अमेरिकेत निवडणूकीची हवा प्रचंड वेगाने वाहत असून, इंटरनेवर तर दोन्ही बाजूच्या प्रचाराला उधाण आले आहे. या सगळ्यामध्ये क्यूअनॉन(QAnon)चा या हॅशटॅगचा वापर सातत्याने वाढत आहे आणि त्यातून डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांवर सतत टीका होत आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर या सर्वनाश होईल, असे संदेश या हॅशटॅग मोहीमधून पसरवले जात आहेत.
क्यूअनॉन (QAnon) हा आधुनिक युगातील षडयंत्र सिद्धांत असून, तो एका अज्ञात गूप्त राज्यव्यवस्थेच्या अस्तित्वाची भाषा करतो. ही राज्यव्यवस्था अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध कार्यरत असल्याचे मानतो. या गटाचा प्रसार 4चॅन आणि 8चॅन यांसारख्या संकेतस्थळांवरून झाला- जी वापरकर्त्यांना निनावी राहून मजकूर प्रसिद्ध करू देतात. यातील बरेचसे धागेदोरे यावर भर देतात की, प्रसिद्ध व्यक्ती, डेमोक्रॅटिक नेते आणि बरेचसे उच्चपदस्थ अधिकारी या गूप्त राज्याचा भाग आहेत.
एका ताज्या निवड पाहणीनुसार ५६ टक्के रिपब्लिकन नेते हा षडयंत्र सिद्धांत पूर्णपणे किंवा अंशत: खरा असल्याचे मानतात. वंशवादी विचारांच्या आणि षडयंत्र सिद्धांताचा प्रसार करणाऱ्या मार्जोरी टेलर ग्रीन यांनी जॉर्जिया प्रांतातील रिपब्लिकन प्रायमरी (स्थानिक निवडणूक) जिंकली. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना काँग्रेसची जागा मिळेल असे जवळपास खात्रीलायकरित्या सांगता येईल, कारण त्यांच्या विरोधकाने नुकतीच माघार घेतली. ग्रीन या क्यूअनॉनच्या समर्थक आहेत, त्यात नव्हे तर काँग्रेसची निवडणूक लढवणारे ५३ उमेदवार क्यूअनॉनचे समर्थन करतात. त्यात कोलोरॅडो आणि ओरेगॉन येथून जिंकलेले लॉरेन बोबर्ट आणि जो राय पर्किन्स यांचा समावेश आहे.
अध्यक्ष ट्रम्प हेही या नेत्यांना पाठिंबा देतात. ट्रम्प यांनी आपण क्यूअनॉनचे समर्थक अल्याचे जाहीर केलेल नसले तरी त्यांनी अनेद वेळा क्यूअनॉनची ट्वीट्स पुन्हा प्रसारित केली आहेत. क्यूअनॉन षडयंत्र सिद्धांतवाले हे अतिरेकी असून, त्यांच्याकडून देशाला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे, असे एफबीआयनेही म्हटले आहे. त्यामुळे क्यूअनॉनचा अमेरिकी निवडणुकीवर कसा परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. क्यूअनॉनच्या संदेशाने – जो समाजमाध्यमांवरून पसरत आहे आणि ज्याला सत्ताधारी उच्चभ्रूंवरील वाढत्या अविश्वासाची साथ मिळत आहे – त्याचे आकर्षण कसे वाढवले आहे आणि नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी मतदारांच्या कल्पनांना कसा आकार दिला आहे, हे याचे या लेखातून परीक्षण केले जाईल.
क्यूअनॉनचा प्रसार वणव्यासारखा वेगाने झाला आहे. जो सुरुवातीला केवळ इंटरनेटवरील एक अस्पष्टसा धोका वाटत होता, त्याने आता नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वीच्या मुख्य प्रवाहातील राजकीय चर्चांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच, या विचारधारेच्या समर्थकांनी प्रतिपक्षाबद्दल इतका गहिरा द्वेष निर्माण केला आहे की, डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेत असण्याचा संबंध थेट विनाशकारी परिणामांशी जोडला आहे. अशाच एका समर्थकाने हे अत्यंत चपखल शब्दांत मांडले आहे – ‘मूलत:, मला वाटते की, जर बायडन निवडून आले तर जगाचा विनाश होईल.’ क्यूअनॉनचा धोका असा आहे की, त्यात शत्रूबद्दल तीव्र भीती निर्माण करण्याची क्षमता आहे आणि पराभूत होण्याचा संबंध थेट संभाव्य सर्वनाशाशी जोडला जात आहे.
