Published on Jun 10, 2019 Commentaries 0 Hours ago

कझाखस्थानमधील नझरबायेव यांच्या ३० वर्षाच्या सत्तेनंतर ९ जूनला टोकायेव हे देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. या घडामोडींमुळे कझाखस्तान चर्चेत आलाय.

भारताचा युरेशियातील भागीदार-कझाखस्तान

कझाखस्तान १९९१ साली सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आला. त्यापूर्वीच म्हणजे १९८९ मध्ये नुरसुल्तान नझरबायेव यांच्या हाती देशाचे नेतृत्व आले होते. स्वातंत्र्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, आणि पुढे वारंवार येत राहिले. त्यामुळे आत्तापर्यंतची या देशाची वाटचाल नझरबायेव या नावाशी संलग्न राहिली आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. सतत ३० वर्ष सत्तेत राहिल्यानंतर यावर्षी मार्चमध्ये त्यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला, आणि सेनेटप्रमुख कासीम-जोमार्त टोकायेव यांच्याकडे पदभार सोपवला. काल ९ जून २०१९ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत टोकायेव देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. या सर्व घडामोडींमुळे कझाखस्तान सध्या आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये चर्चेत आहे.

कझाखस्तान हा युरेशियन पटलावरील एक महत्त्वाचा देश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रदेशातील सर्वात मोठा, मोक्याचे स्थान लाभलेला, साधनसंपत्तीने परिपूर्ण, आर्थिकदृष्ट्या प्रगत व समृद्ध, शांतताप्रिय आणि विविधतापूर्ण, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रीय, अशी कझाखस्तानची वैशिष्ट्ये सांगता येतील.

२०१७-१८ ही दोन वर्षं कझाखस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची (यूएनएससी) अस्थायी सदस्यता भूषवली. हा बहुमान मिळवणारा हा मध्य आशियातील पहिला देश ठरला. कझाखस्तानची ‘संतुलित’ परदेशनीती, त्यांनी अवलंबलेले शस्त्र-कपात धोरण, ज्यात ‘अण्वस्त्र-अप्रसारा’वर विशेष भर दिला गेला, आणि शांतताप्रिय मार्गाने विवाद निराकरणात शिष्टाईचे प्रयत्न, या सर्वाचे फलित म्हणून यूएनएससी सदस्यतेकडे पाहता येऊ शकते.

या कालावधीत कझाखस्तानने यूएनएससीतील तीन महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद भूषवले; ज्यात इस्लामिक स्टेट आणि अल-कायदामार्फत फोफावलेला दहशतवाद, अफगाणिस्तानातील तालिबानचा धोका, आणि सोमालिया-एरिट्रियामधील चिंताजनक परिस्थिती हे विषय हाताळले गेले. तसेच जानेवारी २०१८ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा परिषदेच्या प्रतिनिधीमंडळाने, सुमारे ९ वर्षांच्या कालावधीनंतर, अफगाणिस्तानला भेट दिली. एवढेच नाही, तर याचदरम्यान कझाखस्तानची राजधानी अस्ताना येथे सिरीयातील यादवी युद्धातल्या विविध घटकांना एकत्रित आणून त्यांच्यात चर्चा आयोजित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, कझाखस्तान जागतिक पटावरील एक महत्त्वपूर्ण व निर्णायक ‘खेळाडू’ म्हणून पुढे आला आहे. याच्या जोडीला अनेक भौगोलिक, भू-राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक, सांस्कृतिक घटक असे आहेत, ज्यामुळे आज हा देश मध्य आशियाच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

सुमारे २७ लक्ष चौरस किमी क्षेत्रफळ असलेला कझाखस्तान हा जगातील नवव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. तसंच क्षेत्रफळाच्या दृष्टीने, पाच मध्य आशियाई देशांतील सर्वात मोठा, आणि सोव्हिएतोत्तर देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा (रशियानंतर) देश आहे. हा जगातील सर्वात विशाल भूवेष्टित (लँडलॉक्ड) देश आहे. कझाखस्तान ‘द्वि-खंडीय’ (ट्रान्स-कॉन्टिनेंटल) भूभाग असून, त्याचे १०% क्षेत्र यूरोपमध्ये आणि उर्वरित ९०% आशियात मोडते. कझाखस्तानच्या उत्तरेला रशिया, पूर्वेला चीन, आणि दक्षिणेला किर्गिझस्तान, उझ्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान असे तीन मध्य आशियाई देश आहेत.

