Author : Shoba Suri

Published on Aug 20, 2021 Commentaries 0 Hours ago

महिलांमधील कोरोनावरील लस घेण्याबाबत असलेल्या संकोचामुळे महामारी लांबत असून, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यातील धोके वाढत आहेत.

गर्भवतींमधील कोव्हिड लसीची भीती जाण्यासाठी…

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, लस घेण्यातील संकोच हा जागतिक आरोग्याला असलेल्या पहिल्या दहा धोक्यांपैकी एक आहे. जेव्हा कोव्हिड-१९ लसींचा प्रश्न येतो तेव्हा, प्रभावी आणि न्याय्य वितरणाबरोबरच त्याचा स्वीकार सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील अभ्यास असे सांगतो की, कोव्हिड-१९ लसीकरणाच्या दुष्परिणामांची भीती हे या संकोचाचे कारण आहे.

कोव्हिड-१९ लस घेण्यासंदर्भात १६ देशांमधील गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांच्या मातांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये, गर्भावरील संभाव्य घातक दुष्परिणाम हे भीतीचे सर्वात प्रमुख कारण असल्याचे आढळून आले आहे. गर्भवती स्त्रियांनी कोव्हिड-१९ लशीचे त्यांच्या बाळावर घातक परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली आणि गर्भार अवस्थेत लशीच्या सुरक्षिततेबद्दलच्या माहितीचा अभाव हे लस घेण्यातील संकोचाचे कारण असल्याचे सांगितले.

गर्भवती स्त्रियांमध्ये कोव्हिड-१९ लशीविषयी विश्वास आणि स्वीकृती वाढवण्यासाठी लशीबद्दल चुकीची माहिती आणि संकोच या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. बहुराष्ट्रीय गट संशोधनामधून गर्भवती महिला आणि जन्मतः अधिक अपंगत्व आणि जन्मतः अर्भक मृत पावण्याचे अधिक प्रमाण यांच्यातील सातत्यपूर्ण संगती सूचित होते. हे पुनरावलोकन कोव्हिड-१९ लसीकरणासाठी विशेषतः पाच वर्षांखालील बालकांचा आणि मातेचा मृत्यूदर अधिक असलेल्या देशांमध्ये गर्भवती महिलांना प्राधान्य देण्याची शिफारस करते.

अमेरिकेतील सीडीसी डेटा असे दर्शवतो की, लस संकोचामुळे ८ मे २०२१ पर्यंत केवळ ११.१ टक्के गर्भवती महिलांचेच कोव्हिड-१९ साठी संपूर्ण लसीकरण झाले आहे. गर्भवती महिलांमध्ये लशीची सुरक्षा आणि परिणामकारकता यासंबंधी शंका/अविश्वास लस संकोचाशी जोडलेले असल्याचे पुराव्यामधून सूचित होते. आरोग्य व्यावसायिकांकडून कोव्हिड-१९ लशीबाबत अस्पष्ट संदेश आणि गर्भवती महिलांमध्ये लस चाचण्यांचा अभाव यामुळे त्यांच्यामध्ये लस संकोच दिसून येतो. कोव्हिड-१९ लसीबाब संकोच बहुआयामी आहे आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांवरील विश्वास हा लस स्वीकृतीसाठी महत्त्वाचा आहे.

महिलांमधील लस संकोच महामारी लांबवून अर्थव्यवस्था पुन्हा सुधारण्यातील धोके वाढवत आहे. भारताच्या सर्व राज्यांमध्ये गर्भवती महिलांमध्ये लस संकोच वाढत असल्याचे अहवाल आणि लसीकरण झालेल्यांच्या संख्येच्या डेटाचा अभाव चिंता वाढवत आहेत. ताप येण्याची भीती, लसीविषयी संशय आणि मिथके, अविश्वास, सामाजिक असमानता, कुटुंबातील सदस्यांवरील अवलंबित्व, आणि जागरूकतेचा अभाव या बाबी गर्भवती महिलांना लसीकरणापासून मागे खेचत आहेत.

काही राज्यांनी समुपदेशनाद्वारे किंवा लसीकरणासाठी विशेष मोहिमा सुरू करून गर्भवती महिलांमधील लस संकोच हाताळण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. लस संकोचावर मात करण्यासाठी कुटुंबांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे आवाहन आरोग्य कार्यकर्त्यांनी केले आहे.

कोव्हिड-१९ लस घेण्यासंबंधी गर्भवती महिलांचे समुपदेशन, मार्गदर्शन करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. लस संकोचावर मात करण्यासाठी पद्धतशीर पुनरावलोकन बहुआयामी धोरण आणि निश्चित दृष्टिकोनाची आवश्यकतेची गरज सूचित करते. सुधारित आरोग्य शिक्षण आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचणे तसेच लसीकरणाच्या निर्णयात कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेतल्यामुळे लसीबद्दलचा विश्वास वाढू शकतो. लस संकोचाचा सामना करताना प्रेरक मुलाखतीसारखा समुपदेशनाचा दृष्टिकोन प्रभावी ठरला आहे. विश्वास वाढवण्यासाठी आणि लस सुरक्षेच्या भीतीवर मात करण्यासाठी अचूक आणि वेळेवर माहिती देणे महत्त्वाचे आहे.

लस अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याबरोबरच लसीकरणाबद्दल ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा दृष्टीकोन याचाही चांगला परिणाम होऊ शकतो. लोकांना संकोचापासून स्वीकृतीपर्यंत जाण्यास मदत करण्यासाठी वर्तन बदलाबद्दलच्या संवादाची गरज आहे.सोशल मीडियावरील लसीबद्दल व्यापक प्रमाणात चुकीच्या माहितीमुळे जगभरात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. म्हणूनच लोकांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी ‘प्रभावी संवादकां’ना सकारात्मक गोष्टी सामायिक करण्यासाठी आणण्याची समर्पित मीडिया रणनीतीची गरज आहे.

लस संकोचाचा सामना करण्यासाठी धोरणकर्त्यांनी लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याविषयी सार्वजनिक विश्वास वाढवून कोव्हिड-१९ संवाद धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. विश्वास, अनुकूलता आणि सुगमता या तीन घटकांना लक्ष्य करून लस संकोचाला आळा घालण्यासाठी सामाजिक सज्जता आणि समुदायाचा सहभाग यांची गरज आहे. दृढनिश्चयाने लसींवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि अविश्वासावर मात करण्यासाठी कोव्हिड-१९ संकटाने संधी दिली आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.