Author : C Joshua Thomas

Published on Aug 22, 2022 Commentaries 13 Days ago

भारत आणि चीन या दोहोंची लोकसंख्या ही जगाच्या एक तृतीयांश एवढी आहे. त्यामुळे भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांचे भविष्य फक्त दोन्ही देशातील लोकांसाठी नव्हे, तर संपूर्ण आशिया आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत.

भारत-चीन नाते ‘समर्पक’ कसे राहील?

जागतिक बाजारपेठेवर आपले वर्चस्व राहावे यासाठी चीनने महत्वांकांक्षी नियोजन केले आहे. त्यासाठी हिंदी महासागरात आपले महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी चीन भारताच्या आधीपासून प्रयत्न करत आहे. २००५ मध्ये ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ ही संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली. चीनने भारताच्या सभोवती आणि त्या पलिकडील देशांमधील बंदरावर आपली पकड घट्ट करून एक साखळी उभारली. पूर्वेला म्यानमार, दक्षिणेला श्रीलंका आणि पश्चिमेला मालदीव आणि टांझानिया असे करत या साखळीचे मुख्य केंद्र पाकिस्तानमधील ग्वादार बंदरात उभारले. या ग्वादारमधून चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) चीनच्या शिनजियांग भागातील काशगरपर्यंत जाईल. चीनने बांगलादेश, नेपाळ आणि इतर शेजारी देशात केलेली गुंतवणूक तसेच चीनकडून भारतीय हद्दीत वारंवार होणारी घुसखोरी ही भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे. आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या भारत चीनपेक्षा बलाढ्य नाही. तरीही सध्याच्या जागतिक चौकटीत भारताला आंतरराष्ट्रीय पटलावर आघाडीची भूमिका मिळाली आहे.

चीनच्या सागरी हालचालींचे मुख्य केंद्र पाकिस्तानमधील ग्वादार आहे, तेथून चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर चीनच्या शिनजियांग भागातील काशगरपर्यंत जाईल.

या सगळ्या पार्श्वभूमीवर चीनसारख्या देशाशी भारताचे संबंध कसे समर्पक राहू शकतात, यासंदर्भात चार मुद्दे समजून घ्यायला हवेत. सर्वात पहिल्यांदा म्हणजे, भारताने चीनची कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियायी शेजारील देशांमध्ये चीनची वर्तणूक लक्षात घ्यायला हवी. या शेजारी देशांमध्ये भारताला अधिक सक्रीय राहून तेथे बहु-ध्रुवीयता आणि लोकशाहीला प्रोत्साहन देणे अत्यावरश्यक आहे.

दुसरे म्हणजे, भारताने शेजारील देशांसाठी पर्यायी आर्थिक प्रारूप विकसित करणे आवश्यक आहे. आपण आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या चीनशी स्पर्धा करू शकत नसलो तरी, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी आपली बाजारपेठ खुली करून शेजारच्या देशांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो. भारताच्या तांत्रिक आणि ज्ञानशक्तीचा उपयोग करून स्वतःचा विकास करू शकतात.

तिसरा मुद्दा म्हणजे, भारताकडे ‘विकासासाठी आवश्यक असणारी मुत्सद्देगिरी’ असणे आवश्यक आहे. खालील क्षेत्रांच्या आधारे ही मुत्सद्देगिरी साधता येईल.

१. पायाभूत सुविधांमधील मुत्सद्देगिरी: संबंधित देशामधील पायाभूत सुविधांसाठी भारताने गुंतवणूक केल्यास त्या देशांमध्ये भारताला सार्वजनिक सद्भावना आणि लोकांचा विश्वास संपादन करण्यास मदत करेल. यासाठी भारताला ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’ आणि थेट संपर्कयंत्रणांचा विचार करता येईल.

२. सार्वजनिक साहित्याद्वारे मुत्सद्देगिरी: नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक ताणतणावांच्या कालावधीत आपत्ती निवारणासाठी, पुनर्वसाठी मदत करणे ही उत्तम मुत्सद्देगिरी ठरू शकेल. यामुळे फक्त लोकांचे दुःख कमी होईल एवढेच नाही, तर त्याद्वारे सार्वजनिक वापराचे साहित्य आणि सेवा यादेखील तिथपर्यंत पोहचतील. त्यासाठी भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणात आधीपेक्षा अधिक संसाधनांचा विचार होणे समावेश असणे गरजेचे आहे.