कझाखस्तान आणि रशिया यांच्यामध्ये सुमारे ७.५ हजार किमी लांबीची सीमारेषा आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सीमेच्या पाठोपाठ ही जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा आहे. मध्य आशियाई देशांपैकी हा एकमेव देश रशियाला जोडून असल्यामुळे इतर देशांचा रशियाशी संपर्क मुख्यतः कझाखस्तान मार्फतच येतो. दुसरीकडे किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तान सोबतच कझाखस्तानही चीनला लागून आहे. किंबहुना, रशिया आणि चीन दोन्हीच्या मध्यात असलेल्या या देशाला भू-संपर्कतेत अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे, ज्याचा परामर्श पुढे घेतला आहे.

कझाखस्तान जरी भूवेष्टित (सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला) देश असला, तरी त्याच्या सीमांवर रणनैतिकदृष्ट्या महत्त्वाचे असे दोन प्रचंड भूवेष्टित जलसाठे आहेत. त्याच्या पश्चिमेला कॅस्पियन समुद्र आहे. हे खाऱ्या पाण्याचं विशाल जलाशय आहे, जे उत्तरेला रशिया, पूर्वेला कझाखस्तान आणि तुर्कमेनिस्तान, दक्षिणेला इराण, आणि पश्चिमेला अझरबैजान या पाच देशांनी वेढलेलं आहे. कॅस्पियन सागराच्या भोवतीच्या पाच देशांमध्ये या जलाशयाची कायदेशीर विभागणी स्पष्ट झालेली नसली, तरी त्याचा पूर्वोत्तर भाग कझाखस्तानच्या मालकीचा आहे, असं ढोबळमानाने मानले जाते. हा सागर आणि त्याच्या सभोवतालच्या भूभागात प्रचंड प्रमाणात हायड्रोकार्बन साठे आढळतात.

कझाखस्तानच्या दक्षिण सीमेवर अरल सागर आहे, जो उझ्बेकिस्तान आणि कझाखस्तानमध्ये विभागलेला आहे. मध्य आशियातील दोन महत्त्वाच्या नद्या अमुदर्या आणि सिरदर्या ह्यांच्या जलनिस्सारणातून अरल समुद्राला पाणीपुरवठा होत असे. मात्र सोव्हिएत काळात नद्यांना घातलेले बांध, विस्तृत कालवे-प्रणाली, आणि अमर्याद सिंचन-उपसा, यामुळे नद्यांचे पाणी समुद्रापर्यंत पोहोचणे बंद झाले. परिणामी अरल समुद्र आटत गेला, ज्यातून पारिस्थितीकीय बिघाड, जैव-विविधतेचा ऱ्हास, शेतीचक्रात अडचणी, पाणीटंचाई, रोगराई, मानवी शरीरांत जनुकीय बिघाड, अश्या गंभीर समस्या निर्माण झाल्या. आज अरल समुद्राभोवतीचे दोन्ही देश, आणि त्याची झळ पोहोचलेले इतर प्रादेशिक देश, या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

