Author : Pratima Joshi

Published on Jul 29, 2020 Commentaries 0 Hours ago

स्थलांतर हा जसा मानवी इतिहासाचा अविभाज्य भाग राहिला आहे, तसेच आपल्या जागेमध्ये दुसऱ्याचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न, हाही मानवी स्वभाव आहे, हे विसरून चालणार नाही.

स्थलांतर, भूमीपूत्र आणि भविष्य

Source Image: newscientist.com

मानवी इतिहासात जगण्यासाठी, रोजगारासाठी आणि नवे काही शिकण्यासाठी कायमच स्थलांतरे होत आलेली आहेत. अनेकदा या स्थलांतराला युद्धे, लढाया, दंगली आणि वांशिक अत्याचार अशी कारणेही आढळतात. ही सर्व कारणे काळाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत गेलेली दिसतात. भविष्यात यापुढेही हे स्थलांतर असेच सुरू राहील. कदाचित स्थलांतराच्या कारणामध्ये आणखी नव्या कारणांची भर पडेल. माणसाच्या या स्थलांतराने जगाची दशा आणि दिशा सतत बदलत राहिली आहे आणि यापुढेही बदलत राहील, एवढे मात्र नक्की. 

‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ या संस्थेतर्फे प्रकाशित  करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार जगभरात २८  कोटी ९० लाख लोक  स्थलांतरित  आहेत. आपला  मूळ  देश  सोडून दुसऱ्या  देशात राहत आहेत. १९९०च्या  दशकात जागतिकीकरण आणि  उदारीकरणाचे  पर्व  सुरू झाल्यानंतर  स्थलांतराला  अधिक वेग आला. या स्थलांतरांमागचे प्रमुख कारण हे उच्च शिक्षण आणि रोजगार हेच आहे. 

देशांतरासोबतच देशांतर्गत स्थलांतरेही भारतात सतत आणि मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. किंबहुना २०००च्या पहिल्या दशकात आपल्या देशात एका  राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या स्थलांतरात लक्षणीय वाढ झालेली दिसते. २०११च्या जनगणना  अहवालानुसार,  ही  संख्या ४५ कोटी ५० लाख इतकी आहे.  इतकी  मोठी  लोकसंख्या आपल्या घरापासून, आपल्या मूळ राज्यापासून  (होम स्टेट) लांब असलेल्या दुसऱ्या राज्यात, शहरात  उपजीविका  करत आहे. आता २०२१ ची जनगणना होईल तेव्हा हा आकडा निश्चितच आणखी वाढला असेल. तो किती वाढला आहे, हे पाहणे अनेक अर्थांनी अभ्यासपूर्ण असेल, कारण त्यात नागरीकरणापासून  शेतीप्रश्नापर्यंत आणि  अर्थव्यवस्थेपासून राजकीय  उलथापालथींपर्यंत अनेक घटकांचा समावेश असेल. 

स्थलांतरे ही फारच  कमी  वेळा  स्वेच्छेने होतात, पुष्कळदा ती कळत नकळत लादली गेलेली असतात. जी स्वेच्छेने होतात असे वरवर  दिसते, त्यामागेही  बरेचदा  आपण  जिथे  राहतो, तेथील आर्थिक आणि राजकीय  कारणे  आहेत, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. म्हणजे अनेक  भारतीयांना अमेरिकेत अगदी मनापासून स्वेच्छेने  जायचेच असते, तसे  निश्चित  करूनच  त्यांनी  आयुष्याची आखणी केलेली असते. त्यांना अमेरिका स्वप्नभूमी वाटते, कारण तेथील संपन्नता, आधुनिक  राहणीमान समाजजीवनातील  मोकळेपणा… अगदी साधे कारण म्हणजे रस्त्यात लोक थुंकत नाहीत, गर्दी नाही आणि ट्रॅफिक जाम नाही… अशी अनेक  कारणे त्यांना त्या देशात जायला उद्युक्त करतात. याचा  दुसरा  अर्थ ते ज्या देशात जन्मले, तेथे अर्थव्यवस्था अद्याप  विकास  पावलेली नाही, तेथे अनेक कारणांमुळे समाज मागासलेला आहे, तेथील राजकीय व्यवस्था आश्वासक नाही. या सर्व अभावांपासून  दूर जाण्याची मानसिकता असते. 

तुलनेने  वरच्या  आर्थिक स्तरांतील व्यक्ती देश बदलतात, तर गरीब  कुटुंबे  आपापली गावे, जिल्हा, राज्ये सोडतात. फरक इतकाच, की वरच्या आर्थिक स्तरांमधील  माणसांकरिता  पोळीवर तुपाची धार पडावी यासाठी स्थलांतर असते, तर गरीब किमान चतकोर भाकर मिळावी म्हणून नाइलाजाने स्थलांतर करतात. 

