Author : Sunil Tambe

Published on Jun 25, 2020 Commentaries 0 Hours ago

‘अफूचे युद्ध’ ही चीनी-पाश्चात्य संघर्षाची सुरूवात आहे. तिथपासून सुरू झालेला हा संघर्ष आजपर्यत संपला आहे, असे म्हणता येणार नाही.

सुपरपॉवर चीनच्या मुळाशी ‘नामुष्कीचा इतिहास’

Source Image: i-scmp.com

(‘चीन आणि सभ्यताधिष्ठीत राष्ट्र’ या लेखमालेचा हा चौथा भाग आहे. या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

गेल्या काही दशकांमध्ये सुपरपॉवर म्हणून उदयाला येणारा चीन आपण सगळेच पाहतो आहोत. जागतिक अर्थव्यवस्थेला आव्हान देणारा हा चीन आज पाश्चात्यांच्या म्हणजेच युरोप आणि अमेरिकच्या डोळ्यात खुपू लागला आहे. चीनविरोधात आघाडी उभारण्यासाठी हे सारे देश जागतिक व्यवस्थेला हाताशी घेत आहेत. पण इथे एक लक्षात ठेवायला हवे की, चीनच्या सामर्थ्याची आणि संघर्षाची मुळे ही त्यांच्या इतिहासात आहेत. ज्या इतिहासाच्या आधारावर त्यांनी राष्ट्रउभारणी केली आहे, ते आपण समजून घेतले नाही तर, चीनची मनोभूमिका आपल्याला कधीच कळणार नाही. चीनचे आजचे आंतरराष्ट्रीय स्थान पाहता, चीन न कळणे कोणत्याही राष्ट्राला परवडणारे नाही. त्यामुळेच चीनच्या इतिहासाचा अभ्यास करणे, महत्त्वाचे ठरले आहे.

चीनच्या जिव्हारी लागलेले ‘नामुष्कीच शतक

चीनचा साम्राज्यशाहीचा इतिहास हा फारच दैदिप्यमान आणि भव्यदिव्य आहे. त्या काळात संस्कृती आणि व्यापार यामध्ये चीन पाश्चात्य देशांच्या बराच पुढे होता. जगाच्या दृष्टीने, चीन हे अतिशय सुसंस्कृत आणि शांतताप्रिय राष्ट्र होते. पण, त्या तुलनेत पाश्चात्य म्हणजेच ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन, अमेरिकन आणि जपानी हे चीनच्या दृष्टीने मागासच म्हणायला हवेत. पुढे, याच मागास पाश्चात्यांसोबत झालेल्या संघर्षात चीनमधील संस्कृतीचा विध्वंस झाला. त्यामुळे चीनी माणसाच्या मनात याविषयी कमालीच्या तीव्र भावना आहेत. ‘अफूचे युद्ध’ ही चीनी-पाश्चात्य संघर्षाची सुरूवात आहे. तिथपासून सुरू झालेला हा संघर्ष आजपर्यत संपला आहे, असे म्हणता येणार नाही. या संघर्षाच्या इतिहासात आजच्या चीनच्या चिवट वृत्तीची बीजे आढळतात.

हा इतिहास साधारणतः असा आहे.

१८ व्या शतकात चीनमधील विविध वस्तूंना…रेशीम, चहा, चिनीमातीची भांडी, इत्यादी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठेत मोठी मागणी होती. पण, युरोपातील कोणत्याही उत्पादनांची आम्हाला गरज नाही, कारण आमचे साम्राज्य परिपूर्ण आहे, श्रेष्ठ आहे. सबब चिनी वस्तूंची किंमत चांदीमध्ये अदा करावी, असा आदेश चीनच्या सम्राटाने काढला. या आदेशामुळे ब्रिटिशांकडील चांदीचा साठा कमी होऊ लागला. आपल्या चलनाचे म्हणजे पौंडाचे मूल्य टिकवण्यासाठी ब्रिटिशांनी वेगळी शक्कल लढवली. त्यांनी चीनमध्ये अफू विकायला सुरुवात केली. अफूची किंमत ते चांदीमध्ये वसूल करायचे.

