Published on May 04, 2021 Commentaries 0 Hours ago

सध्याच्या साथरोगासारखी अत्यंत टोकाची तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली, तर आण्विक प्रकल्पामधील अंतर्गत धोके आणखी गंभीर होण्याची शक्यता असते.

कोरोनामुळे अणूसुरक्षा अधिक आव्हानात्मक

खरे तर, कोणत्याही काळातही अणूसुरक्षा हे एक आव्हान असते. पण कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अणूसुरक्षा ही अधिक आव्हानात्मक ठरते. कारण साथरोगाशी सामना करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात, जी धोरणे अवलंबली जातात त्याचा सकृतदर्शनी संबंध नसलेल्या मुद्द्यांवर कोणता परिणाम होऊ शकतो, त्याचे पुरेसे आकलन सरकारला होत नाही.

उदाहरणार्थ, कोविड-१९ मुळे समाजाच्या सर्व स्तरांवर प्रचंड आर्थिक आणि सामाजिक दबाव आला आहे. त्याचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण झाला आहे, यात शंका नाही. या सगळ्याचा संवेदनशील आण्विक सुविधांमधील कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होईल आणि त्यामुळेच अंतर्गत धोक्यांची शक्यता निर्माण होऊ शकते. येत्या जुलै महिन्यात व्हिएन्ना येथे ‘अणू सामग्रीचे भौतिक संरक्षण’ (सीपीपीएनएम) यामध्ये सुधारणेच्या दृष्टीने होणाऱ्या आढावा परिषदेत कार्मिक विश्वसनीयता कार्यक्रमाच्या स्थितीचा आढावा घेण्याची चांगली संधी आहे. त्याच वेळी व्यापक भौतिक संरक्षण उपाययोजनांतर्गत अंतर्गत धोकेही शोधून काढता येतील.

गेल्या वर्षीच्या म्हणजे २०२० च्या सप्टेंबरमध्ये कोविड-१९ मुळे जी परिस्थिती निर्माण झाली, त्या वेळी राबविण्यात आलेल्या मोहिमांतर्गत साथरोगाचा अणू प्रकल्पांवर झालेला परिणाम, किरणोत्सर्गापासून संरक्षण आणि आपत्कालीन स्थितीसाठी पूर्वतयारी या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय अणूउर्जा संस्थेकडून (आयएईए) चर्चा करण्यात आली. ‘आंतरराष्ट्रीय अणू सुरक्षा गटा’च्या वार्षिक बैठकीमध्ये ही चर्चा झाली. हा गट अणू सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा करणारा आणि सल्ला देणारा जगभरातील सर्वोच्च तज्ज्ञांचा गट आहे.

या असंभवनीय काळात चिवटपणा आणि माहितीची देवाणघेवाण हे महत्त्वपूर्ण विषय असल्याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. मानवी स्रोतांचे महत्त्व, मानवी निर्बंध आणि सुरक्षित अंतर राखणे व आपत्कालीन तयारी कायम ठेवण्याच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. ‘नव्या कामगारांचे विलगीकरण, अणुउर्जा प्रकल्पांवरील बांधकाम तात्पुरते थांबवणे आणि अल्प कामगारांकडून काम सुरू ठेवणे,’ यांसह अन्य अनेक उपायांच्या माध्यमातून सहभागींनी वेगळ्या उपाययोजनाही मांडल्या.

अणू प्रकल्पांची सुरक्षा आणि तो कार्यान्वित करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण गोष्टींच्या चर्चेमधून एक मुद्दा बाजूला पडला. तो म्हणजे यांपैकी काही पाऊले ही अंतर्गत धोके वाढवू शकतात. ही अणू सुरक्षेसंबंधातील आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. सध्याच्या साथरोगासारखी अत्यंत टोकाची तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली, तर अंतर्गत धोके आणखी गंभीर होण्याची शक्यता असते.

