Author : Nilesh Bane

Published on Jun 05, 2020 Commentaries 0 Hours ago

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्गाशी असलेले आपले नाते पुन्हा एकदा समजून घेतले तर, भविष्यात लॉकडाऊनचा हा ‘कारावास’ पुन्हा माणसाच्या वाट्याला येणार नाही.

कोरोनाला हरवून पुन्हा जोडू मातीशी नाते

आज प्रत्येकजण लॉकडाऊनच्या चार भिंतीमध्ये वैतागलेला आहे. मोकळे आकाश, हिरवीगार वनराई, थंडगार वारा आणि त्यावर बोनस म्हणून रिमझिम पाऊस मिळाला तर प्रत्येकालाच हवा आहे. पण, आज कोरोनाने या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवले असून, प्रत्येकजण छताकडे बघत मनातल्या मनात अस्वस्थ आहे. निसर्गाने दिलेली केवढी मोठी शिक्षा आपण भोगतो आहोत, याची जाणीव प्रत्येकालाच आतल्याआत टोचते आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्गाचे आणि आपले असलेले हे नाते, पुन्हा एकदा समजून घेतले तर कदाचित भविष्यात असा ‘कारावास’ माणसाच्या वाट्याला येणार नाही.

भारतीय परंपरेत बाळाची नाळ जमिनीत पुरतात. आईच्या गर्भात बाळाला आईशी जोडून ठेवणारी, त्याचे पोषण करणारी नाळ, बाळाचा जन्म झाल्यानंतर वेगळी केली जाते. त्यानंतर ती जमिनीत पुरताना त्यामागे उदात्त भावना असतात. ‘ हे बालका, आता तू स्वतंत्र जीव म्हणून वावरणार आहेस. यापुढे ही भूमी, ही भूमाता, ही निसर्गदेवता, हीच आता तुझे पोषण करणार आहे.’ हे सांगणारी ही छोटीशी कृती किती अर्थवाही आहे. दुर्दैवाने आम्ही आज हा अर्थही विसरलोय आणि कृतीही. या भुतलावर माणसाचे माणूस म्हणून असणे हीच मुळात निसर्गाशी जोडलेली नाळ आहे. निसर्गाशी जोडलेली ही नाळ समजून घेतली, तर पर्यावरणाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची गरज उरणार नाही.

इथे एक गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट आहे कोकणातील एका गावाची. या गावात दरवर्षी एक अनोखी पूजा होते. त्या दिवशी वाडीतले सगळेजण वाडीला पाणी देणाऱ्या झऱ्यावर जातात. या झऱ्यावरून गावात पाटाने पाणी येते. त्या पाटाच्या बऱ्याच वर असलेल्या या झऱ्यावर वाडीतली सारी माणसे एकत्रितरित्या जातात. तिथे एका कोपऱ्यात घुंगरू लावलेली काठी आणि नवी कोरी पायताणे ठेवली जातात आणि परंपरेनुसार पूजा होते. वाडीतले सारे तिथे गाऱ्हाणे घातलात. पाण्याची पवित्रता जपू असे वचन तिथल्या ठिकाणदाराला (स्थानदेवतेला) देतात आणि पुढल्या वर्षी पुन्हा असेच वचन द्यायला येऊ याची ग्वाहीही देतात.

पुढील वर्षभर हे वचन पाळले जाते. कुणीही पाटाच्या वरील पाण्यात घाण करत नाही, चुकून काही पालापाचोळा पडला असेल तर लगेच सफाई केली जाते, आसपास कुठेही प्रातर्विधी वगैरे होत नाही, दारू पिऊन-पान खाऊन आसापास कोणी फिरकतही नाही. हे सारे कशासाठी? तर तिथला ठिकाणदार काठी घेऊन सगळे बघतोय म्हणून. या पाण्यावर मालकी त्याची आहे. तो आपल्याला पाणी वापरायला देतोय. त्यामुळे आपण या पाण्याचे मालक नाहीत. हे पाणी जसे आहे, तसेच आपण राखायचे आहे. पुढील पिढीकडे सोपवायचे आहे. नाही तर, आपल्याला ठिकाणदाराच्या काठीचा प्रसाद मिळेल, आपल्याला शिक्षा होईल, काहीतरी वाईट घडेल. ही भिती कुणाला त्या जलस्रोताची नासाडी करण्याचे दुःसाहस करू देत नाही.

