Author : Harsh V. Pant

Published on Dec 06, 2019 Commentaries 0 Hours ago

शी जिंगपिंग यांच्यासोबतच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीवरील दबाव वेगवेगळ्या पद्धतीने वाढत आहे, यामुळे कदाचित बीजिंगचे वागणे जागतिक पातळीवर बदलू शकते.

चीनमध्ये वाहताहेत बदलाचे वारे

कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांच्या पुढील आव्हाने दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहेत. हॉंगकॉंग मधील पेचप्रसंग कम्युनिस्ट पार्टीने ज्या पद्धतीने हाताळला त्याला तितकाच जोरदार धक्का देत, लोकशाही समर्थक शक्तींनी स्थानिक निवडणुकीत भरघोस विजय मिळवला, १८ जिल्हा परिषदेपैकी १७ ठिकाणी लोकशाही समर्थकांचे नियंत्रण असणार आहे. या निवडणुकीत ७१% पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले, मतदारांच्या संख्येतील ही लक्षणीय वाढ अभूतपूर्व म्हणावी अशी आहे.

हॉंगकॉंग प्रश्न हाताळताना

२०१९ च्या सुरुवातीला चीनच्या प्रत्यार्पण विधायकाविरोधात निदर्शने सुरु झाली होती. या निदर्शकांना मजबूत पाठिंबा असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या या निकालावरून ठळकपणे स्पष्ट होते. हॉंगकॉंगच्या विवादित नेत्या कॅरी लॅम यांनी आपल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, त्यांच्या सरकारला या निकालांबद्दल आदर असून सरकार सार्वजनिक सदस्यांची मते अत्यंत नम्रतेने ऐकून घेईल आणि त्यावर गांभीर्याने व्यक्त होईल.”

हॉंगकॉंगच्या रस्त्यावर चाललेल्या या निदर्शनांचा आवाज बीजिंगपर्यंत ऐकू जाईल का? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. कारण शी जिंगपिंग यांनी आपला व्यवहार बदलावा यासाठी त्यांना फारसे प्रोत्साहन मिळताना दिसत नाही. उलट, ते आपल्या कठोर व्यवहारात दुपटीने वाढ करतील असे काहींचे म्हणणे आहे. कारण, वर्षाच्या सुरुवातीला जेंव्हा या संघर्षाला सुरुवात झाली होती, तेंव्हा  त्यांच्यासमोरील पर्याय इतक्या वेगाने कमी होतील याचा त्यांनी अंदाजही बांधला नसेल.

विशेषतः शी यांच्यासाठी ही बाब अधिकच त्रासदायक ठरणारी आहे. कारण चीनचे वास्तविक सर्वेसर्वा होण्याआधी त्यांनीच कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिटब्युरो स्थायी समितीवर हॉंगकॉंगचा पोर्टफोलिओ ठेवला होता. आपल्या कठोर आणि चिवट भूमिकेवर त्यांना अतोनात विश्वास आहे असे दिसते आणि त्यांनी सत्तेचे ज्याप्रमाणे अभूतपूर्व पातळीवर केंद्रीकरण केलेले आहे, तिथे शी यांनी लागू केलेल्या धोरणाबद्दल इतर कुणालाही दोष देता येत नाही. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, यांनी “काही झाले तरी, हॉंगकॉंग हा चीनचाच एक भाग आहे,” असे वक्तव्य केले आहे, आणि तसा इशाराही दिला आहे की, “हॉंगकॉंग मध्ये गडबड माजवण्याचा किंवा तेथील समृद्धी आणि स्थिरतेला तडा जाईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होऊ देणार नाही,” यात कसलेची आश्चर्य नाही.

उईगूर समस्या

शी यांची राजवट नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असल्याचा उलगडा तेंव्हा झाला जेंव्हा चीन आपल्या वायव्येकडील झिंजियांग प्रांतातील उईगूर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांकांना कशा प्रकारे सामुहीकरित्या नजरकैदेत ठेवते याचे अधिक सूक्ष्मतेणे विवरण करणारी चीन सरकारची गोपनीय कागदपत्रे आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारांच्या हाती लागली होती. या कागदपत्रांमुळे दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या राष्ट्रीय उद्देशाने लाखो किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण शाळेत पाठवत असल्याचा जो दावा चीन वारंवार करत होता, तो फोल ठरला. डोळ्यात झणणीत अंजन घालणारी बाब म्हणजे, जगभर चीनचे जे राजकीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावास आहेत ती, अशा प्रकारच्या सामुहिक नजरबंदी केंद्रांचे काम सुलभ व्हावे यासाठी सहाय्यभूत ठरत होती. प्रत्येकवेळी जेंव्हा जेंव्हा अशा गोष्टी उघड होतात तेंव्हा चीनच्या जागतिक विश्वासार्हतेला तडा जातो. सध्या हे फार ठळकपणे जाणवत नसले तरी, चीनची जागतिक पटलावर जी एक उंची आहे, तिला जोरात धक्का बसला आहे.

