Author : Taufiq uz Zaman

Published on Jan 31, 2021 Commentaries 0 Hours ago

चौथ्या औद्योगिक क्रांतीने वेग घेतला आहे. यात डिजिटलायाझेशन आणि ऑटोमेशन हे दोन कळीचे मुद्दे ठरतील. त्यामुळे कामगारांना ही कौशल्ये देणे, महत्त्वाचे ठरणार आहे.

भविष्यातील काम: माणसासाठी की यंत्रांसाठी

‘तडजोड’ हा शब्द समस्त मानवजातीचे अस्तित्व, त्याची प्रगती आणि समृद्धीचा विचार करताना विचारात घेतला जातो का? प्रगतीच्या प्रक्रियेमध्ये कोणताही समाज मानवतेशी तडजोड करतो का? २१ व्या शतकात हे प्रश्न अवास्तव किंवा अव्यवहार्य नाहीत. आर्थिक उलाढाली आणि रोजगारामधील कल्पना आणि वास्तव यांच्यातील फरक सद्यस्थितीत मानवाला कळलेला आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीने वेग घेतलेला आहे आणि त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या अकुशल कामगारांच्या रोजगाराशी तडजोड होणार, हे आजचे जळजळीत वास्तव आहे. याचा लवकरच गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.  

उदाहरणार्थ, बांगलादेश हा देश विकसनशील ते मध्यम विकसित देश होण्याकडे वाटचाल करत आहे. यासाठी त्यांनी वेगवान आर्थिक वाढ आणि विकास याची कास धरली आहे. कोविड१९ महामारीच्या काळातही २०२० मध्ये बांग्लादेशचा आर्थिक वृद्धी दर ५.२ होता तो २०२१ मध्ये ६.८ पर्यंत नेण्याचा बांग्लादेशचा मानस आहे.  याच काळात पाकिस्तान -०.४%, श्रीलंका -५.५% आणि भारताचा -९ % असा विकास दर राहणार आहे. 

गेल्या दोन दशकांमध्ये बांगलादेशात तयार कापड आणि वस्त्रोद्योगात मोठ्या प्रमाणावर भरभराट झाली आहे. हे कपडे कमी उत्पन्न असलेल्या अकुशल कामगारांकडून तयार केले जातात आणि इतर देशांत त्यांची निर्यात केली जाते. परिणामी हे क्षेत्र फायद्याचे ठरत आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक मानके पाळण्यासाठी या क्षेत्राने तंत्रज्ञानाचा वाढता वापर, कामगारांसाठी चांगले वातावरण आणि शाश्वत पर्यावरण या बाबींवर भर दिलेला आहे. 

ऑटोमेशनने (स्वयंचलन) या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर बदल घडवून आणलेले आहेत. उदाहरणार्थ जिन्स पॅंटला खिसे लावण्याकरिता आधी दोन कामगारांची गरज असे. आता मात्र संपूर्णपणे यंत्रांवर भर दिल्यामुळे हे काम कमी वेळात आणि कमी श्रमात होते आहे. ज्याचा परिणाम म्हणून कामे अधिक कार्यक्षमतेने व अचूक होतात. 

वित्त, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत ऑटोमेशन (स्वयंचलन) केल्याचे सकारात्मक परिणाम भारतानेही पाहिले आहेत. दोन्ही देशांवरील हे परिणाम काहीसे सारखे आहेत. संपूर्ण यांत्रिकीकरणाला भारतात सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते परंतु तयार कापड आणि वस्त्र उद्योगासाठी बांगलादेशात याला संकट म्हणून पाहिले जाते. या क्षेत्राने कमी उत्पन्न असणाऱ्या लाखो अकुशल मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु तंत्रज्ञानातील सुधारणा आणि वाढते यांत्रिकीकरण यामुळे त्यांना धोका उत्पन्न झालेला आहे. 