कोविड-१९ साथरोग आणि त्यामुळे विविध देशांमध्ये करावा लागलेला लॉकडाउन यांमुळे एकूणच आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. कामात घट होणे, कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागणे, कामाच्या ठिकाणी कमी लोकांची उपस्थिती आणि काही कर्मचाऱ्यांकडून आभासी पद्धतीने काम करवून घेणे आदी परिणाम झालेले दिसतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चीड आणि असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. या सर्वांचा एकूण परिणाम होऊन अंतर्गत हल्ल्यांचा धोकाही वाढू शकतो.

अंतर्गत धोके हा चिंतेचा विषय का असतो? अणू प्रकल्प आणि उर्जा प्रकल्पांमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना किती प्रमाणात सुविधा मिळते त्यानुसार अणू सुविधांच्या कार्यपद्धती, सुरक्षा पद्धती आणि सुरक्षेचे नियम; तसेच त्यातील काही पळवाटा आणि सुरक्षेतील संभाव्य धोके या सर्व घटकांची चांगली जाण असते. जर संभाव्य धोके वाढले, तर या कर्मचाऱ्यांना सुरक्षा यंत्रणेच्या सर्व स्तरांची पडताळणी करण्याचा अधिकार असतो.

अंतर्गत कक्षेतील व्यक्ती या ज्ञात आणि विश्वासू सहकारी असल्या, तरीही अन्य विचित्र किंवा संशयास्पद वागणूक ओळखणे जवळजवळ अशक्य आहे. अंतर्गत धोके लवकरात लवकर ओळखता यावेत, यासाठी संस्थात्मक सुरक्षेसंबंधीच्या गोष्टी अधिक मजबूत करायला हव्यात. विशेषतः रोजगार हिरावून घेणाऱ्या या साथरोगाच्या मध्याच्या काळात आपले मित्र आणि सहकारी यांच्याविरोधात माहिती देण्यास स्वाभाविकपणे विरोधच असणार. अशा वेळी धोक्याच्या दर्शकांची जाणीव करून देण्यासाठी व्यक्तींना संस्थांकडून प्रोत्साहन द्यायला हवे.

अंतर्गत धोके जरी क्वचितच निर्माण होत असले, तरी जेव्हा असे धोके निर्माण होतात, तेव्हा त्याचे परिणाम गंभीर होतात. उच्च क्षमतेच्या युरेनियम (एचईयू) आणि प्लुटोनियम (पीयू)च्या चोरीच्या किंवा हानीच्या अलीकडेच घडलेल्या बहुतेक सर्व घटना या कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच झालेल्या होत्या. यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे काही गुन्हे तर प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांनीच केलेले होते. अशा घटनांची कारणे अनेक आहेत. उदाहरणार्थ, एखादा वरिष्ठ त्याच्या कर्मचाऱ्यावर नाराज होता म्हणून किंवा आर्थिक अथवा अन्य भत्त्यांच्या लालसेमुळे कर्मचाऱ्याकडून असे गुन्हे घडल्याचे आढळून आले आहे. मॅथ्यू बन आणि स्कॉट सेगन यांच्या म्हणण्यानुसार, ‘असंतुष्ट कर्मचाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली,’ हे वाक्य अणू क्षेत्रात दीर्घ काळापासून चिंतेचा विषय ठरले आहे.

अंतर्गत धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे, एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरी देण्यापूर्वीच त्याच्या पार्श्वभूमीचा कसून तपास करायला हवा. असा तपास एकदा करून भागणार नाही, तर दर काही काळानंतर तो पुन्हा करायला हवा. किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला अधिक सुरक्षेची आवश्यकता असलेल्या कामाच्या ठिकाणी अथवा उच्च क्षमतेच्या सुरक्षा प्रकल्पांच्या ठिकाणी त्याची बदली करण्यात आली, तर त्या वेळी त्याची पुन्हा एकदा कसून तपासणी करायला हवी. अर्थात, हा काही पूर्णपणे बिनधोक उपाय नाही आणि अशा तपासामुळे सुरक्षेचा भंग होणारच नाही, अशी हमीही देता येणार नाही.

