Author : Nilesh Bane

Originally Published November 13 2018 Published on Jul 17, 2023 Commentaries 0 Hours ago

हेरिटेज म्हटले की फक्त जुन्या इमारती आणि स्मारकेच डोळ्यापुढे येतात. पण हेरिटेज हा विषय फक्त इमारती आणि स्मारकांपुरता मर्यादीत नाही. या दगडमातीपलिकडल्या हेरिटेजविषयी.

दगडमातीपलिकडल्या ‘हेरिटेज’चे काय?
दगडमातीपलिकडल्या ‘हेरिटेज’चे काय?

बहारीनमधील मनामा येथे झालेल्या युनेस्कोच्या परिषदेत दक्षिण मुंबईतील ९४ व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींच्या समुहाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली. मुंबईसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे महाराष्ट्र हा सर्वाधिक म्हणजे पाच युनेस्को प्रमाणित जागतिक वारसास्थळे असलेले राज्य ठरले असून, मुंबई हे तीन वारसस्थळे असणारे एकमेव शहर ठरले आहे.

याआधी अजंठा (औरंगाबाद), वेरूळ (औरंगाबाद), एलिफंटा (मुंबई), आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत (मुंबई) आदींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. त्यामुळे भारतात असलेल्या युनेस्को प्रमाणित जागतिक वारसास्थळांची संख्या ३७ झाली आहे. या नव्या यशासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदनच करायला हवे. पण या सन्मानासोबत हा वारसा जपण्यासाठी काय करायचे आणि एकंदरितच वारसा (हेरिटेज) म्हणजे काय हे समजून घेण्याची वेळ आली आहे.

आज आपल्याला हेरिटेज म्हटले की फक्त जुन्या इमारती आणि स्मारकेच डोळ्यापुढे येतात. पण हेरिटेज हा विषय फक्त इमारती आणि स्मारकांपुरता मर्यादीत नाही. युनेस्कोसुद्धा याकडे फक्त दगडमातीच्या इमारतींपुरता विचार करत नाही. युनेस्कोची जागतिक वारसा यादी ही मूर्त (टॅन्जिबल) आणि अमूर्त (इन्टॅन्जिबल) अशा दोन्ही स्वरूपाची असते. टॅन्जिबल हेरिटेजच्या यादी इमारती, स्मारके आदींचा समावेश होतो, तर इनटॅन्जिबल यादीमध्ये उत्सव, भाषा, प्राणी, परंपरा, संगीत, हस्तकला आदींचा समावेश होतो.

भारताबाबत जेव्हा आपण अशा इनटॅन्जिबल हेरिटेजचा म्हणजे अमूर्त जागतिक वारशाचा विचार करतो तेव्हा आपल्याला कितीतरी गोष्टी आठवतात. खरं तर अशा अनेक गोष्टी भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत. पण आज युनेस्कोच्या यादीत यातील अगदी मोजक्या गोष्टी आहेत. पारशी नववर्ष सण असलेला नवरोज, केरळातील संस्कृत नाट्यपरंपरा असलेले कुडियट्टम, वेदिक मंत्रपठण, योग, रामलीला, कुंभमेळा अशा निवडक गोष्टी सोडल्या तर या यादीत भारत फारसा दिसत नाही. या उलट चीन, जपान, आफ्रिकन देशांची बरीच मोठी यादी येथे आढळते. ज्या गोष्टींचा उल्लेख या यादीमध्ये आहे, त्याबद्दलही आपल्या देशात किती जागृती आहे?

भारततील प्रत्येक राज्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांची नोंद या यादीमध्ये होऊ शकते. अगदी महाराष्ट्राबद्दल सांगायचे तरी एकमेवोद्वितीय असणाऱ्या आणि शतकानुशतके सुरू असणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. उदाहरण द्यायचे तर चीनमध्ये होणारा ड्रॅगन बोट फेस्टिवल हा युनेस्को हेरिटेज असू शकतो, तर लक्षावधी लोकांचा सहभाग असणारी आणि सातशे वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली पंढरपूरची वारी ही का असू शकत नाही? नायजेरियातील गेलेडे(Gẹlẹdẹ) हा मुखवट्यांचा खेळ जर हेरिटेज असू शकतो तर महाराष्ट्रातील दशावतार किंवा कर्नाटकातील यक्षगान का हेरिटेज असू शकत नाही.

