Originally Published December 21 2018 Published on Jul 25, 2023 Commentaries 0 Hours ago

झेक व स्लोव्हाक या मध्ययुरोपातील देशांशी भारताचे मैत्रीयुक्त संबंध राहिले आहेत. यासंबंधांचा इतिहास आणि भविष्यातील संभावनांचा वेध घेणारा हा लेख

मध्य यूरोप आणि भारत
मध्य यूरोप आणि भारत

जगभरात आपल्या मित्रांमध्ये वाढ करण्यासाठी भारताने गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रयत्न चालवले आहेत. त्यात युरोपीय देशांचे स्थान महत्त्वाचे आहे. युरोपच्या मध्यवर्ती असलेल्या देशांशी मैत्रीचे नाते घट्ट करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना युरोपीय महासंघातील देशही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्यातीलच दोन देश म्हणजे झेक आणि स्लोव्हाक ही प्रजासत्ताकं. रूढार्थाने हे दोन्ही देश भारतापासून हजारो मैल दूर आहेत. मात्र, तरीही या दोन्ही देशांशी भारताचे केवळ द्विपक्षीय पातळीवरीलच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे संबंध आहेत. पूर्वाश्रमीच्या एकसंध झेकोस्लोव्हाकिया या देशाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर हे सहजच लक्षात येते. उभय देशांचा स्वातंत्र्यलढा समान सूत्रावर लढला गेला आणि तो म्हणजे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यप्राप्ती! कोणत्याही हिंसेचा, बळाचा वापर न करता परकीय जोखड झुगारून देऊन स्वातंत्र्य मिळवायचे, या समान ध्येयाने भारत आणि झेकोस्लोव्हाकिया या देशांचे धागे जुळले होते आणि ध्येयप्राप्तीच्या या लढ्यात दोन्ही देश यशस्वी ठरले. आता या ऐतिहासिक आदर्शांचा वापर अधिकाधिक योग्य रितीने करायचा, असा दृढ निश्चय या दोन्ही देशांचा आहे. त्यामुळेच

जागतिक पातळीवरील संस्थांमध्ये सर्व देशांना नेतृत्वाची, प्रतिनिधित्वाची समसमान संधी दिली जावी, यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सुधारणांचा पुरस्कार भारत, झेक आणि स्लोव्हाक हे देश करत आहेत. यामुळे केवळ भारत आणि मध्य युरोप यांच्यातील संबंध दृढ होणार नसून संपूर्ण युरोप आणि आशियाचे हित जोपासले जाणार आहे.

ऐतिहासिक संदर्भ

झेकोस्लोव्हाकियाशी साहित्यिक-सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याचे श्रेय जाते प्रख्यात बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांना. त्यांनी झेकोस्लोव्हाकियाला दिलेल्या भेटी तेथील साहित्यिक-कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरल्या; इतक्या की टागोरांच्या कथा-कविता स्लोव्हाक साहित्यिक-कलाकार त्यांच्या कलाकृतींमध्ये वापरू लागले. टागोरांच्या कवितांमुळे प्रभावित झालेले झेक संगीतकार लिओ जानसेक यांनी १९२० मध्ये टागोरांच्या द गार्डियन या पुस्तकातील कथा त्यांच्या वँडरिंग मॅडमॅन यात संगीतबद्ध केली. झेक लेखक कारेल कॅपेक यांनी १९३७ मध्ये नाताळाच्या पूर्वसंध्येला टागोरांना संदेशपत्र लिहिले. त्यात त्यांनी टागोरांचे वर्णन पूर्वेकडील शांत-धीरगंभीर आवाज’, असे केले. तसेच पाश्चिमात्य जगतातील अशांत युरोपबाबत चिंताही त्यांनी या संदेशपत्रात व्यक्त केली. एरवी अत्यंत सभ्य संस्कृतीचा टेंभा मिरवणा-या पाश्चिमात्य जगतातील देश सख्ख्या भावांप्रमाणे परस्परांशी हस्तांदोलन करण्यासही संकोचतात, असे कॅपेक यांनी त्यांच्या संदेशात म्हटले. टागोरांकडे, भारताकडे आणि एकूणच आशियाकडे कॅपेक यांनी पुढे केलेल्या या मैत्रीच्या हाताला कडवट टीकेला सामोरे जावे लागले होते. टागोरांनी प्रत्युत्तरादाखल कॅपेक यांना शुभेच्छा टेलिग्राम पाठवला. त्यात त्यांनी म्हटले की, या माझ्या शुभेच्छा जशा माझ्या झेकोस्लोव्हाकियातील मित्रांसाठी आहेत तशाच त्या पूर्व आणि पश्चिम यांच्या समान भागधेयावर दृढविश्वास दर्शवणारे जुने आदर्शवादी मित्र आणि भूतलावरील सर्व लोकांसाठीही आहेत’. सर्व जगात समानता आणि स्वातंत्र्यता नांदू दे, ही विशुद्ध भावना या संदेशांमागे होती.