जागतिक पातळीवर डागाळत चाललेल्या या प्रतिमेबद्दल शी यांना स्वदेशात चांगलीच किंमत चुकवावी लागत आहे. हॉंगकॉंगमध्ये तर त्यांना चांगले पर्यायच राहिले नाहीत. आपला कठोर व्यवहार असाच सुरु ठेवण्याचा निर्णय जर त्यांनी घेतला तर हॉंगकॉंगमधील परिस्थिती अजूनच चिघळेल. पण, सवलती देणे  हा देखील त्यांच्यासमोरील व्यवहार्य पर्याय अजिबात नाही, कारण निदर्शकांच्या मागण्या कुठपर्यंत वाढतील हे देखील सहज स्पष्ट होत नाही आहे. प्रत्यार्पण विधेयक मागे घेतले तरी, निदर्शकांच्या मागणीत अस्सल सार्वत्रिक मताधिकार आणि पोलिसांच्या क्रूर कृत्यांच्या आरोपांची चौकशी करण्यात यावी याचीही भर पडली आहे. हॉंगकॉंग पासून तैवान पर्यंतचे अंतर फारच कमी आहे, जिथे येत्या जानेवारीत निवडणुका लागणार आहेत.

पक्षाच्या क्रियाशीलतेवरील परिणाम

चीनच्या मुख्य भू-भागाचा विचार करता, २१ व्या शतकातील एक प्रमुख सत्ता म्हणून उदयास येत असलेल्या चीनचे नेतृत्व म्हणून शी यांची जी प्रतिमा आहे ती कदाचित डागाळली जाऊ शकते. देशातील गोंधळाची स्थिती हाताळण्यास चीनचे नेतृत्व असमर्थ आहे, चीनच्या सामान्य नागरिकांत हा विश्वास दृढ झाल्यास चीनच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी काम्युनिस्ट पक्षाने जो नाजूक समतोल राखला आहे, तो उध्वस्त होऊ शकतो.

शी यांच्या धोरणांचा फटका बसल्याने कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत शत्रुत्व टिपेला पोहोचण्याची देखील शक्यता आहे. सर्वोच्च नेता होण्याच्या आपल्या महत्वकांक्षेपोटी शी यांनी अनेक शत्रू निर्माण केले आहेत आणि आपल्या विरोधाकंशी ते अतिशय निर्दयी पद्धतीने वागतात. त्यापैकी काहीजण आपली प्रतिक्रिया देण्यासाठी सज्ज देखील झाले असतील. चीनची अर्थव्यवस्था ढासळत आहे. शी यांच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह उपक्रमातील पुढाकाराबाद्दल देशांतर्गत टीकाटिप्पणी वाढत आहे. या अतिभव्य प्रकल्पाच्या खर्चाचा भार चीनलाच सोसावा लागत आहे, जो चीनची आर्थिक क्षमता विचारात न घेता फक्त शी यांच्या आत्मविश्वासातून उभारला जात आहे. इतर देशांत देखील चीनचे आक्रमक प्रभावी कार्यक्रम राबवत आहे त्याबद्दलही तीव्रप्रमाणात प्रतिकूल प्रतिक्रिया उमटत असून, त्यासंदर्भाने काही महिन्याच्या कालावधी नंतर नवनवीन खुलासे समोर येत असतात.

अगदी अलीकडेच ऑस्ट्रेलियम प्रसारमाध्यमांनी केलेल्या वृत्तांकनात असा आरोप करण्यात आला होता की, चीन ऑस्ट्रेलियाच्या संसदेत हेरगिरी करण्याचा कट रचला असून, चीनची ही कृती “अतिशय त्रासदायक” असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केला होता. चीनच्या या कृत्याचा शोध त्यांच्या देशातील गुप्तचर संस्थेमार्फत घेतला जाईल असेही ते म्हणाले होते. यासोबतच असेही वृत्त मिळाले आहे की, चीनच्या गुप्तहेराने हॉंगकॉंग, तैवान आणि ऑस्ट्रेलिया मधील चीनने केलेल्या कार्याची माहिती दिल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या राजाश्रायासाठी अर्ज केला आहे, आणि तो वैयक्तिकरित्या या ‘गुप्तहेराच्या कामात सहभागी’ असल्याचे सूचित केल्याने आधीच जागतिक पातळीवर तडे गेलेली चीनची प्रतिमा आणखीनच खराब झाली आहे.

जसजसा शी जिंगपिंग आणि कम्युनिस्ट पार्टी यांच्यावरील दबाव वाढत जाईल तसतसे, बीजिंग आपल्या अंतर्गत अपयशावरील लक्ष वळवण्यासाठी जगावरच फटकारे ओढण्याचा मार्ग स्वीकरण्याचा धोका आहे. चीनकडून येऊ शकणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी नवी दिल्लीने सावध राहिले पाहिजे. तसेच, बीजिंगमध्ये जी अनेक प्रकरची संकटे येऊ घातली आहेत त्याच्या बाह्यपरिणामांना सामोरे जाण्यासाठी देखील सज्ज झाले पाहिजे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत  

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Harsh V. Pant

Harsh V. Pant

Professor Harsh V. Pant is Vice President – Studies and Foreign Policy at Observer Research Foundation, New Delhi. He is a Professor of International Relations ...

Read More +