आज अर्बन हेरिटेज किंवा नागरी वारसा हा महत्वाचा विषय बनला आहे. मुंबईसारख्या कॉस्मोपोलिटन शहरातही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्याकडे ढुंकुनही पाहायला मुंबईकराला वेळ नाही. मुंबई ज्या समुद्र किनाऱ्यावर वसली आहे, त्या किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी समुदायाने, आपल्या परंपरांसह आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्यांचे उत्सव, देवता, परंपरा शेकडो वर्षांनंतर आजही अबाधित आहेत. नारळी पौर्णिमा हा उत्सव तर आज कोळी समुदायापलिकडे जाऊन मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनला आहे.

समुद्र किनाऱ्याचा विषय सुरू आहे म्हणून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडता येतो तो असा, की संस्कृती, परंपरा या सीमांनी बांधून ठेवता येत नाहीत. त्यामुळे या परंपरा, देवता दूरदूरपर्यंत पोहचतात. मानवी स्थलांतराचे, धारणांच्या प्रवाहाचे हे धागे माणसाची गोष्ट वारंवार अधोरेखित करतात. उदाहरण द्यायचे तर मुंबईतील वर्सोव्याच्या किनाऱ्यावर असलेली हिंगलाई देवी आणि पाकिस्तानातील हिंगलाज देवी यांचा धागा जोडता येतो. या हिंगलाज देवीचे आणखीही काही स्थाने मुंबईत आहेत. भारत-पाकिस्तानला समुद्रमार्गे जोडणारा हा वारसा किती जणांना ठावूक आहे?

मुंबईच्या दमट हवामानाबद्दल इंग्रजी पत्रव्यवहारात, पुस्तकांमध्ये अनेक उल्लेख सापडतात. मुंबईच्या याच दमट हवामानाला कंटाळून दर उन्हाळ्यात इंग्रज आपल्या कुटुंबासह माथेरान, लोणावळा, खंडाळा येथे जात. या दमट हवामानाची आणखी एक प्राचीन खूण सापडते ते मुंबईतील काही मंदिरांमध्ये. वरळीच्या केदारेश्वर मंदिरात तसेच प्रभादेवीच्या आणि शीतलादेवीच्या मंदिरात आपल्याला खोकलाई मंदिर आढळते. दमट हवामानामुळे वारंवार होणारा खोकल्याचा त्रास दूर व्हावा म्हणून या खोकलाईची पूजा केली जाते. आज औषधोपचाराचे महत्व वाढले असले तरी खोकलाईचा पूजा आजही सुरू आहे. मुंबईच्या आरोग्याचा इतिहास सांगणारी ही परंपरा युनेस्कोची हेरिटेज होऊ शकली नाही तरी, अर्बन हेरिटेज म्हणून नक्कीच नोंदवून ठेवता येईल.

वारसा मग तो मूर्त असो अमूर्त तो जपायला हवा, याची जाणीव या याद्या करून देत असतात. प्रत्येक गोष्ट ही युनेस्कोच्या यादीत असायला हवी अशी नाही. प्रत्येक शहराची स्वतःची एक वारसा यादी असते. मुंबईसह अनेक शहरातील महानगरपालिका त्यासाठी स्वतंत्र विभागही नेमते. पण या विभागातर्फे होणारे काम हे लोकांपर्यंत किती पोहचते हा अभ्यासाचा विषय ठरेल. मुंबईसारख्या शहराची ही यादी बनविताना फक्त दगडमातींच्या वास्तू न पाहता, शहरातील विविध सांस्कृतिक, धार्मिक, भाषक गोष्टींचाही त्यात विचार व्हायला हवा.

मुंबई महापालिकेच्या अर्बन हेरिटेजच्या यादीत अशा किती इनटॅंजिबल गोष्टी आहेत? मुंबईसारख्या शहराची हेरिटेज यादी आजही वास्तूंनी आणि स्मारकांनी भरलेली आहे. या वारसास्थळांची दर्जानुसार यादी करण्याव्यतिरिक्त फारसे अधिकारही या समितीकडे नाहीत. या समितीमध्ये वास्तुविशारदांसोबत लेखक, कलाकार, इतिहासतज्ज्ञ, संस्कृतीचे अभ्यासक यांचाही समावेश असायला हवा. ही समिती ही फक्त कागदी वाघ न राहता, तिच्याकडे काही निश्चित अधिकार हवेत, पुरेसा निधी हवा. अन्यथा ही हेरिटेज यादी फक्त शोभेची बनून राहील.