आता या परंपरेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता येते. कुणाला हा श्रद्धेचा सकारात्मक परिणाम वाटेल तर कुणी म्हणेल, चांगले वागण्यासाठी ठिकाणदार वगैरे अस्तित्वात नसलेल्या संकल्पना जपणे म्हणजे ही अंधश्रद्धा आहे. कुणी म्हणेल जलस्रोत जपायला हवेत, हे तर आपल्या राज्यघटनेमध्ये लिहिलेले आहे. गावाने ते पाळायलाच हवे. त्यासाठी उगीच पूजा वगैरे औपचारिकता कशासाठी? भिती हवीच तर कायद्याची हवी,न दिसणाऱ्या देवाची कशाची हवी?…अशी ही चर्चा कितीही आणि कशीही होऊ शकते. पण, गंगेपासून सार्वजनिक नळापर्यंत कोणत्याही जलस्रोताची काळजी कायद्याची भितीने घेतली जात नाही, ती एका परंपरेच्या भितीने घेतली जाते हे वास्तव कुणालाच नाकारता येत नाही.

मानवी वर्तन फक्त कायद्याने नियंत्रित होऊ शकत नाही, याची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.याउलट ज्या गोष्टीवर माणसाची श्रद्धा असते, तिथे ठरवूनही माणूस अनिष्ठ वागत नाही, असेही अनेक ठिकाणी दिसते. हे सारे कसे उलगडायचे? सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास यासाठीच महत्वाचा ठरतो. परंपरा, संस्कृती, धर्म यासारख्या संकल्पना समाजाची ही मानसिकता अनेकदा अचुकपणे हेरतात. त्यामुळेच माणूस कोणत्याही कायद्यापेक्षा या संकल्पनाच्या अधिन असल्याचे बहुसंख्यवेळा आढळते.

कायद्याला दुय्यम आणि परंपरा, संस्कृती, धर्म आदींना श्रेष्ठ ठरविणे, हा एवढे सारे मांडण्याचा उद्देश नाही. मानवी उत्क्रांतीचा विचार करताना व्यक्ती आणि समष्ठी (समाज) यांच्यातील नाते स्थिर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक टप्प्यावर झाला आहे. मुळातच व्यक्ती आणि अनेक व्यक्तींची मिळून समष्ठी बनत असली तरी या दोन्ही घटकांमध्ये अनेकदा परस्पविरोधी प्रेरणा कार्यरत असतात. व्यक्तीला अनेकदा जे हवे असते ते समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी त्रासदायक असते. त्यामुळे समाज म्हणून जगत असताना, व्यक्तीला अनेकदा स्वतःला शिस्त लावावी लागते. ही शिस्त लावण्यासाठी उभी राहिलेली ‘कायदा’ नावाची व्यवस्था परंपरा, धर्म, संस्कृती यांच्या नंतरची आहे. त्यामुळे परंपरेतल्या गोष्टी या अनेकदा कायद्यापेक्षा जास्त पाळल्या जातात, हे सत्य उरतेच.

काही वर्षांपूर्वी आम्ही चंद्रपूर-गडचिरोलीला गेलो होतो. वाटेत एकदम वाघोबा मंदिर असा फलक दिसला. आम्ही गाडी थांबवून हे मंदिर पाहण्यासाठी उतरलो. देवळात चक्क लाकडापासून बनविलेली पट्टेदार वाघाची मूर्ती होती. आम्ही आतमध्ये फोटो काढत असताना, एक आदिवासी काका पुढे आले. आम्ही त्यांना या मंदिराबद्दल विचारले तर ते म्हणाले,‘नुकताच हे नवीन मंदिर झालाय. आधी हा त्या तिठ्यावर होता. तिथूनहा वाघोबा येथे मंदिरात आलाय. चंद्रपूर-गडचिरोलीमध्ये अनेक आदिवासी गावांच्या सीमेवर तुम्हाला वाघदेव आणि वाघाईची मंदिरे दिसतील. वाघ हा आमचा देव आहे. आम्ही सगळे जण त्याची पूजा करतो. आम्ही त्याच्या राज्यात राहतो. कुणीही आदिवासी वाघाला मारत नाही, मारणार नाही.‘

