चीनचा शिंजियांग प्रांत कायमच चर्चेत राहिला आहे. या उईगूर मुस्लिमबहुल प्रांतात चीनने पद्धतशीरपणे आपले वशवर्चस्ववादी काम सुरू ठेवले आहे. या भागात हान वंशाच्या लोकांची संख्या वाढेल आणि आधीच अल्पसंख्य असलेले उईगूर मुस्लिम अधिकच अल्पसंख्य होत जातील, अशा दृष्टीने कारवाया करणे असा कुटिल डाव चिनी राज्यकर्त्यांनी आखला आहे. त्यासाठी महिलांवर अन्याय होत असूनही, चीनच्या उपकाराखाली असलेले मुस्लिम देश त्यावर काहीच बोलायला तयार नाहीत.
अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या २०१४ च्या शिंजियांग प्रांताच्या दौ-यानंतर चीनच्या या डावाला सुरुवात झाली. उईगूर मुस्लिमांना समृद्ध वारसा लाभला असून तो आता नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. उईगूर वंशाच्या महिलांचे निर्बिजीकरण करणे, त्यांचा बळजबरीने गर्भपात घडवून आणणे आणि त्यांच्या शरीरात गर्भनिरोधक उपकरणे बसवणे इत्यादी घृणास्पद कामे शिंजियांग प्रांतात सरकारच्या आशीर्वादाने बिनबोभाटपणे केली जात आहेत. एकूणच सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष (सीसीपी) उईगूर वंशाच्या मुळावर उठला आहे.
अध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या दौ-यादरम्यान हान वंशाचे प्राबल्य शिंजियांग प्रांतात वाढले पाहिजे, असे सूचक वक्तव्य केले होते. शी जिनपिंग यांच्या या दौ-यानंतर शिंजियांग कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते झँग चुक्शियान यांनी शिंजियांग उईगूर स्वायत्त प्रदेशाच्या घटनेतील कलम १५ नुसार कुटुंब नियोजन नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला. त्या निमित्ताने शिंजियांगमधील लोकसंख्येचे संतुलन स्थिर होऊन हान वंशाच्या लोकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा या निर्धारामागील हेतू होता.
ऐतिहासिकदृष्ट्या शिंजियांगसह मध्य आशियातील महिला या सांस्कृतिक परिचयाच्या सर्वशक्तिमान अशा प्रतीक होत्या आणि या संस्कृतीच्या त्या रक्षणकर्त्या असल्याचे मानले जात होते. मात्र, शिंजियांग प्रांतात कम्युनिस्ट पक्षाने जेव्हा आपले नियंत्रण मिळवले तेव्हापासून पक्षाने आपल्या धोरणानुसार अखिल समाजाच्या संस्कृतीच्या एकजीनसीपणाला महत्त्व देत येथे आपला अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. आपल्या वेगळ्या अशा सांस्कृतिक वारसा आणि केंद्रापकर्षी प्रवृत्तींमुळे उईगूर वंशीय आक्रमकांचे मुख्य लक्ष्य ठरले.
उईगूर वंशीयांची संस्कृती, चालीरिती, संकल्पना आणि सवयी यांवर पद्धतशीरपणे आक्रमण झाले. माओची पत्नी, जिआंग किंग, तर उईगूर वंशियांना ‘परदेशी हल्लेखोर आणि परग्रहवासी’ समजत असे. उईगूर वंशियांचे श्रद्धास्थाने असलेल्या मशिदींवर हल्ले करण्यात आले, मशिदींमध्ये डुकरांचे कळप घुसविण्यात आले, कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्या, सुंथ्यावर बंदी घालण्यात आली. या वंशविच्छेदाचे उदाहरण म्हणजे १९४९ मध्ये संपूर्ण शिंजियांग प्रांतात २९ हजार ५४५ मशिदी होत्या. सांस्कृतिक क्रांतीनंतर या मशिदींची संख्या अवघी १४०० एवढीच राहिली.
