Published on Sep 20, 2019 Commentaries 0 Hours ago

तुरुंगातून सुटका झाल्यावर पुन्हा गुन्हा करण्याची प्रवृत्ती रोखण्यासाठी, या कैद्यांना पुन्हा सर्वमान्य जगता यायला हवे. त्यासाठी जगभर ‘योग’मार्ग वापरला जातोय.

कैद्यांतील ‘गुन्हेगार’ संपविणारा ‘योग’प्रयोग

कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि तुरुंगांच्या ढासळलेल्या परिस्थितीमुळे कैद्यांना आणि तुरुंग अधिकाऱ्यांनाही सध्या प्रचंड तणावाचा सामना करावा लागत आहे. या तणावासोबतच एकदा तुरुंगातून सुटका झाल्यावर पुन्हा गुन्हा करण्याची प्रवृत्ती, ज्याला इंग्रजीत ‘रेसिडिव्हीजम’ म्हणतात हा सुद्धा सध्याच्या गुन्हेविश्वातील गंभीर मुद्दा ठरतो आहे. ही समस्या फक्त विकसनशील देशातच नाही. तर, अमेरिका, युनाइटेड किंग्डम आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशात देखील बळावली आहे. या देशांमध्ये ‘रेसिडिव्हीजम’चे प्रमाण अनुक्रमे ५५ टक्के, ७२ टक्के आणि ४४.६ टक्के इतके आहे. ताज्या उपलब्ध माहितीच्या आधारे, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड आणि स्वीडन या देशांमध्ये पुन्हा गुन्हेगार म्हणून पकडले गेलेल्या कैद्यांचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

या गुन्हेगारवृत्तीचे, रेसिडिव्हीजमचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षा करणे, मानसोपचार पुरवणे आणि कौशल्य प्रदान करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, या उपायांचा समावेश होतो. भारतातील अनेक तुरुंगातील या प्रयत्नांमध्ये ‘योग’ पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. योगमार्गाकडे आता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा म्हणून देखील पाहिले जात आहे. काही संशोधनात असे निष्कर्ष निघाले आहेत की, योगामुळे कैद्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि वागणुकीवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे काही पाश्चिमात्त्य देशांमध्येही कैद्यांसाठी योगप्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढत आहे. तरीही अद्याप योगाचा तुरुंगांमधील वापर हा अतिशय मर्यादित असून, तो तुरुंग अधीक्षकांच्या निर्णयावर अवलंबून आहे.

योग प्रशिक्षण आणि कमी होणारा रेसिडिव्हीजम दर यांचा संबंध

भारतात आधीपासूनच कैद्यांच्या पुनर्वसनसाठी योग प्रशिक्षण आणि साक्षरता अभियानाचा समावेश असल्याचे आपल्याला आढळते. २०१५ मध्ये, तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी कैद्यांना योग प्रशिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण देऊ केले, ज्या प्रशिक्षणानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार होते. जेणेकरून त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांना योग प्रशिक्षक म्हणूनही काम मिळू शकते. २०१८ मध्ये, दिल्लीमधील तुरुंग विभाग आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान (MDNIY) यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट संजीवन’ च्या अंतर्गत एका वर्षात १००० कैद्यांना योग प्रशिक्षक बनण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, बिहारमधील तुरुंग विभागाने राज्यातील ५६ तुरुंगात कैद केलेल्या ४८००० कैद्यांना योग शिकवण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिविंग’ संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. तेलंगणाच्या उस्मानिया विद्यापीठात केलेल्या संशोधनात असे सुचवले आहे की, योग आणि शिक्षण प्रसाराच्या सारख्या अभियानांमुळे कैद्यांच्या सुटकेनंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण कमी होते.

२०१० मध्ये, मध्य प्रदेशातील तुरुंग अधिकाऱ्यांनी अशी योजना सुरु केली की, जे कैदी तीन महिन्याचे योग प्रशिक्षण शिबीर पूर्ण करतील त्यांचा शिक्षेचा कालावधी कमी केला जाईल. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, योगाच्या प्रशिक्षणामुळे कैद्यांना फक्त शारीरिकच फायदा झाला नाही तर कैदी अधिक शांत झाले आहेत आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी त्यांना मिळाली आहे. काही कैद्यांनी त्यांच्या सुटकेनंतर योग्य प्रशिक्षक बनण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.