आज वाघांची संख्या वाढविण्यासाठी वन्यजीव संरक्षक कायदा आहे. ‘सेव्ह टायगर’ या मोहिमेवर आजवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अभयारण्य उभारून वाघ सांभाळणे हे महत्वाचे काम वनखात्याला सोपविण्यात आले आहे. एवढे सारे करूनही वाघाची शिकार होत असल्याच्या घटना अधूनमधून ऐकू येतात. वाघाची कातडी, वाघनखे, दात आदी अवयवांची तस्करी उघडकीस येते. अनेक राजे-रजवाड्यांच्या भिंतीवर आजही शिकारीची प्रतीके असलेली वाघाची डोकी टांगलेली दिसतात. आदिवासी मात्र या वाघांच्या राज्यात राहूनही कधीच वाघाची शिकार करत नाहीत. कारण त्यांना वाघाचे पर्यावरणातील, अन्नसाखळीतील महत्व सांगावे लागत नाही. त्यांच्यासाठी तो देव आहे.

खरे तर, आपल्या प्रत्येक सणाचा शेतीशी आणि पर्यायाने निसर्गाशी अन्योन्य संबंध आहे. अगदी गुढीपाडव्यापासून होलिकोत्सवापर्यंत आणि वटपौर्णिमा-नागपंचमीपासून तुळशीच्या लग्नापर्यंत प्रत्येक गोष्ट निसर्गाशी जोडलेली आहे. पण आज आधुनिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे अनेकदा आपल्याला सणांचे सांगाडेच आढळतात. त्याचा निसर्गाशी असलेला संबंध विस्मृतीत गेलेला दिसतो. याबद्दल आजवर अनेक लेख लिहिले गेले आहेत. अभ्यास झाला आहे. पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यामुळे सणांशी असलेला हा संबंध नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यातील मुख्य मुद्दा एवढाच की, आपण निसर्गाशी असलेली ही नाळ तोडल्याने आज माणूस म्हणून निसर्गाच्या तावडीत सापडू लागलो आहोत.

मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचा एक मत असे आहे की, आजची आफ्रिका ही माणसाची आद्यमायभूमी आहे. जगभर पसरलेला माणूस हा मुळात आफ्रिकेतून पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात, पिढ्यानपिढ्यांच्या स्थलांतरानंतर तिथे पोहचलेला आहे. त्या आफ्रिकेतील आदिम प्रजातींपासून आजच्या आधुनिक अल्ट्राअॅडव्हान्स गॅजेट वापरणाऱ्या पिढीपर्यंत ज्या प्रथा, परंपरा पोहचल्या आहेत, त्यातील बहुसंख्य परंपरा या निसर्गाशी एकरुपता सांगणाऱ्या आहेत. यात आज अस्तित्वात असलेले सगळे धर्म, पंथ, समूह या साऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने त्याचा नव्याने अर्थ लावण्यात आलेल्या अपयशाने, किंवा कालानुक्रमे बाद ठरलेल्या परंपराची पुनर्रचना करण्याचे धाडस न दाखविल्याने अनेक परंपरा या आज समाजाच्या गळ्यातले लोढणे बनून बसल्या आहेत.

एकीकडे आपल्या परंपरेतून आलेल्या गोष्टींची हेटाळणी करून, ही फोलपटे कशी फेकून द्यायला हवीत, याबद्दल तावातावाने भांडणारे ‘नवतावादी’; तर, दुसरीकडे आपल्या उदात्त परंपरेचे गोडवे गात, फक्त तेवढेच कसे बरोबर याचा दुराग्रह धरणारे ‘परंपरावादी’… या दोन प्रवाहांमध्ये ‘आज’ हा कायमच अडकलेला दिसतो. या दोन्ही प्रवाहांच्या मधला ‘सम्यक’ मार्ग बोलायला सोपा असला, पण प्रत्यक्ष तसे जगणे म्हणजे तारेवर चालण्याची कसरत करण्यासारखे आहे. ही कसरत प्रत्येक पिढीला करावीच लागते. काहींना ती जमते, काही धडपडतात, तर काही कोसळतात.

