Published on Apr 30, 2020 Commentaries 0 Hours ago

आज जगभरात कोरोनाइतकीच भयावह आणि उपाय नसलेली आपत्ती दबा धरून बसली आहे. ही आपत्ती आहे, हवामान बदलाची. तिच्याशीही सर्व देशांना युद्धपातळीवर लढावे लागणार आहे.

हवामान बदलही कोरोनाएवढाच धोक्याचा

चीनमधील वुहान शहरामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाल्याला आणि जगभरातील अनेक देश या भीषण वास्तवाच्या दाहक झळांनी पोळू लागल्याला आता जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. या साथीने आपल्या आरोग्य सेवा, अर्थ आणि राजकीय व्यवस्थेमधील त्रुटींना उघडे पाडले आहे. आपल्या यंत्रणांमधील दोष दाखवले आहेत. आपल्या राष्ट्रीय मानसिकतेमधील अस्थिरता अधोरेखित केली आहे. आपण विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये कितीही प्रगती करीत असलो, तरीही शेवटी आपण लहरी निसर्गाच्या दयेवरच अवलंबून आहोत, हा धडा यातून आपल्याला शक्य तितक्या कठोरपणे शिकवण्यात आला आहे.

जगभरातील आरोग्ययोद्धे कोरोनाच्या भयंकर संकटाला तोंड देत असताना, कोरोनाइतकीच भयावह आणि उपाय नसलेली महाभयंकर आपत्ती दबा धरून बसली आहे. ही आपत्ती आहे, हवामान बदलाची. याचा धोका आज कधी नव्हे इतका वाढला आहे. कोरोनाशी लढा ही आजघडीला प्रत्येक देशाची प्राथमिकता असली, तरीही हवामान बदलाचे संकट टाळण्यासाठी, या साथीने शिकवलेल्या धड्यातून बोध घेणे आवश्यक आहे.

सुरुवात महत्त्वाची

कोरोनाची साथ हाताळताना जगभरात उडालेली तारांबळ, सुरुवातीलाच आक्रमक पावले उचलण्याचे महत्त्व अधोरेखित करते. चीनने क्वारंटाइन करणे आणि सामाजिक अंतर पाळणे यांसारखी प्रतिबंधात्मक उपाययोजना केवळ आठवडा आधी केल्या असत्या, तर रुग्णांची संख्या ६६ टक्क्यांनी कमी झाली असती, असे एका संशोधनात निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणेच हवामान बदलांच्या घातक परिणामांच्या सूचना आपल्याला अनेक दशकांपासून मिळत आहेत. तरीही या सूचना आपल्याला जागतिक हवामान बदलांबाबत पावले उचलण्यास उद्युक्त करू शकलेल्या नाहीत.

‘२०१९ मधील जागतिक हवामानाची स्थिती’ या संयुक्त राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमात महासचिव अॅंटोनियो गुटेरेस यांनी इशारा दिला होता की, पॅरिस करारामध्ये ठरलेले 1.5°C किंवा 2°C हे लक्ष्य गाठण्याच्या मार्गापासून जग सध्या अनेक योजने दूर भरकटले आहे. आपण सुरुवातीलाच प्रभावी उपाय योजण्याची वेळ गमावून बसलो आहोत. त्यामुळे आता शेवटचा आणि सर्वोत्तम उपाय हाच आहे की, आपली महत्त्वाकांक्षा वाढवायची आणि हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी कठोर, मूलगामी पावले उचलायची.

आर्थिक वृद्धीसाठी अन्य भारही उचलावेत

आर्थिक वृद्धीसाठी तिसऱ्याच व्यक्तीच्या साहाय्याने अनियंत्रित उत्पादन-लाभ मिळवण्याच्या धोरणांना चाप लावण्यास या साथीने सुचविले आहे. अर्थव्यवस्थेवरील परिणामांच्या भयाने वुहानमधील कोरोनाची सत्यस्थिती दडवून ठेवली आणि लॉकडाऊन करण्यास उशीर केला, असे आरोप चीनवर करण्यात येत आहेत. कोविड-19 किती घातक आहे याचा अंदाज चीनला घेता आला नाही, त्यामुळे या संकटामुळे निर्माण होणारा अतिरिक्त आर्थिक भार उचलण्यात तो अपयशी ठरला.