सुटकेनंतर तुरुंगातून बाहेर पडलेल्या कैद्यांना सर्वमान्य जगता येण्यासाठी परिस्थिती निर्माण करणे ही गुन्हेगारीवृत्ती संपवणारे, म्हणजेच रेसिडिव्हीजमचे प्रमाण कमी करण्याचा प्रभावी मार्ग आहे. योग प्रशिक्षक बनण्याच्या प्रशिक्षणाने त्यांना भविष्यातील रोजगाराची संधीची दारेही उघडी होतात. त्याचबरोबर योगामुळे त्यांना बाहेरच्या जगात गेल्यावर ज्या तीव्र बदलाला सामोरे जावे लागणार आहे, त्याच्याशी सामना करण्याचे बळही मिळते.

तुरुंगातील योग प्रशिक्षणाचे अतिरिक्त फायदे

२०१६ च्या अहवालानुसार, भारतात १४१२ तुरुंग आहेत, ज्यात १,३५,६३८ दोषी गुन्हेगार कैद राहतात. ‘प्रिझन स्टॅटिस्टिकस इंडिया २०१५’ च्या अहवालानुसार, भारतात रेसिडिव्हीजमचे प्रमाण ३ टक्के इतके आहे, जे इतर देशांच्या तुलनेत खूप कमी असले तरी रेसिडिव्हीजम भारतासाठी देखील गंभीर समस्या आहे. एकदा तुरुंगातून सुटका झाल्यावर पुन्हा गुन्हा करताना पकडले गेलेल्या गुन्हेगारांची संख्या २०१५ मध्ये ५५७६ इतकी होती. तसेच, तुरुंगांमध्ये कैद्यांची संख्या वाढत आपल्या क्षमतेच्या ११३.७ टक्क्यांवर पोहचली आहे, असे २०१६ च्या अहवालात नमूद केले आहे.

तुरुंगातील अशा परिस्थितीचा कैद्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो, कैदी चिंता, नैराश्य यांना सामोरे जातात तर आत्महत्येच्या आणि आक्रमक हिंसेच्या विचारात वाढ होते. ‘प्रिझन स्टॅटिस्टिकस इंडिया २०१६’ च्या अहवालानुसार ६०१३ कैदी मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, असे नमूद केले आहे. तुरुंगात अनैसर्गिक मृत्यूंची संख्या २०१५ ते २०१६ या कालावधीत दुप्पट झाली तर आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढले.

अमेरिका, युनाइटेड किंग्डम आणि ऑस्ट्रेलियासारखे विकसित देशात तुरुंगात योग प्रशिक्षणाला संस्थात्मक स्वरूप देण्यात येत आहे; अशा वेळी भारताने अंधारात चाचपडू नये. ‘जर्नल ऑफ सायकायट्रिक रिसर्चमध्ये’ प्रकाशित झालेल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका पेपरमध्ये, युनाइटेड किंग्डममधील कैद्यांवर प्रयोग करून योग प्रशिक्षण घेतल्याने मनाचे स्वास्थ्य कसे सुधारते आणि तणाव कसा कमी होतो, यावर भाष्य केले आहे.  या प्रयोगासाठी, कैद्यांची १० आठवड्यांच्या योग प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी बिनहेतूक निवड केली होती. या प्रयोगाच्या शेवटी मिळालेल्या माहितीतून असे समोर आले की, कैद्यांच्या पुनर्वसन कार्यक्रमात योग महत्वाची भूमिका निभावू शकतो. ज्या कैद्यांनी अधिक योगवर्गात भाग घेतला आणि त्याचबरोबर स्वतःहून योग केला (आठवड्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा), त्यांचा तणाव कमी झाल्याचे नमूद केले गेले. त्यामुळे, असे योग वर्ग जर तुरुंगांमध्ये घेण्यात आले तर कैद्यांच्या मानसिक तणावात घट होईल आणि त्यांच्या वागणुकीत सकारात्मक बदल घडून येईल. या बदलाचा त्यांच्या सुटकेनंतर त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर ठेवण्यास मदत होईल, असा संशोधनाचा निष्कर्ष काढला गेला.

