Author : Nadine Bader

Published on Jun 29, 2020 Commentaries 0 Hours ago

भारत-चीनमध्ये नक्की काय सुरू आहे, याबद्दल सर्वच बाजुंनी संभ्रमावस्था आहे. सरकारने आता तरी या संभ्रमावस्थेतून देशाला सत्यतेकडे नेणे गरजेचे आहे. यासंदर्भात अमेय तिरोडकर यांनी केलेले भाष्य.

प्रत्यक्षाहून प्रतिमा ‘धुरकट’

Source Image: indepthnews.net

भारत-चीनमध्ये नक्की काय सुरू आहे, याबद्दल कोणालाच काही कळेनासे झाले आहे. एकीकडे वीरश्रीचे पोवाडे म्हटले जाताहेत, दुसरीकडे भारताच्या गुप्तहेर यंत्रणांचे अपयश उघडे पडलेय… एकीकडे चीनसोबत करारमदार होताहेत तर दुसरीकडे चीनला जशात तसे उत्तर देऊ, वगैरेची भाषा बोलली जाते आहे… प्रत्येकाला इथे आपल्याच प्रतिमेची पडली आहे. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याबद्दल सर्वच बाजुंनी संभ्रमावस्था आहे. भारतापुरते बोलायचे तर मोदी सरकारने आता तरी या संभ्रमावस्थेतून देशाला सत्यतेकडे नेणे गरजेचे आहे.

इथे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरचा एक संदर्भ मला आठवतो. हा संदर्भ या आधी अनेकदा दिला गेला आहे. पण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण लोकांनी तो विसरू नये आणि त्यातून योग्य तो धडा वेळीच घ्यायला हवा. दुसऱ्या महायुद्धानंतर व्हिक्टर क्लेम्परर या नाझी जर्मनीतल्या ज्यू समाजशास्त्रज्ञाची डायरी नंतर नाझी हिटलर काळाबद्दल फार महत्त्वाचा दस्तावेज ठरली. या डायरीतील हा एक प्रसंग आहे.

हिटलर युद्ध हरलेला असतो. मित्र राष्ट्रांच्या फौजा बर्लिनमध्ये पोचलेल्या असतात… आणि एके दिवशी हिटलर आत्महत्या करतो. ३० एप्रिल १९४५. बर्लिनच्या त्या फ्युररबंकरमध्ये जेव्हा हिटलर आत्महत्या करत असतो, नेमक्या त्याचवेळेला बर्लिनमध्येच कुठेतरी व्हिक्टर हात तुटल्यामुळे जखमी झालेल्या जर्मन सैनिकाशी बोलत असतो. तेव्हा व्हिक्टरच्या हे लक्षात येते की, मित्र राष्ट्रांच्या फौजा बर्लिनमध्ये आल्यात हे त्या सैनिकाला माहिती आहे. हिटलर कोंडला गेलाय आणि जर्मनी पराभवाच्या उंबरठ्यावर आहे, हेही त्याला ठाऊक आहे. पण त्या सैनिकाला त्याही स्थितीत असे वाटत होते की, हिटलर अजूनही काहीतरी चमत्कार करेल आणि मित्र राष्ट्रांना हरवेल. ही त्याची इच्छा नाही तर श्रद्धा होती. तेव्हा त्या सैनिकाला हे ठाऊक नव्हते की, हिटलरने हतबल होऊन आत्महत्या केलेली आहे.

त्या सैनिकाच्या आणि त्याच्यासारख्या लाखो जर्मनांच्या मनात जे होते त्याला ‘इमेज’ म्हणतात. आणि हिटलरने आत्महत्या केली याला ‘फॅक्ट’ म्हणतात. ‘इमेज’पासून ‘फॅक्ट’ खूप लांब गेली की भयंकर फसवणूक होते. मग ती कुणाचीही असो. व्यक्ती, संस्था अथवा देश. प्रतिमा आणि प्रत्यक्षातील अंतर, हे एकंदरीतच समाजाला आणि पर्यायाने जगाला फार हानीकारक ठरते.

आज भारत-चीन प्रश्नाबाबत हाच प्रतिमा आणि प्रत्यक्षातील गोंधळ सामोरा येतो आहे. मोदी सरकारची ‘इमेज’ ही चीनने निर्माण करून ठेवलेल्या नाजूक आणि स्फोटक वस्तुस्थितीपासून दूर गेलेली आहे. त्यातून देशाची फसवणूक होते आहे. आज हे म्हणण्यासारखी स्थिती आहे की, ही फसवणूक सरकारकडूनच होते आहे. ज्या लोकांनी जे सरकार निवडून दिले, ते सरकार त्याच लोकांना फसवत आहे, वस्तुस्थितीपासून दूर नेत आहे. कशासाठी तर, आपली इमेज वाचवण्यासाठी!

नरेंद्र मोदी सत्तेवर आले २०१४ ला तेच मुळात ‘स्ट्रॉंग नेता’ म्हणून. मनमोहन सिंग यांची कमजोर पंतप्रधान अशी इमेज झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, मजबूत पंतप्रधान अशी इमेज मोदींची बनवली गेली. २०१९ ला मोदींना परत मते मिळाली ती त्याच ‘स्ट्रॉंग इमेज’ च्या आधारावर. पुलवामाच्या घृणास्पद हल्ल्याला उत्तर म्हणून बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकला प्रेझेंट केले गेले. या स्ट्राईकबद्दल तेव्हाही गंभीर प्रश्न विचारले गेले होते आणि आजही ते प्रश्न कायम आहेत. पण, हे प्रश्न लष्कराच्या शौर्याच्या माहोलाच्या आड दाबून टाकले गेले. स्ट्रॉंग लीडरशिप हेच तेवढे महत्त्वाचे ठरले आणि मोदी परत निवडून आले.

