Originally Published December 19, 2022 Published on Dec 29, 2022 Commentaries 0 Hours ago

अवकाशातील शस्त्रीकरणाबाबतची सध्याची वाटचाल ही शांतता आणि अवकाश प्रवेशाला बाधा आणणारी आहे.

एसॅट चाचणीवरील बंदी महत्त्वाची का आहे ?

विनाशकारी काइनेटिक अँटी-सॅटलाइट (एसॅट) चाचण्यांवरील जागतिक स्थगितीला पाठिंबा वाढत आहे. काही दिवसांपूर्वी, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (यूएनजीए) एक ठराव संमत केला होता ज्यात कायनेटिक एसॅट चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. अवकाशातील सुरक्षितता आणि स्थैऱ्याबाबत एसॅट चाचण्यांच्या परिणामांची चिंता वाटणाऱ्या युनायटेड स्टेट्ससह इतर अनेक देशांनी हा ठराव प्रायोजित केला होता. या प्रक्रीयेत तब्बल १५५ देशांनी ठरावाच्या समर्थनार्थ मतदान केले, नऊ देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले आणि नऊ देश अनुपस्थित राहिले. बेलारूस, बोलिव्हिया, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, चीन, क्युबा, इराण, निकाराग्वा, रशिया आणि सीरिया या देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले तर भारत, लाओस, मादागास्कर, पाकिस्तान, सर्बिया, श्रीलंका, सुदान, टोगो आणि झिम्बाब्वे हे नऊ देश या प्रक्रियेत गैरहजर राहिले. मतदानाची पद्धत यूएन फर्स्ट कमिटीच्या आधीच्या याच मुद्द्यावर झालेल्या मतदानासारखीच होती पण त्याला एक अपवाद होता, तो म्हणजे, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकने पहिल्या समितीमध्ये ठरावाच्या बाजूने मतदान केले होते परंतु यूएनजीएच्या मतदानात या ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

एसॅट चाचणी बंदी हा ठराव कोणत्याही राष्ट्रावर बंधनकारक नाही. राष्ट्रांना एसॅट चाचण्या थांबवण्याचे आणि पुढील वाटचालीत अवकाशातील शस्त्रास्त्रांच्या शर्यतीला प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियांमध्ये योगदान देण्याचे आवाहन या ठरावात करण्यात आले आहे. ७ डिसेंबर रोजी पास झालेल्या एसॅट चाचणी-बंदीच्या ठरावासोबत,  नो फर्स्ट प्लेसमेंट ऑफ वेपन इन आऊटर स्पेस (एनईपी) यासह आणखी अनेक अवकाश- आणि आण्विक-संबंधित ठराव होते. आतापर्यंत हाती आलेल्या अहवालांनुसार, एसॅट चाचणी-बंदीच्या ठरावात असे म्हटले आहे की एसॅट चाचण्या करण्यापासून संयम बाळगणे हा अवकाशातील वातावरणास होणारे नुकसान टाळण्यासाठी एक तातडीचा व  प्रारंभिक उपाय आहे तसेच अवकाशातील शस्त्रास्त्र शर्यतीला प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या विकासास हातभार लावणे निकडीचे आहे. हा ठराव म्हणजे अंतराळातील शस्त्रांस्त्र धोके कमी करण्याच्यादृष्टीने पुढील पावले विकसित करण्यासाठीच्या व्यापक प्रयत्नांचे समर्थन आहे.

एसॅट चाचणी-बंदीच्या ठरावात असे म्हटले आहे की एसॅट चाचण्या करण्यापासून संयम बाळगणे हा अवकाशातील वातावरणास होणारे नुकसान टाळण्यासाठी एक तातडीचा व  प्रारंभिक उपाय आहे तसेच अवकाशातील शस्त्रास्त्र शर्यतीला प्रतिबंधासाठी केल्याजाणाऱ्या उपाययोजनांच्या विकासास हातभार लावणे निकडीचे आहे.

एसॅट चाचणी-बंदीवरील सध्याच्या ठरावाचा उगम हा एप्रिल २०२२ च्या डिस्ट्रक्टीव डायरेक्ट असेंट एसॅट   चाचण्या न करण्याच्या अमेरिकेच्या एकतर्फी निर्णयात आहे. युनायटेड स्टेट्स विनाशकारी डायरेक्ट-असेंट अँटी-सॅटेलाइट क्षेपणास्त्र चाचण्या करणार नाही आणि यात इतर राष्ट्रांनी सामील होण्याचे आवाहन उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी एप्रिलमध्ये केले होते. यांचीच आठवण त्यांनी युएनजीए मतदानानंतर ट्विट करून दिली आहे. आज १५५ देशांनी संयुक्त राष्ट्राच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे हे आंतरराष्ट्रीय मानक स्थापित झाले आहे, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

एप्रिलमध्ये अमेरिकेच्या निर्णयानंतर, आणखी नऊ देशांनी अशा एसॅट चाचण्या न करण्याचे जाहीर केले होते. काही दिवसांपुर्वीच फ्रान्सनेही या संदर्भात आपला निर्णय जाहीर केला आहे.