‘प्रिझन योगा प्रोजेक्ट’, ‘लिबरेशन प्रिझन योगा’ आणि ‘द प्रिझन फिनिक्स प्रोजेक्ट’ या तीन संस्था तुरुंगात कैद्यांना योग शिक्षण देण्यासाठी समर्पित आहेत. प्रिझन योगा प्रोजेक्टची सुरुवात कॅलिफोर्नियामध्ये झाली, आता अमेरिकेतील विविध तुरुंगातील कैद्यांना योग प्रशिक्षण पुरवण्याचे काम ते करतात. अमेरिकेतील रेसिडिव्हीजमचे प्रमाण कमी करणे हे त्यांचे ध्येय आहे. प्रिझन फिनिक्स प्रोजेक्ट युनाइटेड किंग्डम मधील ८४ तुरुंगांमध्ये योग आणि ध्यान वर्ग आयोजित करतात. महिन्याभरात ते २००० कैद्यांपर्यंत पोहचतात. ऑक्सफर्ड विद्यापीठाने जे संशोधन युनाइटेड किंग्डममधील तुरुंगात केले ते या संस्थेच्या मदतीने केले होते.

भौतिक आणि आध्यात्मिक जीवानाला जोडणारी ही पुरातन विद्या भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. परंतु दुर्दैवाने आज भारतातच ‘कैद्यांसाठी योग’ या विषयावर काम करणारी एकही सरकारी किंवा खासगी संस्था नाही. काही तुरुंगांमध्ये योग वर्ग घेतले जातात, परंतु बरेच अधिकारी मानसोपचारांना प्राधान्य देतात. परंतु, योग आणि मानसोपचार दोन्ही भिन्न लक्ष्य साधतात. मानसोपचार हे मानसिक रोगांवर उपचार म्हणून अतिशय महत्वाचे आहे, तर योग प्रतिबंधात्मक आरोग्य प्रणाली आणि जीवनशैली आहे. जे मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी जात आहेत त्यांच्यासाठी देखील योग एक उत्तम पूरक सराव ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार हे देखील समोर आले आहे की, मानसोपचार बाह्य घटक म्हणून मदत करतो तर योग त्वरित आराम मिळवण्यासाठी पूरक ठरतो.

पुढे काय?

गेल्या महिन्यात २९ ऑगस्ट रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की, सरकार ‘फिट इंडिया मिशन’ च्या अंतर्गत देशभर १२,५०० आयुष (AYUSH) केंद्र उभारणार आहे. त्यापैकी ४००० केंद्र २०१९ च्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, याचाही त्यांनी उल्लेख केला. आयुष मंत्रालय जे आयुर्वेद, योग, युनानी,होमिओपॅथी इत्यादींचा प्रसार करते, त्या मंत्रालयाच्या अंतर्गत ही केंद्रे असतील. देशात सार्वजनिक आरोग्यावर जे नव्याने विशेष लक्ष दिले जात आहे, त्याचा आवाका तुरुंगातही वाढवणे आवश्यक आहे. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी या आयुष केंद्रांच्या सहकार्याने अधिकाधिक कैद्यांना योग प्रशिक्षण देण्यासाठी कार्य केले पाहिजे. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान सोबत भागीदारी प्रस्थापित करण्यास, दिल्लीच्या ‘प्रोजेक्ट संजीवन’ चे उदाहरण समोर ठेवून एकत्र काम करण्यास त्यांना प्रोत्साहीत केले पाहिजे.

योग प्रशिक्षण घेऊन तुरुंगातून सुटका झालेल्या कैद्यांना तुरुंगात योग प्रशिक्षण देण्यासाठी नेमणे महत्वाचे ठरेल. त्यांना तुरुंगाच्या वातावरणाचा अनुभव असल्याने ते इतर कैद्यांच्या समस्या समजू शकतील आणि अधिक चांगला सल्ला देण्यास पात्र असतील. योग हे आज भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी’साठी उत्तम साधन म्हणून उदयास आले आहे आणि महत्वाचे ठरले आहे. या संधीचा वापर करून, परराष्ट्र मंत्रालयाने बऱ्याच देशांमध्ये योग प्रशिक्षक पाठवले आहेत. त्याच व्यक्तींचा वापर करून गरजू देशांना या सुविधेच्या मार्फत आपण मदतीचा हात पुढे करू शकतो. कारण नागरिकांना गुन्हेगारी वृत्ती आणि तुरुंगापासून लांब ठेवणे हे फक्त देशाच्या हिताचे नाही, तर मानवतेच्या हिताचे देखील आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.