Author : Sunil Tambe

Published on Jan 03, 2020 Commentaries 0 Hours ago

देशातील आजच्या अंशांततेच्या पार्श्वभूमीवर आसामी भाषा, आसामी अस्मिता वा आसामी राष्ट्रवादाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो आहे.

शोध आसामी राष्ट्रवादाचा

१९७९ साली आसाममध्ये बांगलादेशातील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधात आंदोलन उभे राहिले होते. या आंदोलनाला आसामी राष्ट्रवादाचा आविष्कार असेही म्हटले गेले. (या असंतोषाचा वेध घेणारा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा) या आंदोलनाचा परिणाम म्हणून १९८५ साली केंद्र सरकार आणि अखिल आसाम विद्यार्थी संघटनेत करार झाला. या करारातही आसामी भाषा आणि वैशिष्ट्यपूर्ण आसामी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची अट होती. त्यानुसार सारे काही चालू होते. पण एनआरसी आणि सुधारित नागरिकत्वाची माशी शिंकली आणि या कायद्याच्या विरोधात आसाम आणि ईशान्य भारतात आंदोलन उभे राहिले. संचारबंदीचा हुकूम मोडून तरुण रस्त्यावर आले. त्यांची समजूत घालताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामी भाषा व संस्कृतीचे जतन, संवर्धन करण्याची हमी दिली. हा आसामी राष्ट्रवाद म्हणजे नक्की काय? त्यामध्ये कोणाचा समावेश होतो? याचा शोध घ्यायला हवा.

सर्व मराठी भाषकांचं एक राज्य असावे अशी मागणी १९३१ साली करण्यात आली होती. मुंबई प्रांत, हैदराबाद संस्थान, कर्नाटक, मध्यप्रांत अशा चार विभागात मराठी भाषक विभागले होते. १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकार झाला. बेळगाव, कारवार, निपाणी कर्नाटकात राहिले, डांग गुजरातेत गेला. संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त झाल्याने मराठी अस्मितेचा, राष्ट्रवादाचा झेंडा शिवसेनेने हाती घेतला. मद्रास प्रांतातून आंध्र प्रदेश वेगळा करण्याची चळवळ सुरू झाली. पंजाबी सुभ्याचे आंदोलन झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका दशकातच भाषावार प्रांतरचनेची आंदोलनं उभी राह्यली. परंतु आसामी अस्मितेचे आंदोलन १९७९ साली उभे राहिले. देशातील आजच्या अंशांततेच्या पार्श्वभूमीवर आसामी भाषा, आसामी अस्मिता वा आसामी राष्ट्रवादाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

२०११ च्या भाषक जनगणनेनुसार आसामची एकूण लोकसंख्या सुमारे ३.१० कोटी आहे. यापैकी दीड कोटी लोक आसामी भाषक आहेत. जवळपास ९० लाख लोक बंगाली भाषा बोलतात. त्याशिवाय देवरी, राभा, तिवा, कार्बी व अन्य भाषा बोलणारे समूह आहेत. सुमारे वीस लाख लोक देशी वा गोलपारिया भाषा बोलणारे आहेत. हिंदी ही आसाममध्ये तिसर्‍या क्रमांकाची भाषा आहे. आसाममध्ये तीन अधिकृत भाषा आहेत. बोडो, आसामी आणि बंगाली.

बोडो आणि कोचराजबंशी समूह आसाममधील सर्वात प्राचीन मूलनिवासी. बोडोलँण्डचा कारभार पाहाणार्‍या बोडो टेरिटोरिअल कौन्सिलमध्ये चार जिल्ह्यांचा समावेश होतो. कोक्राझार, चिरांग, बाक्सा आणि उदालगिरी. आसामच्या पश्चिमेस आणि खालच्या आसाममध्ये हा प्रदेश मोडतो. बोडो टेरिटोरिअल कौन्सिलची (बोडो प्रादेशिक मंडळ) अधिकृत भाषा बोडो आहे. या प्रदेशात संथाल, कोचराजबंशी, राभा, गारो असे अनेक आदिवासी समूह आहेत. त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत. त्याशिवाय बंगाली लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. बोडो प्रादेशिक मंडळाच्या अधिपत्याखालील प्रदेशाचा समावेश राज्यघटनेच्या सहाव्या अधिसूचीत होतो. या प्रदेशाला सुधारित नागरिकत्वाचा कायदा लागू होणार नाही.

या प्रदेशात शेती हाच उपजिवीकेचा व्यवसाय आहे. उद्योग नाहीत. बोडो आणि बिगर बोडो- बंगाली हिंदू आणि मुसलमान, संथाल (चहामळ्यावर काम करणारे परराज्यातून आलेले मजूर), आसामी यांच्यामध्ये हिंसक संघर्ष जमीन व नैसर्गिक संसाधनाच्या नियंत्रणावरून या प्रदेशात अधूनमधून उसळत असतो. धानाच्या काढणी जवळ आली की अनेक गावांमधून संरक्षणासाठी मोर्चेबांधणी करण्यात येते. विळे, कोयते, धनुष्यबाण, भाले इत्यादी हत्यारांनी सज्ज टोळ्या शेताचे रक्षण करण्यासाठी जागता पाहारा ठेवतात. हे समूह आसामी राष्ट्रवादाशी एकात्म झालेले नाहीत.