नागपंचमीच्या सणाचे साधे उदाहरण घेऊ. नाग किंवा साप हा निसर्गातील सरपटणारा जीव शेतीसाठी प्रचंड महत्वाचा. शेतीचे नुकसान करणारे उंदीर खाणारा साप, हा शेतीचा रक्षणकर्ताच. त्याबद्दल त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू झालेल्या या परंपरेला विविध कथांनी आणि संकल्पनांनी सजविले गेले. मग तो नाग पृथ्वी तोलून धरणारा शेषनाग असो की समुद्रमंथनाच्या वेळी दोर म्हणून वापरलेला वासुकी असो. अशा एक ना अनेक कथा साप या प्राण्याभोवती गुंफल्या गेल्या. या अनेक परंपरांचा परिपाक म्हणून आजही नागपंचमी साजरी होते. मुंबई-पुण्यासारख्या महानगरात तांब्या-पितळेच्या सापावर दूधाचे हंडे ओतून जर आम्ही नागपंचमी साजरी करणार असू, तर आपण निसर्गाचे पूजन करतो आहोत की त्याचे विडंबन करतो आहोत, याचे भान हरवून गेले आहे.

भारतीय संस्कृती म्हणताना आत्ताच्या भौगोलिक सीमांच्या पलिकडे विचार करायला हवा. भारतीय उपखंड किंवा दक्षिण आशियायी देशांमध्ये व्यापून उरलेली ही संस्कृती थोड्या फार फरकाने निसर्गानुनयीच आहे. त्यातील वैदिक किंवा त्याच्यातही आपल्याला जवळच्या असणाऱ्या अनेक स्थानिक, समाजिक, धार्मिक परंपरा तपासून पाहिल्या तरी हे निसर्गाशी असलेले नाते स्पष्टपणे जाणवते. आजच्या आधुनिक काळात त्यांचा संदर्भ काहीसा धुसर झाला असून, तो मूळ स्वरूपापासून भरकटलेला दिसतो, हे मात्र नाकारता येत नाही.

आपल्या वार्षिक सणांची रचना जरी पाहिली तरी कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे परिपूर्ण चक्र त्यात सुस्पष्टपणे जाणवते. शिशीराची पानगळ संपून नव्या पालवीचे स्वागत करणारा गुढीपाडवा. पेरणीची बेगमी करून पावसाची वाट पाहत केलेली आषाढीची यात्रा. त्यानंतर येणाऱ्या वर्षाऋतूची वाट पाहत येणारा श्रावण आणि त्यातील व्रतवैकल्ये. त्यात पुन्हा साप, समुद्र, बैल अशा निसर्गरूपांचीच पूजा. श्रावणातील वैकल्ये आवरताहेत तोच गणोबा किंवा गणेशोत्सव. तोही पुन्हा सृष्टिपूजेचाच उत्सव. मातीचाच गणपती आणि तेरड्याचीच गौर. तिही पुन्हा त्याच निसर्गात विरघळून जाणार. गणपतीनंतर पूर्वजांच्या स्मृतीसाठीचा पितृपंधरवढा. तोपर्यंत कापणीची कामे उरकून नवरात्रीत आदिमायेचा जागर. दसऱ्याला पिकलेल्या धान्यांच्या लोंब्या दारावर टांगायच्या त्या चिमण्यापाखरांसाठी. त्यानंतर दिवाळी वर्षभर मेहनतीने जे कमावले ते बाजारात आले पाहिजे. अर्थव्यवस्थेचा गाडा चालायला हवा म्हणून खरेदी व्हायला हवी. शेतकऱ्यासोबत बारा बलुतेदारही जगले पाहिजेत. त्यानंतर तुळशीचे लग्न आणि मग माणसांच्या लग्नाचा धुमधमाका. हे सारे चक्र समजून घेतले तर, आजच्या भाषेत ज्याला आपण ‘इकॉनॉमिक सायकल’ म्हणतो, ते त्यावेळच्या स्वयंपूर्ण ग्रामीण इकॉनॉमीने निसर्गाचे रक्षण करून कसे सांभाळले होते ते नीट कळेल.

