Published on Sep 23, 2019 Commentaries 0 Hours ago

आसामातील जोऱ्हाटमधील डॉ.देबेन दत्ता यांची जमावाने केलेली हत्या ही देशातील प्रत्येक डॉक्टरच्या हिमतीची हत्या आहे.

\
एका डॉक्टरच्या हत्येची भयकथा

महिनाभरापूर्वी एक धक्कादायक बातमी एका दिवसाच्या आत सगळ्या देशाच्या नजरेआड गेली. ही बातमी होती आसामातील जोऱ्हाटमधील. हा आसामचा चहाच्या मळ्यांनी फुललेला निसर्गरम्य परिसर. इथे काम करणाऱ्या चहा कामगारांसाठी टी गार्डन हॉस्पिटल्स उभारली आहेत. या रुग्णालयात ७३ वर्षीय डॉ.देबेन दत्ता यांनी उभे आयुष्य सेवा दिली. निवृत्तीनंतरही त्यांनी आपली सेवा या टी गार्डन रुग्णालयात सुरू ठेवली होती. अशाच एका रुग्णालयात कामगारांमध्ये मारहाण होऊन, अत्यवस्थ झालेला एक रुग्ण आणला आणि काही तासात त्याचा मृत्यू झाला. या नंतर भडकलेल्या जमावाने डॉक्टरांसह रुग्णालयात दिसेल त्याला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत जमावाने डॉ. देबेन दत्ता यांचे अक्षरशः ‘मॉब लिंचिंग’ म्हणजे निर्घृण सामुहिक हत्याकांडच घडवून आणले. दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शकही चित्रपटात दाखवणार नाहीत इतकी बीभत्स अशी या हत्येची क्लिप आहे. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या यंत्रणेला रुग्णवाहिकाही वापरू दिली नाही. शेवटी सी.आर.पी एफ. जवानांना बोलवून डॉ. देबेन दत्ता यांना सोडवण्यात आले, पण त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

गेल्या दशकात ‘डॉक्टरांना मारहाण’ या नव्या आजाराचा जन्म झाला. माध्यमांमधून दर महिन्याला एखादी तरी अशी बातमी येऊन धडकते. तर मग वाद, शिवीगाळ, मारहाण याचे  दिवसाला एक तरी प्रमाण असावे. मागे कोलकाता वैद्यकीय महाविद्यालयात एक निवासी डॉक्टर मारहाणीत थोडक्यात बचावला. डॉ. देबेन दत्ता यांच्या मृत्यूने मात्र या सामाजिक अस्वास्थ्यावर कळस चढवला. विशेष म्हणजे माध्यमे, सर्वसामान्य कोणाला ही याची दखल घ्यावी वाटली नाही. कुठेही या विषयी फारशी हळहळ व्यक्त झाली नाही.

कोणाला हे जाणवत नसेल आणि कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण हा अशा प्रकारे एका डॉक्टर चा मृत्यू हा २६/११ चा अतिरेकी हल्ला किंवा देशाचा इतिहास बदलवून टाकणाऱ्या बाबरी मशिद पाडण्यासारखी आहे. फरक एवढाच की, या सर्व घटनांचे उघड आणि तातडीचे सामाजिक दुष्परिणाम दिसून आले व ते वर्तविलेही गेले. डॉ. दत्ता यांच्या या न चर्चिल्या गेलेल्या डॉक्टरच्या मृत्यूचे छुपे सामाजिक परिणाम हे संथ गतीने आणि अनेक वर्षे दिसून येणार आहेत.

हॉस्पिटल ही सिनेमा थिएटरसारखी मौज म्हणून येण्याची जागा नाही. तिथे प्रत्येक जण मुळातच एका अनिच्छेने आणि नशिबाला दोष देतच प्रवेश करत असतो. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे शंभर टक्के समाधान होणे अशक्य असते. त्यातच गंभीर रुग्णाच्या बाबतीत उपचारातील अपयशाचा समानार्थी शब्द हा मृत्यूच असतो.  पण आजच्या सामाजिक परिस्थितीचा आणि सार्वत्रिक मानसिकतेचा अभ्यास केल्यास होत गेलेले आणि रुजत गेलेले बदल आपल्या लक्षात येतील. समाजमाध्यमे, सुट्ट्यांसाठी परदेश प्रवासाचे ट्रेंड, राजकारणात एकमेकांवर तुटून पडण्याची वृत्ती, कर्कश चर्चा  आणि स्वतःची प्रतिमा घट्ट करणाऱ्या अनेक गोष्टींचा  उदय याच गेल्या दोन दशकातला. याच कालावधीत नकळत वैद्यकीय क्षेत्राबाबतीतही दोन बदल नोंदविणे गरजेचे आहे. एक म्हणजे आजार झाल्याची स्वतःची  जबाबदारी झुगारून इतरांवर त्याचे खापर फोडता येईल का हा शोध आणि दुसरे म्हणजे मृत्यू होऊच कसा शकतो? हा अहंकार. मग जे झाले ते फक्त डॉक्टरच्या चुकीतूनच झाले हे जाहीर करून आपल्या गेलेल्या नातेवाईकाचा बदला घेतला ही जाहीर करण्यासाठी रुग्णालयाची तोडफोड, मारहाण. यात आपल्याला आपला आरोग्य सेवेचा हक्क मिळाला नाही हा व्यवस्थेवरचा राग असतोच. पण बरेच हल्ले हे पूर्ण उपचार झालेल्या आणि महागड्या रुग्णालयातही झाले आहेत.

