Author : Shreya Mishra

Published on Sep 24, 2019 Commentaries 0 Hours ago

नव्या पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भूतान डिजिटल आणि अंतराळ क्षेत्राचा विकास करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे.

भारत-भूतानमध्ये ‘डिजिटल’ नाते

भारत आणि भूतान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या ५१ व्या वर्षात या दोन देशांनी परस्पर सहकार्याचा एक नवा अध्याय सुरू केला आहे. डिजिटल आणि अवकाश क्षेत्रातील गुंतवणुकीचा विस्तार करून उभय राष्ट्रांनी नव्या युगाची पायाभरणी केली आहे. भारताच्या आणि भूतानच्या पंतप्रधानांनी, १७ ऑगस्ट २०१९ रोजी भूतानमध्ये रुपे (RuPay) कार्ड, ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क ऑफ इंडिया’ आणि ‘ड्रक्रेन’चे (ड्रक रिसर्च अँड एज्युकेशन नेटवर्क) यांचे एकत्रीकरण, तसेच इस्रोने बांधलेल्या ‘ग्राउंड अर्थ स्टेशन’चे उद्घाटन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचा श्रीगणेशा केला.

भूतानला डिजिटल का व्हायचे आहे?

मर्यादित देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संपर्क असलेला भूतान हा कोणतीही किनारपट्टी अथवा बंदर नसलेला पर्वतीय देश आहे. या कारणाने जागतिक बाजारपेठेत प्रवेश करताना भूतानला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांवर मात करता यावी आणि डिजिटल क्षेत्राच्या माध्यमातून जगाशी संपर्क साधता यावा, यासाठी भूतानने आपले डिजिटल क्षेत्र विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

निर्यात, महसूल आणि रोजगार यासाठी जलविद्युत क्षेत्रावरील आपले अतिअवलंबित्व भूतानला कमी करायचे आहे. कारण भविष्यात दीर्घ कालावधीकरता जलविद्युत क्षेत्राचा पर्याय अशक्य ठरणार आहे; म्हणूनच भूतानने आपले लक्ष डिजिटल क्षेत्रावर केंद्रित केले आहे. माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित  सेवांच्या निर्यातीद्वारे रोजगार निर्मिती आणि परकीय चलन कमावण्याचा डिजिटल क्षेत्र हा एक विश्वासार्ह स्रोत आहे. हे लक्षात घेऊन, भूतानमध्ये परदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी आणि युवा पिढीला नोकऱ्या मिळाव्या, यासाठी पहिले तंत्रज्ञान केंद्र व प्रशिक्षण केंद्र २०१२ मध्ये थिम्पू येथे सुरू करण्यात आले.

भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार, भूतानच्या डिजिटल आणि अवकाश विषयक पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. याद्वारे पुरेशी रोजगारनिर्मिती करून युवापिढीच्या क्षमतांचा उपयोग करण्याचा त्यांचा मानस आहे. असे करताना, कौशल्यांचा विकास जागतिक मानकांनुसार होईल याचीही दक्षता घेतली जात आहे.

डिजिटल क्षेत्रात भारताचे सहकार्य भूतान का घेत आहे?

भूतान आणि भारत या उभय राष्ट्रांना, परस्पर विश्वास आणि उत्तम मैत्रीपूर्ण संबंधांवर आधारित सहकार्याचा दीर्घ इतिहास आहे. आज जगभरातील एक तंत्रज्ञानातील महासत्ता म्हणून भारताने कौशल्य प्राप्त केले आहे. तसेच डिजिटल व अवकाश क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या आणि परवडण्याजोग्या तंत्रज्ञानाचा चांगला अनुभव भारताकडे आहे. या दोन घटकांमुळे भूतान भारताकडे सहकार्याच्या दृष्टीने पाहतो. अशा प्रकारे, भूतान आपल्या डिजिटल आणि अवकाश क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी, भारतीय गुंतवणुकीच्या आणि नैपुण्याच्या प्रतीक्षेत आहे.

सहकार्य करण्यास भारत तयार का आहे?

‘शेजारी राष्ट्रांना अग्रक्रम’ या भारताच्या परराष्ट्र धोरणाअंतर्गत, भूतानच्या विकासाबाबत भारत कटिबद्ध आहे, या धोरणाला अनुसरून जलविद्युत क्षेत्रावरील अतिअवलंबित्व कमी करण्यासाठी डिजिटल आणि अवकाश या क्षेत्रांत उभय राष्ट्रांमध्ये सहकार्याचे धोरण अवलंबिले जात आहे. डिजिटल आणि अवकाशविषयक सहकार्याद्वारे आपल्या तंत्रज्ञानाचा ठसा उमटवणे आणि भूतानला भांडवल केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधा निर्मिती करण्यास मदत करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे.