सांस्कृतिक क्रांतीदरम्यान चीनच्या या अत्याचारांना उईगूर मुस्लिम महिलांनी कडवा विरोध दर्शवला. त्यांनी आपापल्या धर्म, धर्माची तत्त्वे, त्याच्या चालीरिती, संस्कृती यांचे प्राणपणाने रक्षण केले. आपल्या कुटुंबात या सगळ्याचे पालन होईल, यावर या महिलांचा कटाक्ष असे. आपली संस्कृती टिकून राहावी यासाठी त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी या महिलांनी दोप्पाज (छानशी वेलबुट्टी असलेली पांढरीशुभ्र टोपी) या पारंपरिक हातमागाच्या उत्पादनाला कुठेही खंड पडू दिला नाही. चिनी अत्याचाराचा प्रतिकात्मक निषेध म्हणून या उईगूर महिला दोप्पाज वापरत आणि डोक्यावरून पदर घेत तसेच कधीकधी बुरखाही वापरत. एवढेच नव्हे तर उईगूर वंश टिकावा, वाढावा यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या क्रूर अत्याचारानंतरही पारंपरिक आणि अतिशय वेदनादायी अशा प्रसूतीशास्त्राच्या माध्यमातून या महिलांनी आपल्या मुलांना जन्म देत उईगूरांचा जन्मदर स्थिर ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही केले.
१९५५ मध्ये चीनच्या मध्यवर्ती सरकारने शिंजियांग उईगूर स्वायत्त प्रदेश (एक्सयूएआर) निर्माण करत शिंजियांग प्रांताला स्वायत्तता दिली. मात्र, ती कागदोपत्रीच राहिली. प्रत्यक्षात शिंजियांग प्रांताला कधीच स्वायत्तता मिळाली नाही. १९७९ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाने (सीसीपी) नव्या विवाह कायद्यातील कलम १२ नुसार एक अपत्याचा नियम लागू केला. शिंजियांग प्रांतातील शासनकर्त्यांनी शिंजियांग उईगूर स्वायत्त प्रदेशाच्या प्रकरण ३ मधील कलम १५ अनुसार १९८१ पासून शिंजियांग प्रांतात हाच नियम लागू केला. जो १९८३ पासून अल्पसंख्याकांनाही लागू झाला.
या स्वायत्त कायद्यानुसार शहरी भागात राहणा-या अल्पसंख्यकांना दोन अपत्यांची मुभा होती तर ग्रामीण भागातील उघिरांना तीन अपत्यांची मुभा देण्यात आली. अल्पसंख्यकांना लागू करण्यात आलेल्या संतती नियमन कायद्याला शिंजियांग प्रांतात कठोर विरोध झाला. बीजिंगलाही या आंदोलनाची झळ पोहोचली. आपल्या अस्तित्वावरच घाला घातला जात असल्याच्या भावनेने पेटलेल्या उईगूर विद्यार्थ्यांनी उग्र आंदोलन केले. आपल्याच भूमीतून आपल्याला पद्धतशीरपणे संपविण्याचा हा घाट असून तो वेळीच मोडायला हवा, या विचारांनी एकत्र आलेल्या उईगूर तरुणांनी संतती नियमनाचा कायदा मोडीत काढावा, अशी मागणी केली.
मात्र, कुटुंब नियोजनातही शिंजियांगमध्ये कोणतीही स्वायत्तता देण्यात आली नव्हती. शिंजियांग प्रांतात या कुटुंब नियोजन कायद्यांतर्गत अल्पसंख्यकाच्या घरात जन्माला आलेल्या नवजात शिशुचे भवितव्य बीजिंगमधील चिनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते ठरवत असत. त्यांनी बीजिंगमध्ये बसून तयार केलेले नियम गाव पातळीपर्यंत झिरपत होते. उईगूर महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक दंड (२ हजार ते ६ हजार युआन) भरावा लागत असे तसेच प्रांतिक नियमानुसार एखाद्या महिलेच्या पोटात तिस-या अपत्याचा गर्भ असला तरी तिच्या गर्भधारण काळात संबंधित महिलेला कधीही बळजबरीने गर्भपात करण्यास सांगितले जात असे.