जागतिकीकरणाच्या रेट्याने भारतात वाढत  चाललेली  शहरे भारतातील ग्रामीण भागांतील लोकांना आपल्याकडे खेचून घेतात, याच प्रक्रियेने संपन्न झालेले देश भारतासारख्या  अविकसित देशातील बुद्धिसंपदा आणि श्रमसंपदा असलेल्या उपयुक्त लोकांना आपल्याकडे खेचून घेतात. 

भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वर्तमानात जगभरातील अन्य देशांत राहणाऱ्या भारतीयांची संख्या २ कोटी ८० लाख १९ हजार  इतकी आहे. यात १  कोटी २० लाख  ४९ हजार अनिवासी  भारतीय (एनआरआय) आहेत, तर १  कोटी ५० लाख भारतीय  वंशाचे, पीपल  ऑफ इंडियन ओरिजिन (पीआयओ) आहेत. ज्या दोन प्रांतांत भारतीय लोकांचे स्थलांतर अधिक आहे, त्यापैकी ४० लाख  ५० हजार  अमेरिकेत  राहत आहेत. तर जीसीसी म्हणजे, बाहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरब  या  आखाती  देशांमध्ये ८० लाख ५० हजार भारतीय आहेत. संयुक्त अरब अमिरात म्हणजे ‘यूएई’मध्ये राहणाऱ्यांची संख्या ३० लाख ५० हजार इतकी आहे. परदेशात  राहणाऱ्या भारतीयांची ही संख्या एकट्या व्हेनेझुएला देशाच्या लोकसंख्येजवळ जाणारी आहे.  

भारतात राज्यांतर्गत   होणाऱ्या या स्थलांतराकडे पाहिले, तरी त्याची खोली आणि व्याप्ती लक्षात यावी. २००१ ते २०११ या दशकभरात अशा अंतर्गत स्थलांतराचे प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढल्याचे जनगणना अहवाल सांगतो. २०११च्या अहवालाप्रमाणे ९.८ टक्के लोकांनी रोजगारासाठी, ०.७ टक्क्यांनी व्यापार-उद्योगासाठी, १.१ टक्क्यांनी शिक्षणासाठी, ४६.३ टक्क्यांनी विवाहानंतर, ७.४ टक्क्यांनी जन्मानंतर, १४.४ टक्क्यांनी घरदार सोडून कायमसाठी तर २०.५ टक्क्यांनी अन्य  कारणांसाठी स्थलांतर केले. रोजगारासाटी स्थलांतरीत झालेल्या ९.८ टक्के लोकांची संख्या ४ कोटी १० लाख इतकी होती. यात ८४ टक्के पुरूष आहेत, तर १६ टक्के महिला. याचा  अर्थ  पत्नी, मुले यांना मूळ गावी ठेवून पोटासाठी  शहराकडे जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. याच तीन साडेतीन कोटी स्थलांतरीत कष्टकऱ्यांची परवड कोरोना काळात होत असलेली आपण अनुभवत आहोत. 

भारतातील स्थलांतरीत  कष्टकऱ्यांच्या  परवडीची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेली दिसते. त्यात ‘आयएलओ’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचाही समावेश आहे. उपाशीपोटी, मुलाबाळांना आणि कुटुंबातल्या म्हाताऱ्या आणि  अपंग  सदस्यांना  पाटुंगळीवर मारून हजारो किलोमीटर पायी चालत, नाहीतर कोंबलेल्या अवस्थेत जे मिळेल त्या वाहनाने मजल दरमजल करत  जाणाऱ्या लोकांनी साऱ्या जगाचे  लक्ष  आपल्याकडे वेधून  घेतले. इथून पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न भारताच्या  संदर्भात नेहमीच महत्वाचा राहणार आहे. 

रोजगाराची शाश्वती नाही, सामजिक सुरक्षा नाही, हक्काचे  अन्नपाणी नाही, निवारा नाही, मूळ गावी रोजगाराच्या संधी नाहीत, साधे आपल्या गावी परतण्यासाठी  वाहनाची सोय नाही आणि केंद्र व राज्य सरकारे यांच्याकडे या सर्वावर उपाययोजना नाहीत अशी ही परिस्थिती आहे आणि  जगाच्या नकाशावर गेलेले हे भारताचे चित्र त्याची शान तर वाढवणारे नाहीच, उलट मान खाली घालायला लावणारे आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्थलांतरीत कामगारांचे हाल या  कोरोना काळात पुढे आले आहेत. ‘सीएनएन इंटरनॅशनल’च्या एका अहवालानुसार, युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटनमधील रुमानियन कामगारांचा प्रश्न इथून पुढे बिकट होत जाणार आहे. विशेषकरून  ब्रेक्झिट  धोरण  प्रत्यक्षात अंमलात येईल, तेव्हा ही गुंतागुंत अधिक वाढणार आहे. सिंगापूरबद्दल भारतीयांना मोठे आकर्षण आहे. त्याची सुबक रचना, नगरनियोजन आणि नागरी सुविधा यामुळे पर्यटनासाटी तसेच तेथील कररचनेमुळे उद्योगव्यावसायिक आणि पगारदार मंडळींसाठी, तो जणू पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. सिंगापूर  किंवा कोणत्याही  टॅक्स हेवन किंवा आंत्रपु्रनर फ्रेंडली  असलेल्या  सुनियोजित शहराच्या बाह्य आवरणाखाली दडलेले एक समांतर जग असते. ते  जग बाह्य चेहऱ्याइतकेच विस्तारलेले असते, मात्र ते  जाणीवपूर्वक  दिसू  दिले  जात नाही, कारण पर्यटन व अन्य बाबींवर  त्याचा परिणाम  होऊन  अर्थव्यवस्था  नाजूक  अवस्थेत ढकलली जाऊ शकते, शिवाय भांडवलप्रधान व्यवस्थेचे ते एक खास वैशिष्ट्यही असते. 

