Author : Priyatam Yasaswi

Published on Jun 25, 2019 Commentaries 0 Hours ago

‘पोस्ट-ट्रूथ’सारख्या संकल्पनांनी प्रभावित झालेल्या आजच्या युगात समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर होत असताना सामाजिक आरोग्य राखण्यासाठी माध्यमसाक्षरता निकडीची झाली आहे.

माध्यम साक्षरता – काळाची गरज

ज्या समाजात सेकंदासेकंदाला सर्वव्यापी माहिती सर्वदूर पोहोचत आहे आणि ‘पोस्ट-ट्रूथ’सारख्या संकल्पना दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहेत, तिथे माहिती ग्रहण करणाऱ्यांची जागृती वाढवणे आणि ‘माहिती’ ही संकल्पना नेमकी काय आहे याची समज वाढवणे अत्यावश्यक आहे. काही एक विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी माहिती निर्माण करणे आणि ती पसरवणे ही काही आत्ता विशेष बाब राहिलेली नाही. राजकीय, वैचारिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात अफवा पसरवणे किंवा खोट्या बातम्या पसरवणे हा चिंतेचा विषय बनला आहे.

समाजमाध्यमांनी सुसज्ज असलेल्या किंवा सर्वज्ञ समजल्या जाणाऱ्या इतर मेसिंजिंग नेटवर्क्सच्या काळात , मोठ्या प्रमाणात माहिती पाठवणे हे फक्त विचारवंत किंवा प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित काम राहिलेले नाही. अशावेळी माहितीच्या या प्रचंड प्रवाहाला रोखणे निव्वळ अशक्य गोष्ट आहे.

अशा काळात अशी माहिती गाळून घेणे, त्याचे विश्लेषण करणे आणि जर माहिती खोटी किंवा चुकीची वाटत असेल तर ती नाकारता येणे यासाठी माहिती ग्रहण करणाऱ्यांच्या हाती काही ठोस साधने हवीत. अगदी तरुण वयात जेंव्हा अशा माहितीचा मारा सुरु होतो त्याच काळात याचा सराव होणे गरजेचे आहे. कल्पना आणि तथ्ये यांच्यातील फरक ओळखता येण्यासाठी, अध्यापन आणि शिकण्याच्या परिस्थितीतच हे तंत्र आत्मसात करता आले पाहिजे, म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश असणे अत्यावश्यक आहे.

स्मार्टफोन्स आणि टॅबलेटचा वापर कॅन्सर सारखा फोफावलेला आहे, म्हणजेच सध्याच्या तरुणाईकडे जलद माहिती मिळवण्याची साधने पूर्वीपेक्षा सहज उपलब्ध आहेत. २०१६ मध्ये स्टँडफोर्ड हिस्ट्री एज्युकेशन ग्रुपने केलेल्या एका संशोधन अभ्यासादरम्यान हे स्पष्ट झाले की, आजचे विद्यार्थी सोशल मीडिया वापरण्यात तरबेज असले तरी, स्थानिक स्पॉन्सर्ड जाहिराती आणि वृत्त कथा यात त्यांना फरक करता येत नाही. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, विद्यार्थ्यांना अचूक माहिती मिळवण्याच्या मार्गात निर्माण होणार्या अडथळ्यांना योग्य दिशा देता येत नाही. काही राष्ट्रांनी या समस्येचे निदान त्वरेने केले आणि गेल्या काही वर्षांत त्यांना अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे.

