Author : Siddharth Yadav

Published on Nov 20, 2023 Commentaries 3 Hours ago

जग पर्यावरण-स्नेही आणि नैतिकदृष्ट्या योग्य पोषण पर्यायांच्या शोधात असताना, या बाबतीत कृत्रिम मांसाने मध्यवर्ती स्थान प्राप्त केले आहे, परंतु इतर सर्व नाविन्यपूर्ण कल्पनांप्रमाणे, तेही स्वतःची आश्वासने आणि आव्हाने घेऊन येते.

भविष्यातील खाद्यपदार्थ: कृत्रिम मांसाची पर्यावरणीय आश्वासने आणि नैतिक आव्हाने

कृत्रिम मांस अथवा प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेले मांस तयार करण्याचे तंत्रज्ञान आणि पद्धती पेशीसंबंधित शेती म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्राशी संबंधित आहेत. या पद्धतीत ‘प्रौढ स्नायूंच्या स्टेम पेशींचे (अशा पेशी ज्यातून विशेष कार्य असलेल्या इतर सर्व पेशी निर्माण होतात.) जिवंत किंवा मृत प्राण्यांपासून मिळणाऱ्या ‘कोलेजन मॅट्रिक्स’मध्ये संवर्धन करणे आणि त्यांच्या प्रसारासाठी व सांगाड्याशी जोडलेल्या स्नायूंच्या ऊतींच्या पट्ट्यांमध्ये फरक करण्यासाठी आवश्यक ऊर्जा स्त्रोत प्रदान करणे’ समाविष्ट आहे. प्रयोगशाळेत निर्मिलेले मांस, ‘इम्पॉसिबल फूड्स’सारख्या (मांस उत्पादनांची गरज दूर करण्याकरता, वनस्पती-आधारित पर्याय विकसित करून जागतिक अन्न प्रणाली खऱ्या अर्थाने शाश्वत बनवणे) शाकाहारी पर्यायांपेक्षा वेगळे आहे. ते नैसर्गिक मांसासारखेच पेशीय स्तरावर मांस विकसित करते, कारण ते खऱ्या प्राण्यांच्या ऊतींपासून प्राप्त होते. अमेरिकेच्या कृषी विभागाने अलीकडेच ‘अपसाइड फूड्स’ आणि ‘इट जस्ट’ या दोन कॅलिफोर्नियातील कंपन्यांना, त्यांच्या संवर्धित कोंबडीची विक्री करण्यासाठी मंजुरी दिल्याने या नावीन्यपूर्णतेवर प्रकाशझोत पडला आहे. या नव्या खेळीसह, सिंगापोरच्या पाठोपाठ अमेरिकेत प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसाच्या विक्रीला हिरवा कंदिल मिळाला आहे. हवामानातील बदल आणि संसाधनांची कमतरता यांसारख्या जागतिक चिंतांच्या पार्श्‍वभूमीवर, आपल्या अन्नाचे भविष्य घडविण्यात कृत्रिम मांसाची भूमिका शोधणे अत्यावश्यक आहे.

प्रयोगशाळेत विकसित केलेले मांस, ‘इम्पॉसिबल फूड्स’सारख्या शाकाहारी पर्यायांपेक्षा वेगळे आहे. हे मांसही नैसर्गिक मांसासारखेच पेशीय स्तरावर विकसित होते, याचे कारण ते खऱ्या प्राण्यांच्या ऊतींपासून प्राप्त होते.