समान तत्त्व आणि जागतिक उद्दिष्ट्ये

१९५७ मध्ये, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या सुमारे दशकभरानंतरही झेकोस्लोव्हाकिया सोव्हिएत विचारांच्या पगड्याखाली होता. मात्र, असे असले तरी उभयतांमधील व्यापार-उदिमाला सुरुवात झाली होती. १९५७ मध्ये उभय देशांत विस्तृत व्यापारी करारमदार झाले. त्यात भारतातून झेकोस्लोव्हाकियाला ४४ वस्तूंची निर्यात केली जाईल तर त्या बदल्यात झेकोस्लोव्हाकिया १०६ वस्तूंची निर्यात भारताला करेल, असे ठरले. भारतासाठी झेकोस्लोव्हाकिया हा मध्य युरोपातला सर्वात मोठा व्यापार-उदिमाचा भागीदार देश होता. महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीच्या तत्त्वज्ञानावर आधारित स्वातंत्र्यप्राप्तीचा लढा आणि त्यामुळे ब्रिटिशांना झालेली पळता भुई थोडी, हे जगभरातील अनेकांसाठी प्रेरणादायी होते. तथापि, मध्य युरोपला साम्यवादी राजवटीविरोधात अहिंसक लढ्यासाठी १९८०च्या उत्तरार्धापर्यंत वाट पाहावी लागली. १९८९ मधल्या आमच्या तलम क्रांतीने लोकशाही, निष्पक्षता, मानवता आणि अहिंसकता या तत्त्वांना प्रोत्साहन मिळाले. मात्र, त्यानंतर १९९३ मध्ये तलम काडीमोडातून झेकोस्लोव्हाकियाचे अहिंसक पद्धतीने विभाजन झाले.

विद्यमान परिस्थितीत भारत दोन स्वतंत्र अशा झेक आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकांशी व्यवहार करतो. तीनही देशांमधील संबंध मैत्रीचे आणि सकारात्मकतेचे आहेत. तीनही देशांतील नेतृत्वांनी या द्विपक्षीय संबंधांची बांधणी इतिहासातील अनुभवांवरून परस्परांना घट्ट बांधून ठेवतील, अशा समान तत्त्वांच्या आधारावर केली आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला या देशांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये थारा नाही. दहशतवाद्यांची आश्रयस्थाने, त्यांना होत असलेला वित्तपुरवठा, त्यांना पुरवल्या जाणा-या सुविधा, दळवळणाची साधने यांचे समूळ उच्चाटन झालेच पाहिजे, ही विचारांची समानता भारत आणि झेक-स्लोव्हाक प्रजासत्ताकांमध्ये आहे. मात्र, या आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तसेच सद्यःस्थितीतील अत्यंत क्लिष्ट अशा भूराजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक पातळीवरील अनेक संस्थांमध्ये अमूलाग्र सुधारणा होणे गरजेचे आहे.