उदाहरणार्थ, २०१४ नंतर, फिनलंडमध्ये (जगातील सर्वात चांगली सार्वजनिक शिक्षण व्यवस्था या देशात आहे), एक अँटी-फेक न्यूज ड्राईव्ह विकसित केले, ज्याच्या मुळ उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तर्काधिष्ठित विचारसरणी आणि विवेकी क्षमता रुजवणे हाच आहे. २०१६ च्या आयइए आंतरराष्ट्रीय नागरी आणि नागरिकत्व शिक्षण यांच्यावतीने करण्यात आलेल्या संशोधनानुसार फिनलंडमधील ८२% शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये तर्काधिष्ठित विचारसरणी आणि स्वतंत्र विचार करण्याची कुवत निर्माण करण्यात यशस्वी ठरले, हे त्यांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. सत्यस्थितीचे संशोधन करणाऱ्या विविध संघटना आणि/किंवा बाहेरचे तज्ज्ञ यांच्या सहयोगाने त्यांनी विविध  प्रकारचे घटक विकसित करून त्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तर्कबुद्धी विकसित होऊन चुकीच्या माहितीचे खंडन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित झाली. यामध्ये एखादा चालू घडामोडीतील विषय घेऊन त्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, जिथे प्रश्न विचारण्याची मुभा असेल आणि चुकीच्या गोष्टीचे खंडन करण्याची क्षमता निर्माण होईल, जो फक्त ‘एक वृत्ती’ यापुरता मर्यादित न राहता तो नित्य सवयीचा भाग बनेल, अशा वातावरणाची निर्मिती करणे अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला. याचप्रमाणे सप्टेंबर २०१८ मध्ये, अमेरिकन पब्लिक स्कूल मध्ये देखील माध्यम साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी देखील एक कायदा संमत केला.  राज्य सिनेटचे सदस्य बिल डॉड्ड यांनी या विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता, यामध्ये राज्यातील शिक्षण विभागाला असे आदेश देण्यात आलेत की,  माध्यम साक्षरता निर्माण करण्यासाठी गरजेची ती निर्देशित संसाधने पुरवण्यात यावीत आणि त्याप्रमाणे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे.

भारतासारख्या देशात, जिथे माहितीची सत्यता ही एक अतिदुर्मिळ बाब होत चालली आहे, तिथे शालेय स्तरावर माध्यमसाक्षरतेचा समावेश करण्याबाबत अगदी त्रोटक चर्चा सुरु आहे.

आयसीटी एकीकडे शिक्षणाच्या अवकाशात  वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवे मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु, कार्यक्षम तंत्रज्ञान कौशल्य आणि साक्षरता यांना एकत्र गुंफता येणार नाही. माहितीच्या प्रवाहाला भौगोलिक सीमा पार करणे कठीण नाही, माहिती ग्रहण करताना वस्तुनिष्ठ विचार करणे अत्यावश्यक आहे.

भारतातील शिक्षण व्यवस्था फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर आणि घोकंपट्टी करून शिकण्यावरच पूर्णतः बेतलेली असल्याने हा व्यापक गतिशील विचार समजावून घेण्यास ही शिक्षणव्यवस्था सज्ज नाही. सुरुवातच करायची झाल्यास, अजूनही प्रशासकीय पातळीवर देखील म्हणावी तितकी या समस्येच्या तीव्रतेची जाणीव झालेली नाही. यातच भर म्हणजे, जास्तीत जास्त शिक्षक हे डिजिटल क्षेत्रापासून दूर आहेत, तंत्रज्ञानाच्या वापराशी असणारी ओळख ही देखील एकमोठी अडचण आहे. त्यातच प्रचलित समाजव्यवस्थेत, वर्तमानपत्रात छापून आलेल्या किंवा टीव्हीवरून सांगितल्या जाणार्या किंवा अगदी व्हॉटसपवरून फोरवर्ड केलेल्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची आपली संस्कृती आहे, या माहितीच्या सत्यतेबाबत कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही. ही सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर सुधारणा होणे आवश्यक आहे.