उईगूर महिला आणि त्यांचे कुटुंबीय दंड भरत असत आणि हान वंशाच्या मुलांच्या संख्येत वाढ होणार नाही, याचीही दक्षता बाळगत. शिंजियांग प्रांतातील लोकसंख्येचे संतुलन बिघडून त्या ठिकाणी हान वंशियांचे प्राबल्य व्हावे आणि उईगूर मुस्लिमांना चीनच्या मुख्य प्रवाहात आणले जावे, यासाठी हे सर्व केले जात होते. उईगूर महिलांनी हिंमत बांधत आणि कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांना अंधारात ठेवत दोन वा तीनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म दिला आणि ही सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात त्या यशस्वीही ठरल्या. उपलब्ध आरोग्य सेवा नाकारत पारंपरिकरित्या सुईणीच्या हातून बाळंतपण करून घेत उईगूर महिलांनी हे यश संपादन केले. अनेक महिला बाळंतपणासाठी त्यांच्या पालकांच्या घरी जाऊन तेथेच कार्यभाग उरकून घेत.
शिंजियांग प्रांताचे भू-सामरिक महत्त्व २१व्या शतकाच्या दुस-या दशकात कैकपटींनी वाढले. विशेषतः अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या महत्त्वाकांशी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) प्रकल्प २०१३ मध्ये संकल्प सोडला त्यावेळेपासून तर शिंजियांग प्रांतेच महत्त्व अतोनात वाढले. बीआरआयच्या सहा मोठ्या मार्गिकांपैकी तीन मार्गिका शिंजियांग प्रांतातूनच जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिंजियांग प्रांतात मोठ्या प्रमाणात हान वंशीय लोकांचे आगमन झाले. त्यातून या भागातील उईगूर मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढीस लागले.
२०१४ मध्ये कुनमिंग रेल्वे स्थानकात एका माथेफिरूने केलेला चाकू हल्ला हे त्याचे निदर्शक होते. या घटनेनंतर जिनपिंग यांनी तातडीने शिंजियांग प्रांताचा दौरा केला. या दौ-यात त्यांनी अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. प्रांतात होत असलेल्या दंगाफसादाला वेळीच आवर घालण्याचा इशारा दिला. त्यासाठी दडपशाही वापरण्याचे स्वातंत्र्य त्यांनी स्थानिक अधिका-यांना दिले. तसेच शिंजियांग प्रांताच्या आर्थिक वृद्धीसाठी त्यांनी काही भरघोस पॅकेजही जाहीर केले.
जिनपिंग यांच्या दौ-यानंतर कम्युनिस्ट पक्षाने शिंजियांग प्रांतावर आपली पकड घट्ट केली आणि तेथील विद्रोही उईगूर नागरिकांवर नजर ठेवण्यात येऊ लागली, त्यांना पुनर्शिक्षित करण्याच्या निमित्ताने मोठ्या शिबिरांमध्ये डांबून ठेवण्यात येऊ लागले, हान वंशाच्या लोकांना प्राधान्य दिले जाऊ लागले, त्यांना अधिकाधिक सवलती दिल्या जाऊ लागल्या, हान वंशाच्या लोकांना आपली लोकसंख्या वाढावी यासाठी प्रोत्साहित केले जाऊ लागले.
चीने २०१६ मध्ये एक अपत्य धोरणाला तिलांजली दिली. काही प्रांतांमधील लोकांना तर लोकसंख्या वाढविण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात आले. परंतु त्याचवेळी उईगूर मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीवर चाप ठेवण्यासाठी उईगूर महिलांचे सक्तीचे निर्बिजीकरण, गर्भपात आणि त्यांच्या शरीरात गर्भनिरोधक उपकरणांची स्थापना इत्यादी अघोरी उपाय सत्ताधा-यांनी सुरू केले. त्यासाठी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने शिंजियांग प्रांतात अक्षरशः कोट्यवधी रुपये ओतले.