कझाखस्तानमध्ये विपुल नैसर्गिक संसाधनं सापडतात. विशेषतः तेल, नैसर्गिक वायू, आणि युरेनियम हे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अति-महत्त्वाचे पदार्थ येथे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्याच्या संशोधित तेलसाठ्यांमध्ये हा देश जगातील ११व्या स्थानावर आहे. मात्र येथील अंतर्गत वापर मर्यादित असल्यामुळे, इथले जवळपास ८५% तेल निर्यात केले जाते. रशिया, युरोपियन युनियन आणि चीन हे कझाख तेलाचे प्रमुख आयातदार आहेत. तसंच, कझाखस्तानमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा (ऑस्ट्रेलिया पाठोपाठ) युरेनियम साठा आहे. असं असून २००९ सालापासून हा देश युरेनियमच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये जगाच्या युरेनियम उत्पादनात कझाखस्तानचा वाटा ३९% होता. याव्यतिरिक्त, येथे लोहखनिज, कोळसा, सोनं, चांदी, तांबं, शिसं, जस्त, टंगस्टन, आणि बराईट यासारखी अनेक खनिजं सापडत असून; त्याचा जस्त, टंगस्टन आणि बराईटच्या संशोधित साठ्यांमध्ये जगात प्रथम क्रमांक लागतो. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ‘रेअर अर्थ’ पदार्थांचे देखील येथे मुबलक साठे आहेत, ज्यांची खनन प्रक्रिया सुरु केल्यास या देशाला अजून महत्त्व प्राप्त होऊ शकतं.

आधी चर्चा केल्याप्रमाणे, कझाखस्तानला अतिशय मोक्याचं स्थान लाभले आहे. युरोप-आशिया खंडांच्या मध्यभागी स्थित, रशिया आणि चीन या दोन्ही प्रादेशिक महासत्तांशी जोडणारी सीमा, मध्य आशियाई देशांबरोबरची निकटता, आणि कॅस्पियन समुद्राचं स्थान, या सर्व घटकांमुळे आंतर-राष्ट्रीय, आंतर-क्षेत्रीय, आणि आंतर-खंडीय संपर्कतेमध्ये या देशाला महत्त्व आहे. आज युरेशियन प्रदेशातील सर्व वाहतूक कॉरीडोर्स आणि ऊर्जा पाइपलाइन्स त्यांच्या जटिल जाळ्यामध्ये कझाखस्तान एक महत्त्वाचा दुवा बनला आहे.

खरंतर आशिया आणि युरोप यांना जोडणाऱ्या दुव्याची भूमिका या भूभागाने अनादी काळापासून वठवली आहे. प्राचीन काळातील ‘सिल्क रोड’च्या अनेक शाखांपैकी एक शाखा येथील विस्तृत गवताळ प्रदेशातून जात असे. इतिहासात अनेक राज्यकर्त्यांनी या प्रदेशावर आक्रमणं केली, तरीही येथील भटकी विमुक्त जीवनशैली आणि पशुपालनावर आधारित अर्थव्यवस्था अबाधित राहिली. १९व्या शतकाच्या सुरुवातीलाच झारने चढाई करून हा प्रदेश रशियन साम्राज्याला जोडला. १८६०च्या दशकात झारने उर्वरित मध्य आशियाकडे आपला मोर्चा वळवला; मात्र त्याअगोदरच आजचा कझाखस्तानचा भूभाग रशियन साम्राज्यात सर्वतोपरी विलीन व एकरूप झाला होता.

१९१७च्या बोल्शेविक क्रांतीनंतर संपूर्ण मध्य आशिया सोव्हिएत संघात अंतर्भूत झाला. सुरुवातीला किर्गिझ गणराज्याचा भाग असलेल्या कझाख प्रांताला १९३६ मध्ये स्वतंत्र गणराज्याचा दर्जा मिळाला. रशियन आणि सोव्हिएत काळात येथे शेती, उद्योगधंदे, खाणकाम यांचा विस्तार झाला; वाहतूक, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचाही विकास झाला. मात्र त्याचबरोबर रशियन भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव वाढत गेला. रशियन आणि स्लाव्ह वंशाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर येथे स्थलांतर केल्यामुळे कझाखस्तानची वांशिक-भाषिक समीकरणे बदलत गेली.

