Published on Nov 27, 2019 Commentaries 0 Hours ago

महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, बार्शी अशी चारच मोठी कॅन्सर उपचार रुग्णालये आहेत. किमान जिल्हा रुग्णालयात ऑन्कॉलॉजी विभाग त्वरीत सुरु करणे गरजेचे आहे.

कॅन्सरबद्दल आरोग्यधोरण हवे

भारतामध्ये कॅन्सरच्या प्रमाणात फक्त गेल्या एका वर्षात ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतासारखा आर्थिकदृष्ट्या मागास देशात शिक्षणाची, त्यातही आरोग्य शिक्षणाची वानवा आहे. दुसरीकडे पुरेशा आरोग्यसुविधां उपलब्ध नसल्याने आज भारत हा जगातील कँन्सरची राजधानी होत आहे. खरे तर किमान ८० टक्के कॅन्सरमुळे होणारे मृत्यू हे टाळता येण्यासारखे आहेत. पण स्क्रिनिंग आणि प्रतिबंध या दोन्ही शब्दांचे वावडे असलेल्या या देशाला ही गोष्ट पटवून कशी सांगायची? तसेच हीच गोष्ट सर्वसामन्यांच्या गळी कशी उतरवायची? हे यक्षप्रश्न आज आरोग्य तज्ज्ञांसमोर उभे आहेत.

भारतात स्त्रियांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या तोंडाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर; पुरुषांमध्ये तोंडाचा, फुफुस आणि प्रोस्टेट तसेच स्त्री-पुरुष दोघांमध्ये आतड्यांचा कँन्सर हे मृत्यूस कारणीभूत ठरणारे प्रमुख कॅन्सर आहेत. फुफुस सोडले तर या प्रत्येक कॅन्सरला टाळता येणे शक्य आहे. आज अनेक विकसित देशांमध्ये त्या देशातील विविध कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेऊन कॅन्सर स्क्रिनिंग प्रोग्राम आखलेले आहेत. म्हणजेच या कॅन्सरचे प्राथमिक पायरीवरच निदान करून त्यावर तातडीने उपचार करण्याची आणि तो पसरू न देण्याची प्रतिबंधात्मक सरकारी व्यवस्था उपलब्ध आहे. एवढेच नव्हे, तर संपूर्ण लोकसंख्येसाठीची मार्गदर्शक तत्वांचा दर पाच वर्षांनी आढावा घेऊन त्यात बदल केले जातात.

आपल्या देशात मात्र किमान सर्वसामान्यपणे आढळणारे कँन्सर कुठले व ते टाळायचे कसे याचे जुजबी ज्ञान ०.१ टक्के लोकांनाही अद्याप नाही. प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या घरातील कँन्सरचा कौटुंबिक पूर्व इतिहास, घरातील सदस्यांची व्यसने, खाण्या-पिण्याच्या सवयी, जीवनशैली यावरून आपल्या कुटुंबाची ‘कॅन्सर रिस्क असेसमेंट’ करायला हवी. म्हणजेच आपल्या घरात कोणाला कुठला कॅन्सर होण्याची शक्यता आहे, याचा अभ्यास केला पाहीजे. इथेच न थांबता तो टाळता येण्यासाठी काय बदल करायला हवे व तो टाळण्यासाठी वेळोवेळी स्क्रिनिंग म्हणजे, प्राथमिक स्टेजमध्ये लवकर निदानासाठी काय तपासण्या करायला हव्या याच्या नजिकचा आणि दूरगामी योजना आखायला हवी.