आसामी भाषा प्रामुख्याने ब्रह्मपुत्रेच्या खोर्‍यात बोलली जाते. मात्र अप्पर वा वरचा आसाम हा या भाषेचा बालेकिल्ला आहे. सिबसागर, दिब्रुगड, जोरहाट, नागाव इत्यादी जिल्हे. सिबसागर व जोरहाट या अहोम राजांच्या राजधान्या होत्या. साहजिकच तिथे आसामी भाषकांची संख्या अधिक आहे. हा प्रदेश वरच्या वा अप्पर आसामचा आणि ब्रह्मपुत्र नदीच्या खोर्‍याचा आहे.

आसाममध्ये दोन नद्यांची खोरी आहेत. एक ब्रह्मपुत्र तर दुसरी बराक. आसामच्या दक्षिणेला बराक नदीच्या खोर्‍यात तीन जिल्हे आहेत. कचार, करीमगंज आणि हैलाकंडी. या जिल्ह्यांचा कारभार बंगाली भाषेत चालतो. कारण हा प्रदेश पूर्व बंगालला (त्यानंतर पूर्व पाकिस्तान आणि आता बांगलादेशाला) जोडून आहे. सिल्चर ही या प्रदेशाची राजधानी मानली जाते.

आजच्या आसामच्या बहुतांश प्रदेशावर अहोम राजांची सत्ता होती. सुमारे सहाशे वर्षं. १८२६ साली अहोम राजांची सत्ता ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने खालसा केली आणि हा प्रदेश बंगाल प्रांताला जोडला. त्यानंतर दहा वर्षातच बंगाली ही आसामची अधिकृत भाषा असल्याचं घोषित करण्यात आले. आसाममधील राज्यकारभार आणि शिक्षणाची भाषा बंगाली बनली. बंगाली भाषेचे वर्चस्व अर्थातच ब्रिटिशांनी लादलेले होते. नव्याने उदयाला येणार्‍या आसामी मध्यमवर्गामध्ये त्याबद्दल चीड होती. या मध्यमवर्गात प्रामुख्याने अहोम वंशीयांचा आणि आसाममधील उच्चवर्णीयांचा समावेश होता. या काळात आसाममधील नोकरशाहीत बंगाली भाषकांचे वर्चस्व होतं. वेगळी भाषा, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थान यामुळे बंगाली भाषकांची बिरादरी आसामी मध्यमवर्गापेक्षा ठळकपणे वेगळी होती.

आसामी भाषेच्या दडपशाहीला वाचा फोडली अमेरिकन बाप्टिस्टांनी. ख्रिश्चन धर्माचा प्रचार सर्व भाषांमध्ये करण्याच्या धोरणामुळे अमेरिकन बाप्टिस्टांनी आसामी भाषेत नियतकालिक सुरू केले. या नियतकालिकापासून आसामी अभिजनवर्गाला प्रेरणा मिळाली. या अभिजनवर्गातील अनेक विद्वानांनी आसामी भाषेत वर्तमानपत्रं आणि साहित्य निर्मिती सुरू केली. १८७२ मध्ये बंगालचा नायब राज्यपाल, जॉर्ज कॅम्पबेलने आसामचा कारभार आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून आसामी भाषेला मान्यता दिली. परंतु बंगाली आणि बंगाली भाषेच्या वर्चस्वाची पकड ढिली झाली नाही. प्राथमिक शिक्षण आसामी भाषेत तर माध्यमिक आणि उच्च शिक्षण बंगाली भाषेत अशी रचना अस्तित्वा आली. १८८८ मध्ये असमिया भाषा उन्नती साधिनी सभेची स्थापना कोलकत्यात झाली. ज्ञानेश्वरांनी, एकनाथ, नामदेव इत्यादींनी संस्कृत भाषेच्या वर्चस्वाच्या विरोधात बंड केले होते. तसेच आसाममध्ये बंगाली भाषेच्या वर्चस्वाच्या विरोधात साहित्यनिर्मितीची चळवळ सुरू झाली.

१९०५ मध्ये बंगालची फाळणी करण्यात आली. मुस्लिम बहुसंख्य असलेला पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्य असणारा पश्चिम बंगाल अशी. या फाळणीला बंगाली भाषकांचा विरोध होता. कारण मूळ बंगाल म्हणजेच पूर्व बंगाल. पश्चिम बंगाल हा गौड प्रदेश होता. बंगालातील अभिजन रविंद्रनाथ ठाकूर, जगदीशचंद्र बोस इत्यादी सर्व पूर्व बंगालातले. कोलकता हे ब्रिटिशांनी वसवलेलं शहर होते. ढाका हीच पूर्वापार बंगालची राजधानी मानली जात होती. त्यामुळे बंगालच्या फाळणीला हिंदू आणि मुस्लिम बंगाली भाषकांनी विरोध केला. भारतातले पहिले जनआंदोलन उभे राहिले.