आश्वासने…

पर्यावरणाशी आणि हवामानाशी संबंधित समस्यांचा सामना करण्यासाठी, प्रयोगशाळेत मांस उत्पादने विकसित करण्याची शक्यता अगदी अचूक वेळी निर्माण झाली आहे. मुख्यत्वेकरून २०१०च्या तुलनेत २०५० पर्यंत प्राण्यांच्या मांसाचा वापर ७० टक्क्यांहून अधिक वाढण्याचा अंदाज आहे. २०१४ मध्ये, या समस्यांवर संभाव्य उपाय म्हणून जगातील पहिले कृत्रिम मांस बर्गर प्रकट झाले. मार्च २०२३ मध्ये, दशकभरापेक्षा कमी कालावधीनंतर, नामशेष झालेल्या ‘मॅमथ’च्या (भरपूर लोकर असलेला प्रचंड मोठा प्राणी) डीएनएपासून बनवलेला मांसाच्या गोळ्यासारखा ‘मीटबॉल’ हा खाद्यपदार्थ प्रकट झाला. हे आफ्रिकी हत्तींच्या अनुवांशिक माहितीसह मॅमथ मायोग्लोबिनचे विभाजन करून तयार केले गेले. पेशीय शेती आणि प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसामध्ये अन्नसुरक्षा आणि हवामान बदलावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्याची क्षमता आहे, याचे कारण प्राणिज उत्पादनांचा जागतिक प्रभाव, हा प्राणिज नसलेल्या उत्पादनांच्या तुलनेत खूपच मोठा आहे. उदाहरणार्थ, १६.५ टक्के ते १९.४ टक्के विषारी वायूंचे उत्सर्जन, ८३ टक्के शेतजमिनीचा वापर आणि एक तृतीयांशहून अधिक मानव-प्रेरित नायट्रोजन उत्सर्जन पशुपालन आणि पशुधन देखभालीमुळे होते.

पेशीय शेती आणि प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसामध्ये अन्नसुरक्षा आणि हवामान बदलावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्याची क्षमता आहे, याचे कारण प्राणिज उत्पादनांचा जागतिक प्रभाव हा प्राणिज नसलेल्या उत्पादनांच्या तुलनेत खूपच मोठा आहे.

हेलसिंकी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक हॅना टुओमिस्टो यांनी सुचवले आहे की, प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसाचे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय लाभ मिळू शकतात. अभ्यासात असे दिसून आले आहे की, शैवाल संवर्धन माध्यमात वाढणारे मांस विषारी वायूंचे उत्सर्जन ७८-९६ टक्के इतक्या लक्षणीयरीत्या कमी करू शकते आणि पारंपरिक मांस उत्पादन प्रक्रियेच्या तुलनेत जमिनीचा वापर, पाण्याचा वापर आणि ऊर्जा वापर मर्यादित करू शकते. प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसामध्ये केवळ हवामान- आणि पर्यावरण-संबंधित समस्यांना तोंड देण्याची क्षमता आहे, असे नाही तर याद्वारे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षणही होईल. वैद्यकीय अभ्यासक डॅनियल सर्गेलिडिस यांनी नोंदवले आहे की, लक्ष्य लोकसंख्याशास्त्राच्या विशिष्ट पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयोगशाळेत विकसित केलेले मांस अतिरिक्त सजीवाच्या ऊतींवर किंवा पेशींवर परिणाम करणाऱ्या संयुगासह सुधारित केले जाऊ शकते. मांस विकसित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सुविधांची स्वच्छता आणि स्वच्छता मानके यांचे पालन केल्यामुळे झुनोटिक आणि अन्नजन्य रोगजनकांचे धोके कमी करता येतील. या शिवाय, प्रयोगशाळांमध्ये मांस वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे कीडनाशके, कीटकनाशके, कृत्रिम वाढीचे घटक आणि मांस उत्पादन प्रक्रियेत पारंपरिकपणे आढळणाऱ्या प्रतिजैविकांची गरज कमी होऊ शकते.