हेच हवामान बदलांच्या बाबतीतही म्हणता येईल. जगभरातील शासन यंत्रणांना औद्योगिक प्रदूषण रोखणे, कोळशाचा वापर थांबवणे किंवा कार्बन उत्सर्जन कर लावणे कठीण वाटते; कारण तो त्यांच्या पर्यावरण किंवा आरोग्याच्या खर्चाचा भाग नसतो. आपण कोरोनाच्या या साथीच्या आजारातून एक महत्त्वाची गोष्ट शिकलो की, आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात विळी-भोपळ्याचे नाते आहे असे म्हणणे चुकीचे आहे.

केवळ वेळ निभावून नेणे पुरेसे नाही

ट्रेनचे डब्बे आणि स्टेडियममध्ये विलगीकरण कक्ष सुरू करणे, शिपिंग कंटेनरमध्ये अतिदक्षता विभाग उभारणे आणि घरच्या घरी मास्क तयार करणे, या सर्वांतून अकल्पित संकटाशी लढताना माणसाची कल्पकता दिसते. पण अशा अक्राळविक्राळ संकटाला तोंड देताना अशा निभावून नेण्याच्या उपाययोजना पुरेशा नाहीत, याकडेही या वेळी लक्ष वेधले गेले आहे. कोविड-१९ ची भयानकता आणि त्यामुळे सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टा पाहता, या जागतिक संकटात केवळ वेळ निभावून नेणे पुरेसे नाही. हाच प्रकार हवामान बदलांबाबतही आहे.

दुष्काळ सोसू शकणारी पिके विकसित करणे, सागरी भिंती बांधून समुद्राच्या वाढत्या पातळीपासून किनारपट्टीवरील लोकांचे संरक्षण करणे आणि ऊर्जा-सक्षम इमारतींसाठी नियम बनवणे, आदी हवामान बदलांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. मात्र हवामान चांगले राखण्याचे प्रयत्न आणि उत्सर्ग कमी करणे या गोष्टींच्या आधी या उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येऊ नये.  कारण शेवटी उत्सर्ग कमी झाला नाही,  तर या उपाययोजना करणे आवाक्याबाहेरचे ठरेल.

सर्वात गरीब गटावर अधिक परिणाम

कोविड-१९ चे आणखी एक निराळे वैशिष्ट्य म्हणजे, समाजातील सर्वात गरीब आणि दयनीय गटावर त्याचा अधिक परिणाम होतो. गरीब आणि वंचित गटाला या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक संकटाची सर्वाधिक झळ बसते. त्याचप्रमाणे हवामान बदलांमुळे ओढावणाऱ्या संकटांचाही धोका कमी उत्पन्न असणाऱ्या देशांना आणि व्यक्तींना अधिक असतो. या साथीमध्ये होरपळणाऱ्यांच्या साहाय्यासाठी अनेक देश विविध पॅकेज जाहीर करत आहेत. पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, गरीबी निर्मूलन हे केवळ विकासासाठीच महत्त्वाचे नाही, तर हवामान बदलाच्या या संकटाला तोंड देण्यासाठीही ते एक महत्त्वाचे पाऊल आहे.

वैयक्तिक कृतीही बदल घडवू शकते

द लान्सेट (www.thelancet.com) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी सरकार इतकीच लोकांनीही कृती करणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊन लादणे, निदान करण्यासाठी चांगल्या सुविधा पुरवणे आणि दूरवरून आरोग्य विषयक सल्ले घेण्याची व्यवस्था आदी गोष्टी कोरोनाला वेसण घालण्यासाठी सरकारने उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पण यातील अनेक गोष्टी या खासगी व्यक्तींनीच केल्या, जसे की सामाजिक अंतर आणि आधीच स्वतःचे विलगीकरण करणे आणि त्याचे परिणामही आपल्याला दिसत आहेत.

हवामान बदल रोखण्यासाठी अशा वैयक्तिक पातळीवरच्या कृती करण्याचे आवाहन पर्यावरणवादी अनेक दशकांपासून करत आहेत. पण इलेक्ट्रीक कार वापरणे किंवा प्लास्टिकचा वापर थांबवणे, अशा गोष्टी करणे म्हणजे महासागरातील थेंबभर पाण्याइतके आहे, असा नकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही.