कॅन्सर प्रतिबंध व उपचार हे धोरण पातळीवर आपल्या आपल्याकडे अजून विचारातच घेतले गेलेले नाही. महाराष्ट्रातील दोन आरोग्यमंत्र्यांचा जीव गेल्या दहा वर्षात, कॅन्सरने गेला असूनही राज्यात शासकीय पातळीवर याचा गांभीर्याने विचार झालेला नाही, हे आश्चर्यकारक आहे. टाळता येणाऱ्या व सर्वाधिक प्रमाणात अढळणाऱ्या स्तन, सर्वायकल, तोंडाचा कॅन्सर, प्रोस्टेट आणि आतड्यांचा कॅन्सर असे  पाच कॅन्सर जरी टार्गेट केले तरी ७० टक्के घटना टळू शकतील. यासाठीची स्क्रिनिंगची पद्धत तशी कमी खर्चिक आहे. पण आरोग्य खात्यात या विषयीचा ठोस कार्यक्रम व त्याचे निश्चित उद्दिष्ट ठरलेले नाही. कॅन्सरची कुठलीही विशेष तपासणी करायची झाल्यास उपजिल्हा सोडाच पण जिल्हा रुग्णालयातही याची सोय नाही. त्यामुळे प्रत्येक भौगोलिक भागासाठी कॅन्सरचे प्रमाण बघून किमान एका तरी कॅन्सरचा स्क्रिनिंग प्रोग्राम राबवण्याचे उद्दिष्ट कालमर्यादा ठरवून निश्चित करायला हवे.

उपचारांच्या बाबतीतही तेच आहे.  पूर्ण राज्यात टाटा, मुंबई हे प्रमुख आणि नागपूर, औरंगाबाद, बार्शी ही तीन अशी एकूण चार मोठी कॅन्सर उपचाराची रुग्णालये आहेत. त्यातच ग्रामीण– शहरी भागातील उपचारांच्या उपलब्धतेमधील दरी खूप मोठी आहे. उपचारांचा मुख्य ताण हा मुंबईतील टाटा रुग्णालयावर आहे. त्यातच ग्रामीण भागातील रुग्णांना येथे येऊन राहणे जड जाते. त्यामुळे बरेच रुग्ण या सुविधा शहरात असल्याने येण्यास उशीर करतात. त्यामुळे सहज बरे होणारे कॅन्सर शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचून रुग्णांचा मृत्यू होतो. यात महिला रुग्णांची स्तिथी अजूनच बिकट आहे. त्यामुळे किमान जिल्हा रुग्णालयात ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर उपचाराचा विभाग त्वरीत सुरु करणे गरजेचे आहे. शासनाच्या महात्मा फुले योजनेत ही कॅन्सर उपचारांची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे.

वैद्यकीय क्षेत्राचा इतिहास कँन्सर उपचाराच्या गोष्टींनी भरलेला आहे. यातील भारतात अनेक स्त्रियांचा प्राण घेणाऱ्या सर्वायकल कँन्सर टाळणारी पॅप स्मिअर ही सोपी, स्वस्त आणि सहज करता येणारी चाचणी कशी दुर्लक्षित राहिली हे जाणून आपली मान शरमेने खाली जाईल. डॉ. पपानिकोलोऊ यांनी १९२८ साली ‘पॅप स्मिअर’ या टेस्टचा शोध लावला. ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्वायकल) कॅन्सरचे निदान लवकर आणि तो होण्याआधीच्या स्टेज मध्ये होऊन, त्यावर लागलीच उपचार होऊ शकतात. यामुळे कॅन्सर पुढे वाढत नाही व त्या स्त्रीचा जीव वाचतो.

डॉ. पपानिकोलोऊ यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नीचा मोठा हात आहे. ही टेस्ट योनी मार्गातील थोड्या पेशी घेऊन करावी लागते. पपानिकोलोउ यांच्या पत्नीनी अनेक वर्षे त्यांच्या योनी मार्गातील पेशी डॉक्टरांना स्मिअर संशोधनासाठी घेऊ दिल्या. हे संशोधन करण्यासाठी व यासाठी पैशाची तजवीज करण्यासाठी डॉ. पपानिकोलोऊ यांनी घरोघरी जाऊन कार्पेट विकले, हॉटेलमध्ये वायोलिन वाजविले. यातून ही हजारोंचा जीव वाचविणारी ही टेस्ट जन्माला आली.

