Published on Aug 09, 2019 Commentaries 13 Hours ago

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहणारा डॉ. रश्मिनी कोपरकर यांचा लेख

लोकांच्या परराष्ट्रमंत्री : सुषमा स्वराज

सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनामुळे भारतीय राजकारणाची अपरिमित हानी झाली आहे. लोकप्रिय नेता, उत्कृष्ट संसदपटू, प्रभावी वक्ता, आणि सहृदय राजकारणी अशा विविध रूपांमधून त्यांनी सुमारे चार दशकं जनमानसावर प्रभाव पाडला. ह्याकाळात त्यांनी चार राज्यांमधून एकूण ११ प्रत्यक्ष निवडणुका लढवल्या. किंबहुना, जनाधार प्राप्त असलेल्या अत्यल्प समकालीन नेत्यांत त्यांचं नाव अग्रस्थानी घेता येईल. पंतप्रधान वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या दोहोंच्या नेत्तृत्वाखालील मंत्रीमंडळांत सुषमाजींनी अनेक मंत्रीपदं भूषवली. मात्र ज्यात त्यांनी सर्वस्व ओतून स्वतःची निराळी छाप सोडली, ते म्हणजे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय!

२०१४ मध्ये बनलेल्या मोदींच्या पहिल्या मंत्रीमंडळात सुषमाजींवर परराष्ट्रव्यवहार खात्याची जबाबदारी पडली. ती त्यांनी शिताफीने निभावलीच; शिवाय त्यात लोकप्रियतेचं सर्वोच्च शिखर त्यांनी गाठलं. त्या स्वतंत्र भारताच्या प्रथम महिला परराष्ट्रमंत्री ठरल्या. ह्याआधी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काही काळासाठी त्यांनी परराष्ट्रखातं स्वतःच्या अखत्यारीत ठेवलं होतं. मात्र स्वतंत्र पदभार स्वीकारून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सुषमाजी पहिल्याच!

जगातील कुठल्याही देशासाठी परराष्ट्रव्यवहार हे अतिमहत्त्वाचं आणि संवेदनशील खातं असतं; आणि त्यामुळेच ह्या खात्यातील धोरणआखणीवर पंतप्रधानाचा थेट प्रभाव असतो. तसंच अनेक परदेश दौरे, भेटी-गाठी पंतप्रधान स्वतः करत असल्यामुळे, परराष्ट्रव्यवहार मंत्र्याच्या स्वतंत्र कामकाजावर आपसूकच मर्यादा येते.

भारतातसुद्धा गेली अनेक दशकं, पंतप्रधानाने धोरण आखून देणं आणि परराष्ट्रमंत्र्याने केवळ त्याची अंमलबजावणी करणं, असाच कल दिसत होता. मात्र तसं असूनही, सुषमाजींची विशिष्ट शैली, आश्वस्त करणारी देहबोली, अथक मेहनत घेण्याची तयारी, आणि राजकारणातून मिळालेली विजिगीषु वृत्ती, ह्या सगळ्याच्या जोरावर त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. ह्या व्यवस्थेमध्ये सुषमाजींचं पंतप्रधान मोदींबरोबर असलेलं समीकरण अतिशय महत्त्वाचं ठरतं.

मोदींच्या नेत्तृत्वाखाली भारताची परराष्ट्रनीती आखली जात असे, आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी सुषमाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असे. ज्यात परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंग आणि एम. जे. अकबर, आणि तत्कालीन परराष्ट्रसचिव एस. जयशंकर ह्यांची त्यांना मोलाची साथ लाभली.

परदेश दौऱ्यांच्या बाबतीत मोदींनी सुषमाजींना मागे टाकलं होतं. गेल्या पाच वर्षांत मोदींनी ९३, तर सुषमांनी एकूण ७९ दौरे केले. तरीही मोदींच्या सर्व आंतरराष्ट्रीय भेटींची संपूर्ण पार्श्वभूमी तयार करण्याचं श्रेय पूर्णतः सुषमांना द्यायला हवं. किंबहुना पंतप्रधानांच्या अतिमहत्त्वाच्या भेटींच्या पूर्वतयारीसाठी सुषमा अनेकदा स्वतः त्या देशाला भेट देत, आणि मोदींच्या दौऱ्याची संपूर्ण रूपरेषा आणि स्वाक्षरी करायची कागदपत्र इत्यादी तयारी करून परतत, जेणेकरून मुख्य भेट सुरळीत पार पडे.

