भारत बदलतोय. तंत्रज्ञान हे या बदलाचे प्रमुख कारण ठरले आहे. स्मार्ट तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता, प्रभावी अॅप्स या सर्वांमुळे आरोग्य, शिक्षण, कृषी व उत्पादन क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसून येताहेत. डेटा आधारित संशोधनात वाढ झाल्यामुळे यास अधिक बळ मिळते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाच्या शक्तीचा फायदा घेत लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी व देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी सध्या प्रचंड संधी आहेत.
२०२५ पर्यंत ट्रिलियन डॉलर डिजिटल अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवलेल्या भारतासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. भारताची ओळख सध्या तंत्रज्ञानाचे शक्तिकेंद्र अशी बनली आहे. भारतातील डिजिटल ग्राहकांची बाजारपेठ वेगाने फोफावते आहे. ५० कोटींहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. ‘आधार’ हा जगातील सर्वात मोठा डिजिटल आयडेंटिटी कार्यक्रम भारत राबवत असून, त्या अंतर्गत आतापर्यंत सुमारे एक कोटी २० लाख लोकांची नोंदणी करण्यात आली आहे. ई पेमेंट व्यवहार दिवसागणिक वाढत आहेत. दर महिन्याला सरासरी १ अब्जाहून अधिक ऑनलाइन (यूपीआय) व्यवहार नोंदवले जात आहेत.
४५ लाख प्रतिभावंत आयटी इंजिनीअर्सच्या पाठबळावर भारतातील आयटी उद्योग सुमारे १९१ अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळवतो आहे. जगातील टॉप टेन ग्लोबल सिस्टिम इंटिग्रेटर्सपैकी बहुतांश भारताबाहेर असूनही भारतात ९ हजारांहून अधिक टेक स्टार्टअपस सुरू झाले आहेत. त्यापैकी १६०० स्टार्टअप्स तंत्रज्ञानाच्या मूलभूत अशा संशोधन कार्यात जोमाने कार्यरत आहेत.
तंत्रज्ञानाचा झपाट्याने अंगिकार करण्यासाठी भारताची प्रचंड लोकसंख्या हा एक मोठा प्रेरणास्त्रोत आहे. भारताच्या प्रचंड लोकसंख्येची डिजिटल सेवांची गरज ही टेक आधारित अर्थव्यवस्थेकडे वळण्यास प्रवृत्त करते. तसेच, अधिकाधिक क्षमतेचे, परवडणारे व मोबदला मिळवून देणारे तंत्रज्ञान निर्माण करण्यास चालना देते.
‘कोविड १९’ ची महामारी आणि नव्या भू-राजकीय परिस्थितीमुळे तंत्रज्ञानाकडे लोकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसंच, या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापराचा वेगही कमालीचा वाढला आहे. दूरस्थ आणि दुर्गम भागांना जोडणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती व विविध उद्योगांमध्ये डिजिटल सेवेच्या प्रवेशाचा अभूतपूर्व वेग सध्या आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. काळाबरोबर राहता यावे व प्रवाहाबाहेर फेकले जाऊ नये म्हणून प्रत्येक क्षेत्र आणि विभाग डिजिटल होतो आहे.
अद्ययावत तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या बाबतीतली ही ऊर्जा व उत्साह पाहण्यासारखा आहे. हा प्रवास जसजसा पुढे जाईल, तसतसे विविध प्रकारचे तंत्रज्ञान भारताचे ट्रिलियन डॉलर डिजिटल अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
डिजिटल बदलांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता
कृत्रिम बुद्धीमत्ता ही संकल्पना १९५० पासून अस्तित्वात आहे. मात्र, दोन गोष्टींच्या एकत्रिकरणामुळे ती सध्या सर्वव्यापी व सर्वस्पर्शी ठरत आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर डेटा उपलब्धतता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेमरी व गणन क्षमता. जिचा उपयोग करून आपण उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण करू शकतो व त्यातून निष्कर्ष काढू शकतो. आपण सध्या इतिहासाच्या एका निर्णयाक टप्प्यावर आहोत. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या युगात प्रवेश करताना भारताला त्याच्याकडे असलेले तंत्रज्ञान, डेटा उपलब्धता, डेटा वैविध्य आणि प्रतिभेच्या जोरावर नेतृत्व करण्याची व फायदे घेण्याची मोठी संधी आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या वापराचा मुद्दा लक्षात घेतल्यास भारत सध्या अत्यंत वेगळ्या स्थानी आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान निर्माण करण्याची व संशोधनाची संधी भारताला आहे. माणूस केंद्रस्थानी ठेवून अॅप निर्मितीवर भर देतानाच एकंदर जगासाठीच आर्टिफिशल इंटेलिजन्सची कवाडे खुली करण्याची संधी भारताला आहे.