लिन झेक्सू या चीनच्या व्यापार आयुक्ताने अफूच्या तस्करीच्या विरोधात कठोर कारवाई केली. त्यामुळे ब्रिटिशांनी चीनच्या विरोधात युद्ध छेडले. या युद्धात चीनचा सपशेल पराभव झाला. त्यानंतर चीनच्या नष्टचर्याला सुरुवात झाली. ब्रिटिशांच्या पाठोपाठ फ्रेंच, जर्मन, इटली, अमेरिका, रशिया, जपान या राष्ट्रांनी चीनचे लचके तोडायला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतापर्यंत चीनची ही फरफट सुरू होती. कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या क्रांतीमुळे जागा ड्रॅगन झाला. मात्र, इतिहासातील या नामुष्कीच्या शतकाचा पुरेपूर बदला आपण घ्यायला हवा, हे चीनच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे सूत्र आहे.

याच अपमानाच्या भावनांमधून चीनमधील नामुष्कीच्या स्मृतीचे संग्रहालय १९८५ साली डुआंगहान शहरात उभारण्यात आले. ‘चीनला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, आपण कष्ट उपसले पाहिजेत. गरज पडली तर, प्राणार्पण करायला हवे’, हा संदेश या संग्रहालयाने चीनी माणसाला थेटपणे दिला. आजही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील चिनी नेते या संग्रहालयाला आवर्जून भेट देतात. आतापर्यंत कोट्यवधी चिनी नागरिकांनी या संग्रहालयाला भेट दिली आहे. १९९६ मध्ये राष्ट्रीय शिक्षणाच्या पायाभूत अभ्यासक्रमाची प्रेरणा याच संग्रहलायने दिली असे मानले जाते.

अफूच पहिल युद्ध

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने तोपर्यंत भारतीय उपखंडावर बस्तान बसवले होते. भारतातून चीनला अफूची निर्यात सुरू झाली. १७९० सालात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने २०० पेट्या (एका पेटीत ६३ किलो) अफू चीनला निर्यात केली. हे प्रमाण पुढे वाढत गेले. १८३८ पर्यंत एका वर्षांत ४० हजार पेट्यांची निर्यात चीनला होऊ लागली. चिनी सम्राटाने अफूच्या आयातीवर बंदी घातली होती, म्हणून अफूच्या तस्करीला ब्रिटन आणि अन्य युरोपियन राष्ट्रांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे ब्रिटनच्या चलनाची किंमत सावरली परंतु चीन भिकेला लागला. करोडो लोक अफीमबाज झाले. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला.

उत्पादन घटल्याने अर्थव्यवस्था मोडकळीला आली. अफूच्या तस्करीवर कडक कारवाई करण्याचा हुकूम सम्राटाने दिला. तस्करी केलेल्या अफूचे पेटारे जाळून टाकण्यात आले. ब्रिटन आणि युरोपिय राष्ट्रांनी त्याला हरकत घेतली. मुक्त व्यापाराच्या तत्वाच्या विरुद्ध हा व्यवहार आहे, असा त्यांचा दावा होता. मुक्त व्यापाराचे तत्व हे धर्मतत्वप्रमाणेच पवित्र आहे, हा व्यापार अफूचा असेल किंवा अन्य कोणत्याही वस्तुचा, असा युक्तिवाद या राष्ट्रांनी केला. ब्रिटीशांनी चीनच्या विरोधात युद्ध पुकारले. या अफूच्या युद्धात चिनी नाविक दलाचा सपशेल पराभव झाला. चिनी सरकारला १८४२ साली नानजिंगचा तह करणे भाग पडले.

या तहान्वये, युद्धाचा सर्व खर्च ब्रिटिशांनी वसूल केला, चीनमधील ब्रिटीश नागरिकांना चीनच्या कायद्यातून वगळण्यात आले आणि हाँगकाँग बेट दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टीने ब्रिटनला देणे चीनला भाग पडले. कँटोनशिवाय आणखी पाच बंदरं व्यापारासाठी खुली करावी लागली. या तहानंतर वर्षाला सत्तर हजार पेट्या अफू चीनमधील बंदरांवर दाखल होऊ लागली. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात संपूर्ण जगात जेवढे अफूचे उत्पादन झाले तेवढी अफू १९व्या शतकाच्या मध्यात चीनमध्ये विकली गेली.