स्थलांतर, आक्रमणे आणि औद्यागिक-तंत्रज्ञानाच्या क्रांतीने हे सारे चक्र विस्कटले. ते विस्कटणे एका अर्थाने अपरिहार्यच होते. पण या बदलत्या व्यवस्थेनुसार नव्या धारणा तयार करणे किंवा जुन्या धारणांना आधुनिक रूप देण्याचे काम आपल्याकडून नीटसे झाले नाही, असे म्हणायला जागा उरते. शहरीकरणाचा आणि औद्योगिकीकरणाचा वेग कितीही वाढला असला तरी, आजही बहुसंख्य भारत हा खेड्यांमध्ये आणि शेतीवर अवलंबून आहे. एवढेच काय तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आजही मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे या कृषीआधारित, निसर्गानुनयी श्रद्धाविश्वाचा, धारणांचा पगडा आपल्या समाजावर खोलवर रुजलेला दिसतो.

या श्रद्धाविश्वाची चिकित्सा करणाऱ्या संस्था कमकुवत झाल्या. त्याला नवा आकार देणारे ऋषी किंवा मुनी ही परंपरा संपून त्यांची जागा बाबा-बुवांनी घेतली. ऋषी किंवा मुनी या दोन शब्दांची व्युत्पत्ती जरी लक्षात घेतली तरी परंपरांचा नवा अर्थ लावणे म्हणजे काय हे समजू शकेल. ‘ऋषी’ या शब्दातील ‘ऋ’ हा धातू ‘पुढे जाणे’ या अर्थाचा आहे. ‘पुढे जाणारा, अर्थात प्रागतिक विचारांचा, पुरो-गामी असलेला असा तो ऋषी’ हा त्या शब्दाचा मूळ अर्थ. ‘मुनी’ शब्दाचा उगम पाहिला असता द्राविड भाषांमध्ये ‘मुन’ हा धातू दोरीच्या (सूत्र) साहाय्याने पुढे जाणारा असाच होतो. हे पुढे जाणे टाळून, पाठच्यांनी सांगितलेले घोकत राहणारे बाबा-बुवा आपल्याला थोर वाटू लागले आणि मठ-आश्रम हे राजकीय-आर्थिक हितसंबंधाचे अड्डे बनले.

या साऱ्या उलथापालथीमध्ये निसर्गाशी-पर्यावरणाशी असलेली धार्मिक श्रद्धांची, समाजिक धारणांची वीण विस्कटत गेली. पंचमहाभूतांची पूजा आणि त्यातही अन्न देणाऱ्या भूमीबद्दल असलेला मातृभाव हा आपल्या धारणांमध्ये ठायीठायी आढळतो. सुफलन किंवा इंग्रजीत ज्याला फर्टिलिटी म्हणून त्याच्या अनेक संकल्पना आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये आढळतात. सुफलन प्रक्रिया आणि तिच्याविषयीचे कुतुहल, गूढ हे लोकांच्या मनात होते. त्यामुळे इथे देव ही कल्पना विकसित होत असताना सृजनाला महत्व दिले गेले. सृजन करणारी किंवा सृजनात्मक अशी जी चिन्हे आहेत किंवा शरीराचे जे अवयव आहेत म्हणजे लिंगपूजा, योनीपूजा इथे रूढ झाली.कामाख्याचा उत्सव, जागोजागीच्या लज्जागौरी किंवा नद्यांना सुफलनाचे प्रतीक मानणे अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आपल्याकडे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून सुपीक जमीन मानली जाते, तर अलक्ष्मीचे रुपक म्हणजे नापीक जमीन. आज आपण धनाला किंवा नोटा-नाण्यांची पूजा करून जे लक्ष्मीपूजन करतो, हा संकल्पनांमध्ये नंतर झालेला बदल आहे. जो निसर्गापासून दूर नेत नव्या औद्योगिक अर्थव्यवस्थेशी जोडणारा आहे.