‘भारतीय अर्थव्यवस्थेवर आर्टिफिशल इंटेलिजन्सचा प्रभाव’ या शीर्षकाखाली ‘नॅसकॉम’ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करणाऱ्या कंपन्यांनी त्याचा वापर एका युनिटने वाढवला तरी भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल ६७.२५ अब्ज डॉलरची किंवा भारताच्या जीडीपीच्या अडीच टक्के भर पडू शकते.
नव्या पिढीची संवाद यंत्रणा: डिजिटल इंडियासाठी ‘5जी’ तंत्रज्ञानाची गरज
जिथे जिथे डेटाची निर्मिती होते, तिथेच त्याचे गणन व विश्लेषण करण्याची क्षमता ‘5जी’ तंत्रज्ञानात आहे. स्मार्टफोनच्याही पलीकडे जाऊन अब्जावधी उपकरणांना जोडून घेण्याची क्षमता ‘5जी’ तंत्रज्ञानामध्ये आहे. ‘5जी’ नेटवर्कमुळे कंप्युटिंगमध्ये अनेक नवे बदल घडतील. यामुळे व्हर्चुअल जगामध्ये क्लाऊडपासून ते वायर्ड नेटवर्किंगपर्यंत संवादाच्या अमर्याद अशा संधी निर्माण होतील.
‘5जी’ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची संधी भारताला आहे. त्यासाठी ‘5जी’ तंत्रज्ञानाची गरज भागवू शकतील अशा स्मार्ट, अद्ययावत व परवडणाऱ्या पायाभूत सोयीसुविधांची गरज भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेला आहे. भारतात संगणकीय क्षमतेचा हा नवा पसारा मुक्त स्त्रोत इनोव्हेशनच्या आधारे चालणार आहे. शैक्षणिक व संशोधन प्रयोगशाळांचा भक्कम पाठबळ लाभलेले भारतातील संशोधक व विकासक संयुक्त सहकार्यातून क्रांतिकारक बदल घडवून आणतील.
वीज, पाणी व रस्त्यांप्रमाणेच सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा एक भाग म्हणून भारत सरकारने नेटवर्क कनेक्टिव्हिटीकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी तेथील कनेक्टिव्हिटीच्या अडचणी दूर करायला हव्या. जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून घेता येईल. एका संशोधनानुसार, मोबाइल ब्रॉडबँडच्या वापरात सरासरी १० टक्क्यांची वाढ आर्थिक विकासाला ०.६ ते २.८ टक्क्यांपर्यंत हातभार लावते.
उद्योग ४.०: वेगवान यांत्रिकीकरणाद्वारे सुधारणा
नव्या औद्योगिक क्रांतीच्या (Industry 4.0) प्रवासात भारताने आघाडीवर राहण्याची गरज आहे. डिजिटलायझेशन हा ‘इंडस्ट्री ४.०’ चा गाभा आहे. नव्या युगाचे कम्प्युटर अप्लिकेशन्स, ऊर्जेच्या स्मार्ट सुविधा, रोबोटिक यंत्रणा आणि मशिन व्हिजन सारखे अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाची गरज त्यासाठी लागणार आहे.
इतकेच नव्हे, देशात सर्वसमावेशक व शाश्वत औद्योगिक विकासाला चालना देण्याची क्षमता ‘इंडस्ट्री ४.०’ मध्ये आहे. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर असलेला भारताचा भर बघता उत्पादनाच्या नवनव्या व शाश्वत पद्धती आणि तंत्राचा स्वीकार आपण करायला हवा. हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक विश्वासार्ह होत असल्याने व त्याद्वारे नवनव्या कल्पना जन्म घेत असल्याने त्याच्या वापरातून भारतातील व एकूणच जगातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचा कायापालट होईल.