भूतानच्या विद्यमान सरकारने देशातील गरीब-श्रीमंतामधील ‘दरी कमी करण्या’संबंधी जे लक्ष्य निश्चित केले आहे. ते साध्य होण्यासाठी त्यांचा डिजिटल आणि अवकाश क्षेत्रात गुंतवणूक करून विकास करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भारत-भूतान सहकार्याच्या रचनेत बदल घडविण्याचा आणि त्यात वैविध्यपूर्णता आणण्याचा पूरक प्रयत्न भारत करीत आहे.

कोणते उपक्रम सुरू झाले आहेत आणि त्यांचे फायदे कोणते?

भारत आणि भूतान यांनी बँकिंग आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे आपल्या डिजिटल सहकार्याचा प्रारंभ केला आहे. अवकाश क्षेत्रामधील सहकार्य प्रामुख्याने दक्षिण आशियाई उपग्रह सेवांच्या संबंधात आहे. बँकिंग क्षेत्रातील सहयोगात भूतानमध्ये रुपे (RuPay) कार्ड सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रुपेच्या (RuPay)   प्रवेशाने भूतानच्या वित्तीय व्यवहारांमध्ये क्रांती होईल आणि त्याद्वारे भूतानमध्ये आर्थिक सर्वसमावेशकतेचा मार्ग अधिक खुला होईल. याचे कारण, भूतानच्या दुर्गम भागांत बँका आणि एटीएमसारख्या भौतिक पायाभूत सुविधा उपलब्ध करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यांत भारताला मुख्यत: होणारा लाभ असा की, भारतीय स्थानिक देय (पेमेन्ट) व्यवस्थेचा जागतिक आवाका वाढेल आणि उभय देशांमधील डिजिटल पेमेन्टमध्ये वाढ होईल. यामुळे पर्यटनातील आणि सीमेपल्याड होणाऱ्या व्यापारांतील व्यवहार सुलभ होतील. भूतानमध्ये रोकडविरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारताचे ‘भीम’ अॅप सुरू करण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्याच्या करारावरही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

भूतानच्या ‘ड्रकरेन’चे भारताच्या ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’सोबतचे एकत्रीकरण हे ई-लर्निंग क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सहकार्य आहे. या एकत्रीकरणामुळे दोन देशांची विद्यापीठे, संशोधन संस्था, ग्रंथालये, आरोग्य सेवा आणि कृषी संस्था यांच्यात सुरक्षित आणि जलद संपर्क होणे सुनिश्चित होईल. आपल्या देशात जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम आणि अध्ययन साहित्य उपलब्ध व्हावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या भूतानच्या युवा नागरिकांसाठी हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते.

अवकाश क्षेत्रातील सहकार्य प्रामुख्याने इस्रोद्वारे ‘ग्राऊंड अर्थ स्टेशन’ आणि ‘सॅटकॉम’च्या बांधणीद्वारे दक्षिण आशिया उपग्रहीय सेवांचा वापर करण्याची भूतानची क्षमता वाढवणे याकरता आहे. या उपक्रमामुळे भूतानमधील टेलि-मेडिसिन, टेलि-एज्युकेशन आणि आपत्ती व्यवस्थापनाला चालना मिळाली आहे. भारतातील युवा भूतानी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लहान उपग्रहाचा विकास व प्रक्षेपण यासाठी केलेला करार हाही अवकाश क्षेत्रातील एक निश्चित करण्यात आलेला एक सहयोग आहे.

निष्कर्ष

उभय राष्ट्रांतील संबंधांचे पारंपारिक पैलू सांभाळतानाच डिजिटल युगातील भारत-भूतान संबंधांचा केंद्रबिंदू युवकांवर स्थिरावला आहे. भूतान आपल्या नव्या पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी डिजिटल आणि अवकाश क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या पर्वतीय राष्ट्राचा विकास साधण्याचा प्रयत्न यशस्वी व्हावा, याकरता भारताने मदतीचे पाऊल उचलले आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Shreya Mishra

Shreya Mishra

Shreya Mishra is Masters in International Relations. She currently works as a Junior Research Fellow at Jindal School of International Affairs O.P. Jindal Global University. ...

Read More +