खजुरोहाची शिल्पे, एखादे योनीचे चित्र, लज्जागौरीचे शिल्प जर आपल्याला अशुभ वाटत असेल तर तो आपल्या दृष्टीचा दोष आहे. आदिम काळातीलऋषीमुनींनी आणि सामान्य माणसांनीही या तत्वांची उपासना का केली असेल? असा प्रश्न स्वतःला विचारण्याच धाडस आपण करत नाही. सृजन प्रक्रियेची महत्तम कल्पनेबद्दलचा आदर त्यांच्या मनात होते. त्याचे महत्व त्यांना समजलेले होते. त्याबद्दलची त्यांची दृष्टी व्यापक होती. ती निरोगी दृष्टी सोडून फक्त प्रतीकांमध्ये अडकलेली आणि फक्त ‘अर्थ’पूर्ण अशी उपासनापद्धती उत्तरकाळात रूढ झाली. मग, गणपतीची उंची वाढते आणि त्याचे हात पाय सोन्याचे होतात. त्याच्यापुढे हजारोंच्या गर्दीत माणसे एकमेकांना चेंगरत दर्शन घेतात आणि मिरवणुकीत शेकडो ढोल एकत्र वाजवले जातात. या साऱ्यातून मांगल्याच्या उपासनेएवजी ओंगळवाणे हिडीस प्रदर्शन घडते. जे माणसाच्या निसर्गानुरुप निरोगी अशा धारणांपासून झालेली अधोगती आहे. त्यापुढे कोणत्या पर्यावरण रक्षणाची अपेक्षा बाळगणार?

इतिहासातील ज्या समृद्ध भारताचे आपण दाखले देतो, त्या भरतवर्षामध्ये असलेल्या माणसाचे श्रद्धाविश्व हे निरोगी होते, त्यामध्ये विकसनाला संधी होती, नव्या तंत्रज्ञानाला जागा होती, नव्या विचाराला-नव पर्यायाला मान्यता होती. म्हणूनच मतभिन्नतेची परंपरा सांगणारी विविध दर्शने आणि वेगवेगळ्या दिशांनी चालणारे पंथ-सांप्रदाय या भूमीवर उदयाला आले. या मातीने जगभरातून आलेली आक्रमणे पचविली, नव्या धर्मांना जन्म दिला, परदेशातून झालेली धर्मांतरे पचविली. तरीही निसर्गाशी असलेले नाते आजपर्यंत जपले. त्यामुळे अवशेषरुपाने का होईना, या परंपरा आपल्यापर्यंत पोहचल्या.

या परंपरा पुनरुज्जीवीत करायच्या तर त्या सुधारण्याचे आणि प्रसंगी बदलण्याचे सामर्थ्य अंगी बाणवावे लागेल. त्याचे सामाजिक, भौगोलिक, आर्थिक, नैतिक परिणाम तपासून पाहावे लागतील.हे परिणाम तपासताना आपल्याला अनेक हादरे बसणार आहेत. आजवर न पटणाऱ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. दुर्दैवाने असे समजून घेण्याची क्षमता आज सर्वदूररित्या कमी होताना दिसते. ‘इन्स्टंट’ फूडप्रमाणे मानवी धारणांमधील सुधारणाही ‘इन्स्टंट’ करण्याचा अट्टाहास होण्याची शक्यता दिसत आहे. अशी पावले आत्मघाताकडेच नेणारी आहे. त्यामुळे निसर्गाशी जोडणाऱ्या या परंपरा समृद्ध होण्याऐवजी नष्ट होण्याचा धोका आहे.

