Published on Apr 17, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत हात धुणे महत्त्वाचे आहे, पण, केनियात अनेकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि सॅनिटायझर घेण्याइतके उत्पन्न नाही.

कोरोनाबाधित आफ्रिकेची वेदना

‘कोविड १९’ या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत आहे. संकटाचा सामना करण्याची प्रत्येक देशाची पद्धत निराळी असली तरी सर्व देशांपुढे असलेली आव्हाने बऱ्याच अंशी सारखी आहेत. तर, काही भागात खूप वेगळा व विलक्षण ट्रेण्ड पाहायला मिळतोय. जगभरातील प्रगत देशांच्या तुलनेत आफ्रिकेमधील ही निरिक्षणे खूप काही सांगून जाणारी आहेत.

मोठ्या प्रमाणावर साधनसुविधा व वैद्यकीय उपकरणे असूनही कोरोनाविरोधी लढ्यात प्रगत देशांनी हार मानल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या या सध्याच्या संकटापुढे या प्रगत देशांनी अक्षरश: नांगी टाकली आहे. त्या प्रगत देशांच्या तुलनेत आमच्याकडे असलेली यंत्रणा किंवा क्षमता प्रचंड कमी आहे. त्यामुळे आम्हा आफ्रिकन देशांसाठी सर्वात चिंताजनक बाब म्हणजे येऊ घातलेल्या विनाशाची सतत वाटणारी भीती.

आमच्याकडचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, केनियामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. आतापर्यंत तिथे २४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ११ जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी केनिया सरकार देशव्यापी टाळेबंदीचा विचार करत आहे. ही टाळेबंदी किमान १४ दिवसांची हवी तरच त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, इतक्या दिवसांचा अन्नधान्याचा साठा करून ठेवण्याची क्षमता नसलेल्या जवळपास ४० टक्के जनतेच्या खाण्यापिण्याचे काय करायचे, हा प्रश्न केनियाच्या सरकारपुढे आहे.

हातावर पोट असलेले हे सर्व लोक दिवसाला जास्तीत जास्त २ ते ३ डॉलर (१५० ते २०० रुपये) कमावतात. या कमाईत त्यांच्या कुटुंबाचे फक्त एका दिवसाचे कसेबसे भागते. या लोकांचं सरकारला सांगणे आहे की, ‘आम्हाला कॉलरा, मलेरिया मारू शकले नाहीत. नियमित पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या सुविधा नसलेल्या शहरांलगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहूनही आम्ही तग धरून आहोत. त्यामुळे आम्हाला घरांमध्ये डांबण्याऐवजी कोरोनाच्या विषाणूला सामोरे जाण्यासाठी सोडून द्या. कारण, फक्त तीन दिवस जरी आम्ही घरात राहिलो तरी आमची कुटुंब उपाशी मरतील.’ कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी सातत्याने हात धुणे महत्त्वाचे आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, केनियातील बहुतेक लोकांना हात धुण्यासाठीही स्वच्छ पाणी मिळत नाही आणि हँड सॅनिटायझर घेण्याइतके त्यांचे उत्पन्न नाही.

किंबहुना अन्नाशिवाय त्यांच्यासाठी दुसरी कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही. ज्या देशातील लोकांना सरकारने हँड सनिटायझरचा पुरवठा केला. त्यांच्या निवासी वस्त्या व परिसर निर्जंतूक केले, तेथील लोकांनी काही प्रमाणात परिस्थितीशी जुळवून घेतले. कोविड १९ च्या जागतिक प्रभावामुळे पुकारण्यात आलेली टाळेबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या समस्येमुळे एक वेळच्या जेवणावरही लोकांनी समाधान मानले आहे.

आफ्रिकेवरील हे संकट इतक्यावरच थांबत नाही. कोरोना विषाणूने जगाला हैराण करून सोडले असताना टोळधाडींचे प्रमाणही बरंच वाढले आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेची समस्या अधिक गंभीर झाली आहे. हवामान बदलामुळे वातावरणात होत असलेल्या असंख्य बदलांमुळे कोरडवाहू व अर्ध-कोरडवाहू प्रदेशात राहणारे लोक अन्नधान्याच्या बाबतीत आधीच अनेक अडचणींचा सामना करत आहेत. त्यात टोळांच्या नव्या समस्येची भर पडली आहे.