२०१५ पासून बांगलादेशात तयार कापड आणि वस्त्र उद्योगामध्ये पुरूषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे. आधी या क्षेत्रात स्त्रियांचे वर्चस्व होते. सध्या तयार कापड आणि वस्त्र उद्योगात अनेक कामे यंत्रांवर केली जातात. ही यंत्रे हाताळण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कौशल्याची गरज असते. यंत्रे हाताळणे आणि तत्सम कामे करण्यासाठीचे कौशल्य, ज्ञान आणि प्रशिक्षण पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आहे .याच कारणाने या क्षेत्रात पुरुषांची संख्या वाढती आहे. 

या क्षेत्राचा अधिक काळजीपूर्वक विचार करताना बांगलादेश आणि इतर विकसनशील देशांत शिक्षण सक्तीचे करणे ही काळाची गरज आहे. गेल्या दशकामध्ये बांगलादेशमध्ये राष्ट्रीय शिक्षण नोंदणी दरात २०% ने वाढ झालेली आहे. असे असले तरी तरुणांमधील बेरोजगारीचा दर हा २०१९ मध्ये ११.८७% इतका नोंदवला गेला आहे. बांग्लादेश, भारत आणि इतर दक्षिण आशियाई देशांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. लोकांमधील साक्षरतेचे प्रमाण वाढून आणि शिक्षणाचा पुरस्कार केल्यास अधिक कुशल मनुष्यबळ प्राप्त होणे शक्य आहे.     

खाजगी शैक्षणिक तंत्रज्ञानाने संपूर्ण जगामध्ये शिक्षण क्षेत्रात मोठी सुधारणा घडवून आणली आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, परीक्षा घेणे आणि कौशल्य विकास या कार्यक्रमांद्वारे जवळपास ३००० एडटेक कंपन्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील सरकारी कार्यक्रमांसोबतच अनेक खाजगी कंपन्या या क्षेत्रात महत्वाचा वाटा उचलत आहेत. या खाजगी कंपन्या देत असलेले शिक्षण अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांनी अधिकाधिक डिजिटलाइज होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत बांग्लादेशचा इंटरनेट पेनीट्रेशन रेट १२.९ असून भारताचा हा दर ४८.४८ टक्यांवर आहे. भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात डिजिटल कनेक्टीव्हीटी वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे महत्वाचे आहे.   

एडटेक कंपन्या करत असलेले काम आश्वासक आहेच पण त्यांचा लोकांवरील प्रभावही जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. या कंपन्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. कोविड महामारीच्या काळात या कंपन्यांनी साधलेल्या यशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ई-लर्निंगशिवाय इतरही अभ्यासाचे पर्याय चाचपून पाहणे ही काळाची गरज झाली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्यात कौशल्यनिर्मिती, तंत्रज्ञान साक्षरता आणि व्यावसायिक शिक्षण रुजवणे महत्वाचे आहे.     

माणूस की यंत्र या वादामध्ये शिक्षण आणि कौशल्यविकास हे दोन महत्वाचे घटक आहेत. विविध क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानासोबत कुशल मनुष्यबळाची गरजही वाढती आहे. यांत्रिकीकरणामुळे ज्या अकुशल कामगारांचा रोजगार जाणार आहे त्यांना नवीन रोजगार शोधणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी त्यांना व्यवसायाचे आणि कौशल्याचे वेगळे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. 

उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन कामगारांना शिक्षण देऊन कौशल्य विकास करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. यासाठी वेगवेगळ्या नागरी संस्थांची मदतही होऊ शकेल. खासगी संस्थांनी कोणाला कामावर ठेवावे यावर कोणतेही निर्बंध नाहीत पण सामाजिक बांधिलकी साधून या कामगारांना शिक्षण देणे आणि भविष्यातील कामासाठी तयार करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. 

(तौफिक उझ जमान हे कॅस्पर फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आहेत. फिमेल एम्पॉवर मूव्हमेटचे ते सहसंस्थापक आहेत.)

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.