उईगूर महिलांची धरपकड करत त्यांना सक्तीने आययूडीने (इंट्रा युटेरियन डिव्हायसेस) बांधून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात असत. काहींना, विशेषतः दक्षिण शिंजियांगमधील महिलांना मासिक पाळी थांबण्याची औषधे सक्तीने दिली जात. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत खोतान आणि काशगर या दक्षिण शिंजियांग प्रांतातील दोन शहरांमधील नैसर्गिक लोकसंख्यावाढीचा दर ८४ टक्क्यांनी घटला. १.६ टक्क्यांवरून हा दर ०.२६ टक्क्यांवर आला. चिनी लोकसंख्येच्या तुलनेत शिंजियांगच्या लोकसंख्येचे प्रमाण १.८ टक्के एवढेच आहे परंतु संपूर्ण चीनच्या तुलनेत ८० टक्के आययूडी एकट्या शिंजियांग प्रांतातील उईगूर महिलांमध्ये बसविण्यात आले होते.
२०१४ नंतर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने शिंजियांग प्रांतात केलेल्या अत्याचारांचे मुख्य उद्दिष्ट केवळ उईगूरांच्या लोकसंख्येला चाप लावणे एवढेच नव्हते तर उईगूर संस्कृतीच्या रक्षकांनाही त्यांना मुळापासून उखडून फेकायचे होते. गेल्या चार वर्षांत कम्युनिस्ट पक्षाने शिंजियांग प्रांतात जी काही दडपशाही अवलंबली आहे ती पाहता चीन जागतिक स्तरावर स्वतःला कधीही नियमाधारित परोपकारी सत्ताधारी म्हणून जाहीर करू शकणार नाही.
इस्लामी जग चीनवर कधीही विश्वास ठेवणार नाही. चीनच्या आहारी गेलेली मुस्लिम राष्ट्रे शिंजियांग प्रांतातील दडपशाहीविरोधात मिठाची गुळणीच घेणे पसंत करतात. काही मुस्लिम राष्ट्रांनी संधी मिळेल त्या व्यासपीठावर चीनच्या शिंजियांग प्रांतातील मुस्लिमांवर होणा-या अत्याचारांविरोधात आवाज उठवला. पण, जेव्हा जपानसह २२ लोकशाहीवादी देशांनी चीनने उईगूर प्रांतात सुरू केलेल्या छळछावण्या बंद कराव्यात यासाठी पत्र लिहिले तेव्हा संयुक्त अरब अमिरात, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यासह ३७ मुस्लिम राष्ट्रांनी चीनची तळी उचलून धरली. शिंजियांग प्रांतात मानवाधिकारांचे कोणतेही उल्लंघन होत नसल्याचा निर्वाळाच या मुस्लिम राष्ट्रांनी दिला.
शिंजियांग प्रांतातील उईगूर महिलांवरील अनन्वित छळाच्या बातम्यांना पाय फुटल्यानंतर अमेरिकेने चीनवर यथेच्छ तोंडसुख घेतले. संरक्षणमंत्री मायकल पॉम्पिओ म्हणाले की, “चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ताबडतोब ही घृणास्पद कारवाई थांबवावी, असे आवाहन आम्ही करत आहोत”. मात्र, उईगूर मुस्लिम महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या कानावर येऊनही पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांनी चीनचा साधा निषेधही केला नाही. पाकिस्तान आणि चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत शिंजियांग प्रांतातील घटना हा चीनचा अंतर्गत मामला असून त्याविषयी आम्ही कोणतेही मतप्रदर्शन करणार नाही, असे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिंजियांग प्रांतात चालवलेली सांस्कृतिक दडपशाही थांबविण्यासाठी कम्युनिस्ट पक्षावर जगभरातून दबाव वाढत आहे. परंतु तरीही युरोप, अमेरिका, जपान आणि इतर लोकशाही देशांना चीनने दाद दिलेली नाही. मात्र, आता तरी उईगूर मुस्लिमांवरील अत्याचाराची दखल घेत मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येऊन चीनचा निषेध करावा आणि लोकशाहीप्रेमी पाश्चिमात्य देशांशी हातमिळवणी करून उईगूर संस्कृतीचे रक्षण होईल, यासाठी ठोस पावले उचलावीत, ही अपेक्षा.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.