१८५० च्या दशकात युरोप आणि अमेरिकेतील औद्योगिक क्रांती ऐन भरात होती. जपानमध्येही औद्योगिक क्रांतीचे लोण पोचले होते. वाढत्या उत्पादनांसाठी जगातल्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी, उद्योगप्रधान राष्ट्रे एकमेकांशी स्पर्धा आणि सहकार्य करू लागल्य होत्या. हा पाश्चात्य साम्राज्यवादाचा उभरता काळ होता. त्यामध्ये ब्रिटनने मुसंडी मारली होती. ब्रिटनप्रमाणेच अमेरिका आणि फ्रान्सनेही चिनी सरकारशी तह केले होते. मात्र या तहांची मुदत बारा वर्षांची होती.

पहिल्या अफूच्या युद्धातील विजयामुळे ब्रिटनच्या अपेक्षा आणि आकांक्षा वाढल्या होत्या. १८४२ सालचा नानजिंगचा तहातील कलमांचा पुनर्विचार करायला हवा, असा आग्रह ब्रिटनने धरला. ब्रिटनला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ हा दर्जा चीनने द्यावा, ब्रिटीश व्यापारासाठी चीनची बाजारपेठ खुली करावी, अफूच्या व्यापाराला अधिकृत मान्यता द्यावी, आयात केलेल्या मालावर चीनच्या अंतर्भागात कोणतेही कर लावू नयेत, मजूरांच्या व्यापाराचे नियमन करावे, चाचेगिरीला पायबंद घालावा या मागण्या चिनी सरकारने मान्य कराव्यात, यासाठी ब्रिटीश साम्राज्य आकाश-पाताळ एक करण्याची भाषा करत होते. चिनी सरकारसोबत झालेल्या तहांच्या बिगर-चिनी भाषेतले मसुदेच अधिकृत समजण्यात यावेत, असाही ब्रिटनचा आग्रह होता. ब्रिटिशांची दादागिरी वाढली होती. ब्रिटीश व्यापारी चिनी सरकारला जुमानेसे झाले होते. त्यातूनच अफूच्या दुसऱ्या युद्धाची ठिणगी पडली.

अफूच दुसर युद्ध

१८५६ च्या ऑक्टोबर महिन्यात चिनी आरमाराने हाँगकाँग बंदरात म्हणजे ब्रिटीश हद्दीत नोंदणी झालेले एक जहाज कँटोन बंदरात ताब्यात घेतले. एरो नावाचे हे जहाज चांचेगिरी करणारे आहे, असा संशय होता. या जहाजावरील चिनी खलाशांना अटक केली. या जहाजावर ब्रिटिशांचा युनियन जॅक होता. हा ध्वज चिनी अंमलदाराने फाडला. हे सर्व घडत असताना, या जहाजाचा ब्रिटीश कप्तान शेजारच्या जहाजावर होता. त्याने ही हकीकत कँटोनमधील ब्रिटीश राजदूताला कळवली. अटक केलेल्या खलाशांची मुक्तता करा आणि ब्रिटीश राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल माफी मागा, अशा मागण्या ब्रिटीश राजदूताने चिनी सरकारकडे केल्या.

चिनी अंमलदाराने अटक केलेल्या काही खलाशांची सुटका केली. मात्र उरलेल्या दोन जणांना सोडण्यास नकार दिला. तेवढे कारण दाखवून ब्रिटीश फौजांनी कँटोन शहरावर तोफा डागायला सुरुवात केली. युद्धाला तोंड फुटले. फ्रान्स, अमेरिका, रशिया यांनी ब्रिटनला पाठिंबा दिला. अमेरिकन आणि फ्रेंच आरमार ब्रिटनच्या बाजूने युद्धात सामील झाले. चीनची राजधानी बिजिंगपर्यंत या मित्र राष्ट्रांच्या फौजांनी धडक मारली. चिनी सम्राटाच्या वासंतिक प्रासादाची (समर पॅलेस) राखरांगोळी ब्रिटीश आणि फ्रेंच तोफखान्याने केली. सपशेल शरणागती पत्करण्याशिवाय चिनी सम्राटापुढे अन्य कोणताही मार्ग नव्हता.

त्यानंतर झालेल्या तहान्वये युद्धाचा सर्व खर्च ब्रिटन आणि फ्रान्स यांनी चिनी सरकारकडून वसूल केला. ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका यांना चिनीच्या राजधानीत दूतावास स्थापन करण्याची परवानगी मिळाली. हे दूतावास म्हणजे चिनी कायदेकानून पासून अभय मिळालेल्या वसाहती होत्या. आपआपल्या दूतावासाच्या रक्षणासाठी फौजा तैनात करण्याचेही अधिकार या राष्ट्रांना होते. दहा मोठी बंदर परदेशी व्यापारासाठी खुली करण्यात आली. त्याशिवाय सर्व परदेशी जहाजांना यांगत्से नदीत वाहतूक करण्याचा परवाना मिळाला.

