-
CENTRES
Progammes & Centres
Location
आता‘पीअर टू पीअर कार रेंटल’ पद्धत भारतात मूळ धरू पाहात आहे. त्यामुळे सरकारलाही यासंदर्भात कायदे करण्याची गरज भासू लागली आहे.
गेल्या काही महिन्यांत प्रवासी वाहनांच्या खपाला ब्रेक लागला आहे. त्यास विविध घटक कारणीभूत असले तरी स्वमालकीची कार घेऊन तिचे हफ्ते फेडा, तिची देखभाल करा वगैरे करण्यापेक्षा सरळ ओला किंवा उबर बुक करून प्रवास करण्याकडे ग्राहकांचा कल वाढीस लागला आहे. नपेक्षा सरळ भाड्याने गाडी घेऊन सहल किंवा जवळचा प्रवास केला जातो. आता यात नवा पर्याय येऊ घातला आहे तो म्हणजे ‘पीअर टू पीअर कार रेंटल’ पद्धत. ओला, उबर किंवा भाड्याने गाडी घेऊन कार्यभाग साधण्याच्या प्रकाराला ‘शेअर्ड मोबिलिटी’ असे संबोधले जाते. मात्र, आता ही पद्धतही मागे पडून ‘पीअर टू पीअर कार रेंटल’ पद्धत भारतात मूळ धरू पाहात आहे. त्यामुळे सरकारलाही यासंदर्भात कायदे करण्याची गरज भासू लागली आहे.
सद्यःस्थितीत ‘शेअर्ड मोबिलिटी’ आणि वाहनांसाठी भारतात मोटार वाहन कायदा, १९८८ (येथून पुढे यास ‘कायदा’, असे संबोधले जाईल) लागू आहे. या कायद्यानुसार खासगी वाहने (खासगी गाडी क्रमांक असलेली वाहने) भाडेतत्त्वावर दिली जाऊ शकत नाहीत. खासगी वाहन भाडेतत्त्वावर दिले गेलेच तर पुढील कायदेशीर आव्हानांना सामोरे जावे लागते.
१. खासगी वाहनाचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करावयाचा असेल तर कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत संबंधित वाहनाच्या मालकाला क्षेत्रीय किंवा राज्य वाहतूक प्राधिकरणाकडून त्यासाठी परवाना प्राप्त करावा लागतो. पैशांच्या मोबदल्यात खासगी वाहनाचा वापर ति-हाईताला करू दिला जाणार असल्याने ती व्यावसायिक बाब ठरते. त्यामुळे त्यासाठी लागू असलेले तुम्ही भरावे आणि रीतसर तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवर कळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर नंबर पिवळ्या रंगात करून घ्यावा, अशी सरकारची अपेक्षा असते, जेणेकरून गाडी ‘सेल्फ ड्राइव्ह’ भाडेतत्त्वावर देता येऊ शकेल.
२. कायद्याच्या कलम १४७ अनुसार विमा कंपन्या खासगी मालकीच्या गाड्यांना खासगी विमा कवच पुरवता त्यावेळी त्यांना कोणत्याही कंत्राटात्मक उत्तरदायित्वाला विमा संरक्षण पुरवणे बंधनकारक नसते. विमा कंपन्या फक्त मालक किंवा त्यांना माहीत असलेल्या व्यक्तीकडून गाडीच्या होणा-या खासगी वापरालाच विमा कवच पुरवतात. गाडीच्या मालकासाठी अनोळखी असलेल्या कोणत्याही ति-हाईत व्यक्तीने कार चालवली किंवा कार चालवत असेल तर त्या चालकाला विमा संरक्षण लागू नसते. या सर्व बंधनांमुळे ‘पीअर टू पीअर कार भाडे पद्धती’ भारतातील खासगी कार मालकांसाठी बेकायदेशीर आणि जोखमीची ठरत आहे. मात्र, आता परिस्थिती बदलू पाहात आहे. कारण ग्राहक आताशा ओला, उबर आणि झूमकारच्या सेल्फ ड्राइव्ह रेंटल कार यांसारख्या ‘शेअर्ड मोबिलिटी’ प्रकारांना पर्यायाने भाडेतत्त्वावरील गाड्यांना प्राधान्य देऊ लागला आहे. त्यामुळे उत्तम भविष्य असलेल्या ‘पीअर टू पीअर कार भाडे पद्धती’ला (पी२पी) कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे.
‘पी२पी कार रेंटिंग’ म्हणजे काय?