१९९१ला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाल्यानंतर कझाखस्तानने लोकशाहीनिष्ठ घटना आणि मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मात्र लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने अजून कझाखस्तानला बरीच वाटचाल करायची आहे. स्वातंत्र्यानंतर देशात अधूनमधून सार्वत्रिक निवडणुका घेतल्या गेल्या. पण प्रत्येक निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष नझरबायेव प्रचंड बहुमताने निवडून येत राहिले. त्यांच्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात देखील मुदतवाढ केली गेली. राज्यघटनेमध्ये कुठलीही व्यक्ती दोनपेक्षा अधिक वेळा राष्ट्राध्यक्षपदावर राहू शकत नाही, अशी तरतूद असतानाही २००७ साली घटनेत बदल केला गेला. केवळ दोन कार्याकाळांची तरतूद ही पहिले राष्ट्राध्यक्ष नझरबायेव यांना लागू पडत नाही, असं प्रावधान घटनेत घातलं गेलं. त्यानंतर अनुक्रमे २०११ आणि २०१५च्या निवडणुकांत ते बहुमताने निवडून आले.

आता ३० वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर नझरबायेव यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरीही अजूनही ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख आहेत. किंबहुना ते पद तर त्यांना तहहयात बहाल करण्यात आलं आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी ज्या प्रकारच्या संस्था आणि रचना विकसित व्हाव्या लागतात, त्या अजून कझाखस्तानात होऊ शकलेल्या नाहीत. मात्र २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्षाचे काही अधिकार संसदेकडे वळते केल्यामुळे लोकशाही समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आता नवीन राष्ट्राध्यक्ष निवडीनंतर या प्रक्रियेचे काय होते, हे पाहावे लागेल.

नझरबायेव यांनी राष्ट्राला विकसनशील देशांच्या पंक्तीत आणून बसवलं हे मात्र खरं. कझाखस्तान ही मध्य आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, जिचा स्वातंत्रोत्तर काळात सातत्याने विकास व विस्तार होत गेला. गेल्या २७ वर्षांत येथील दरडोई एकूण घरगुती उत्पादनात (पर कॅपिटा जीडीपी) सुमारे २० पटींनी वाढ झाली असून, आता या देशाने वर्ल्ड बँकेच्या वर्गीकरणानुसार सरासरीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या देशांच्या गटात प्रवेश केला आहे. २०५० पर्यंत जगातील सर्वात विकसित ३० देशांमध्ये कझाखस्तानला नेऊन ठेवण्याची योजना राष्ट्राध्यक्ष नझरबायेव यांनी आखली. तथापि कझाख अर्थव्यवस्था संपूर्णतः नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे, ज्यात विविधता आणल्याशिवाय देशाची सर्वांगीण प्रगती होणार नाही. तेलाच्या घटत्या किंमतीमुळे अलिकडच्या काळात येथील आर्थिक वाढीच्या दरावर विपरीत परिणाम झाला आहे.

नझरबायेव यांच्या नेतृत्वाखाली सरकारने भाषिक-सांस्कृतिक विविधतेच्या आधारावर बहु-सांस्कृतिक (मल्टी-कल्चरल) समाजनिर्मिती, विविध वंशांमध्ये शांततापूर्ण संवाद, आणि कायदेशीर समता, यावर भर दिला. सुमारे १७ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या कझाखस्तानात एकूण १३० भाषिक/वांशिक समूह वास्तव्य करतात, ज्यात कझाख (६५%) आणि रशियन (२३%) यांची संख्या लक्षणीय आहे. कझाख आणि रशियन या दोन्ही भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा आहे. सोव्हिएत काळापासून सिरिलिक (रशियन) लिपीत लिहिल्या जाणाऱ्या कझाख भाषेचं मात्र आता लॅटिन लिपीत परिवर्तन होते आहे, जी प्रक्रिया २०२५ पर्यंत पूर्ण होईल. देशात सुमारे ७०% इस्लामधर्मीय आणि २६% ख्रिश्चन असले, तरी राज्य संपूर्णतः धर्मनिरपेक्ष आहे. विशेष म्हणजे पारंपारिक भटकी जीवनशैली आणि पशुपालन, ह्यांची पाळंमुळं त्यांनी आजही जतन करून ठेवली आहेत. किंबहुना त्यांच्या बहु-सांस्कृतिक समाजाचे अधिष्ठान भटक्या विमुक्त जीवनशैलीतच सापडते, असे ते अभिमानाने सांगतात.