ही टेस्ट अत्यंत स्वस्त आणि खूप प्रभावी आहे. पण आपला करंटेपणा असा की ही जीवरक्षिणी टेस्ट आपल्या देशात अत्यंत अल्प प्रमाणात केली जाते. खर तर ही स्क्रिनिंग टेस्ट असल्याने, अनेक देशात पस्तीशीनंतर शासनातर्फे प्रत्येक महिलेची ही टेस्ट केली जाते. आपल्याकडे याबद्दल सरकारलाही जाणीव नाही आणि लोकांनीही.

भारतात दर वर्षी १ लाख स्त्रियांना गर्भाशयाचा (सर्वायकल) कॅन्सर होतो. त्यातच जास्त मुले असणे, लवकर लग्न झालेले असणे व योनी मार्गाचा जंतूसंसर्ग हे सर्वायकल कॅन्सरचे रिस्क फॅक्टर म्हणजे ‘शक्यता वाढवणाऱ्या गोष्टी’ आहेत. आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी, मुलीची पस्तीशीनंतर सलग तीन वर्षे ही टेस्ट नक्की करून घ्यायला हवी. कुठल्याही गायनॅकॉलॉजिस्ट (स्त्रीरोग तज्ज्ञ) किंवा पॅथॉलॉजिस्टकडे ही टेस्ट करता येते. याला फार खर्चही येत नाही. आपण या साध्य टेस्टच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सर पासून आपल्या घरातील स्त्रीचे रक्षण करू शकतो.

डॉ. पपानिकोलोऊ यांचे दोन वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले. पण त्यांना तो मिळू शकला नाही. सौ. मेरी पपानिकोलोऊ यांची खूप इच्छा होती की त्यांना हा पुरस्कार मिळावा. १३ मे रोजी गुगल डूडल च्या माध्यामतून त्यांना किमान गुगलने ऑन लाईन सलामी दिली.

स्त्रियांमधील दुसरा महत्वाचा कॅन्सर म्हणजे स्तनांचा कँन्सर. बरेच स्तनांचे कॅन्सर हे कुठल्याही लक्षणांशिवाय दिसतात तर काहींमध्ये गाठ दिसून येते. त्यामुळेच चाळीशीनंतर नियमित स्तनांची तपासणी करणे गरजेचे आहे. जर आपल्या रक्तातील नात्यातील कोणाला याआधी स्तनांचा कॅन्सर झाला असेल, तर आपली कँन्सर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा सर्व स्त्रियांना याच्या प्रतिबंधासाठी जागरूक असले पाहिजे. यासाठी दर तीन महिन्यांनी स्वतःच्या हातांनी अंघोळ करत असताना कुठे गाठ लागते आहे का, हे स्वतः तपासून पाहणे शक्य असते. पण याबद्दल अशिक्षित वर्गात संभ्रम असू शकतो. म्हणून चाळीशीनंतर दर वर्षी स्तनाची सोनो-मामोग्राफी करून घेणे आवश्यक असते. यात स्तनातील कुठलीही गाठीची त्वरीत निदान होते. उपचारांच्या बाबतीतही अजून त्वरित शस्त्रक्रिया करू घेणे, आर्थिक हलाखी मुळे शक्य होत नाही. म्हणून स्तनांच्या कॅन्सरचे निदान झाले की त्वरीत उपचार करण्यासाठी यंत्रणा उभारणे, हे एक मोठे आव्हान आहे. आज अनेक समाजिक संस्था या क्षेत्रात कार्यरत आहेत.

तंबाखूजन्य कॅन्सर हेही मृत्यूचे प्रमुख कारण आहे. भारतात आढळणाऱ्या सर्व कँन्सर्सपैकी ३० टक्के हे फक्त तंबाखूमुळे होतात. एकीकडे तंबाखू, गुटखा उद्योगाकडे महसूलाचा मोठा स्रोत म्हणून पाहिले जाते. पण त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या खर्चाकडे आणि या खर्चामुळे अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाकडे मात्र तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. व्यसनमुक्ती हे आजही मानसशास्त्रात दुर्लक्षित दालन असल्याने तंबाखूजन्य कॅन्सर टाळायचे कसे हे एक मोठे कोडेच आहे. हे टाळण्याची आपली समज आणि प्रयत्न तंबाखू, गुटख्याच्या पाकिटांवर तोंडाच्या कॅन्सरमुळे विद्रूप झालेले चेहरे टाकण्याच्या पलीकडे गेलेले नाही.