पी२पी कार रेंटिंगएक क्रांतिकारी आणि सोपी अशी पद्धत आहे. पी२पी कार रेंटिंग पद्धतीत खासगी गाडीचा मालक त्याची गाडी जेव्हा वापरत नसतो तेव्हा ती ति-हाईत व्यक्तीला भाडेतत्त्वावर देऊन वरकमाई करू शकतो. म्हणजे एअरबीएनबीसारखे. यात खासगी कारचा मालक गाडीचे भाडे किती घ्यायचे, ती किती किलोमीटरपर्यंत चालवायला द्यायची आणि कोणत्या वेळी, कोणत्या कालावधीत गाडी भाड्याने द्यायची, या सर्व गोष्टींचा निर्णय घेण्यास स्वतंत्र असतो. हे झाले कार मालकांचे. भाडेतत्त्वावर गाडी घेणा-यांसाठी काय, असा प्रश्न सहजच उपस्थित होतो.
गाड्या भाड्याने देणा-यांकडे गाडीची मागणी केली की ते त्यांना वाट्टेल ते भाडे सांगतात. तसेच त्यांच्याकडे गाड्या मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. शिवाय पार्किंग शुल्क/विमानतळ शुल्क/ दुकानासमोर गाडी लावण्याचे शुल्क इत्यादी प्रकारचे शुल्क द्यावे लागते, ते वेगळेच. त्याऐवजी पी२पी कार रेंटिंग पद्धत ग्राहकांना सोपा पर्याय उपलब्ध करून देते. म्हणजे ज्याला गाडी भाड्याने घ्यायची आहे तो त्याच्या घराच्या परिसरातून किंवा शहरातून अवघ्या काही तासांसाठी गाडी भाडेतत्त्वावर घेऊ शकतो.
अशा पद्धतीने खासगी कार मालक त्यांच्या कारची उपलब्धता आणि तिचा वापर यांच्या आधारावर स्वतः गाडीचा वापर न करता ती ति-हाईत व्यक्तीला भाड्याने देऊन वरकमाई करू शकतात. ज्यांना गाडी भाडेतत्त्वावर हवी आहे त्यांच्यासाठी ही खूपच सुटसुटीत पद्धत आहे. कारण गाड्या भाड्याने देणा-या कंपन्यांशी डोके लावावे लागत नाही. पी२पी पद्धतीमध्ये गाडी मालक आणि भाडेतत्त्वावर गाडी घेणारा हे दोघेही थेट संपर्कात येतात. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता वगैरेंना फाटा दिला जातो. पी२पीमध्ये मोबाइल ऍपद्वारे गाडी भाड्याने मिळू शकते.
भारतातील भविष्यातील पी२पी कार रेंटल कंपन्या आणि भाडेकरू यांचे मुख्य परिचालन प्रारूप इतर देशांमध्ये यशस्वी ठरलेल्या या पारूपासमानच असेल. भारतातील पी२पी कार रेंटल कंपन्या प्रथमतः त्यांच्या ऍपवर भाडेकरूंना नोंदणी करण्यास सांगतील. नोंदणीसाठी वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना, आधार कार्ड आणि बँक तपशील इत्यादी गोष्टी अनिवार्य असतील. भाडेकरूने ऍपवर सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून पुढील प्रक्रिया करणे, कागदपत्रांची सत्यासत्यता तपासणे आणि अखेरीस भाडेकरूचे खाते वैध ठरवणे इत्यादी प्रक्रिया कंपनीद्वारे दुस-या टप्प्यात पार पाडल्या जातील.
कंपनीकडे भाडेकरूची अधिकृत नोंदणी झाली की मग भाडेकरू शहरातील कोणत्या भागातून गाडी भाड्याने घ्यायची हे ठरवतील, त्यानंतर गाडीची निवड करतील आणि त्यानंतर शुल्काचा भरणा करतील. ज्या दिवशी गाडी भाड्याने घ्यायची आहे त्या दिवशी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधी भाडेकरू नियोजित स्थळी पोहोचेल आणि त्यांच्या मोबाइलमध्ये असलेल्या ऍपद्वारे गाडीचे कुलूप उघडेल (कीलेस एन्ट्री). प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी भाडेकरूला गाडीची काही विशिष्ट छायाचित्रे काढावी लागतील जसे की, गाडीत इंधाचे प्रमाण किती आहे हे दर्शवणारे मापक, किलोमीटर, गाडीला कुठे काही पोचा (डेण्ट) गेला असल्यास ते इत्यादी. ही सर्व छायाचित्रे मोबाइल ऍपवर अपलोड करावी लागतील. त्यामुळे कार मालकाशी या सर्व मुद्दयांवर भविष्यात होऊ शकणारे वाद टळतील. भाडेकरूंना खासगी गाडी भाड्याने घेताना विमा खरेदी करणे अनिवार्य असेल. त्यामुळे कार मालक आणि भाडेकरू या दोघांचे कोणत्याही आकस्मिक नुकसानापासून किंवा मालमत्तेच्या नुकसानापासून संरक्षण होईल.