आरोग्य: आरोग्याच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. टेलिमेडिसिन, रेडिऑलॉजी, निदानाच्या अद्ययावत पद्धती, औषध संशोधन तसेच, रुग्णालयांची कार्यप्रणाली अशा अनेक अंगांनी या क्षेत्राची प्रगती झाली आहे. हृदयाची स्थिती जाणून घेणारी उपकरणे, विविध प्रकारच्या झटक्यांचा अंदाज घेणारे सेन्सर्स, स्मार्टफोनला थेट डेटा पाठवणारे ग्लुकोज मॉनिटर या साऱ्यामुळे आरोग्याची काळजी आपोआप घेतली जात आहे. नवनव्या तंत्रज्ञानाचा जसजसा आरोग्य सेवेसाठी उपयोग करून घेतला जाईल, तसतसा या सेवेचा आवाका वाढेल आणि खर्च कमी होईल. परिणामी आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे प्रमाणही वाढेल.
कोरोना साथीच्या सध्याच्या काळात टेलिमेडिसीन आणि दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ला घेण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: देशाच्या दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी वेळेवर, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळू लागल्याचे दिसत आहे.
लोकसंख्येची आकडेवारी व विश्लेषण करून संकटाचा अंदाज बांधण्यात व त्याचे व्यवस्थापन करण्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. उदाहरणार्थ, इंटेल इंडिया, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंटस्ट्रीयल रिसर्च आणि हैदराबाद स्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या संस्था संयुक्तपणे काम करत असून ‘कोविड १९’ ची चाचणी अधिक वेगवान आणि कमी खर्चिक कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. विषाणूच्या उत्पत्तीची साखळी शोधू पाहत आहेत. एकापेक्षा अनेक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला असलेल्या धोक्यानुसार आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने त्याचे वर्गीकरण कसे करता येईल याचा अभ्यास करत आहेत.
कृषी: भारतातील जवळपास ५० टक्के लोकसंख्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्यात तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. नव्या युगातील तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स, रोबो आणि ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांची, मातीच्या गुणवत्तेची, भौगोलिक घटकांची आणि किटकांच्या धोक्याची त्या-त्या क्षणाची माहिती मिळू शकते. त्यातून शेतीच्या उत्पादनात सुधारणा होऊ शकते. शेती उत्पादनापासून ते वितरणापर्यंत, उत्पादनाच्या वापरापर्यंत प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे हे आशादायी आहे. या बाबतीत सातत्याने प्रगती होत जाणार आहे.
शिक्षण: शिक्षण क्षेत्र हे गेल्या काही काळापासून तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वेगाने वापर करणारे क्षेत्र राहिले आहे. दूरस्थ शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, नवनव्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या उपकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ई लर्निंग हा लवकरच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाचा भाग होईल आणि सर्वांना दर्जेदार शिक्षण व मार्गदर्शकांचा लाभ घेता येईल. गावखेड्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षण क्षेत्रातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञान निर्मिती: जागतिक स्पर्धेसाठी भारताला मोकळे मैदान
येत्या काळात जगातील एक प्रमुख उत्पादन केंद्र बनणे हे भारताचे लक्ष्य आहे. तंत्रज्ञान निर्मिती हा या लक्ष्यपूर्तीच्या प्रवासातील प्रमुख आधारस्तंभ असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर्स हे उद्योग, आरोग्य, रिटेल, दळणवळण व प्रशासन अशा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित सर्वच बाबींना स्पर्श करतात. भविष्यातही ते स्वयंचलित वाहतूक, आर्टिफिशल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, क्लाउड व अन्य गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. २०२५ पर्यंत भारत ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ असेल. या बाजारपेठेचे मूल्य ४०० अब्ज अमेरिकन डॉलर असेल, असा अंदाज आहे.