रुग्णालयांमध्ये व वैद्यकीय क्षेत्रात अपप्रकार चालतात यात शंकाच नाही. वैद्यकीय क्षेत्र ही काही १०० टक्के नैतिकता जपून आहे, असेही नाही. पण कट प्रॅक्टीस, औषध कंपन्यांशी लागेबांधे ही याच समाजात याच समाजातील इतर घटकांच्या बिगर वैद्यकीय असलेल्या समाजातच निर्माण झाले आहेत. इतर सामील असल्याने वैद्यकीय अनीतीचे समर्थन करता येणार नाही पण ही समाजाच्या बिघडलेल्या वीणेचा एक भाग आहे हे समजून घ्यावे लागेल. सर्व देशाच्या काही प्रमाणातील फसवणुकीचा सगळा बदला आपण मृत्युच्या वेळी एक घोट पाण्यासाठी तडफडणाऱ्या ७३ वर्षाच्या डॉ. देबेन दत्ता यांच्याकडून घेणार आहोत का? हा प्रसंग केसरी चित्रपटात हवालदार इशर सिंगने शत्रुला पाणी पाजण्याचे कार्य सोपवलेल्या आणि हे कार्य करत असताना निर्घृणपणे तलवारीने चिरले गेलेल्या खानसाम्यासारखे आहे.

मारहाणींच्या घटनांनंतर याची करणे आणि हे रोखण्याचे उपाय अशा चर्चा आता खूप झाल्या. पण आता सगळे खोलवर  समाजिक परिणाम करून आणि एका कालचक्राच्या संक्रमाणानंतरच थांबेल असे वाटते. कारण आता हळूहळू तज्ज्ञ डॉक्टर सुपर स्पेशालिटीपासून लांब जात आहेत. ज्या जागांसाठी आधी कमालीची चुरस असायची त्या अनेक सुपरस्पेशालिटीच्या जागा यावर्षी रिकाम्या जात आहेत. सुरेक्षेच्या कारणामुळे आधी गंभीर रुग्णांवर उपचार केलेल्यांची पुढच्या पिढीला वैद्यकीय शाखा एक तर नको आहे. जर निवडलीच तर रेडीओलॉजी, त्वचारोग अशा तुलनेने कमी जोखीम असलेल्या शाखा निवडण्याकडे आता वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल आहे. एकीकडे सगळीकडे आंत्रप्रिनरशिप, स्टार्ट अपचे वारे वाहात असताना मात्र वैद्यकीय क्षेत्रात चांगली सेवा देणारी व सोबत रोजगार ही निर्माण करणारी छोटी व मध्यम रुग्णालये झपाट्याने बंद होत आहे.

बरेच डॉक्टर उच्च शिक्षण घेऊन ही पर्यायी व्यवसाय करत असताना किंवा अशा जीवाचा धोका नसलेल्या व्यवसायाची निवड करत आहेत. काही डॉक्टर स्वतः चा व्यवसाय बंद करून कॉर्पोरेट रुग्णालयात नोकरी करणे पसंत करत आहेत. कॉर्पोरेट रुग्णालय हे एक किंवा काही डॉक्टर मिळून चालवत असलेल्या रूग्णालयासारखे नसते. ते एक बिझनस मॉडेल असते. तिथे मालकाशी जाऊन थेट समोरासमोर भांडता येत नाही. कडक सुरक्षा व्यवस्था, बाउन्सर यावर कोर्पोरेट रुग्णालयात भरमसाठ वार्षिक बजेट राखून ठेवले जाते. तसे असंख्य छोट्या रुग्णालयांना परवडणारे नसते. लँनसेट सारख्या अंतरराष्ट्रीय जर्नलने ही भारतातील मध्यम व छोटी रुग्णालये उत्तम आरोग्य सेवा देत असल्याचे मान्य केले आहे. पण आज हल्ल्यांची भीती आणि डळमळणारे आर्थिक गणित यामुळे अनेक रुग्णालयांची स्थिती कॅफे कॉफी डे सारखी झाली आहे.