चीनने केलेल्या घुसखोरीबद्दल आता हेच होते आहे. ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की, चीनने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली आहे. गलवान खोरे हा भारताचा भाग आहे. इथेच चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये हाणामारी झाली, ज्यात आपले २० जवान मारले गेले. जोवर हे वीस जवान मारले गेले नव्हते, तोवर भारत सरकारने चीनकडून झालेल्या घुसखोरीबद्दल ब्र उच्चारला नव्हता. जवान मारले गेल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत वादग्रस्त विधान केले की, कोणी आपल्या देशात घुसखोरी केलीच नाही. नंतर मोदींचे ते वक्तव्य पीएमओच्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवरून काढून टाकण्याची नामुष्की आली. इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अशी वेळ आपल्यावर येणे ही भयंकर लाजिरवाणी आणि संतापजनक गोष्ट आहे. आणि ही वेळ आपल्यावर का आली? स्ट्रॉंग लीडर ही इमेज टिकवण्याच्या अट्टाहासापोटी!

मागच्या सहा वर्षात मोदींनी जगभर प्रवास केला. जिथे जातील आणि जिथे शक्य होईल तिथे तिथल्या भारतीयांना एकत्र करून मोठमोठ्या सभा घेतल्या. याचा उद्देश एकच होता. देशातल्या जनतेला असे सतत दाखवत राहणे की, मोदी कसे ग्लोबल लीडर बनले आहेत. ‘प्लेईंग फॉर द डोमेस्टिक ऑडियन्स’ असे या सगळ्या खर्चिक कारभाराचे वर्णन देशातल्या अनेक नामांकित तज्ज्ञ मंडळींनी केले. अशा कारभाराने मोदींचा ‘इगो’ सुखावला असेल किंवा त्यांच्या समर्थकांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पण, त्यातून आंतरराष्ट्रीय राजकारणावर काही परिणाम होत नसतो.

जे इतर देशांत केले तेच मोठ्या प्रमाणात मोदींनी चीनसोबत केले. भारताच्या इतिहासात मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत की जे तब्बल ५ वेळा चीनला गेले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही त्यांनी असेच अनेकवेळा बोलावले आणि अहमदाबादच्या झुल्यापासून महाबलीपुरमपर्यंत फिरवले. पण, तोवर या परराष्ट्र धोरणाचे पाणी चीनने जोखले होते आणि त्यातून चीनने आताची आक्रमक भूमिका घेतली.

खरेतर, चीनच्या घुसखोरीवर मोदी सरकार असे म्हणू शकले असते की, आम्ही मैत्रीचे प्रयत्न केले पण चीनला त्याचे गांभीर्य समजले नाही आणि त्यांनी आताची घुसखोरी केली आहे. हे वस्तुस्थितीच्या अधिक जवळ जाणारे ठरलं असते. पण, इथे (आणि नेहमीच!) वरचढ ठरली ती इमेजची काळजी!

एकीकडे घुसखोरी झाली आहे, असे मान्य केले की स्ट्रॉंग लीडरशिप ह्या इमेजला धक्का लागतो. दुसरीकडे चीनबद्दल जनमताचा दबाव वाढतो आणि तिसरीकडे आपण हतबल आहोत हेही उघडे पडते. हे सगळे होऊ न देण्यासाठी म्हणून ‘फॅक्ट’पासून समाजाला, देशाला दूर नेणे सुरू आहे. मीडिया, काही राजकीय पक्ष आणि भाजपने सांभाळलेले बेसुमार ट्रोल्स यांच्या माध्यमातून इमेज काही काळ सांभाळली जाईलही पण त्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. उलट ती चिघळेल. पण, हे भान ना सरकारला आहे ना त्यांच्या समर्थकांना!

एरिक हॉब्सबॉन नावाचे विसाव्या शतकात एक महान इतिहासकार, भाष्यकार होऊन गेले. त्यांनी इमेज आणि नेता यांच्याबद्दल एक महत्त्वाची मांडणी केली आहे. ते म्हणतात की जेव्हा एखादा नेता लोकांना सांगण्यासाठीच्या गोष्टीवर, प्रचारावर स्वतःच विश्वास ठेवायला लागतो तेव्हा त्याचे, त्याच्या समर्थकांचे आणि त्याच्या संस्थेचे पतन अटळ असते. नेत्याचे हे असे स्वतःच्या प्रचारावर स्वतःच विश्वास ठेवणे, हीच त्याच्या शोकांतिकेची सुरुवात असते.

भारत-चीन वादात स्थिती अजून इतकी टोकाला गेलेली नाही. पण, इमेज सांभाळता सांभाळता मूलभूत गोष्टींकडे (इथे डिप्लोमसी आणि वस्तुस्थिती) दुर्लक्ष झाले तर, मात्र आपण सर्वच जण हतबलतेच्या खाईत लोटले जाऊ आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकार असेल. जगातील ३८ टक्के लोकसंख्या फक्त भारत आणि चीन या दोन देशांमध्ये राहते. त्यामुळे या दोन देशांमधील नात्याचा परिणाम साऱ्या जगावर होणार आहे. त्यामुळे हे सारे कोणलाच परवडणारे नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.