लोकमान्य टिळकांनीही बंगालच्या फाळणीला विरोध केला होता. वंदे मातरम् ही घोषणा याच काळात संपूर्ण देशात लोकप्रिय झाली. आसाममधील अभिजनवर्गाचाही बंगालच्या फाळणीला विरोध होता. कारण आसामचा समावेश पूर्व बंगालमध्ये करण्यात आला होता. जनआंदोलनाच्या दबावामुळे बंगालच्या फाळणीचा निर्णय सरकारने रद्द केला आणि आसामला स्वतंत्र प्रांताचा दर्जा मिळाला.

१९३१ सालच्या जनगणनेच्या अहवालानुसार आसाममधील आसामी भाषकांची लोकसंख्या होती १.७४ दशलक्ष. एकूण लोकसंख्येच्या ३१.४२ टक्के. १९५१ सालच्या जनगणेत आसामी भाषकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ५६.६९ टक्के झाली. या काळात आसाममध्ये आजच्या मेघालय राज्याचाही समावेश होता. शिलाँग ही आसामची राजधानी होती. बंगालच्या फाळणीमुळे पूर्व पाकिस्तानातील सिल्हेट जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आसाममध्ये म्हणजे बराक खोर्‍यात हिंदूंनी स्थलांतर केले होते. स्वातंत्र्यानंतर आसामी भाषेला राजमान्यता मिळावी यासाठी आंदोलन सुरू झाले. १९५६ साली राज्य पुनर्रचनेचा कायदा संमत झाला. आसामी भाषेचा समावेश राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित करण्यात आला. आसामी भाषेला अधिकृत राजभाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारा ठरावा आसाम साहित्य सभेने मंजूर केला. आसाम प्रदेश काँग्रेस समितीनेही या ठरावाला पाठिंबा दिला. या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन सुरू झाले.

आसामी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याला बिगर आसामी भाषिकांनी विरोध केला. त्यासाठी शिलाँगमध्ये मोर्चा काढण्यात आला. आसामी आणि बिगर-आसामी भाषकांची निदर्शने होऊ लागली. या आंदोलनात पोलीसी गोळीबारात काही व्यक्ती ठार झाल्या. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सिल्चर आणि करिमगंज बार असोसिएशनने केली. आसामचे मुख्यमंत्री बिमला प्रसाद चाल्हिआ यांनी आसामी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचं विधेयक १९६० साली विधानसभेत मांडले. आसामी ही राज्याची अधिकृत भाषा असेल परंतु काही काळासाठी इंग्रजीलाही हा दर्जा देण्याची तरतूद या विधेयकात होती. हे विधेयक आसाम विधानसभेत पारित झालं. या निर्णयाला बंगाली भाषकांनी विरोध केला. आसामी आणि बंगाली भाषकांमध्ये संघर्ष पेटला. विशेषतः बराक नदीच्या खोर्‍य़ात. अखेरीस सदर विधेयकात दुरुस्ती करण्यात आली आणि बंगाली भाषेलाही राज्यकारभारत स्थान मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी ही रदबदली केली म्हणून या दुरुस्ती विधेयकाला शास्त्री फॉर्म्युला असं म्हटले गेले.

बंगाली भाषा आणि बंगाली भाषकांचं वर्चस्व यांच्या विरोधात आसाममधील अभिजनांच्या भावना तीव्र आहेत. आसामी अभिजनांमध्ये प्रामुख्याने अहोम वंशीयांचा आणि आसाममधील उच्च जातीयांचा समावेश आहे. बोडो व अन्य जनजाती यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी आसामी अभिजनवर्गाची धारणा आहे. बोडो व अन्य जनजातींच्या स्वतंत्र भाषा आहेत. त्यामुळे आसामी भाषक आसाममध्ये बहुसंख्य होऊ शकत नाहीत असा पेंच आहे. एकोणिसाव्या शतकापासून असलेला हा पेच एकविसाव्या शतकातही समाधानकारकरित्या सुटण्याची शक्यता नाही. आसामी राष्ट्रवादाला बंगाली, बोडो आणि हिंदी राष्ट्रवाद आव्हान देत असतात.

आसामी राष्ट्रवादात या विविध अस्मितांना एकात्म करण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक आणि सांस्कृतिक शक्ती म्हणजेच आधुनिक परिभाषेत बोलायचे तर आर्थिक विकासाच्या किल्ल्या आसामी अभिजनांकडे नाहीत. त्यामुळे बंगाली आणि बोडो या दोन मतपेढ्या आसामच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात. यापैकी बंगाली मतपेढीचे विभाजन हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये झाले आहे. या ध्रुवीकरणाला भाजपने गती दिली आणि बंगाली हिंदूंची मतपेढी काबीज केली. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे आसामी मतपेढी भाजपपासून दुरावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

(नागरिकत्व कायद्यातील सुधारणेमुळे पेटलेल्या आसामची पार्श्वभूमी समजावून देणाऱ्या लेखमालेतील हा दुसरा भाग आहे. पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा )

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.