सुषमा स्वराजांनी अतिशय मोक्याच्या वळणावर भारताचं परराष्ट्रमंत्रीपद स्वीकारलं. गेल्या काही वर्षांत जागतिक भू-राजकीय परिस्थिती बदलत गेली, ज्यायोगे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचं महत्त्व आणि भूमिका ह्यातही बदल होत गेले.

गेल्या पाच वर्षांत देशाच्या बाह्य व्यवहारांमध्येही प्रचंड वृद्धी झाली, आणि त्यात विविधताही येत गेली. लहानमोठ्या सर्वच देशांशी आपले द्विराष्ट्रीय संबंध सुधारत गेले; आणि त्याचबरोबर अनेक बहुराष्ट्रीय संघटनांतही भारताला सदस्यता मिळाली. जबाबदाऱ्या वाढल्या, तशीच अनेक आव्हानंही समोर येत गेली. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतचं प्रतिनिधित्व करणं सोपं नव्हतं, जे सुषमाजींनी बऱ्याच अंशी यशस्वी करून दाखवलं.

मागे एका पत्रकार परिषदेत बोलताना, सुषमाजींनी त्यांच्या कूटनीतीचे, सक्रीय, सशक्त आणि संवेदनशील, असे तीन महत्त्वाचे पैलू नमुद केले होते. ह्या पैलूंच्या आधारे त्यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीत परराष्ट्र व्यवहारांना दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळाचा आढावा ह्याच तीन मुद्द्यांच्या आधारे घेणं संयुक्तिक ठरेल.

पहिला मुद्दा सक्रियता. सुषमाजी स्वतः अक्षरशः २४ तास परराष्ट्रखात्यासाठी उपलब्ध असत. इतर देशांतील भारतीय दूतावासही तेथील स्थानिकांच्या आणि भारतीयांच्या मदतीसाठी सतत खुले असावेत, असा त्यांचा आग्रह असे. विविध प्रदेशांतील देशांच्या समूहांतील भारतीय राजदूतांच्या त्या नियमित एकत्रित बैठका घेत असत, ज्यात आधी नेमून दिलेल्या कामाचा आढावा आणि पुढील कार्यक्रम आखणे होत असे. हा नियम दिल्लीस्थित अधिकाऱ्यांनाही लागू होता. हीच करडी शिस्त त्यांनी भारतातील पासपोर्ट कार्यालयांना लावली, जेणेकरून नागरिकांसाठी पासपोर्ट संपादन प्रक्रिया सुकर झाली.

सुषमाजींची उपलब्धता केवळ प्रत्यक्षच नाही, तर सोशल मीडियावरही असे. त्यांच्या स्वतःच्या ट्वीटर अकाउंटवरून त्या जनतेशी नियमित संपर्कात असत. त्याच अकाउंटचं पुढे परराष्ट्र मंत्रालयाच्या २४*७ हेल्पलाईनमध्ये रुपांतर झालं. त्यायोगे, कुणाचा पासपोर्ट गहाळ होणं, परदेशात प्रवासाला गेल्यावर काही अडचणी येणं, किंवा कुणी नैसर्गिक आपत्तीत सापडणं, ह्या सर्व प्रसंगांत त्यांनी भारतीय दूतावासांची मदत केवळ एक ट्वीट अंतरावर आणून ठेवली. त्यामुळेच लोक गंमतीने त्यांना ‘ट्वीटर मंत्री’ म्हणू लागले. पण ह्या मार्गाने हजारो गरजूंना त्वरित मदत मिळाली, हे महत्त्वाचं.