या संदर्भातील अधिक व्यापक आणि सखोल दृष्टिकोन म्हणजे, असंतुष्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, अधिक शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि अधिक कठोर लेखापरीक्षण प्रक्रिया यांची आवश्यकता. अणू प्रकल्पांमध्ये काम करणारे कर्मचारी भुकटी किंवा द्रव स्वरूपातील घटकांची हाताळणी करीत असतात, अशा वेळी त्यातील अल्प भाग चोरणे अगदी सोपे असते. कारण अशा अल्प प्रमाणातील घटकाच्या भुरट्या चोरीकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते.

अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण जरी कमी असले आणि त्या विशिष्ट सुरक्षेच्या संदर्भानेच घडत असल्या, तरीही अशा घटनांमध्ये आलेले अनुभव आणि शिकलेले धडे व्यापक प्रमाणात प्रसारित करायला हवेत. अशा घटना नव्या नाहीत किंवा त्या केवळ एखाद्याच देशात किंवा प्रदेशात घडत असतात, असेही नाही. दक्षिण आफ्रिकेतील कोईबेर्ग या अणूउर्जा प्रकल्पात १९८२ मध्ये ‘एका आतल्याच माणसाने अणूभट्टीमधील थेट स्टीलच्या प्रेशर व्हेसलवर स्फोटके ठेवली आणि नंतर त्यांचा स्फोट घडवून आणला.’ हा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी ही घटना घडली होती.

एवढेच नव्हे, तर काही कट्टरपंथीय राजकीय प्रकरणेही घडली आहेत. या प्रकरणांमध्ये अंतर्गत धोके ओळखण्यासाठी आराखडा करण्यात आलेले ‘कर्मचारी विश्वसनीयता कार्यक्रम’च उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ईलियास बौघलाब याचेच उदाहरण घ्या. इलियास हा बेल्जियममधील डोएल अणूउर्जा प्रकल्पामध्ये सुरक्षा तंत्रज्ञ म्हणून काम करीत होता. त्याला अत्युच्च सुरक्षा असलेल्या भागात प्रवेश करण्यास परवानगी होती.

साधारणतः २०११ च्या अखेरीस किंवा २०१२ च्या प्रारंभी इलियास कट्टरवादी बनला आणि तो इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत दाखल झाला. सीरियात गेला आणि तेथेच त्याचा अंत झाला. त्याने आपल्याला मिळालेल्या अत्युच्च सुरक्षा परवान्याचा वापर प्रकल्प धोक्यात आणण्यासाठी केला होता का, याविषयी आढळलेले निदर्शक अगदी अल्प असले, तरी त्याचे कट्टरवादी होणे, आढळून न येणे हे धोकादायकच होते.

अंतर्गत धोक्यांना नेहमीच एकाच बाजूने पाहिले जाते. म्हणजे असंतुष्ट कर्मचारी आपला राग आणि चीड आपल्या मालकावर व्यक्त करतात. अणू उर्जा व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी साथरोगाच्या काळातही ‘प्रकल्प सुरक्षितरीत्या कार्यान्वित ठेवले आहेत;’ मात्र, कर्मचाऱ्यांच्या समाधानाविषयी वरिष्ठांनी कधीही आत्मसंतुष्ट राहू नये. या संदर्भात आयएईए अत्यंत सक्रिय आहे.

‘आयएईए’कडून कोविड-१९ ‘परिचालन अनुभव नेटवर्क’ची स्थापना करण्यात आली आहे. हे एक प्रायोगिक तत्त्वावरील नेटवर्क असून साथरोगाच्या काळात ‘नियोजित किंवा राबविण्यात आलेल्या प्रतिक्रियापर कृतींचा साठा’ करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे खूपच उपयुक्त पाऊल आहे. पण या समस्येला अचूक किंवा बिनधोक उत्तर नाही. वास्तविक, साथरोगाच्या संदर्भाने अंतर्गत धोक्याच्या संभवाचा मुद्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये कधीही ठळकपणे उपस्थित झाला नाही, ही चिंतेची गोष्ट आहे. ‘सीपीपीएनएम’मधील सुधारणेसाठी जुलैमध्ये होणारी आढावा परिषद ही अंतर्गत धोक्यांच्या शक्यतेचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने आणि जागतिक व राष्ट्रीय स्तरावर योग्य पाऊले उचलण्याच्या दृष्टीने एक उपयुक्त संधी आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.