व्यवस्था बाजारकेंद्री परंतु योग्य प्रोत्साहनच नाही

आम्ही अलिकडेच, २०१७ मध्ये, केलेल्या झेक प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र धोरणाच्या विश्लेषणात, ज्यात भारताविषयीच्या धोरणाचाही उल्लेख होता, असे आढळून आले की, झेक प्रजासत्ताकाचे परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार व उद्योग मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी भारताला अधिकाधिक महत्त्व देऊ लागले आहेत आणि यात उल्लेखनीय बाब अशी की. हे मंत्रिगण भारताकडे केवळ द्विपक्षीय धोरणाच्या दृष्टिकोनातून बघत नाहीत तर दक्षिण आशियातील एक विश्वासू साथीदार म्हणून भारताकडे ते पाहतात. मात्र, भारताकडून तसा प्रतिसाद मिळत नसल्याचेही यातून दिसून आले. झेक प्रजासत्ताकाचे मंत्री तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करत असताना भारताकडून मात्र म्हणावा तितका सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. भारताच्या झेक प्रजासत्ताकाबाबत असलेले असमतोल धोरण येथे अधोरेखित होते. भारतातील गुंतवणूक वाढविण्यासाठी झेक कंपन्या उत्सुक आहेत. त्यातूनही नजीकच्या काळात भारताच्या या धोरणात बदल होण्याची चिन्हे आहेत. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ ते ९ डिसेंबर, २०१८ या कालावधीत झेक प्रजासत्ताकाच्या दौ-यावर आले असता त्यांनी झेक प्रजासत्ताकाचे अध्यक्ष मिलोस झेमन यांच्याबरोबर एका संयुक्त पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या. या संयुक्त पत्रकात भारत आणि झेक प्रजासत्ताक या दोन देशांदरम्यान केवळ आर्थिक, शैक्षणिक, शास्त्रीय आणि पर्यटन या क्षेत्रांपुरताच नव्हे तर अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर करणे, व्यापार संरक्षण, दहशतवादाचा बीमोड या मुद्द्यांवरही परस्परांशी सहकार्याचे धोरण ठेवण्यावर भर देण्यात आला. लवकरच उभय देशांमध्ये संपूर्ण सामरिक भागीदारीबाबतचा करारही होणार आहे.

स्लोव्हाकियाबरोबरही भारताचे राजकीय आणि आर्थिक संबंध दृढ होऊ लागले आहेत. यंदाच्या मे महिन्यात भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी स्लोव्हाकियाची राजधानी ब्राटिस्लाव्हाला भेट दिली होती. तसेच ऑक्टोबर महिन्यात श्री. अकबर यांनी तेथे जग्वार लँड रोव्हर निर्मितीच्या कारखान्याचे उद्घाटनही केले होते. भारतीय गुंतवणूकदारांना स्लोव्हाक बाजारपेठ खुणावत आहे. अलिकडच्या काळापर्यंत स्वतंत्र स्लोव्हाकियाशी भारताचे संबंध उत्तम आहेत. दोन्ही देशांच्या राजधान्यांमध्ये परस्परांचे दूतावासही १९९५ पर्यंत स्थापन झाले. ब्राटिस्लाव्हामध्ये २३ सप्टेंबर २०१८ रोजी भारतीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्लोव्हाकियातील स्थानिकांना भारतीय खाद्यपरंपरा, हस्तकला, वस्त्रप्रावरणे आणि संस्कृती यांची ओळख होण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल होते.

समारोप

भारत आणि झेक-स्लोव्हाक प्रजासत्ताक यांचा परस्परांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे. युरोपीय समुदायातील बाजारपेठेत मुसंडी मारायची असेल तर त्यासाठी झेक आणि स्लोव्हाकिया प्रजासत्ताकांचे पर्यायाने मध्य युरोपचे प्रवेशद्वार केव्हाही उत्तम आहे. त्याचवेळी झेक आणि स्लोव्हाकियाच्या उत्पादनांना भारतात लाखोंची खुली बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी आशा उभय देश बाळगून आहेत.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथे संधी मिळेल तिथे हे देश परस्परांना पूरक अशी सकारात्मक भूमिका घेत असतात. लोकशाही, स्वातंत्र्य आणि अहिंसा ही समान तत्त्वे या देशांना परस्परांशी घट्ट बांधून ठेवतात. भारत, झेक आणि स्लोव्हाक प्रजासत्ताक यांनी परस्परांशी असलेला इतिहासकाली संबंधांचा पाया अधिक विस्तारायला हवा आणि त्या दिशेने भक्कमपणे पाऊले टाकायची असतील तर तीनही देशांनी परस्परांबाबतच्या हितसंबंधांना जोपासले पाहिजे आणि ते वृद्धिंगत होतील, याकडे कटाक्ष ठेवला पाहिजे. तसेच परस्परांतील सांस्कृतिक आणि भौगोलिक अंतर कसे मिटवता येईल, याकडेही उभय देशांनी लक्ष द्यायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.