समाजमाध्यमे आणि क्यूअनॉनचे अवडंबर
आज आपल्या इंटरनेटवरील बहुतांश संभाषणांवर फेसबुक आणि गुगलचे नियंत्रण आहे. क्यूअनॉनचा हॅशटॅग म्हणून वापर सातत्याने वाढत आहे आणि त्यातून डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांवर सतत टीका होत असून येऊ घातलेल्या सर्वनाशाचे संकेत दिले जात आहेत. २०१९ सालात हॅशटॅग क्यूअनॉन आणि त्याच्याशी संबंधित क्यू, क्यूपॅट्रियट, दग्रेटअवेकनिंग अशा हॅशटॅग्जचा २,२२,३२,२८५ ट्वीट्समध्ये वापर झाला – म्हणजेच दिवसाला सरासरी ६०,९१० ट्वीट्स. याच्या तुलनेत २०१९ साली हॅशटॅग मीटूचा वापर ५२,३१,९२८ ट्वीट्समध्ये तर हॅशटॅग क्लायमेटचेंजचा वापर ७५,१०,३११ ट्वीट्समध्ये झाला होता. यावरून दिसून येईल की, या षडयंत्राने जागतिक पातळीवरील रचनात्मक अन्याय आणि धोक्यांचा सामना करण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर कृतीच्या आवाहनापेक्षा किती जास्त महत्त्व प्राप्त केले आहे.
क्यूअनॉनच्या समर्थकांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांनी सतत खिल्ली उडवून, ही ऑनलाइन लढाई चालवली आहे आणि या कामी त्यांचे अपप्रचाराचे तंत्र उपयोगी पडत आहे. निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करण्यासाठी समाजमाध्यमे मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरतात आणि क्यूअनॉन या संकल्पनेचा पुरेपूर लाभ घेत आहे. गेल्या शरद ऋतूत, क्यूअनॉन षडयंत्रवाल्यांनी हॅशटॅग वोट आणि हॅशटॅग वोटऑननोव्ह5 अशा ट्वीट्स आणि मीम्सचा इंटरनेटवरून लोंढाच आणला आणि त्याद्वारे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन आणि विरोधकांची प्रतिमा मलीन करून लुईझियाना आणि केंटुकी राज्यांतील गव्हर्नरच्या निवडणुकीवर प्रभाव पाडला.
यातून एकाच पक्षाच्या समर्थनार्थ इंटरनेटवर मजकुराचा महापूर आणता येतो आणि त्यातून त्यांची जगाचे रक्षक किंवा उद्धारकर्ते अशी प्रतिमा निर्माण करता येते. हे षडयंत्रकारी मानतात की, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर विश्वास ठेवता येत नाही. हे षडयंत्र आणि त्याच्या समर्थकांनी राजकीय बदल घडवण्यासाठी रेटा निर्माण करणे, हा बदल दाखवून देतो की, क्यूअनॉनचा कसा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे आणि त्याद्वारे मतदार आणि उमेदवारांच्या कल व पर्यायांत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
फेसबुकवर वापरतर्त्यांचे पर्याय आणि सूचना यावर ट्रेंड्स (कल) नियंत्रण ठेवतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, जेव्हा एखादी व्यक्ती ट्रम्प किंवा रिपब्लिकन पक्षाला फॉलो करते तेव्हा तिच्या फेसबुक फीडमध्ये क्यूअनॉनसंबंधी सूचना किंवा शिफारसी वाढतात. समाजमाध्यमांवर अशा प्रकारे प्रतिध्वनी कोश तयार करून ग्राहकांना त्यांच्या पूर्वग्रहानुसार एकतर्फी माहिती पुरवण्याचा हा जो कल आहे त्यातून क्यूअनॉनला समविचारी रिपब्लिकन्सच्या न्जूज फीडमध्ये शिरकाव करण्यास फायदाच होतो आणि याचा मतदारांच्या धारणांवरील प्रभाव निर्णायक ठरू शकतो.
तथापि, क्यूअनॉनच्या आवाहनाला काही मानसशास्त्रीय आयाम आहेत जे या निवडणुकीच्या संदर्भात त्याच्या समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीला अडचणीचे ठरवतात. क्यूअनॉन तिंवा तत्सम षडयंत्रांच्या आकर्षणाच्या मूळाशी ओळखीचा अभाव आणि कुठेतरी संबंधित असण्याची गरज आहे. भक्कम सामायिक ओळख आणि कोणाशी तरी संबंधित असणे या बाबी आपल्या मानसिक उत्क्रांतीत इतक्या रुजल्या आहेत की, क्यूअनॉनसारखे गट त्याचा खुबीने वापर करतात. क्यूअनॉनच्या समर्थकाने चिलखती वाहनात बसून महामार्गावरील वाहतूक थांबवण्याच्या घटनेतून दिसून येते की, एखाद्या गटाशी संबंधित असण्याची ही भावनिक गरज कोणत्या टोकाला जाऊ शकते.