भारताने स्वदेशी व स्वावलंबनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे डिझाइन व डिजिटल कौशल्य व ग्राहक क्षमतेचा अधिकाधिक लाभ उठवून भारताने जास्तीत जास्त सेमीकंडक्टर्सची निर्मिती करणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञान संशोधनात महिलांचा सहभाग कळीचा
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, क्लाउड, 5जी सारख्या नव्या जगातील तंत्रज्ञानाने आपले एकूणच जीवन अमूलाग्र बदलून टाकले आहे. मात्र, वेगवेगळ्या स्तरांतील संशोधकांच्या मदतीने या तंत्रज्ञानाची निर्मिती केली तरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो. अशा परिस्थितीत महिलांचा सहभाग व स्त्री-पुरुष वैविध्याचा मेळ घालणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.
वेगवान व शाश्वत विकासावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे. प्रगतीच्या या टप्प्यावर कामाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला समानतेला प्रोत्साहन देऊन २०२५ पर्यंत जीडीपी ७७० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याची मोठी संधी भारताला आहे. मात्र, त्यासाठी व्यापक बदलांची गरज आहे.
लिंगभेद मिटवण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले गेले असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसण्यासाठी त्या दिशेने सातत्याने व चिकाटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रयत्नांमध्ये सरकार, उद्योग क्षेत्र व शिक्षण क्षेत्रामध्ये समन्वय व सहकार्य असणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी व अर्थव्यवस्थेतील विविध स्तरांवर महिलांच्या पुरेशा सहभागासाठी ते महत्त्वाचे आहे.
संशोधन व तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी इंटेल इंडियाची कटिबद्ध
‘इंटेल इंडिया’ ही कंपनी भारतातील डिजिटल बदलांचा व नवकल्पनांचा अविभाज्य भाग राहिली आहे. अमेरिकेच्या व्यतिरिक्त भारत हेच इंटेलचे सर्वात मोठे डिझाइन सेंटर आहे. बेंगळुरू व हैदराबाद इथे ‘इंटेल’ची मोठी केंद्रे आहेत. ‘इंटेल’ने आजपर्यंत भारतात ६ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली असून आजही संशोधन व विकास आणि नवकल्पनांच्या माध्यमातून ही कंपनी स्वत:चा एक वेगळा व व्यापक ठसा उमटवत आहे.
इंटेलच्या भारतातील शाखेने इंटेलचे तंत्रज्ञान व प्रोडक्ट लीडरशीपमध्ये लक्षणीय योगदान दिले आहे. इंटेलची भारतातील डिझाइन सेंटर ही चीप निर्मिती, ५ जी नेटवर्क्स, ग्राफिक्स, सॉफ्टवेअर, डेटा सेंटर व क्लाउडसाठी प्लॅटफॉर्म, क्लायंट व इंटरनेट ऑफ थिंग्ज अशा विविध अभियांत्रिकी कामांमध्ये गुंतली आहेत. इंटेल ही भारतात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून वेगवान संशोधन, नवकल्पना, तंत्रज्ञान निर्मिती आणि सर्वसामान्यांचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे.
प्रचंड लोकसंख्या, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, डिजिटलायझेशनचा वेगाने केला जाणारा स्वीकार, तंत्रज्ञान निर्मिती क्षमता, उद्योगस्नेही वातावरण ही भारताची ताकद आहे. त्यासाठी सरकारने उद्योग, स्टार्टअप्स, शिक्षण या क्षेत्रांसोबत एकत्रितरित्या काम करण्याची गरज आहे. डेटा आधारित तंत्रज्ञानाचा व्यावसायिक व समाजासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण गोष्टी, आकर्षक व्यवसाय मॉडेल, नवे संशोधन, बौद्धिक मालमत्ता आणि तंत्रज्ञान आधारित आकर्षक धोरणांची आवश्यकता आहे. त्या दिशेने प्रमाणिक प्रयत्न केल्यास आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड, ५ जी आणि इतर तंत्रज्ञानाची प्रगती होईल आणि भारतासह जगाच्या डिजिटल परिवर्तनाला गती मिळेल. नवकल्पनांच्या नव्या लाटेचे नेतृत्व करण्याची ही संधी भारताने साधली पाहिजे.
(निवृती राय या ‘इंटेल इंडिया’च्या ‘कंट्री हेड’ आहेत.)
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.