Author : Anub Mannaan

Published on Oct 27, 2023 Commentaries 0 Hours ago

मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्यांना त्यांना खेळण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. यासाठीच काम आणि खेळ यांच्यात संतुलन राखणेही महत्त्वाचे आहे.

मुलांना खेळू द्या!

युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड (UNCRC 1989) म्हणजेच मुलांच्या हक्कांसाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत मुलांचे नागरी, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि आरोग्याचे हक्क निश्चित करण्यात आले आहेत. मुलांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्यासाठी 196 देशांनी आपली वचनबद्धता दर्शवली आहे. इतिहासातला हा सर्वात जास्त सहमती असलेला मानवाधिकार करार आहे.

या करारामध्ये मुलांची सुरक्षितता आणि कल्याणासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांसह मुलांचा खेळण्याचा हक्क आणि त्यांच्या विकासात असलेले खेळाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.   कलम 31 मध्ये मुलांना विश्रांती, खेळ आणि मनोरंजक गोष्टींमध्ये रमण्याचा हक्क आहे, असे म्हटले आहे. 2013 मध्ये या खेळण्याच्या अधिकाराच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळाली. यावेळी कलम 31 ची अमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपायांचे तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात आले आणि ते सामान्य टिप्पणी क्रमांक 17 मध्ये समाविष्ट करण्यात आले.

बालपणातील मूलभूत हमींचे संरक्षण करण्यासाठी 196 देशांनी वचनबद्धता दर्शविली आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळाला महत्त्व असल्यामुळेच खेळाच्या अधिकाराला इतक्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. खेळ म्हणजे काय?  ज्या क्रिया मुलांमध्ये पुढाकाराची भावना वाढवतात आणि त्यांना प्रतिसाद द्यायला शिकवतात त्याला खेळ असे म्हणता येईल. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी हाताळण्यासाठी आणि नवेनवे अनुभव घेण्यासाठी संसाधने आणि जागा उपलब्ध होते. खेळामुळे मुलांमधली उत्स्फूर्तता आणि व्यक्त होण्याची क्षमता वाढीस लागते. खेळामध्ये स्वयंप्रेरणा आहे, उत्स्फूर्तता आहे. मुलांना त्यात उपजत स्वारस्य असते. पण याचा अर्थ असा नाही की खेळ ही केवळ मुलांसाठीची मुलांनी चालवलेली क्रिया आहे. पालक आणि मोठी माणसं मुलांच्या खेळात सामील झाली तर त्यांच्यात सुदृढ नातं तयार होतं. त्यामुळेच मुलांचा खेळण्याचा मूलभूत अधिकार जपणे फार महत्त्वाचे आहे.

खेळण्याचे फायदे

मुलांना वेगवेगळ्या खेळांमध्ये गुंतवून त्यांच्या विकासाला संधी दिली तर सामाजिक सलोखा टिकून राहतो आणि परस्पर संबंध सुदृढ होतात. तसेच खेळामुळे संघर्ष कमी करण्यासही मदत करते. खेळ आणि मेंदू विज्ञानाच्या अभ्यासातून असे सूचित होते की खेळाचे फायदे लगेचच दिसून येतात. खेळामुळे   मुलांना त्यांच्या शारीरिक आणि सामाजिक वातावरणाशी सकारात्मक संवाद साधण्यास मदत होते. मुलांनी प्रौढांच्या हस्तक्षेपाशिवाय वेगवेगळे खेळ खेळले तर त्यांना गटांमध्ये कसे काम करायचे याचा अनुभव मिळतो. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण वाढण्यासही मदत होते. काय खेळायचे, कधी खेळायचे आणि कसे खेळायचे हे ठरवण्याच्या प्रक्रियेत सामाजिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.

सध्याच्या काळात लहान मुलांमधला लठ्ठपणा हा एक  चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे बालपणातच सतावणारा लठ्ठपणा हे एकविसाव्या शतकातील सार्वजनिक आरोग्याच्या   गंभीर आव्हानांपैकी एक आहे. यामुळेच निरोगी राहण्यासाठीच्या खाद्याची निवड आणि मुलांसाठीचे वेगवेगळे खेळ हा य़ा समस्येवरचा योग्य उपाय असू शकतो. खेळामुळे शारीरिक व्यायाम होतो, सहनशक्ती विकसित होते, शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि सभोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची मुलांची क्षमताही वाढीस लागते. औपचारिक शारीरिक शिक्षण वर्गापेक्षा सुटीच्या वेळात खेळण्याचे अधिक शारीरिक फायदे आहेत, असे संशोधनात दिसून आले आहे.

