Published on May 28, 2020 Commentaries 0 Hours ago

वटवाघळांनी नेहमीच आपल्यापासून ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळले आहे. कोरोनासारख्या विषाणूंचा फैलाव रोखायचा असेल तर आता आपणही ते पाळायला हवे.

वटवाघळांचे ‘फिजिकल डिस्टन्सिंग’!

Source Image: animals.sandiegozoo.org

वटवाघूळ या अंधारात फिरणाऱ्या, झाडाला उलटे लटकून राहणाऱ्या प्राण्याबद्दल माणसाच्या मनात आधीपासूनच भीतीची भावना आहे. आज जगभर थैमान घालणारा कोरोनाचा विषाणू या वटवाघळांमुळे परसला असे लोक बोलू लागले, तेव्हापासून हा प्राणी आणखी बदनाम झाला आहे. अनेक ठिकाणी तर, या वटवाघळांना मारून टाकण्यात येत आहे. पण, आपल्याकडे पसरलेला कोरोना हा या वटवाघळांमुळे पसरलेला नाही. त्यामुळे नक्की काय घडले, हे समजून घेणे आजघडीला अत्यंत आवश्यक ठरले आहे.

जगभरामध्ये झालेला कोरोनाचा फैलाव नेमका कशामुळे झाला, यावर सध्या मोठे संशोधन सुरू आहे. चीनच्या वुहानमध्ये जानेवारी महिन्यात कोरोनाचा प्रसार होऊ लागला, तेव्हा हा विषाणू कुणामुळे पसरला याच्या चर्चा सुरू झाल्या. असे म्हटले जा लागले की, हा विषाणू झूनॉटिक आहे. म्हणजेच या विषाणूचा संसर्ग प्राण्यांमधून माणसांना होतो. सुरुवातीला वुहानच्या मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या एका जलजीवावर संशय घेतला गेला. मग पँगोलिनचे नाव चर्चेत आले. त्यानंतर वटवाघळांमार्फत माणसांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे बोलले जाऊ लागले. कोरोनाचा प्रसार नेमका कोणत्या प्राण्यांमुळे झाला हे अद्यापही सिद्ध झालेले नाही.

काहीही सिद्ध झाले नसले तरी, गेले काही दिवस वटवाघळे आणि कोरोनाच्या बातम्या कानावर येताहेत, तसतशी या पंख असलेल्या गूढरम्य प्राण्यांबद्दलची भीती वाढायला लागलीय. भारतात राजस्थानमध्ये याच भीतीने १५० वटवाघळांना मारण्यात आले. इंडोनेशिया, अमेरिका या देशांतही अशा घटना घडल्या आणि जगभरातच वटवाघळांचा बचाव करण्याची वेळ आली आहे. वटवाघळांबद्दल आधीच आपल्या मनात असलेल्या भयामध्ये, शिसारीच्या भावनेमध्ये या कोरोनामुळे भरच पडलीय.

नेचर चा अहवाल काय सांगतो?

जर आपल्या आसपास निलगिरी, अशोक अशी उंच झाडे असतील, तर तिथे काही वटवाघळे झाडाला टांगलेली दिसतील. ती घरात आली तर? त्यांच्यामुळे आपल्याला कोरोना झाला तर ? अशी भीती आज अनेकांच्या मनात दाटलेली आहे. पण ही भिती व्यर्थ आहे. कारण, आपल्याकडे संक्रमित होत असलेला कोरोना हा या वटवाघळांमुळे पसरलेला नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. सध्या यावर बरेच संशोधन सुरू आहे.

‘नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकात एक लेख प्रसिद्ध झालाय. यामध्ये कोरानाचा विषाणू आणि वटवाघळांमध्ये असलेल्या कोरोनामध्ये साम्य आढळले, तरी वटवाघळांमध्ये असलेला हा कोरोना आणि कोविड-१९ या आजाराचा थेट संबंध नाही, असे म्हटले आहे. वटवाघळांमध्ये आढळलेला विषाणू हा या कोरोना विषाणूचा पूर्वज आहे, असे या संशोधनातून आढळते आहे.

खवले मांजरावरही संशय

वटवाघळांसोबतच आणखी एका प्राण्याकडे कोरोनाचा फैलाव केल्याच्या संशयाने पाहिले जातेय. हा प्राणी आहे खवले मांजर. पँगोलिन म्हणजेच खवले मांजर नावाच्या या प्राण्यामध्ये कोरोनाचा विषाणू वटवाघळांनीच नेला, असाही शास्रज्ञांचा क़यास आहे.