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ आणि ‘सीएनएन इंटरनॅशनल’ या दोन संस्थांच्या रिपोर्टनुसार सिंगापूरमध्ये झालेला कोरोनाचा फैलाव आणि मृत्यू यात स्थलांतरीत कामगारांना बसलेला फटका फार मोठा आहे. सिंगापूरमधील या समांतर जगातील लोक अत्यंत कोंदट आणि जगण्यासाटी  धोकादायक असलेल्या समूह वसाहतीत, डॉरमिटरीजमध्ये  राहतात. आरोग्याबाबत  न  बोललेलेच  बरे. 

‘द गार्डियन’ या प्रसिद्ध वर्तमानपत्राने यावर सविस्तर रिपोर्ताज दिला आहे. कबुतरांच्या खुराड्यासारख्या असलेल्या या निवासांत अक्षरशः हजारो लोक  राहतात. त्यांची एरवीही परवडच असते आणि आता या महामारीमध्ये त्यात वाढच झालेली आहे. हे केवळ रुमानियन कामकरी विंश्व सिंगापूरमधील ‘केजेड  वर्क’पुरतेच  नाही,  द गार्डियनने  यूरोपातील  निम्न स्तरांत जगणाऱ्या स्थलांतरीत आणि मूळ युरोपीयनच असणाऱ्या लोकांविषयीही जी माहिती दिली आहे, ती त्यांच्या वाईट स्थितीवर बोट टेवणारीच आहे. सर्व देशांच्या सीमा बंद झालेल्या, विमानसेवा चालू नाहीत, नोकऱ्या गेलेल्या, जमवलेली  पुंजी संपत आलेली, सामाजिक सुरक्षा योजनांचा पत्ता नाही. कसेबसे मायदेशात, घरी परतलेच तर कोव्हिडसंसर्गाच्या भयाने येऊ दिले जात नाही. ‘द गार्डियन’ म्हणते, की हे सगळे लोक ‘नो मॅन्स लँड’मध्ये बंदिवान झालेले आहेत. 

या अस्वस्थ वातावरणात सर्वांनाच असुरक्षिततेने ग्रासलेले आहे. जगण्याची असुरक्षितता, रोजगाराची असुरक्षितता, नातेसंबंधांची असुरक्षितता, भविष्याची असुरक्षितता… सर्वच प्रकारच्या भयाने ग्रासलेले जग येत्या काळात आपल्या जागतिक होण्याच्या, उदार धोरणे राबविण्याच्या निर्णयांबद्दल फेरविचार करू मागेल, अशा शक्यता दिसू लागल्या आहेत. ब्रेक्झिटच्या रूपाने युरोपीय समुदायात त्या गेल्या काही वर्षांपासून दिसू लागल्याच आहेत. अमेरिकेतही ‘प्रोटेक्शननिझम’ची भाषा आता तीव्र होत आहे. आता ही प्रक्रिया जगभरच वेगळे रूप धारण करण्याची शक्यता आहे. 

या प्रक्रियेला सध्या सर्वच देशांमध्ये लाभत असलेला एक पैलू आहे, भूमिपुत्र संकल्पनेचा. सन ऑफ द सॉइल… जागतिकीकरणाचे एक चक्र तीस वर्षांनंतर पूर्ण होत असताना, आता एक निराळाच फेरा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज जगभर विखुरलेल्या २८ कोटींहून अधिक असलेल्या  रोजगारक्षम समूहांवर त्याचा काय परिणाम होईल, ते पाहणे अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे.

स्थलांतर हा जसा मानवी इतिहासाचा अविभाज्य भाग राहिला आहे, तसेच आपल्या जागेमध्ये दुसऱ्या कोणाचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न, हाही मानवी स्वभावाचाच भाग आहे, हे विसरून चालणार नाही. शेवटी, हे कधीही न संपणारे चक्र आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.