प्राण्यांच्या खेळाचे आणि मेंदूच्या विज्ञानाचे अभ्यास असे सूचित करतात की खेळाचे फायदे जवळजवळ त्वरित दृश्यमान आहेत, ज्यामुळे मुलांना त्यांच्या शारीरिक आणि सामाजिक वातावरणाशी सकारात्मक संवाद साधण्यास मदत होते.

मोकळा वेळ आणि आपल्याच वयाच्या मुलांशी साधलेला संवाद याचे सामाजिक, भावनिक आणि मानसिक फायदे आहेत. यातून मुलांची शिकण्याची क्षमता वाढते आणि त्यांचा शैक्षणिक अनुभवही समृद्ध होतो. खेळाचा वेळ आणि शैक्षणिक उपलब्धी यांच्यात थेट संबंध आहे, असेही संशोधनात सिद्ध झाले आहे. शाळेमध्ये सुटीच्या वेळेत केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की शारीरिक हालचाली आणि आपल्याच वयाच्या मुलांशी संवाद यामुळे वाचन, लेखन, शब्दलेखन, गणित आणि मौखिक कौशल्येही सुधारतात. विश्रांतीच्या वेळेत अशा संवादाला वाव मिळाल्यामुळे मुलांचे वर्गातील वर्तन सुधारते. कारण याच वेळेत मुले स्वत:हून चांगल्या सवयी शिकतात.

खेळणे तुम्हाला आनंदी करते. सामाजिक खेळ विविध विकासात्मक उद्देशांसाठी मदत करतात. माणसांचे  मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही याचा उपयोग होतो.  सकारात्मक भावना व्यक्त केल्याने टिकाऊ संसाधने देखील तयार होतात. याउलट मुलांना खेळायला मिळाले नाही तर त्यांच्यात नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक आरोग्याच्या  समस्या उद्भवतात. एका अमेरिकन मानववंशशास्त्रीय अभ्यासकाने नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार, अमेरिकन मुलांचे खेळणे कमी झाल्यामुळे त्यांच्यात मनोविकार बळावले होते.

प्रौढ माणसे जेव्हा खेळ नियंत्रित करतात तेव्हा त्याचे मूल्य कमी होते हेही निदर्शनास आले आहे.  उदाहरणार्थ, शाळेनंतरच्या संवर्धन वर्गांचे फायदे मुलांच्या नेतृत्वाखालील खेळातून मिळणाऱ्या वर्गांपेक्षा खूप वेगळे आहेत. यावरही बराच अभ्यास झाला आहे. लहान मुलांचे खेळणे कमी होते तेव्हाच खेळाचे कौतुक आणि समज वाढीला लागते हाही एक विरोधाभास आहे.

सामाजिक खेळ विविध विकासात्मक हेतूंसाठी कार्य करतो, ज्यामुळे मानसिक कल्याण सुधारते.

मुलांच्या खेळण्याच्या मूलभूत अधिकारावर गरिबी, बालमजुरी आणि युद्ध यांसारख्या विविध कारणांमुळे गदा येते. त्याचबरोबर जिथे संसाधनांची काहीही  अडचण नाही तिथेही खेळण्याचे प्रमाण कमी झालेले दिसते. या घसरणीला कोणतीही एक गोष्ट जबाबदार नाही असेच म्हणावे लागेल. यावर सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांचा एकत्र परिणाम होत असतो.