पहिल चीन-जपान युद्ध

चिनी साम्राज्य कमालीचे दुबळे बनले होते. पाश्चात्यांच्या मदतीने चिनी सेनादलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न चीनची सम्राज्ञी चिशीने केला (चिशीचा पती चीनचा सम्राट होता. परंतु त्याच्या मृत्यूनंतर राजकीय सत्ता तिने आपल्याच मुठीत ठेवली होती. गादीवरील सम्राट नाममात्र होता). चिनी सैन्याची विभागणी मांचू, हान, मंगोल आणि हुई (मुसलमान) अशा चार फौजांमध्ये होती. मांचू राज्यकर्ते होते त्यामुळे त्यांना सर्वाधिक वेतन आणि विशेषाधिकार होते. या फौजेत अत्याधुनिक शस्त्रअस्त्रांपासून ते धनुष्यबाण, भाले या मध्ययुगीन शस्त्रांचाही समावेश होता.

कोरिया हे चीनचे मांडलिक राज्य होते. औद्योगिक राष्ट्रांना त्यांच्या बाजारपेठेसाठी कोरियाची बाजारपेठही हवीच होती. आशिया खंडातील अत्याधुनिक राष्ट्र म्हणून जपानने चीनला पिछाडीवर टाकले होते आणि प्रगत पाश्चिमात्य राष्ट्रांशी बरोबरी करण्यात जपानचा स्वाभिमान सुखावला होता. कोरियातील बाजारपेठेवर अन्य राष्ट्रांप्रमाणेच जपानचाही डोळा होता. कोरियामध्येही आर्थिक-सामाजिक-राजकीय घुसळण सुरू होती. राजाच्या विरोधात बंडाची ठिणगी पडली. कोरियाच्या सत्ताधीशाने चीनची मदत मागितली. चीनच्या फौजांनी कोरियाकडे कूच केली, हे जपानला पटले नाही.

जपानला विश्वासात घेतल्याशिवाय कोरियाच्या राजकारणात चीनने हस्तक्षेप करणे जपानला नामंजूर होते. त्यावरून युद्ध पेटले. चिनी संस्कृती श्रेष्ठ आहे आणि जपानी संस्कृतीवर चीनचा प्रभाव आहे, जपानची लोकसंख्या क्षेत्रफळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेता, या युद्धात आपला विजय निश्चित आहे अशीच बहुसंख्य चिनी आणि सरकारची अपेक्षा होती. १८९४-९५ च्या युद्धात अत्याधुनिक जपानी लष्कराने चीनचा पराभव केला. या पराभवामुळे चीनला जबरदस्त धक्का बसला. त्याशिवाय मानहानीकारक तह करावा लागला. या युद्धामुळे चीनला कोरीयावर पाणी सोडावे लागले. कोरिया स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र बनले. जपानला नुकसान भरपाई द्यावी लागली आणि जपानी व्यापार्यांयसाठी चार शहरे खुली करावी लागली. त्याशिवाय जपानने ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ हा दर्जाही पदरात पाडून घेतला.

चीनची अवहेलना रोखण्यात चिनी सम्राट वा सरकार अपयशी ठरले होते. चीनच्या कारभारावर परदेशी राष्ट्रांची पकड वाढली होती. हाँगकाँग ब्रिटिशांच्या हाती गेले, मकाव पोर्तुगीजांनी ताब्यात घेतले, कोरिया स्वतंत्र झाला, तैवानवर जपानने कब्जा केला. साखालिन आणि व्लादिव्होस्तोक ही बंदरे रशियाच्या ताब्यात गेली. तिबेटवर रशिया आणि ब्रिटिशांची नजर होती. आधुनिक उत्पादन आणि युद्ध तंत्रापुढे चिनी साम्राज्याला गुडघे टेकावे लागत होते. राज्य यंत्रणा खिळखिळी झाली होती.