…आणि कृत्रिम मांसाचे धोके

कृत्रिम मांसाचे आश्वासन कागदावर आदर्शवत वाटत असले तरी, त्याच्या अंमलबजावणीची शक्यता काही प्रश्न निर्माण करते. प्रथमत:, पर्यावरणावरील भविष्यातील परिणामांबद्दल खूप आधीच निष्कर्ष काढला जात आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे, तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी झाली तर त्याचा वन्यजीवांवर आणि जैवविविधतेवर कसा परिणाम होईल? पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी,  कॅलिफोर्निया विद्यापीठातील अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक एडवर्ड स्पॅंग आणि त्यांच्या सहयोगींनी असा युक्तिवाद केला आहे की, प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसाच्या संभाव्यतेचे गौरव करणारे मागील अभ्यास ‘सध्याच्या/नजीकच्या मुदतीच्या पद्धती अचूकपणे प्रतिबिंबित करत नाहीत, ज्या पद्धती ही उत्पादने तयार करण्यासाठी वापरल्या जातील.’ त्यांनी निष्कर्ष काढला की, कृत्रिम मांस उत्पादनाचा पर्यावरणीय प्रभाव, खरे तर, पारंपरिक मांस उत्पादन प्रणालींपेक्षा खूप जास्त असेल.

कृत्रिम मांस आणि जैवविविधता

वर नमूद केल्याप्रमाणे, कृत्रिम मांसाचा पर्यावरणावर होणाऱ्या प्रभावासंबंधित अभ्यासात, प्रामुख्याने हवामान आणि नैसर्गिक संसाधनांच्या वापरावर त्याच्या होणाऱ्या परिणामावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, वन्यजीव आणि संरक्षित प्राण्यांच्या प्रजातींवर प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसाच्या परिणामावर पत्रकार आणि संबंधित उद्योगातील तज्ज्ञांनी फारच कमी संशोधन केले आहे. ज्या तंत्रज्ञानाद्वारे रेस्तराँ आणि घरांमध्ये जेवणाच्या ताटात प्रयोगशाळेत विकसित केलेली कोंबडी आणता येईल, त्याच तंत्रज्ञानाचा वापर वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती इत्यादींसारख्या- आतापर्यंत व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध नसलेल्या प्राण्यांचे विलक्षण चवीचे मांस विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसाचा प्रचार आणि गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना या व्यावसायिक संधींची माहिती आहे. एक उदाहरण म्हणून, इंग्लंडस्थित मांस विकसित करणारी कंपनी, प्राइमव्हल फूड्स- ‘उत्तम भोजनाची संभाव्यता’ विकसित करण्याच्या मोहिमेवर असल्याचे कथन करत आहे, ‘ज्यात सिंहाच्या मजबूत, समृद्ध स्वादापासून लुसलुशीत नाजूक पोताच्या झेब्रा सुशीचा समावेश आहे, ’ आणि स्वाद इतपतच मर्यादित नाही. कोणत्याही प्राण्यांना किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासांना इजा न करता, जागतिक दर्जाचे विलक्षण स्वादाचे मांस देण्यासाठी पेशीय कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे हे कंपनीचे एकंदर उद्दिष्ट आहे.

प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसाचा वन्यजीव आणि संरक्षित प्राणी प्रजातींवर होणाऱ्या परिणामांविषयी पत्रकार आणि संबंधित उद्योगातील तज्ज्ञांनी फारसे संशोधन केलेले नाही.