जेव्हा गाडीची गरज भासेल तेव्हा अगदी घरापासून जवळच गाडी उपलब्ध होण्याची हमी लाखो भारतीयांना पी२पी कार रेंटल क्षेत्र देते. त्याचवेळी कार मालकांनाही वरकमाई करण्याची आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याची संधी हे क्षेत्र उपलब्ध करून देते. भारतात मोठमोठ्या शहरांमध्ये वाहतूककोंडी ही रोजची डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. पी२पी कार रेंटल पद्धतीमुळे कमी संख्येने गाड्या रस्त्यावर उतरतील आणि वाहतूककोंडी व पर्यायाने प्रदूषणाला आळा बसू शकेल. तसेच बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांना, ज्यांच्याकडे कार आहे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देत स्वयंसिद्ध होण्यासाठीही हे क्षेत्र संधी उपलब्ध करून देते.
एकदंरित या क्षेत्राच्या आगमनामुळे सरकारला करांच्या माध्यमातून उत्पन्नाचा आणखी एक स्रोत निर्माण करता येऊ शकेल आणि विमा क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यातही हे क्षेत्र उपयुक्त ठरेल. उबर (राइड-हेलिंग), झूमकार (सेल्फ ड्राइव्ह रेंटल), ब्ला ब्ला कार्स (कारपुलिंग) इत्यादींच्या माध्यमातून शेअर्ड मोबिलिटीच्या पर्यायांनी भारतात यशस्वीरित्या पाय रोवले असताना भारतीय कार मालक आणि भाडेकरू याही शेअर्ड मोबिलिटी प्रारूपाचे स्वागतच करतील, याची खात्री आहे.
ड्राइव्हइझी आणि राइडइंजिन यांसारख्या कंपन्यांनी भारतात त्यांच्या माध्यमातून पीअर कार रेंटचे दालन खुले करून दिले आहे. मात्र, या पद्धतीद्वारे गाडी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणा-यांमध्ये सामान्य कार मालकांपेक्षा टूर ऑपरेटर्स आणि पीअर रेंटिंग हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून करणा-या व्यक्तींची संख्या जास्त आहे.
उत्तर अमेरिकेतील सुमारे २१ लाख लोक या क्षेत्रातील सेवेचा लाभ घेत असल्याचे अलीकडेच आढळून आले आहे. ट्युरो आणि गेटअराऊंड या दोन कंपन्या या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ३० अब्ज डॉलर एवढ्या अगडबंब आकाराच्या पारंपरिक अमेरिकी कार रेंटल उद्योगांना टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. पी२पी कार रेंटल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे खडबडून जाग्या झालेल्या पारंपरिक कंपन्यांनी आता पी२पी कार रेंटल क्षेत्रांतर्गत कार्यरत असलेल्या कंपन्यांना कार रेंटल उद्योगांना लागू असलेले नियमच लागू करावे, असा तगादा अमेरिकी प्रशासनाकडे लावला आहे.
मात्र, पी२पी कार रेंटल क्षेत्रातील कंपन्यांनी त्यावर युक्तिवाद करताना आम्ही कार मालक आणि भाडेकरू यांच्यातील दुवा म्हणून काम करत असल्याने स्वतःला फक्त (उबरसारखे) सेवा पुरवठादार समजतो, त्यामुळे आम्हीही पारंपरिक कार रेंटल कंपन्यांच्याच श्रेणीमध्ये मोडतो, असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील ३४ राज्यांमधील सरकारांनी पी२पी कार रेंटल क्षेत्राला कायद्याच्या परिघात आणत त्यांना पारंपरिक कार रेंटल उद्योगाप्रमाणे वागणूक देण्याच्या दिशेने गांभीर्याने विचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील पी२पी कार रेंटल क्षेत्राला पारंपरिक कार रेंटल क्षेत्राप्रमाणे कायदेकानू लागू होतात किंवा कसे हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे.