पीत नदीला पूर येत होते, दुष्काळ पडत होते. लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत होते. कुत्री-मांजरे खाऊन लोक कसंबसे जीवन कंठत होते. केंद्र सत्ता नावापुरती उरली होती. अनेक जमीनदार-सरदार आपआपल्या प्रांतात मनमानी कारभार करत होते. जनतेला लुबाडत होते. बंडखोरांचे अनेक छोटे-मोठे गट सक्रीय झाले होते. मात्र, कुणालाही आधुनिक राज्य, संघटना कशी बांधायची ह्याची तीळमात्र कल्पना नव्हती. पाश्चात्य राष्ट्रांच्या साम्राज्यवादाच्या विरोधात असंतोष खदखदत होता. अफू आणि ख्रिश्चन धर्म पाश्चात्य साम्राज्यवादाचे प्रतीक बनली. जपानकडून झालेल्या पराभवाने चिनी जनमानस हादरून गेले होते.

बॉक्सर बंडखोर

या काळात बॉक्सर बंडखोरांनी उठाव केला. अफूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची चळवळ सुरू झाली. ख्रिश्चनांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होऊ लागले. चिनी आणि परदेशी ख्रिश्चनांची, ख्रिश्चन धर्मगुरुंची कत्तल होऊ लागली. ब्रिटीशांनी या बंडखोरांना बॉक्सर म्हटले कारण हे बंडखोर प्राचीन चिनी युद्धकलेत पारंगत होते. या बंडखोरांना चीनच्या सम्राज्ञीने उघड पाठिंबा दिला. चिनी सरकार आणि बॉक्सर बंडखोरांनी सर्व पाश्चात्य राष्ट्रांच्या विरोधात एल्गार पुकारला. बॉक्सर बंडाच्या काळात कुंग-फू या चिनी युद्धकलेचे कमालीचे उदात्तीकरण करण्यात आले. हे योद्धे हवेत उडू शकतात, त्यांना गूढ औषधींचे, अतिंद्रिय शक्तींचे ज्ञान असते अशा समजुती वाऱ्याच्या वेगाने पसरल्या होत्या. विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील चिनी सिनेमांमध्येही हे पाहायला मिळते. चिनी संस्कृतीच्या या गूढ शक्तिंबाबतच्या समजुती चिनी जनमानसात खोलवर रुजल्या आहेत.

ऑस्ट्रिया-हंगेरी, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका अशा आठ राष्ट्रांनी एकत्र येऊन बॉक्सर बंडाचा निःपात करण्याचा विडा उचलला. या आठ राष्ट्रांचे शिस्तबद्ध सैन्य, नियोजन आणि शस्त्रास्त्रांपुढे चिनी फौजा आणि बॉक्सर बंडखोरांचा निभाव लागला नाही. १४ ऑगस्ट १९०० रोजी चीनची सम्राज्ञी आणि सम्राटाला आपल्या लवाजम्यासह बिजिंगमधून पळ काढावा लागला. या काळात राजघराण्याला आणि दरबाऱ्यांना आपल्या साम्राज्याच्या विपन्नतेचं दर्शन घडले. आठ राष्ट्रांच्या फौजांपुढे संपूर्ण शरणागती पत्करण्याशिवाय सम्राटापुढे दुसरा पर्याय नव्हता. त्यानंतर एका दशकातच सम्राटाची सत्ता उलथून टाकण्यात आली. औपचारिकदृष्ट्या चीन आधुनिक राष्ट्र-राज्य बनला.

यानंतरही चीनच्या अवहेलनेची पन्नास वर्षं बाकी आहेत, हे त्यावेळी चीनच्या सम्राज्ञीला वा तिच्या हातातले बाहुले असलेल्या अफीमबाज सम्राटाला ठाऊक नव्हते. अखेरच्या सम्राटाचा तर जन्मही झाला नव्हता. चीनचा हा सारा इतिहास माहीत असल्याशिवाय आजचा चीन आपल्याला कसा कळणार? त्या नामुष्कीला आपल्या सामर्थ्याने उत्तर देण्याचा प्रयत्न करणारा चीन, म्हणूनच आज जगासाठी महत्त्वाचा आहे. तो समजून घ्यायलाच हवा.

(‘चीन आणि सभ्यताधिष्ठीत राष्ट्र’ या लेखमालेचा हा चौथा भाग आहे. या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)


संदर्भ

  1. Never Forget National Humilation, Historical Memory in Chinese Politics and Foreign Relations By Zheng Wang, Columbia University Press, 2012
  2. The Penguin History of Modern China: The Fall and Rise of a Great Power, By Jonathan Fenby, 2008
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.