अवैध बाजार आणि विलक्षण स्वादाची लोकांची भूक

पारंपरिक पशुधनासाठी प्रयोगशाळेत विकसित केलेल्या पर्यायांचा विकास आणि वापर हा शाश्वत अन्न उत्पादनातील एक नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून गौरवला जाऊ शकतो, परंतु वन्य प्रजातींच्या संवर्धित आवृत्त्यांचे व्यापारीकरण करण्याच्या प्रस्तावाची छाननी करणे आवश्यक आहे. असे प्रयत्न अनावधनाने बेकायदेशीर बाजारपेठांना बळकटी आणू शकतात व त्यांना नवा जोम मिळू शकतो आणि प्रयोगशाळेत विकसित केलेल्या विदेशी मांस उत्पादनांचे बेबंद मार्केटिंग- विशेषतः भारतासारख्या उच्च जैवविविधता असलेल्या देशांवर परिणाम करणारे ठरू शकते. जगातील ८ टक्के वन्यजीव असलेला भारत, बेकायदेशीरपणे प्राण्यांची आयात आणि निर्यात करणाऱ्या जगभरातील अव्वल २० देशांपैकी एक आहे, ज्याची सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ चीन आणि दक्षिणपूर्व आशिया, आखाती देश, युरोप आणि उत्तर अमेरिका आहे. विलक्षण स्वाद असलेल्या पाळीव प्राण्यांच्या बाजाराच्या मागणीमुळे आणि गेंड्याची शिंगे, बिबट्याचे कातडे आणि वाघांच्या भागांसह काही वन्य प्राण्यांचा विशिष्ट शारीरिक भाग हा उपचारांकरता परिणामकारक ठरू शकतो, असा समज काही पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये रूढ झालेला असल्याने प्राण्यांचा अवैध व्यापार वाढतो. २०१९ मध्ये, शेकडो तस्करांना अनेक भारतीय राज्यांमध्ये टोके गेको पकडण्यासाठी आणि त्यांचा व्यापार करण्यासाठी अटक करण्यात आल्याची नोंद आहे. टोके गेकोंच्या विशिष्ट शारीरिक अवयवांचा वापर एड्स बरा करण्यासाठी केला जाऊ शकतो, या विलक्षण दाव्यामुळे व्यापाराला चालना मिळाली. काही प्राण्यांच्या औषधी गुणधर्मांवरील निराधार विश्वास, विकसित केलेला पर्यायी प्रतिउत्पादक बनू शकतो, ज्यामुळे जंगली प्राण्यांच्या संख्येची मागणी वाढू शकते आणि त्यावरील दबाव वाढू शकतो. प्रयोगशाळेत विकसित केलेल्या वाघांच्या मांसाकरता किंवा तत्सम प्रजातींकरता बाजारपेठेचा पाठपुरावा करणे, भारतासारख्या तस्करीचे मोठे प्रमाण असलेल्या देशात नियामकांनी कष्टाने साध्य केलेली प्रगती धोक्यात आणते. पर्यावरणीय विवेकबुद्धीसह नवकल्पना संतुलित करून सावधपणे या टोकापर्यंत जाणे अत्यावश्यक आहे.

विलक्षण स्वाद असलेल्या पाळीव प्राण्यांच्या बाजाराच्या मागणीमुळे आणि गेंड्याची शिंगे, बिबट्याचे कातडे आणि वाघांच्या भागांसह काही वन्य प्राण्यांचा विशिष्ट शारीरिक भाग हा उपचारांकरता परिणामकारक ठरू शकतो, असा समज काही पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये रूढ झालेला असल्याने प्राण्यांचा अवैध व्यापार वाढतो.

पुढील मार्गक्रमण

देशात प्रयोगशाळेत उगवलेल्या कोंबडीचे उत्पादन करण्यासाठी आणि वितरणासाठी अमेरिकेच्या कृषी विभागाने अलीकडेच दिलेल्या मंजुरीमुळे केवळ पाळीव प्राण्यांच्या प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसासाठीच नव्हे तर वन्य प्राण्यांसाठीही जागतिक स्तरावर आणखी गुंतवणूक निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, जर प्रयोगशाळेत विकसित केलेले विदेशी मांस लवकरच व्यावसायिकरित्या उपलब्ध झाले, तर विदेशी मांसासाठी ग्राहकांची भूक निर्माण होण्याचा धोकाही वाढू शकतो. प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसाच्या उत्पादनासाठी आगाऊ नैतिक आणि धोरणात्मक चौकटी लागू केल्याखेरीज हे विशेषतः धोकादायक असू शकते. म्हणूनच, ‘जस्ट फूड्स’, ‘अपसाइड फूड्स’, ‘प्राइमव्हल फूड्स’ यांसारख्या कंपन्या उत्तम पौष्टिक, क्रूरता-मुक्त, कत्तल-मुक्त मांसाचे आदर्शवत भविष्य सादर करतात, जे हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करेल, त्यांच्या स्वयंपाकासंबंधीच्या आश्वासनांवर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही.