अवकाश सुरक्षित आणि स्थिर जागा म्हणून राखण्याच्या प्रयत्नात फ्रान्स विनाशकारी डायरेक्ट-असेंट एसॅट चाचण्या घेणार नाही, असे नोव्हेंबरच्या अखेरीस फ्रेंच संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयांनी जाहीर केले आहे. ज्या इतर देशांनी या चाचण्या न घेण्याचे वचन दिले आहे त्यात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे.

अर्थात, रशिया, चीन आणि भारतासह इतर अनेक देशांप्रमाणेच युनायटेड स्टेट्सनेही भूतकाळात अशा डायरेक्ट-असेंट एसॅट चाचण्या केल्या आहेत. ज्यांनी अशा चाचण्या घेतल्या त्यामध्ये संभाव्य दांभिकता असूनही आता त्या थांबविण्याचे आवाहन केले जात आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की अशा चाचण्या अवकाशाच्या शांततापूर्ण वापरासाठी थेट धोका दर्शवणाऱ्या तर आहेतच पण तसेच यांवर जागतिक समुदायातील प्रत्येकजण अवलंबून आहे.

अलिकडच्या वर्षांत, उपग्रहांची सुरक्षा आणि कार्यप्रणाली धोक्यात आणणाऱ्या क्रियाकलापांमध्ये वाढ झाली आहे. १५ नोव्हेंबर २०२१ मध्ये रशियाची जी एसॅट चाचणी केली त्यात कॉसमॉस १४०८ हा उपग्रह नष्ट करण्यात आला होता. चाचणीने सुमारे १८०० ट्रॅक केलेले स्पेस डेब्रिजचे तुकडे तयार झाले. आता त्याव्यतिरिक्त तयार झालेल्या तुकड्यांना ट्रॅक करणे कठीण आहे. कॉसमॉस १४०८ हे १९८२ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते आणि २०२१ पर्यंत ४८५ किलोमीटरच्या कक्षेत निकामी झाले होते.

या चाचणीची पुष्टी करताना, स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस असे म्हणाले की रशियन फेडरेशनने बेपर्वाईने स्वत: च्या एका उपग्रहावर थेट-आरोहण विरोधी उपग्रह क्षेपणास्त्राची विनाशकारी उपग्रह चाचणी केली आहे. या चाचणीने आत्तापर्यंत १५०० पेक्षा जास्त ट्रॅक करण्यायोग्य ऑर्बिटल डेब्रिजचे तुकडे आणि लहान ऑर्बिटल ढिगाऱ्याचे लाखो तुकडे तयार केले आहेत जे सर्व राष्ट्रांच्या हिताला धोका निर्माण करणारे आहेत तसेच या चाचणीमुळे एक मोठे डेब्रिज फिल्ड निर्माण झाले आणि यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांसाठी धोका निर्माण झाला आहे. ही रशियन कृती बेजबाबदार आहे, आणि त्यामुळे अवकाशात मोठा धोका निर्माण झाला आहे. ओपन एंडेड वर्किंग ग्रुपसारखे अनेक उपक्रम युएनमध्ये सुरू आहेत. एसॅट चाचणी बंदी प्रमाणे, हे व्यापक अंतराळ सुरक्षा अजेंडावर प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे. ओईडब्ल्युजीने आत्तापर्यंत दोन सत्रे आयोजित केली आहेत, परंतु याचा परिणाम कसा होईल हे आताच ठरवणे उचित ठरणार नाही. ओईडब्ल्यूजी हे युएनजीएच्या प्रक्रियेतुन आलेले आहे. युएनमध्ये शस्त्रास्त्र नियंत्रण आणि नि:शस्त्रीकरणाचे काम जिवंत ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न होत आहे. कायदेशीर उपाय असो किंवा नियम, अवकाश पूर्णपणे युद्धक्षेत्र बनण्याआधी राज्यांना लहान प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागणार आहेत.

अलिकडच्या वर्षांत, उपग्रहांची सुरक्षा आणि कार्यप्रणाली धोक्यात आणणाऱ्या क्रियाकलापांमध्ये वाढ झाली आहे. १५ नोव्हेंबर २०२१ मध्ये रशियाची जी एसॅट चाचणी केली त्यात कॉसमॉस १४०८ हा उपग्रह नष्ट करण्यात आला होता.

एसॅट्स आणि इतर काउंटर-स्पेस क्षमतांच्या विकासाचा पाठपुरावा करणाऱ्या अधिक देशांसह बिघडत चाललेली सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता पुढील एसॅट चाचण्या थांबवण्यासाठी सध्याच्या उपक्रमात अधिक देशांनी सामील होण्याची वेळ आली आहे. एसॅट्स हा जरी तात्काळ चिंतेचा विषय असला तरी अंतराळ, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धांकडे देखील तितकेच लक्ष देण्याची गरज आहे. जोपर्यंत देश एकत्र येण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेत नाहीत आणि अंतराळ शस्त्रीकरणाच्या संदर्भात सध्याच्या ट्रेंडला थांबवण्याच्या मार्गांवर कार्य करत नाहीत, तोपर्यंत अवकाशातील शस्त्रीकरणाबाबतची सध्याची वाटचाल ही शांतता आणि अवकाश प्रवेशाला बाधा आणणारी आहे.

हे भाष्य मूळतः The Diplomatमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.