Bronfenbrenners’s social-ecological model

Bronfenbrenner’s Ecological Systems Theory

ब्रॉन्फेनब्रेनरने मॉडेलचा पहिला स्तर पाहिला तर त्यात मुलांच्या आजूबाजूच्या वातावरणातील दबावांचा समावेश होतो. वाढलेला शैक्षणिक दबाव, शाळेचे मोठे तास, शाळेनंतरचे व्यवहार आणि स्क्रीनवरचा वाढलेला वेळ हे यातले महत्त्वाचे घटक आहेत. शैक्षणिक कामगिरीची शर्यत अगदी लवकर सुरू होते.  उदाहरणार्थ प्राथमिक शाळेआधीच्या शिक्षणात म्हणजे  मुले 2 ते 3 वर्षांची असतानाच त्यांना फळे आणि भाज्यांच्या विविध श्रेणी माहित असणे अपेक्षित असते. त्याचा परिणाम त्यांच्या शाळाप्रवेशावर होऊ शकतो. यामुळे पालक मुलांना शाळा सुरू होण्यापूर्वीच शिकवणी आणि विशेष वर्गात दाखल करतात. शिक्षणाचे तास वाढले की मुलांकडे फारच कमी वेळ उरतो. हा दबाव केवळ शैक्षणिक नसतो. तर या मुलांना  खेळ, संगीत, परदेशी भाषा, नृत्य प्रकार किंवा थिएटर यांचा समावेश असलेली एक यादीच दिली जाते.

शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टीत त्यांना सहभागी व्हावे लागते. मग अशा वेळी प्रौढांनी ठरवलेल्या कार्यक्रमांपलीकडे कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे वेळच उरत नाही. बर्‍याचदा पालक म्हणतात, जर त्यांना आताच या गोष्टी समजल्या नाहीत तर नंतर त्यांना त्यासाठी वेळच मिळणार नाही. पण व्यग्र प्रौढत्वाची तयारी करताना मुलांचे बालपण हरवले जाते हे आपल्या लक्षात येत नाही. तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि स्क्रीन टाइमची वाढती पातळी आहे हीदेखील मोठी आव्हाने आहेत. अशा जीवनशैलीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पालक आणि मुलांकडे एकमेकांसोबत घालवण्याचा दर्जात्मक वेळच उरत नाही.

शैक्षणिक कामगिरीची शर्यत अगदी लवकर सुरू होते; उदाहरणार्थ, प्रीस्कूल मुलांना (2-3 वर्षे वयोगटातील) कठोर शाळा प्रवेश प्रक्रियेसाठी फळे आणि भाज्यांच्या विविध श्रेणी माहित असणे अपेक्षित आहे.

या मॉडेलच्या पुढील स्तरामध्ये विविध घटकांचा समावेश आहे. पालक ज्याबद्दल निर्णय घेतात किंवा घेऊ शकतात असे ते घटक आहेत. खेळाच्या जागांचे व्यापारीकरण आणि घर ते शाळा आणि घर ते क्रीडांगण यांच्यातील वाढलेल्या अंतराचा आर्थिक आणि वेळेच्या बाबतीत परिणाम होतो. यामध्ये तिसऱ्या स्तरात मांडलेल्या घटकांमध्ये मुलाच्या मुक्तपणे खेळण्याच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या अप्रत्यक्ष प्रभावांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, मुलाला प्रत्येक संधीची ओळख करून देण्यासाठी पालकांना पाठवलेले आणि स्मार्टपणे मार्केट केलेले संदेश आणि मुलाला अष्टपैलू बनवण्यासाठी प्रौढांच्या नेतृत्वाखालील समृद्धी कार्यक्रम.    यातल्या शेवटच्या स्तरात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक शक्तींचा समावेश होतो. सामाजिक भांडवल कमी होणे आणि गुन्हेगारीच्या वाढत्या पातळीमुळे मुलांच्या स्वतंत्र हालचालींवर परिणाम होतो. त्यांचा  सार्वजनिक जागांमधला वावरही त्यामुळे कमी होतो. यामुळे मुलांची मुक्तपणे खेळण्याची क्षमता मर्यादित होते. पालक त्यांच्या मुलांना किती तणावमुक्त पद्धतीने वाढू देतात यावर ते वातावरण शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निकोप आहे की नाही ते ठरते.

निष्कर्ष 

मुलांना फारसा मोकळा वेळ न देणे आणि खेळाचा वेळ कमी करणे याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच मुलांना शिकवणे आणि त्यांची जिज्ञासा  आणि सर्जनशीलता नैसर्गिकरित्या वाढू देणे यामध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे. मुलांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण ही केवळ पालकांची जबाबदारी नाही. मोकळा वेळ आणि खेळण्याचा वेळ वाढवण्यासाठी शाळांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट शैक्षणिक धोरण आणि त्याला सांस्कृतिक समर्थनही गरजेचे आहे.

अनुब मन्नान या शिक्षणतज्ज्ञ आणि सल्लागार आहेत. त्यांनी यापूर्वी भारतातील मानवाधिकार आणि बाल हक्क क्षेत्रात स्वतंत्र सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.