सुषमाजींच्या व्यवहाराचा दुसरा पैलू म्हणजे त्यांची सशक्तता. मग ते संयुक्त राष्ट्रांच्या साधारण सभेत उभं राहून पाकिस्तानला सुनावलेले खडे बोल असोत; ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज’च्या व्यासपीठावरून “आपण दहशतवादाचा खात्मा करून विश्वशांतीच्या दिशेने मार्गाक्रमण करू” असे आवाहन असो; किंवा चीनबरोबरच्या डोकलाम संघर्षात दिलेला राजनैतिक लढा असो, त्यांनी आपल्या व्यवहारातून नेहमी भारताच्या राष्ट्रीय व सामरिक हितांचं जतन केलं. त्यांच्या मुत्सद्देगिरीची खरी कसोटी पुलवामा हल्ल्यानंतर लागली. त्यावेळी त्यांनी ज्या संयम, चिकाटी आणि निर्धाराच्या बळावर जागतिक मत आपल्या बाजूने वळवलं, त्यासाठी भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तिसरा पैलू म्हणजे संवेदनशीलता. स्वराजांनी परराष्ट्रमंत्रालय अधिक लोकाभिमुख केलं. त्यांच्या वैयक्तिक स्वभावातील मृदुतेमुळे त्या भारताबाहेर राहाणाऱ्या असंख्य भारतीयांची आई झाल्या. अगदी इटलीमध्ये मधुचंद्रासाठी गेलेल्या आणि फारकत झालेल्या जोडप्याच्या पुनर्मीलनापासून, येमेन वा लिबियामधील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या हजारो भारतीयांच्या सुटकेपर्यंत, सर्व प्रसंगांत सुषमाजींची निष्ठा समान होती. पाकिस्तानात सुमारे १५ वर्ष अडकलेल्या २७-वर्षीय मूकबधीर गीताची सुटका, इराकमध्ये आयसीसच्या तावडीत फसलेल्या ४६ ख्रिस्ती नन्सची सुटका, आणि पाकिस्तानने तुरुंगात डांबलेल्या हमीद अन्सारीची सुटका, अश्या अनेकांना सुषमांच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले.

सुषमाजींचा हा मदतीचा हात केवळ भारतीयांसाठीच होता असं नाही, तर त्यांनी अनेक परदेशी नागरिकांचीही मदत केली. पाकिस्तानातील अनेक रुग्णांना केवळ एका ट्वीटच्या आधारावर, आणि मानवतावादी दृष्टिकोनातून, त्यांनी वैद्यकीय व्हिसा बहाल केला, ज्यामुळे अनेकांचे प्राणही वाचले आहेत.

तसंच, नेपाळमधील भूकंपाच्यावेळी तिथे अडकून पडलेल्या ७१ स्पॅनिश नागरिकांची त्यांनी शिताफीने सुटका केली. त्याबद्दल, स्पॅनिश सरकारने त्यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ सिव्हिल मेरिट’ ह्या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव केला. पुढे २०१७ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नल ह्या अमेरिकन मासिकाने सुषमाजींबद्दल ‘जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात लाडक्या राजकारणी’ असे गौरवोद्गार काढले.

सुषमाजींच्या व्यवहारकुशलतेबद्दल लिहावं तेवढं थोडं आहे. मात्र ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी परराष्ट्रमंत्रीपदाला बहाल केलेली छबीदेखील लक्षणीय होती. टापटीप साडी, कपाळी ठसठशीत कुंकू, हळू तरीही डौलदार चाल, सुस्पष्ट व शुद्ध हिंदी वाणी या वैशिष्ट्यांनी युक्त सुषमाजी देशाबाहेर लोकांसाठी सक्षम, समर्थ भारतीय स्त्रीसमुदायाचंच प्रतिक बनल्या. तसंच, आंतरराष्ट्रीय योग दिवस, महात्मा गांधींची १५० वी जयंती, हिंदी भाषा प्रसार, भारतीय सांस्कृतिक केंद्रांचा विस्तार, ह्यायोगे त्यांनी भारतीय संस्कृती जगात पसरवली. जगातील मोठमोठ्या, उंचपुऱ्या राष्ट्रप्रमुखांनी, मग अगदी ओबामांपासून पुतीनपर्यंत सगळ्यांनी, सुषमाजींशी बोलण्यासाठी आदराने आणि प्रेमाने माना झुकवल्याचे अनेक फोटो आपण पाहिले आहेत. त्यातून सुषमाजींविषयीचा अभिमान आणि आदर द्विगुणित होतो.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुषमाजींनी २०१९ मध्ये स्वतःहून मंत्रीपद नाकारलं, आणि त्यांच्या नेत्तृत्वाखाली कार्य केलेल्या माजी परराष्ट्रसचिव एस. जयशंकर यांना परराष्ट्रमंत्री करण्यात आलं. असं असलं, तरी त्या सतत अनुभवी मार्गदर्शकाच्या भूमिकेत उपलब्ध होत्या. त्यांनी राबवलेल्या परराष्ट्रव्यवहाराच्या मार्गावरून पुढे मार्गक्रमण करणे; आणि अथक परिश्रमांतून भारतीय राष्ट्रीय हितांचा सतत विस्तार करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.