चीनमधल्या वुहानमध्ये कोरोना नेमका कसा आला याचे खूप तर्क वितर्क आहेत. कुणी म्हणते, प्रयोगशाळेत प्रयोग करताना हा विषाणू लिक झाला. कुणी म्हणते, तो वुहानच्या मिट मार्केटमध्ये म्हणजे मांस विकले जाणाऱ्या बाजारातून आला… तर कुणी म्हणतेय, हा विषाणू वटवाघळांमार्फतच पसरला. आता याबद्दलचे पुरावे नंतर समोर येतील पण या सगळ्यामध्ये वटवाघळांबद्दल एक मेख दडलेली आहे.

तस्करी केलेली वटवाघळ

ज्या वटवाघळांबद्दल संशय व्यक्त होतोय, ती वटवाघळं जंगली नाहीत तर खाण्यासाठी पकडून आणून पिंजऱ्यात ठेवलेल्या वटवाघळांमुळे तो माणसांकडे आला असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर खवले मांजराशी या विषाणूचे साम्य आहे. पण, तस्करी केलेल्या खवले मांजरामधून याचा फैलाव झाला असावा, असाही अंदाज आहे.

खवले मांजर हा प्राणी जगात सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी आहे आणि चीनमधल्या मिट मार्केटमध्ये तो सर्रास विकला जात असे. ‘कोरोना’ विषाणूचा प्रवास वटवाघळातून खवले मांजर आणि मग माणसामध्ये झाला असावा, असा एक तर्क मांडला जातो तो यामुळेच.

बँट कोरोना वेगळा कसा ?

वटवाघळांवर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड यांनी याबद्दल एक लेख लिहिला आहे. मीही त्यांची याबद्दल एक सविस्तर मुलाखत घेतली. त्यांच्या लेखाचे शीर्षक आहे…’बॅट कोरोना म्हणजे कोविड-१९ नव्हे, जरा समजून घ्या, गैरसमज नको.’

डॉ. महेश गायकवाड सांगतात, चीनमध्ये कोविड-१९ हा विषाणू ‘हॉर्स शू बॅट’ नावाच्या वटवाघळातून पसरला असावा, असे म्हटले जाते. ही वटवाघळे कीटकभक्षी आहेत. आपल्याकडे ‘फ्लाइंग फ़ॉक्स’ नावाची झाडाला लटकणारी वटवाघळे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही वटवाघळे फळं खाणारी आहेत. त्यामुळे या दोन वटवाघळांमधला फरक लक्षात घ्यायला हवा.

त्याचबरोबर NIV म्हणजेच नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी या संस्थेनेही या विषयावर संशोधन केले. या संस्थेने भारतातल्या आठ राज्यांतील वटवाघळांचे नमुने घेतले. या वटवाघळांमध्ये बॅट कोरोना नावाचा विषाणू सापडला. पण हा कोरोना वटवाघळांमधून माणसांमध्ये जाणारा नाही. हा बॅट कोरोना वेगळा आहे, त्याचा कोविड-१९ शी संबंध नाही, हेही NIV ने स्पष्ट केले आहे. तरीही वटवाघळांबद्गलची आपली भीती जात नाही. याला कारणेही तशीच आहेत.

चीनची बँट वुमन

याआधी सार्सचा विषाणू वटवाघऴांमुळे पसरला होता हे सिद्ध झाले आहे. निफा, इबोला यासारखे आजारही वटवाघळांमुळे पसरले, पण कोविड-१९ हा आजार वटवाघळांमुळे पसरल्याचा ठोस पुरावा नाही. चीनच्या बॅट वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रोफ़ेसर शि झिंगली यांनी यावर बरेच संशोधन केले आहे. याआधी, २००५ मध्ये त्यांनी ‘सार्स’चा विषाणू वटवाघळांमधून पसरल्याचे सिद्ध केले होते. २०१४ पासून त्या ‘सार्स आणि बँट कोरोना’ या विषयावर संशोधन करतायत. पण कोविड-१९ चा विषाणू आणि आमच्या प्रयोगशाळेचा काहीही संबंध नाही, असे विधान त्यांनी केले आहे. वटवाघळांच्या संशोधक या नात्याने त्यांचे हे विधान आपण लक्षात घ्यायला हवे.