३. अन्न आणि इंधनाद्वारे मुत्सद्देगिरी: ज्याप्रमाणे भारत श्रीलंकेला त्याच्या चालू आर्थिक संकटात मदत करत आहे, त्याचप्रमाणे शेजारच्या इतर देशांसाठी अन्न आणि इंधन पुरवून मुत्सद्देगिरी प्रभावी करता येईल. लंकेसारख्ये आर्थिक तणावाखाली असलेल्या देशांच्या अस्तित्वासाठी ही अचूक वेळेवर केलेली आणि सर्वात महत्वाची मदत असू शकते.

४. औषधांच्या मदतीद्वारे मुत्सद्देगिरी: शेजारील देशांमधील आरोग्याच्या प्रश्नाशी लढण्यासाठी भारत त्यांना लसी, औषधे आणि परवडणारी आरोग्यसेवेसंदर्भातील मदत करू शकतो. या मदतीमुळे या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करता येतील.

५. शैक्षणिक सहाय्याद्वारे मुत्सद्देगिरी: शेजारील देशांतील विद्यार्थ्यांना भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देऊन भविष्यातील पिढ्यांमध्ये भारताबद्दल विश्वास संपादीत करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना सार्वजनिक-खाजगी-भागीदारीद्वारे शिष्यवृत्ती देऊ केली जाऊ शकते. तसेच दोन्ही देशांतील शैक्षणिक आणि व्यावसायिक पदव्यांना मान्यता देऊन, सांस्कृतिक मुत्सद्देगिरी साधता येईल.

चौथा मुद्दा म्हणजे, रशिया आणि इराणप्रमाणे व्यापारामधील देवाणघेवाणीसाठी भारताकडे दक्षिण आशियायी देशांसाठी एक चलन असणे आवश्यक आहे. पाकिस्तानसोबत तणाव असला तरी, दक्षिण आशियातील बहुतांश देशांची चलने भारतीय रुपयाशी मिळतीजुळती असल्याने, या दिशेने नवी दिल्लीकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आगामी G20 अध्यक्षपदाचा मानकरी असलेला, तसेच देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना जगातील एक उगवती शक्ती म्हणून भारताने आपली नवी ओळख निर्माण करायला हवी.

अनेक अडचणी आणि अडथळे असतानाही भारत-चीन संबंध वृद्धिंगत होत आहेत. दोघांनीही त्यांचे नाते सुधारण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. परस्परांमध्ये अधिक संवाद साधण्याची तयारी दर्शविली आहे. डायलॉगद्वारे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे, “जेव्हा भारत आणि चीन एकमेकांच्या हितसंबंधांबद्दल संवेदनशील राहून विश्वास आणि आत्मविश्वासाने एकत्र काम करतील तेव्हा आशिया आणि जगाला चांगले भविष्य मिळेल. पण, हे होण्यासाठी, नवी दिल्लीला नव्या पद्धतीने विचार करावा लागेल. या विचाराद्वारे भारत-चीन संबंधांचा एक नवा इतिहास लिहिला जाईल. या नव्या नात्यामुळे एकमेकांचा शेजार अधिक सुकर होईल.

आगामी G20 अध्यक्षपदाचा मानकरी असलेला, तसेच देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना जगातील एक उगवती शक्ती म्हणून भारताने आपली नवी ओळख निर्माण करायला हवी. भारताने या संधीचा उपयोग विवेकाने करायला हवा. विशेषत: चीनसोबत आपली शक्ती ठामपणे दाखवायला हवी. त्यासाठी भारताने आपले राष्ट्रीय आणि जागतिक हितसंबंध पूर्ण करण्यासाठी लष्करी आणि सास्कृतिक दोन्ही शक्तींचा पुरेपूर वापर करण्याची वेळ आली आहे. 

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

C Joshua Thomas

C Joshua Thomas

Dr. C. Joshua Thomas is a Distinguished Fellow in International Relations at CPPR Kochi Kerala: Adjunct Professor Department of Political Science University of Science &amp: ...

Read More +