आज जगभरातील अनेक देश आपल्याला युनेस्कोतर्फे मिळालेल्या जागतिक वारसा सन्मानाचा पर्यटनासाठी उत्तम वापर करून घेतात. तसेच पोकळ अभिमान दाखविण्यापेक्षा, पर्यटन वाढून आर्थिक भरभराट होण्यासाठी हे देश त्यांचा वारसा ‘जागतिक वारसा’ यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडे आज फक्त वास्तूविशारदांच्या समुहात याबद्दल जागरूकता दिसते. त्यामुळेच आपल्या इमारतींना हे स्थान मिळताना गेल्या काही वर्षांमध्ये दिसते आहे. पण सांस्कृतिक, कला, भाषा क्षेत्रात मात्र याबद्दल काहीच जागृती नाही, असे खेदाने म्हणावे लागते. त्यामुळे युनेस्कोसारख्या जागतिक यादीत आपल्याला कसे स्थान पटकाविता येईल, याचे नियोजन कसे करावे, याबद्दल या समुहांनी आणि सरकारनेही फेरविचार करायला हवा.

आज युरोपमधील लंडन, रोम, पॅरीस अशा शहरांना भेट देण्यासाठी जसे पर्यटक गर्दी करतात, तसेच चीनमधला पेकिंग ऑपेरा पाहायला आणि ब्राझिलमधला कार्निवल पाहायलाही गर्दी करतात. जर आपण आपल्या इमारतींप्रमाणेच या अमूर्त वारशाकडे ‘हेरिटेज’ म्हणून पाहू शकलो, तर पर्यटनावर आधारित नवी अर्थव्यवस्था उभी करू शकू. जेव्हा या पद्धतीने पर्यटन आणि त्यावर आधारित अर्थकारण उभे राहते. तेथे प्रवास, गाइड, कलाप्रदर्शन, रेस्टॉरंट, बेड अँड ब्रेकफास्ट, होस्टेल, सोवेनिअर इत्यादी माध्यमांतून रोजगाराची साधने उभी राहतात. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जोरावर स्थानिक रोजगार उभे राहू शकतात. त्यामुळे आज देशातील बेरोजगारांची संख्या वाढत असताना आणि आर्थिक वाढीचा दर घसरत असताना हा दृष्टिकोन अर्थव्यवस्थेला नवे बळ देऊ शकेल.

दुर्दैवाने, आज संस्कृती, सांस्कृतिक विभाग हे फक्त दिखाव्याचे विषय ठरले आहेत. आज आपल्या शहरांमध्ये निश्चित असे सांस्कृतिक धोरण नाही. त्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र अर्बन कल्चर आणि आर्ट कमिशन हवे असे मुख्यमंत्र्यांनी ओआरएफच्या कार्यक्रमातच जाहीर केले होते. हे कमिशन जेव्हा खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेने कामाला लागणे गरजेचे आहे. आज जगभर ‘सॉफ्ट पॉवर’ या संकल्पनेचा गवगवा आहे. पण, आपण मात्र अद्यापही आपली असलेली ही ‘सॉफ्ट पॉवर’ पूर्णपणे वापरत नाही. म्हणून राजकारणाच्या पलिकडे जाऊन जोपर्यंयत या गोष्टीकडे रोजगार निर्माण करणारी आणि अर्थव्यवस्था बळकट करणारी संधी म्हणून पाहिले पाहिजे.

राजकीय इच्छाशक्तीप्रमाणेच लोकसहभाग हा देखिल यातील महत्वाचा भाग. या साऱ्या हेरिटेजबद्दल लोकांच्या, संस्थांच्या मनात कुतुहल, आकर्षण असते. अनेकदा यातील अनेक गोष्टी त्यांच्या श्रद्धेचाही भाग असतात. त्यामुळे या वारसा संवर्धनाच्या चळवळीत लोकांना, लोकसमुहांना सहभागी करून घ्यायला हवे. शालेय पातळीपासून व्यावसायिक लोकसमूहांपर्यंत अनेकांना या संवर्धन प्रक्रियेत जोडता येईल. आज सर्वत्र क्राउड सोर्सिंग बद्दल बोलले जाते. या लोकसमुहांमधून या कामासाठी निधी उभा राहू शकेल. या वारसास्थळे किंवा वारसा परंपरा जतन करण्यासाठी काही समूहांकडे दत्तकही देता येतील. हे सारे करण्यासाठी गरज आहे, ती सक्षम अशा कायदेशीर चौकटीची.

ही चौकट नव्या सास्कृतिक विचारसरणीतून, धोरणातून मिळणार आहे. म्हणूनच सामाजिक, आर्थिक धोरणासोबत नवे सांस्कृतिक धोरणही तेवढेच आवश्यक आहे. आज हेरिटेज इमारतींच्या रुपाने मिळालेले हे यश आपण या पद्धतीने वृद्धिंगत केले पाहिजे. तरच आपण आपल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची शाळेत घेतलेली प्रतिज्ञा जपली असे म्हणता येईल.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.