माणसांमुळेच झाला संसर्ग

कोरोनाचा फैलाव रोखणे हे जगापुढेच एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान पार केल्यानंतर काही दिवसांनी कदाचित कोरोनाचे मूळ आपल्याला कळू शकेल. पण त्याचे खापर आत्तातरी पूर्णपणे वटवाघळांवर फोड़ता येणार नाही. त्यातही कोणताही पुरावा नसताना, भारतातल्या वटवाघळांच्या प्रजातींवर संशय घेणे तर खूपच अयोग्य ठरेल, असे डॉक्टर महेश गायकवाड यांच्यासारख्या तज्ज्ञांना वाटते. कोरोना चा हा विषाणू प्राण्यांकडून माणसांकडे आला असला तरी, भारतात झालेला कोरोनाचा फैलाव हा परदेशातून आलेल्या माणसांमुळेच झाला आहे, वटवाघळांमुळे नाही, असे ते पुन्हापुन्हा सांगतात.

डॉ. महेश गायकवाड हे वटवाघळांवर संशोधन करण्यासाठी महाबळेश्वरच्या ‘रॉबर्स केव्ह’मध्ये गेले होते. तिथे त्यांना वटवघाळांमुळे काही प्रमाणात संसर्गही झाला होता पण सार्स, कोविड-१९ अशा प्रकारचा संसर्ग किंवा श्वासाचे विकार असे मात्र कधीच झाले नाहीत, हे ते आवर्जून सांगतात.

……………………………………………………………………

(फोटो- डॉ. विजय शास्त्री)

……………………………………………………………………

पश्चिम घाटातली गुहा आणि वटवाघळे

पश्चिम घाटावर डॉक्युमेंटरी करताना मीही गोव्यामधल्या एका अभयारण्याजवळ असलेल्या वटवाघळांच्या गुहेत गेले होते. ती वटवाघळे कीटकभक्षी होती. पण मलाही या वटवाघळांपासून कोणताही संसर्ग झाला नाही. कोयना अभयारण्यावर लघुपट करतानाही अशाच उन्हाळ्याच्या दिवसांत आम्ही ‘फ्लाइंग फॉक्स’ची वस्ती असलेल्या ठिकाणी राहायचो. ही वटवाघळे कधीच आमच्या जवळही आली नाहीत. दिवसा झाडाला लटकून राहायचे आणि संध्याकाळी जंगलाच्या दिशेने मोठमोठ्या थव्यांनी उडत जायचे, असा त्यांचा दिनक्रम होता.

निसर्गातील वटवाघळांचे महत्त्व आपण समजून घ्यायला हवे. रात्री जंगलात फिरणारी ही वटवाघळे वेगवेगळी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेतून या फळांच्या बिया पुन्हा जंगलात पडतात आणि उगवून येतात. म्हणजे जंगलातली किती नवी झाडे या वटवाघळांनी लावली असतील, याची कल्पना येते. पक्षीमित्र किरण पुरंदरेंच्या भाषेत सांगायचे, तर वटवाघळांना यासाठी वृक्षारोपणाचे जीवनगौरव पुरस्कार द्यायला हवेत! वटवाघळे परागीभवन तर करतातच, पण त्याशिवाय काही कीटक खाणाऱ्या वटवाघळांमुळे कीटकांची संख्या मर्यादित राहते आणि याचा फ़ायदा शेतकऱ्यांना होतो.

वटवाघळांना कोरोनाची बाधा का नाही?

या रात्री फिरणाऱ्या वटवाघळांच्या क्षमता कमालीच्या आहेत. उडताना ते एक विशिष्ट प्रकारचा आवाज करतात. या ध्वनिलहरी जेव्हा पुन्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा त्यांना अंधारातूनही वाट काढ़ता येते. रात्री जंगलात फिरताना ही वटवाघळे जी फळं खातात त्यावरून त्यांची दृष्टी किती शोधक असली पाहिजे हेही कळते.