‘कॅफे कॉफी डे’च्या व्ही जी सिद्धार्था सारखे डॉक्टर व्यक्तिगत आत्महत्या करत नसले तरी, त्यांची व्यावसायिक आत्महत्या मात्र प्रचंड प्रमाणावर सुरु आहे. आर्थिक मंदीची चर्चा सर्वत्र सुरु आहे पण आरोग्य क्षेत्रात उपचाराची कमतरता आणि असलीच तर महाग कॉर्पोरेट्स चा पर्याय या छुप्या मंदीचे भान कोणालाही नाही. भारताची ८० टक्के जनता खासगी आरोग्य सेवा घेते आणि कितीही महागडी वाटत असली तरी ती किमान उपलब्ध तरी आहे. त्यातच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्टरला रुग्णाच्या अपेक्षा आणि त्याची साधी सचोटीची सेवा हा समतोल राखणे अवघड झाले आहे. It is difficult to be good, when goodness is not in demand म्हणजे जेव्हा चांगुलपणा समाजात नको असतो तेव्हा चांगले राहणे हे आव्हान असते असे इतर क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही झाले आहे.

आज डॉक्टरांची हेटाळणी कसाई, दरोडेखोर अशी चावडीवरच्या गप्पां मध्ये सहज केली जाते. अगदी आंतरराष्ट्रीय   व्यासपीठावर पंतप्रधान मोदींनीही भारतातील डॉक्टर कसे फसवणूक करतात, हे थट्टा करत सांगून झाले. आज डॉक्टरांची ही अवस्था एकंदरीतच समाज म्हणून भूषणावह नाही. समाज म्हणून वैद्यकीय धोरणांचा पुनर्विचार होणे जसे गरजेचे आहे, तसेच देशातील लोकांनी प्रत्येक व्यवसायाची मर्यादा लक्षात ठेवायला हवी. अट्टल गुन्हेगारांबद्दल ज्या देशात सहानुभूतीने विचार होतो, तिथे डॉक्टरांचा विचार होऊ शकत नाही. आपल्या या महान देशाला आज झालंय तरी काय? की तो एका डॉक्टरच्या हत्येबद्दल मुग गिळून बसलाय. वोलटायर या तत्ववेत्त्याचा एक उपदेश आहे – ‘ What we owe to the dead is truth ‘ मृत्यू पावलेल्याला आपण काही देऊ शकतो तर ते म्हणजे प्रखर सत्य मान्य करणे.

डॉ.दत्तांचा मृत्यू हा फक्त विवेकाचा आणि तारतम्याचा मृत्यू नाही तो देशातील प्रत्येक डॉक्टरच्या हिमतीचा मृत्यू आहे. तो गंभीर आजारांच्या उपचारात अहोरात्र झटणाऱ्या कौशल्याचा मृत्यू आहे. भविष्यात आपल्या बुद्धिवान पाल्याला डॉक्टर बनवण्याची इच्छा आकांक्षांचा मृत्यू आहे. आज आपल्या समजातील परिस्थिती अशीच विवेकहीन होते आहे, हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे. त्याशिवाय डॉ. दत्ता यांना आपण काय समजून घेणार?

आयन रँड या लेखिकेचे rationalism म्हणजे बुद्धीप्रमाण्यावाद जगाला शिकवण्यात आयुष्य गेले. तिची ‘अॅटलस श्रग्ड’ ही कादंबरी हजारो वर्षांच्या विचारसरणीला छेद देणारी ठरली. त्यात जगातील कौशल्यवान आणि बुद्धिवान जर संपावर गेले तर जग कसे विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल, हे सांगितले आहे. हे पुस्तक डॉ. दत्तांच्या हत्येचे प्रायश्चित्त म्हणून प्रत्येकाने जरूर वाचावी. या डॉक्टरच्या मृत्युच्या गर्भात असेच एखादे कल्पनेपेक्षा भयानक वास्तव दडलेले असू शकत. ते टाळायचे असेल तर एकच मार्ग आहे. विवेक आणि तारतम्याची कास धरण्याचा.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.