युरोपात परिस्थिती जरा वेगळी आहे. युरोपात सर्वत्र पी२पी कार रेंटल क्षेत्र सध्या तेजीत आहे. इंग्लंडमध्ये ड्राइव्ही (आता गेटअराऊंड) आणि हियाकार यांसारख्या या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या त्यांची नियमित सेवा घेणा-यांपैकी सुमारे ७२ टक्के ग्राहकांना स्वमालकीची कार घेण्याच्या विचारांपासून परावृत्त केले आहे. आमच्याकडे नोंदणी असलेल्या एकूण ग्राहकांपैकी ६५ टक्के ग्राहकांकडे आमची सेवा सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या मालकीच्या एक किंवा दोन गाड्या होत्या. मात्र, त्यात आता घट झाली आहे, असा दावा या कंपन्यांनी केला आहे.
भारतातील कोणत्याही महानगराप्रमाणेच लंडन शहराचे दृश्य असते. लंडनमध्ये सर्वाधिक वाहतूककोंडी आणि प्रदूषण होण्याची नोंद आहे. आता बहुतांश लंडनवासीयांनी स्वतःच्या मालकीची गाडी असण्याच्या विचारांना तिलांजली देत पी२पी कार रेंटल प्रारूपाला प्राधान्य दिले असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. एकट्या लंडनमध्ये पी२पी कार रेंटल पद्धतीचा लाभ घेणारे २० लाख ग्राहक असल्याचा अंदाज आहे. पी२पी कार रेंटल क्षेत्रातील कार्यरत कंपन्यांमुळे लंडन शहरातील वाहतूककोंडीचे आणि कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी झाले आहे. कारण आता कमी संख्येने खासगी वाहने लंडनच्या रस्त्यावर उतरतात.
पी२पी कार रेंटल कंपन्यांनी आता त्यांच्या ताफ्यांमध्ये इलेक्ट्रिक कारचा वापर वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत लंडन शहरातील प्रदूषण आणि कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर येऊन लंडन हरित शहर म्हणून ओळखले जाईल, याची खात्री आहे. जर्मनी, बेल्जियम, इटली, फ्रान्स आणि फिनलंड या युरोपीय देशांमध्येही वाहतूककोंडी आणि प्रदूषण या समस्यांनी डोके वर काढल्याने त्या ठिकाणीही पी२पी कार रेंटल पद्धत मूळ धरू पाहात आहे.
आग्नेय आशियात पी२पी कार रेंटल क्षेत्राने अलीकडेच प्रवेश केला आहे. एका अंदाजानुसार आग्नेय आशियातील एकूण तरुण पिढीपैकी २५ टक्के तरुण असे आहेत की त्यांनी स्वतःच्या मालकीची गाडी तर घेतली परंतु तिच्या कर्जाचे हफ्ते भरण्याइतप त्यांचे उत्पन्न नाही. त्यामुळे कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी या तरुणांनी पी२पी कार रेंटल पद्धतीचा वापर करत त्यांच्या मालकीच्या गाड्या ति-हाईताला भाड्याने देण्यास सुरुवात केली असून त्यांना त्यातून चांगले उत्पन्नही मिळत असल्याचे आढळून आले आहे. या उत्पनातून ते कर्जाचे हफ्ते फेडू लागले आहेत.
सिंगापूरसाठी पी२पी कार रेंटल ही एक संपूर्णपणे नवीन पद्धत आहे. सिंगापूरच्या देशांतर्गत वाहन प्राधिकरणाने ‘ड्राइव्ह लाह’ या कंपनीला १ ऑक्टोबर २०१९ पासून पी२पी कार रेंटल पद्धतीने ५०० खासगी गाड्या वापरण्याला परवानगी दिली. या योजनेला कसा प्रतिसाद मिळतो याचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतरच सिंगापूरसाठी ही पद्धत योग्य आहे किंवा कसे याचा निर्णय घेतला जाणार आहे. थायलंडमध्ये पी२पी कार शेअरिंग कंपन्यामध्ये आघाडीची असलेली ड्राइव्हमेट या कंपनीने शाखा सुरू केली असून देशाच्या वाढत्या या वाहतूककोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन थायलंड सरकारला दिले आहे. पी२पी कार रेंटल क्षेत्राचा अधिकाधिक लाभ घेण्यात आग्नेय आशियामध्ये मलेशिया सर्वात आघाडीवर आहे. मूव्हबाय आणि क्विककार या कंपन्यांनी मलेशियाची बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. मलेशियात ९३ टक्के लोकांकडे स्वमालकीची गाडी आहे.