लहरी पाऊस आणि टोळांच्या हल्ल्याचा सामना करावा लागणाऱ्या या ग्रामीण जनतेवरच कोरोना विषाणूमुळे ठप्प असलेल्या शहरांतील नागरिकांना अन्न पुरवण्याची जबाबदारी आहे. त्यांना कोरोना विषाणू आणि टोळांचा सामना करतानाच अन्नाधान्यही सुरक्षित ठेवायचे आहे. शहरात राहणाऱ्या लोकसंख्येचे पोट भरावे यासाठी उत्पादन वाढवण्याकडेही त्यांना लक्ष द्यायचे आहे.

एक जबाबदार नागरिक या नात्याने सरकार करत असलेल्या प्रयत्नांना पूरक काम करण्याचा विचार आपण करायला हवा. त्याचबरोबर जगभरातील विविध देशांना, विशेषत: ग्रामीण भागात तोंड द्यावे लागत असलेल्या अनेक स्वरूपाच्या आव्हानांवर उपाय शोधण्याचे कामही करायला हवे. वाईटातील वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन करता यावे, यासाठी आपण सरकारला वेळ द्यायला हवा. त्याचवेळी, संकटाच्या काळात अत्यंत सकारात्मक राहून काम करणाऱ्या आणि आपल्यातीलच गरीब, वंचितांना अन्न व पाण्यासारख्या मूलभूत गोष्टी उपलब्ध व्हाव्यात यासाठी धडपड करणाऱ्या संस्था, संघटनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे.

भविष्यात लोकांना कोरोनासारख्या विषाणूंशी लढा देण्यासाठी सज्ज करणे, हा आपला प्रयत्न असायला हवा. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाही एक उपाय आहे. लोकांना तयार संतुलित आहार मिळेल याची तजवीज करूनच हे लक्ष्य साध्य करता येणे शक्य आहे. अन्नसुरक्षेच्या माध्यमातून या दिशेने प्रयत्न होत राहायला हवेत. सध्याचे हे संकट दूर झाल्यानंतरही, एक समाज म्हणून आपण नेमके कसे पुढे जाणार आहोत, याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा.

कोरोना व्हायरसच्या आधीही आपल्यासमोर काही आव्हाने होती. कोरोना गेल्यानंतरही ती बहुधा तशीच राहणार आहेत. त्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्यामध्ये उपजतच असलेल्या कौशल्याचा व सामाजिक साधनांचा आपण कसा वापर करणार आहोत? आपल्याकडे असलेल्या मर्यादित साधनांचा वापर करून संकटांशी लढण्याची आपल्या समाजाची क्षमता आपण कशी वाढवणार आहोत? ज्या आव्हांनाना आपला समाज आज आणि भविष्यातही सामोरा जाणार आहे, त्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपलं कुठले देशी ज्ञान विज्ञानाला उपयुक्त ठरणार आहे? हे आपल्यापुढचे प्रश्न असणार आहेत.

अशा किचकट व गुंतागुतीच्या समस्यांची उत्तरे नेहमीच समाजाला केंद्रबिंदू ठेवून शोधलेल्या एकत्रित उपायांमध्ये आणि संबंधितांच्या दृष्टिकोनात सापडली आहेत. ‘कोविड १९’ च्या साथीशी सामना करताना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून संयुक्तपणे जनजागृती करणाऱ्या आणि समाजाला धीर देणाऱ्या बिगर सरकारी संस्थांनी याचे उत्तर दिले आहे. ‘कोरोना’नंतर उद्भवणारं आर्थिक संकट आणि बेरोजगारीच्या परिस्थितीत हातावर पोट असलेल्या आपल्या बहुतांश लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी उत्तम मार्ग कोणता असेल, यावर सध्या अनेक अविकसित देशांबरोबच आफ्रिकी देशही मंथन करत आहेत.

आपणा सर्वांनाच अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य सेवा अशा मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात इतकीच अपेक्षा असते. लोकांच्या अंगभूत क्षमतांचा वापर करणे हाच या गरजा भागवण्याचा शाश्वत मार्ग आहे. अखिल विश्वासाठी हा मार्ग फायदेशीर ठरू शकतो. शेवटी कितीही चर्चा केली आणि काहीही केले तरी आपण औषधे आणि पैसे खाऊन जगू शकत नाही. त्यासाठी अन्नाचीच गरज लागणार आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.