निसर्गाशी जोडलेल्या मानवी संस्कृतीतील परंपरांचा योग्य वेळी मागोवा घेतला नाही, तर काय होते याची दोन धर्मातील दोन उदाहरणे द्यावीशी वाटतात. पहिले इस्लाममधील बुरखा पद्धतीचे. ज्या अरबस्थानात इस्लाम जन्मला, बहरला तिथे उधळणारी वाळू पाहिल्यावर अरबस्थानातील माणसांचे पूर्ण झाकणारे वेश मान्य करण्यासारखे होते. पण इस्लामच्या प्रसारासोबत हे वेशही जगभर जावेत, यासारखे अंधानुकारण नाही. आज अख्ख्या जगभर या बुरखापद्धतीमुळे वाद होत आहेत.

या परंपरेचा वेळीच आढावा घेतला असता तर आज ही वेळ आली नसते. दुसरे उदाहरण म्हणजे भारतीय संस्कृतीतल दिवेलागणीचे. आजही अनेक घरात संध्याकाळी वीजेचे दिवे लावल्यानंतर, पुन्हा वातीचे दिवे देवापुढे लावले जातात. त्या दिव्यापुढे पुन्हा तेच ‘तिळाचे तेल कापसाची वात’ म्हणत शुभं करोती म्हटले जाते. शुभं करती म्हणण्यातील परंपरा चुकीची नाही. पण,अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ही संस्कृती आता आधुनिक झाल्यानंतरही तिला नवे स्वरूप देण्याचे कार्य आपल्याला करता आलेले नाही, हे सत्य नाकारता येत नाही.

धर्म कोणताही असो, पंथ कोणताही असो… अशा चांगल्या पंरपंरांची झालेली माती सर्वत्र पाहायला मिळते. एवढेच नव्हे, तर आमचीच पंरपरा श्रेष्ठ यावर वाद घालणारे आणि प्रसंगी हाणामाऱ्याही करणारे रथी-महारथीही सर्वत्र आढळतात. स्वतःच्या स्वार्थासाठी झुंजणाऱ्या या धर्मवाद्यांना निसर्गाशी, पर्यावरणाशी असलेल्या या परंपरा, संस्कृती, धर्माच्या नात्याशी काहीच घेणेदेणे नसते. त्यामुळे नव्या संकल्पना तयार करणे, जुन्या संकल्पनांना नवे अर्थ देण्याचे महत्कार्य समाजातील विचारवंतांना, धुरिणांना करावे लागणार आहे. हे एका रात्रीचे काम नसून त्यासाठी मोकळ्या विचारांच्या नव्या संस्था घडवाव्या लागतील. समाज बांधणाऱ्या या संस्था अधिक मजबूत करणे, त्या अधिक निर्दोष करणे, त्या प्रभावी करणे हाच उपाय आहे. हा उपाय अर्थातच दीर्घ काळ घेणारा आणि कष्टाचा असेल.

‘विविधतेतील एकता’ हा वाक्रप्रचार एवढ्यांदा वापरला गेलाय की त्यामागील अर्थाचा चोथा झाला आहे. त्याचा खरा अर्थ मेंदूपर्यंत आज पोहचेनासा झाला आहे. निसर्गाची रचना समजून घेतलीत तरी या दोन शब्दांचा अर्थ कळू शकतो. निसर्गामध्ये नाना प्रकारच्या वनस्पती, प्राणी असतात. त्यांचे प्रकार, गरजा हे सारे वेगळे असले, तरी एक अद्भूत असे संतुलन त्यामध्ये साधलेले असते. माणूसही याच निसर्गाचा भाग आहे. त्यालाही हेच निसर्गनियम लागू आहेत. विविध प्रकारच्या, विविध विचारांच्या माणसांना एकत्र ठेवणारी नैसर्गिक व्यवस्था या मातीवर अस्तित्वात होती आणि आजही काही प्रमाणात जिवंत आहे. गरज आहे ती ही सहजीवनाची संस्कृती टिकवण्याची. आपल्यापेक्षा वेगळ्या रंगाच्या, वेगळया विचारांच्या माणसाला आपल्याएवढेच सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करणे म्हणजे निसर्गाशी जोडून जगणे आहे. अन्यथा… नैसर्गिक न्याय कोणालाच चुकलेला नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.