प्रयोगशाळेत विकसित केलेल्या मांसामुळे पर्यावरणावर जे परिणाम होतील, याचा अचूक अंदाज लावू शकणाऱ्या आणि संरक्षित वन्य प्राण्यांच्या प्रजातींना उद्भवणाऱ्या धोक्याचे मूल्यांकन करू शकणारे वैज्ञानिक अभ्यास आणि प्रारूप नसल्यामुळे, या संदर्भात पुढे मार्गक्रमण करताना, भागधारकांनी आणि धोरणकर्त्यांनी सावधगिरीचा दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. धोरणकर्त्यांनी सर्व कृत्रिम मांस उत्पादन सुविधांसाठी सर्वसमावेशक, निःपक्षपाती आणि पुनरावृत्तीचे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अनिवार्य करायला हवे. यामुळे हे सुनिश्चित होईल की, जसे तंत्रज्ञान विकसित होत जाईल आणि विकसित होईल, तसे त्यांच्या वास्तव जगातील परिणामांचे सतत मूल्यमापन केले जाईल. या नवकल्पनांचे शाश्वततेच्या उद्दिष्टांमध्ये खरोखर योगदान मिळेल याची खात्री पटेल.

जस्ट फूड्स, अपसाइड फूड्स, प्राइमव्हल फूड्स यांसारख्या कंपन्या उत्तम पौष्टिक, क्रूरता-मुक्त, कत्तल-मुक्त मांसाचे आदर्शवत भविष्य सादर करतात, जे हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करतील, त्यांच्या स्वयंपाकासंबंधीच्या आश्वासनांवर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही.

विदेशी मांसाच्या प्रयोगशाळेत विकसित केलेल्या आवृत्त्यांचे उत्पादन करण्याच्या उद्देशाने उदयाला आलेल्या कंपन्यांमुळे, भारतासारख्या बहुविध पर्यावरण असलेल्या देशांमध्ये बेकायदेशीर बाजारपेठांना बळकटी मिळण्याचा आणि जंगलात पकडलेल्या नमुन्यांची मागणी वाढण्याचा महत्त्वपूर्ण धोका आहे. वनसंपदा आणि प्राण्यांच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशनाचा भारत सदस्य असल्यामुळे (सीआयटीइएस), प्रयोगशाळेत विकसित केलेल्या विलक्षण चवीच्या मांस उत्पादनांच्या बेजबाबदार विपणनाला लक्ष्य करणारे आंतरराष्ट्रीय नियम प्रस्तावित करायला हवे. धोरणकर्त्यांनी विपणनासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम स्थापित करायला हवे, जेणेकरून अशा प्रयत्नांमुळे अनावधनाने वन्य लोकसंख्येला हानी पोहोचणार नाही किंवा अवैध व्यापाराला प्रोत्साहन मिळणार नाही. पूरकरीत्या, अशा उत्पादनांचे प्रयोगशाळेत वाढलेले स्वरूप दर्शवणारी स्पष्ट माहिती आणि विलक्षण चवीचे मांस खाण्यामागील नैतिक विचारांबद्दल जनजागृती मोहीम- मग ते प्रयोगशाळेत विकसित केलेले असो किंवा जंगलात पकडलेले असो, लागू केले जावे.

सिद्धार्थ यादव हे इतिहास, साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यासाची पार्श्वभूमी असलेले लंडनच्या बर्कबेक कॉलेज विद्यापीठातील पीएच.डी अभ्यासक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.