आर.आर. पाटीलसारखा गृहमंत्रिपदावर राहिलेला महत्त्वाचा राजकीय नेता आणि अनेक चांगली माणसे आपल्याला तोंडाच्या कॅन्सरमुळे गमवावे लागले. किमान तंबाखू खाणाऱ्या लोकांनी तरी तोंडाची वार्षिक तपासणी तरी करून याचे लवकर निदान करून घ्यावे. पण या दोन्ही आघाड्यांवर आम्ही सपशेल अयशस्वी ठरलो आहोत. सिगारेट, तंबाखूमुळे होणारा फुफुसाचा कॅन्सर  हा सर्वात जटील व सहसा शेवटच्या स्टेज मध्येच निदान होणारा व रुग्णाच्या मृत्यूची शक्यता सर्वाधिक असणारा कँन्सर आहे. त्यामुळे व्यसनांना रोखणे हाच या कँन्सर चा एकमेव प्रतिबंध आहे.

पुरूषांमधील प्रोस्टेटचा कॅन्सर हा लवकर निदान झाल्यास चांगले उपचार आणि रुग्ण वाचण्याची जास्त शक्यता असलेला कॅन्सर आहे. प्रोस्टेटची साधी कॅन्सर नसलेली वाढ ओळखून त्यावर उपचार करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. पन्नाशीनंतर लघवीची धार बारीक होणे, लघवी करताना ती पायाजवळ पडणे, लघवीला जोर लावावा लागणे, लघवी परत परत होणे, मधुमेह नसतानाही रात्री लघवीला वारंवार उठावे लागणे, लघवीला जळजळ होणे किंवा रक्त येणे ही लक्षणे आढळून आल्यास प्रोस्टेट तपासणी गरजेची आहे. प्रोस्टेटची वाढ साधी आहे की कँन्सर आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन म्हणजे पीएसए ही तपासणी करावी लागते. यात वाढ झाली असल्यास प्रोस्टेटचा कँन्सरची असल्याचे निदान करता येते. ही तपासणी फारशी महाग नाही आणि चाळीशी नंतर दरवर्षाला प्रत्येक पुरुषाने करून घ्यावी .

आतड्यांचा कँन्सर हा स्त्री-पुरुष दोघांमध्ये होऊ शकतो. यासाठी चाळीशीनंतर दर वर्षी आतड्यांची दुर्बिणीतून तपासणी म्हणजे कोलोनोस्कोपी करून घ्यावी, अशी मार्गदर्शक तत्वे आहेत. सर्वसाधारण सर्व कॅन्सरचे मिळून काही लाल निशाण फडकवणारी लक्षणे आहेत. जी आढळून आल्यास आपण डॉक्टर कडे कॅन्सर आहे का, यासाठी तपासणी साठी जायला हवे. लघवी किंवा शौचाच्या सवयीत मोठा बदल होणे; बरी न होणारी जखम होणे; तोंड, योनी, लघवी, गुदद्वारातून रक्तस्त्राव; भूक न लागणे; जास्त प्रमाणात वजन कमी होणे; गिळायला त्रास होणे; शरीराच्या कुठल्याही भागावर गाठ; तीन महिन्याहून अधिक काळ बरा न होणारा खोकला; वजनात झालेला बदल ही ती काही लक्षणे आहेत. आधुनिक जीवनशैली ही कँन्सरशी निकटचा संबंध आहे. त्यात वजन जास्त असणे, व्यसने, आहारात जास्त प्रमाणातील चरबीयुक्त अन्न, व्यायामाचा आभाव आणि बैठ्या स्वरूपाचे काम हे सर्व कॅन्सरची जोखीम वाढवणारे जीवनशैलीतील  बदल आहेत.

एकीकडे धोरणात्मकरित्या विविध उपायांद्वारे कॅन्सरचा प्रतिबंध आणि दुसरीकडे आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करणे हेच कॅन्सरच्या राक्षसाला रोखण्याचे उपाय आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.