स्वातंत्र्यानंतर १९९७मध्ये कझाखस्तानची राजधानी अल्माटीहून अस्ताना येथे हलवण्यात आली. खरंतर अस्ताना हे सर्वतोपरी नवंकोरं शहर त्याच कारणासाठी वसवण्यात आलं. त्यामागे नझरबायेव यांची अतिशय चतुर भूमिका होती. अल्माटी हे शहर देशाच्या दक्षिण टोकाला आहे, आणि त्यावर आजही रशियन/ सोव्हिएत पाऊलखुणा आहेत. त्याउलट अस्ताना नव्याने निर्मिल्यामुळे त्यात जाणीवपूर्वक कझाख सांस्कृतिक छाप सोडली आहे. तसंच अस्ताना देशाच्या उत्तरेकडे असल्यामुळे या प्रांताकडे कझाख भाषिक लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले. परिणामी तेथील रशियनबहुल लोकसंख्या आणि रशियन सांस्कृतिक प्रभाव या दोन्हीला चलाखपणे शह दिला गेला. आज अस्ताना हे शहर देशातील विकास आणि समृद्धीचं प्रतिक म्हणून उदयाला आलंय. जून २०१८ मध्ये येथे भव्य आंतरराष्ट्रीय एक्स्पोचं आयोजन करून नझरबायेवांनी याला एका आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा बहाल केला. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच प्रभारी राष्ट्राध्यक्ष टोकायेव यांनी या शहराचं ‘नुरसुल्तान’ असे नामकरण केले; जी या शहराच्या विकासामागील नझरबायेवांच्या योगदानाची पावती आहे, असं टोकायेवांनी नमूद केले.

कझाखस्तानच्या ‘संतुलित’ विदेशनीतीबद्दल यापूर्वीही उल्लेख आला आहे. या नीतीला राष्ट्रप्रमुखांनी ‘मल्टी-व्हेक्टर’ असे गोंडस नाव दिले आहे. भू-राजकीय स्पर्धेत न पडता सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यात हा देश यशस्वी ठरला आहे. एकीकडे मोठा शेजारी व जुना साथीदार रशिया आणि दुसरीकडे जागतिक महासत्ता असलेला अमेरिका; त्याचबरोबर जागतिक पटलावर नव्याने उदयाला आलेले चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन सारखे भागीदार; या सर्वांशीच कझाखस्तानने महत्त्वपूर्ण सहकार्य प्रस्थापित केले आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटना, शांघाय सहकार्य संघटना, युरोपीय सुरक्षा सहकार्य संघटना, इस्लामी देशांची संघटना, युरेशियन आर्थिक संघ, यासारख्या जागतिक व प्रादेशिक बहुपक्षीय संस्थांतही ते सक्रीय आहेत. युएनएससीमधील सदस्यतेबद्दल आधी उल्लेख आलाच आहे, पण त्याचबरोबर कझाखस्तानच्या ‘आशियातील परस्परसंवाद आणि विश्वास-निर्माण परिषद’ (सिका) आणि ‘जागतिक आणि पारंपरिक धर्मांच्या नेत्यांची महासभा’, या दोन आंतरराष्ट्रीय उपक्रमांची स्तुती केली जाते. ‘शांतता-बांधणी’ आणि ‘चर्चेतून विवादाचे निराकरण’ या क्षेत्रातील कझाखस्तानचे कार्य वाखाणण्याजोगे आहेच; पण विशेष म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्याकडे आलेल्या सोव्हिएत-कालीन अण्वस्त्रांची विल्हेवाट लावून त्यांनी जगासमोर ‘अण्वस्त्र-अप्रसारा’चं एक अनोखे उदाहरण प्रस्तुत केले आहे.

बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत कझाखस्तानची चीनशी झालेली जवळीक लक्षणीय आहे. गंमत म्हणजे, चीनचा बहु-उद्देशीय आणि बहु-आयामी प्रकल्प ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय), याची घोषणा  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ह्यांनी २०१३मध्ये अस्तानामध्ये केली, ज्यावेळी नझरबायेवही उपस्थित होते. बीआरआयअंतर्गत चालणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये कझाखस्तान भागीदार आहे. चीनहून युरोपला जाणारा रेल्वेमार्ग कझाखस्तानातून जातो. तसेच पाईपलाईनद्वारे तेल आणि नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणावर चीनला निर्यात होतेच; शिवाय त्यांच्या ऑईल एक्स्ट्रॅक्शन आणि प्रक्रिया क्षेत्रातही चीनने भारी गुंतवणूक केली आहे. कझाखस्तानातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेच्या विस्तारासाठी आखलेला ‘नुर्ली झोल’ प्रकल्पही बीआरआयशी संलग्न करण्यात आला आहे, यावरून या देशातील चीनचे महत्त्व लक्षात येते.

भारताचेही कझाखस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. राष्ट्राध्यक्ष नझरबायेवांनी आत्तापर्यंत पाचवेळा नवी दिल्लीला भेट दिली असून, त्यांनी २००९ साली भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणेपद भूषवलं. याच भेटीदरम्यान दोन देशांमध्ये ‘रणनैतिक भागीदारी’चा करारही झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अस्तानाला आत्तापर्यंत दोनदा भेट दिली आहे. २०१७मध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या अस्ताना शिखर परिषदेत कझाखस्तानच्या अध्यक्षतेखाली भारताला संघटनेची पूर्ण सदस्यता मिळाली. तसेच दोन देशांनी संरक्षण क्षेत्रात विशेष सहकार्य स्थापन केलं आहे. कझाख सैन्याच्या ठराविक तुकड्यांना भारतात प्रशिक्षण दिले जातं. त्याचबरोबर अलीकडच्या काळात ‘प्रबल-दोस्तुक’ या नावाने दोन देशांत संयुक्त सैनिकी कसरतीही आयोजित केल्या गेल्या.

गेल्यावर्षी प्रथमच कझाखस्तान ‘पीसकीपिंग कंपनी’ भारतीय सैन्याच्या तुकडीसोबत लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम सैन्यात तैनात झाली; त्यापूर्वी या तुकडीचे पीसकीपिंग-हेतू सैनिकी प्रशिक्षणही भारतातच पूर्ण झाले होते. व्यापार, निवेश व उर्जा-सहकार्याचा विचार करता कझाखस्तान भारताचा मध्य आशियातील सर्वात मोठा भागीदार आहे. २००९मध्ये दोहोंत अणुउर्जेच्या शांततापूर्ण वापराचा करार झाल्यापासून आपण त्यांच्याकडून नियमित युरेनियम खरेदी करतो.

जागतिक आणि विशेषतः युरेशियन पटलावरील कझाखस्तानचे वाढते महत्त्व भारतासाठी सूचक आहे. त्यांच्या यूएनएससी अस्थायी सदस्यतेला आपण पाठींबा दिला होता. तसेच त्यांनीही भारताच्या स्थायी सदस्यतेला वेळोवेळी पाठींबा जाहीर केला आहे. राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामरिक क्षेत्रांतील आपल्या भागीदारीवरून हे स्पष्टच आहे, की कझाखस्तान भारताच्या मध्य आशिया संबंधांतील महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. येत्या काळात हे संबंध विविधांगांनी बहरणे, दोन्ही देशांच्या फायद्याचे ठरू शकते.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.