सगळ्यात आधी राज्य शिक्षण विभागाने माध्यम साक्षरतेचे महत्व ओळखून शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश करणे गरजेचे आहे. या संदर्भात, केंद्र सरकारचे दिशानिर्देश देखील उपयुक्त ठरतील. याबाबतीत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी या विषयातील तज्ञांची समिती स्थापन करून त्यांच्या सहाय्याने  अभ्यासक्रमातील विविध विभागांची आखणी करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला पाहिजे. अशा समित्यांमध्ये ज्यांनी माहिती सत्यता पडताळण्यासाठी काही ठोस यंत्रणा उभी केली असेल, असे विद्यमान चिकित्सक तसेच सत्यस्थिती पडताळणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असावा. सगळ्यात  महत्त्वाची बाब म्हणजे, अशी समिती ही राज्य किंवा विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित असावी, जेणेकरून त्यांच्या विद्यार्थ्यांशी निगडीत आणि संदर्भ असणारे घटक ते अभ्यासक्रमामध्ये आणू शकतील.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यार्थ्यांच्या विकासात आई-वडील किंवा निकटवर्तीय जे पालक असतील त्यांची भूमिका देखील महत्वाची असते. विद्र्यार्थ्याच्या घरी जर याबाबत संभाषण होत असेल तर, विद्यार्थ्यामध्ये विश्लेषणात्मक संस्कुती रुजवणे कठीण आहे. विद्यार्थ्यांमध्ये जरी इंटरनेटचा सर्रास वापर होत असला तरी, पालक आणि कुटुंब हेच त्यांचे माहितीचे विश्वासू स्रोत असतात असे अलीकडेच झालेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. म्हणूनच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासोबतच, प्रसारित होणार्या माहितीबाबत थोडीशी संशयाची शक्यता असू शकते याबाबत पालकांमध्ये देखील जागृती करणे गरजेचे आहे. पालक-शिक्षक मिटींग्ज, शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून याबाबत संवाद साधता येणे शक्य आहे.

तिसरी महत्वाची बाब म्हणजे याबाबतीतचा अभ्यासक्रम हा औपचारिक होणार नाही याची खबरदारी घेणे. माहिती एकाच माध्यमातून प्रसारित होत नसते, या क्षेत्रात दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा आणि प्रचलित काळात  माहिती प्रसारीत करण्याचा जो काही नमुना असेल त्यामध्ये सुसंगती साधण्याची गरज आहे.

उदाहरणार्थ, मुले जर व्हॉट्स्अॅप आणि ट्विटरच्या माध्यमातून माहिती मिळवत असतील तर, वर्तमानपत्रात छापून येणारा कोणता मजकूर पैसे देऊन छापून आणला आहे हे शिकवत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी, विद्यार्थ्यांना कसा विचार करावा आणि कशा पद्धतीने विश्लेषण करावे हे शिकवताना, अशा घटकातून शक्य असेल ती (चूक किंवा बरोबर) स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अलीकडे प्रसारीत झालेल्या माहितीचा संदर्भासह वापर करावा.

शेवटी, माहितीबाबत अशा पद्धतीने साशंक होण्याच्या प्रवृत्तीला चालना देत असताना ही वृत्ती वेडगळपणात परावर्तित होणार नाही याची दक्षता घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. कसलेही निर्बंध नसलेल्या या माहितीच्या प्रवाहाचे सगळे घातक परिणाम साधण्यासाठी, सर्व प्रकारच्या माध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे माहितीचे लोकशाहीकरण झालेले असून, त्याची व्याप्ती, वैविध्य आणि शिरकाव वाढला आहे. फसवणूक होण्याच्या भीतीने शिकण्याची उत्सुकता किंवा माहिती करून घेण्याच्या जिज्ञासेवर मात करता कामा नये. खरे तर, माहिती मिळवण्याची प्रवृत्ती ही माहितीचे विश्लेषण करण्याची पूर्वपायरी आहे. सोबतच माध्यम साक्षरता म्हणजे माध्यमांवरील नियंत्रण नव्हे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एकाच माहितीच्या स्रोतावर अवलंबून राहण्याचे आणि इतर पर्यायांकडे दुर्लक्ष करण्याचे  निर्देश देता कामा नयेत. अशा पद्धतीचे निर्णय हे ज्ञानाधारित पद्धतीने घेता आले पाहिजेत हाच यामागचा उद्देश आहे. जिथे चुकीची माहिती आणि अपप्रचार मोहिमांचा सामाजिक प्रश्नावर आणि अगदी राष्ट्रीय निवडणुकीवर देखील परिणाम होत असेल अशा काळात, माहिती गोळा करणे, तिचे अवलोकन करणे आणि तिचे विश्लेषण करणे या तिन्ही गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे अत्यंत आवश्यक आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.