वटवाघळांची रोगप्रतिकारक शक्ती आपल्यापेक्षा तिप्पट असते. वटवाघूळ हा उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. उडताना त्यांच्या शरीराचं तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जातं. अशा तापमानात कोरोनाचे विषाणू त्यांच्या शरीरात बाधा निर्माण करू शकत नाहीत. याचा अर्थ, वटवाघळे खरंच बॅटबॅन, सुपरमॅनपेक्षाही पॉवरफुल आहेत.

घटत चाललेले अधिवास

पश्चिम घाटावर डॉक्युमेंटरी करत असताना मी वटवाघळांचे अधिवास शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की, पश्चिम घाटात आधी वटवाघळांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अनेक गुहा होत्या. आता मात्र या गुहांमध्ये वटवाघळांच्या वसाहती नाहीत. त्यांचे जंगलांचे अधिवासही कमी होत चालले आहेत. या स्थितीत वटवाघळे मनुष्यवस्तीत येण्याचे प्रमाण वाढणार आहे आणि इथेच त्यांची शिकार होण्याचा धोकाही वाढतो. त्याचबरोबर माणसांना कोरोनाचा फैलाव होण्याचा धोकाही. हा धोका टाळायचा असेल तर वटवाघळे, खवले मांजरच नव्हे तर सगळ्याच वन्यप्राण्यांची तस्करी रोखायला हवी.

वटवाघळांना संरक्षण हव

कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर चीनमधलं मिट मार्केट काही दिवस बंद ठेवण्यात आले, पण मग ते पुन्हा सुरू झाले. अशा तस्करीच्या बाजारपेठेत पुन्हा वटवाघूळ, खवले मांजर असे प्राणी आणले जाणार नाहीत, याची खात्री नाही. म्हणूनच वटवाघळांचे अधिवास राखणे, खवले मांजरांची तस्करी रोखणे यासाठी जगभरातल्या वन्यजीव संशोधकांनी मोहीम सुरू केली आहे. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेने अलीकडेच ‘खवले मांजराच्या नावाने चांगभले’ असं म्हणत या प्राण्याची प्रतिकृती पालखीत घेऊन नाचवली होती. कोरोनाच्या या दिवसांत या प्राण्यांबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्यांच्या संवर्धनासाठी पुढे यायला हवे हाच संदेश यामागे होता.

कोरोनाच्या निमित्ताने वटवाघळांचं पर्यावरणातले स्थान आणि त्यांचे संवर्धन यावर चर्चा सुरू झाली आहे. वटवाघळांवरच्या संशोधनाला यामुळे गती मिळू शकते. त्याचबरोबर भारतात वटवाघळांच्या १५० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यांच्या या वेगवेगळ्या प्रजातींना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळायला हवे, असे संशोधकांना वाटते.

सुरक्षित अंतर राखा

तुमच्या घरात चुकून वटवाघूळ आले तर घाबरून जाऊ नका, त्याच्यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही याची खात्री बाळगा, असे आवाहन वटवाघळांवर संशोधन करणाऱ्या जगभरातल्या शास्रज्ञांनी केले आहे. या संशोधकांवर आपण विश्वास ठेवायला हवा. त्याचबरोबर वटवाघळांच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करायला हवेत.

वटवाघळांवरचा हा लेख पूर्ण करताना माझ्या गावात मिट्ट अंधार झाला आहे. दुरूनच घुबडांचे आवाज येऊ लागलेत आणि थोड्याच वेळात इथे वटवाघळेही भिरभिरणार आहेत. परवा पहाटे काही ग्रहतारे पाहायला गच्चीवर गेले तर माझी चाहूल लागून एक भलंमोठ्ठे वटवाघूळ भर्रकन उडाले. त्याच्या आवाजाने मी दचकले पण त्याआधी तेच सावध झालं होते अणि माझ्यापासून लांब उडाले. आपल्यामुळे एवढा गहजब माजला आहे हे त्याच्या गावीही नव्हते.

उडताना त्याने माझ्यापासून एक ठराविक अंतर राखले. माणसांच्या जवळ येऊन त्यांच्यावर हल्ला करून कोरोनाचा फैलाव करण्याचा वटवाघळांचा कोणताही हेतू नाही, हेच यावरून सिद्ध होते. वटवाघळांनी नेहमीच आपल्यापासून हे फ़िज़िकल डिस्टन्सिंग पाळले आहे… कोरोनासारख्या विषाणूंचा फैलाव रोखायचा असेल तर आता आपणही ते पाळायला हवं!

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.