समारोप
पाश्चिमात्य देशांमध्ये स्वमालकीची गाडीकडे गरज म्हणून पाहिले जाते. मात्र, भारतात अजूनही स्वमालकीची गाडी हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत ओला आणि उबर यांनी लोकांच्या मानसिकतेत ब-यापैकी बदल घडवून आणला आहे. २०१९ या आर्थिक वर्षात ग्राहकांच्या मानसिकतेत प्रचंड बदल घडून आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रवासी वाहनांच्या मागणीत लक्षणीय घट झाली. स्वमालकीची गाडी घेणे लोक आता टाळू लागले असून प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीसह ओला, उबर यांसारख्या शेअर्ड मोबिलिटी आणि शटल सेवा यांसारख्या पर्यायांचा अवलंब करू लागले आहेत. त्यातच सतत वाढत असलेल्या इंधनाच्या किमती, वाहतूककोंडीचे वाढते प्रमाण, पार्किंगसाठी पुरेशा जागांचा भाव, पत इतिहास खराब असणे, विम्याच्या अवाच्या सवा किमती इत्यादी कारणांमुळे लोकांचा स्वमालकीची गाडी न घेण्याकडे कल वाढू लागला आहे.
या क्षेत्राला कायद्याच्या कक्षेत घेण्याचे सरकारने ठरवले की जगभरातील व्यावसायिक आणि आघाडीच्या कंपन्या भारतासारख्या प्रचंड आकाराच्या बाजारपेठेत ही संधी साधण्यासाठी धडपड करतील. कारण नवउद्यमी आणि शेअर्ड मोबिलिटीच्या सर्जनशील संकल्पना या दोन्हींसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी व्यवसायवृद्धीला वावही भरपूर आहे. भारतीय गाडी मालक आणि भाडेकरू यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन भविष्यात या क्षेत्रात काम करू इच्छिणा-या कंपन्यांना त्यांची धोरणे आखावी लागतील, नवनवीन कल्पना राबवाव्या लागतील.
अमेरिकेत टुरो किंवा गेटअराऊंड यांच्या तुलनेत पारंपरिक कार एजन्सीच्या माध्यमातून गाडी भाड्याने घ्यायची असेल तर ४७ टक्के जास्त पैसे लागतात. पारंपरिक कार एजन्सी आणि पी२पी कार रेंटल पद्धत यांच्यातील हा किमतीचा फरक भारतात आणखी कमी होईल. कारण भारतात कमी वेतनावर काम करणारे कर्मचारी आणि परवडणा-या कार या दोन्हींची मुबलक उपलब्धता असणार आहे. तसेच पीअर टू पीअर कार रेंटिंग ही पद्धत फक्त सरासरी गाडी मालकांसाठीच नाहीतर जुन्या आणि देखण्या गाड्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनाही या व्यवसायात प्रवेश करण्याची संधी उपलब्ध करून देते. कारण काही उत्साही प्रवासी असतात ज्यांना जुन्या जमान्यातील गाड्यांमधून प्रवास करण्याची हौस असते.
ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक गाड्या आहेत त्यांनाही जास्तीचे उत्पन्न मिळवण्याची संधी ही पद्धत उपलब्ध करून देते. ज्यांना स्वमालकीची गाडी घ्यायची नाही किंवा ज्यांची तशी ऐपत नाही, परंतु त्यांना वेळोवेळी गाडीची गरज लागते अशा लोकांसाठीही हे पी२पी कार रेंटिंग प्रारूप सुयोग्य ठरणार आहे. या प्रारूपामुळे भविष्यात भारतीयांना स्वमालकीची गाडी घेऊन तिच्या कर्जाचे हफ्ते फेडण्याचा आणि स्वतःचा क्रेडिट स्कोर नीट राखण्याचा तणाव राहणार नाही. आता या क्षेत्राला सरकार कायद्याच्या कक्षेत कधी आणि कसे आणते यावर लोकांना या पी२पी कार रेंटल सेवेचा लाभ होतो किंवा कसे हे येत्या काळात स्पष्ट होऊ शकेल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Suyash Srivastava is a practicing advocate who has graduated with LL.M. from the University of California Berkeley (Boalt Hall) with a certificate in Public Law ...
Read More +