अन्य षडयंत्रांप्रमाणेच क्यूअनॉन क्लिष्ट प्रश्नांना साधे उत्तर पुरवू पाहते. त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना हे षडयंत्र असा भरवसा देते की, घटना एखाद्या कारणामुळे घडतात आणि सर्व वाईट गोष्टी एखाद्या सहज ओळखू येणाऱ्या कारणाशी जोडता येतात – या बाबतीत एका गुप्त राज्याशी जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सामील झाले आहे. याशिवाय, असल्या बातम्या खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने येत असल्याने त्या लोकांच्या वेगळेपणाच्या गरजेला दुजोरा देतात. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना नियंत्रित माहिती आणि एखाद्या गटाशी संबंधित असल्याची भावना देण्याची क्यूअनॉनची जी क्षमता आहे त्यातून ते मतदारांच्या विचारसरणीवर किती प्रभाव पाडू शकते हे दिसून येते.
सत्ताधाऱ्यांवरील अविश्वासाचा फायदा उठवणे
नागरिकांचा सत्ताधारी उच्चभ्रूंवरील विश्वास सामान्यपणे उडाला आहे, याचा क्यूअनॉनसारखी चळवळ फायदा उठवते. त्याअर्थी, क्यूअनॉन हे सत्ताधाऱ्यांवरील अविश्वासाचेच फलित आहे. सध्याच्या स्वहित जपणाऱ्या जगात बिग डेटा आणि अन्य साधनांमुळे शासनाची नागरिकांच्या आयुष्यात डोकावण्याची आणि त्यांच्या खासगीपणावर गदा आणण्याचीक्षमता वाढली आहे आणि त्याने सरकारवरील अविश्वासाच्या वातावरणात भरच टाकली आहे. हा अविश्वास केवळ सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापुरता मर्यादित नाही तर त्याने थेट संशयाचे रूप धारण केले आहे. या प्रकरणी तो ट्रम्प यांच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांकडे वैऱ्याच्या नजरेतून पाहण्यातून प्रकट होत आहे.
ऑनलाइन षडयंत्राचे शस्त्रात रूपांतर करून त्याचा राजकीय चळवळीत वापर करणे, ज्यात नागरिक घटनांचे नियंत्रण आपल्या हाती घेतात, ही स्थिती धोकादायक आहे. पिझ्झागेट प्रकरणाने दाखवून दिले आहे की, सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांच्या मनात अविश्वास आहे आणि त्याच पिझ्झा दुकानातून मुलांची तस्करी होत असल्याच्या षडयंत्राने द्वेष वाढून त्यातून हिंसक घटना घडू शकतात.
निष्कर्ष
क्यूअनॉनला आणखी एक हास्यास्पद षडयंत्र म्हणून आणि त्याच्या समर्थकांना दिशाभूल झालेले लोक म्हणून नाकारणे सोपे आहे. तथापि, त्याला आश्रय देण्याने त्याचे आकर्षण वाढून त्याकडे अधिक लोक ओढले जातील. षडयंत्र सिद्धांतांचा त्यांच्या समर्थकांवर बहुआयामी परिणाम होत असतो. त्यातून त्यांना आपण काहीतरी कामाचे आहोत, आपल्याला आत्मसन्मान आहे किंवा आपल्या हाती नियंत्रण आहे अशी जाणीव होत असते. क्यूअनॉनचा सामना करण्यासाठी समजूतदारपणा आणि बौद्धिक श्रेष्ठत्वाची गरज आहे. जसे की हिलरी क्लिंटन यांच्या बास्केट ऑफ डिप्लोरेबल्स या टिप्पणीने प्रस्थापितांविरुद्ध भावना भडकावण्याचेच काम होऊ शकते. तथापि, अशा सखोल आणि वैचारिक बदलांना वेळ आणि खूप प्रयत्नांची गरज असते. सध्या निवडणूक तोंडावर असताना क्यूअनॉनच्या माध्यमातून पसरवली जाणारी खोटी माहिती आणि तिचा निवडणुकीवरील संभाव्य परिणाम रोखण्याला प्राधान्य असणे जरुरी आहे.
मतदान हे नेहमीच वास्ववातील घटनेपेक्षा, त्याबद्दल लोकांच्या असलेल्या सर्वसामान्य मतांवर आधारित असते. त्यामुळे क्यूअनॉनचा अमेरिकी मतदारांपैकी काहींवर परिणाम होऊ शकतो. नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे आणि क्यूअनॉनच्या प्रसिद्धीचा मतदारांच्या प्राधान्यक्रमांवर परिणाम होऊ शकतो. समाजमाध्यम कंपन्यांनी या शक्यता समजून घेतल्या पाहिजेत आणि क्यूअनॉन आणि तत्सम प्रोपगंडाला बातम्यांमध्ये शिरकाव करण्यापासून आणि परिणामी मतदारांच्या निवडीवर परिणाम करण्यापासून रोखले पाहिजे, जेणेकरून डिजिटल अवकाश स्वच्छ राहील.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.