अर्थतज्ज्ञांच्या मते, स्वतःपुरते जगणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचदा स्वतःला योग्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यात रस असतो. सामूहिकदृष्ट्या विचार केल्यास त्या गोष्टींचे परिणाम विपरित होत असतात. यालाच सर्वसामान्यांची शोकांतिका असे म्हटले जाते. पण लोकांच्या नैतिकतेला, वैयक्तिक सुरक्षिततेचे आणि ऐक्याचे आवाहन करून कार्यरत करता येऊ शकते, हे कोविड-१९ साथीने सिद्ध केले आहे.

हवामानपूरक वैयक्तिक कृतीही महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे एक प्रकारचा वर्तनात्मक संसर्ग होऊन समाजातील अन्य लोकांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. या साथीनेही हे अधोरेखित केले आहे की, व्यक्तिगत कृतींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि योग्य वळण लावण्यासाठी स्पष्ट आणि पारदर्शक संवाद आवश्यक आहे. उदाहरणार्थ, दक्षिण कोरिया आणि तैवानने कठोर लॉकडाऊन न लादता केवळ प्रभावी संवाद, मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन कोविडला चितपट केले. वैयक्तिक पातळीवर हवामानपूरक कृती करण्यात याव्यात यासाठी संवादाच्या पारदर्शक आणि प्रभावी योजना राबविणे आवश्यक आहे.

पुढचा टप्पा हरित प्रोत्साहनाचा

या साथीचा आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी अभूतपूर्व अशी वित्तीय, आर्थिक आणि स्थूल अर्थशास्त्रीय पावले उचलली आहेत. ती विवेकी आहेत आणि या भयंकर परिस्थिती देशासाठी उपयुक्तच आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. नियम आणि कायदे यांचे अडथळे दाखवून हरित स्थितंतरासाठी आर्थिक पाठबळ देण्यास टाळटाळ करणाऱ्यांसाठी हे एक प्रभावी उदाहरण ठरू शकते. जगभरातील सरकारे त्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी ज्या उपाययोजनांचा विचार करत आहे, त्या मुख्यतः हवामानपूरकच असायला हव्यात.

अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि खनिज तेलापासून दूर नेण्यासाठी अपारंपरिक आणि प्रदूषणरहीत ऊर्जा तंत्रज्ञान यांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गुंतवणुकींना प्राधान्य दिले पाहिजे. अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी उचललेले प्रत्येक पाऊल ‘हरित’च असावे.

कोविड-१९ च्या साथीने आपल्याला ‘अर्थव्यवस्था १०१’च्या मूलभूत गोष्टींची आठवण करून दिली आहे. नैसर्गिक स्रोत (सार्वजनिक आरोग्य व्यवस्था) या सार्वजनिक वस्तू आहेत आणि कठोर धोरणे व एकत्रित कृती नसतील, तर त्यांचा गैरवापर केला जाऊ शकतो. या संकटाने आरोग्य आणि हवामान पुरकता यांचे यापुढे जागतिक राज्य कारभाराचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून असणारे महत्त्व अधोरेखीत केले आहे.

हवामान अर्थशास्त्रज्ञ गेरनॉट वॅगनर यांच्या शब्दांत नेमके सांगायचे तर ‘कोविड-१९ हा हवमान बदलाचाच वेगवान प्रकार आहे‘. यातील चांगल्या गोष्टी शोधणे भाबडेपणाचे ठरेल. परंतु हवामान बदलामुळे ढळढळीतपणे दिसणारे प्राणघातक संकट टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचा धडा कोविडच्या उद्रकाने दिला आहे. तो आपण किता लक्षात घेतो आणि त्यानुसार किती पावले उचलतो, यावर येणाऱ्या काळात आपली अर्थव्यवस्था आणि एकंदरीच जीवनमान अवलंबून असणार आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Tanushree Chandra

Tanushree Chandra

Tanushree Chandra was a Junior Fellow with ORFs Economy and Growth Programme. She works at the intersection of economic research project management and policy implementation. ...

Read More +