Published on Aug 07, 2020 Commentaries 0 Hours ago

'चोवीस तास' राजकारण राजकीय पक्षांना हवेच आहे. कारण, त्यातूनच त्यांचे मतदार घडणार आहेत. पण यात आपल्या आयुष्याची माती होणार नाही, याची काळजी आपणच घ्यायला हवी.

‘चोवीस तास’ राजकारणाचा पाश

राजकारण हे आता आपल्या घरापर्यंत पोहचले आहे. कौटुंबिक समुहांमध्ये, भावभावंडांमध्ये, मित्रांमध्ये राजकीय विचारधारेवरून खटके उडू लागले आहेत. ‘व्हॉट्सअप’सारख्या सोशल मीडियावर पेटणारे राजकीय वाद आपण सगळ्यांनीच अनुभवले आहेत. राजकीय मतभेद आधीही होते, पण आजच्या सारखे ते विखारी आणि घरफोडे नव्हते. एकमेकांविषयी द्वेष, ईर्ष्या जेवढे आज वाढली आहे, तेवढी याआधी कधीही नव्हती. हे सगळे राजकीय पक्षांना हवेसे आहे. कारण, त्यातूनच त्यांचे मतदार घडणार आहेत. पण, ‘चोवीस तास’ राजकारणाच्या या पाशात आपल्या आयुष्याची माती होणार नाही, याची काळजी आपणच घ्यायला हवी.

महाराष्ट्राचे माजी मंत्री गिरीश बापट यांचे एक छायाचित्र नुकतेच पाहण्यात आले. या छायाचित्रात गिरीश बापट यांनी तोंडाला जो मास्क लावला होता, त्यावर ‘कमळ’ हे भाजपचे निवडणूक चिन्ह होते. कोणत्याही आपत्तीत मदत कार्य करताना पक्षाची आणि स्वत:ची प्रसिद्धी करणे, हे सर्वच पक्षनेते करत असतात. त्यात नवीन कांही नाही.  एवढ्या मोठ्या जीवघेण्या रोगाच्या साथीत लाखो लोक मृत्यमुखी पडले असतानाही, आपल्या स्वत:च्या  चेहऱ्यावरील मास्कवर देखील आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असावे, यास नेमके काय म्हणावे हे सर्व सामान्यांच्या आकलनाच्या पलीकडचे आहे. काहींना ही कृती धुरंधर राजकीय नेत्याची वाटली आणि कांही लोकांना मात्र याचे प्रचंड कौतुक वाटले.

दिवसभरातील चोवीस तास राजकारणाचा ध्यास, हीच आजकाल आदर्श राजकारणाची पद्धत झाली आहे. वर्षातील ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास आणि तासाच्या प्रत्येक मिनिटाला फक्त राजकारण करावे, असे मानणाऱ्या राजकारणांचा वर्ग वाढत आहे. या राजकारणामुळे समाजामध्ये दुही माजत आहे. तुम्ही या बाजुला की त्या बाजुला याच्या पलिकडे, हा वर्ग काहीच विचारेनासा झाला आहे. त्यामुळे जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राला राजकीय रंग देण्याचे घातक काम सुरू झाले आहे.

कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून, देशभरात २३ मार्च पासून टाळेबंदी करण्यात आली. ही कृती योग्य होती की अयोग्य हा स्वतंत्र विषय आहे. पण यामुळे अनेक राज्यात आणि शहरात स्थलांतरित मजूर देशभर अडकून पडले. कित्येक लोक चालत पायी आपल्या राज्यात पोचले, कित्येक जणांचे या काळात उपासमारीने  मृत्यूही झाले. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी सर्व प्रकारचे दिवसातील २४ तास प्रयत्न करणारे,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण देशात अतिशय बिकट स्थिती असताना मात्र जवळपास महिनाभर गायब होते. याचे कारण नंतर असे समजले की, ते बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराचे गुप्त आणि सुक्ष्म नियोजन करत होते. पुढे त्यांनी बिहारमधील गावोगावी जेव्हा टीव्हींचे वाटप करून, एक प्रसारीत प्रचार सभा घेतली, त्यावरून हे सिद्धही झाले. स्थलांतरित मजुरांच्या संख्येत बिहारी लोकांची संख्या प्रचंड होती, मात्र त्यांना इतर सोयी सुविधा देण्यापेक्षा टीव्ही देऊन त्यावर पंतप्रधान मोदीजींचे भाषण ऐकायला लावणे, यालाच तर चोवीस तास राजकारणाचा ध्यास म्हणतात.

भारतातील २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर भारतातील निवडणूक प्रचार मोहिमेचे स्वरूपच बदलून गेले. एक प्रकारचा विलक्षण वेग त्यात निर्माण झाला आहे. निवडणुकीत प्रचाराचे मागील ३० वर्षातील स्वरूप आणि त्यात  झालेल्या खर्चाचा ताळेबंद पहिला तर या दोन निवडणुकांचे वेगळेपण स्पष्ट होते. शिवाय निवडणूक प्रचारासाठी विराट, विशाल सभा, लाल किल्ल्याचा देखाव्याचे स्टेज, लेझर तंत्रज्ञानाचा वापर यासह प्रचाराचे स्वतंत्र चँनेल आणि निवडणुकीसाठी लागणाऱ्या पैशासाठी आणलेले बॉंडस, म्हणजे सर्व कांही भव्य आणि दिव्य!

या दोन्ही निवडणुकात कॉंग्रेसचा पराभव  झाला तर, गृहमंत्री अमित शहा हे इलेक्शन मॅनेजर, निवडणूक तज्ञ वा आधुनिक चाणक्य या नावांनी प्रसिद्ध झाले. त्यांच्या अखंड, अविरत, सतत राजकारण करत निवडणूक जिंकण्याच्या कौशल्याचे एवढे कौतुक झाले की, ते भारतातच काय पण, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेतही निवडणुका लढवून भाजपला बहुमत मिळवून देवू शकतात, अशी त्यांची ख्याती निर्माण झाली. याचे श्रेय त्यांच्या २४ तास राजकारणाच्या वृत्तीत होते. केंद्रीय मंत्री अमित शहा आपल्या गुप्त बिहार मोहिमेतून बाहेर आले, तोच त्यांनी दिल्लीतील मर्कजला परवानगी  दिली नसती तर देशात करोनाची साथ आली नसती, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य देखील ‘२४ तास राजकारण’ या तत्वास शोभणारे होते. प्रत्येक बाबीकडे राजकीय अंगाने पहाणे, हा त्यांच्या राजकारणाचा भाग बनून बसला आहे.

विशेष म्हणजे या काळात कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळ मधील शाळांना ‘ऑनलाईन क्लासेस’साठी अशाच प्रकारे टीव्ही भेट दिले पण अनेकांना ही कृती चुकीची वाटली. कारण केरळमध्ये जवळपास कोणत्याच निवडणुका नसताना मदत करण्याची काहीच अवश्यकता नव्हती, असे त्यांचे म्हणणे होते. राहुल गांधींना चोवीस तास राजकारण करता येत नाही, म्हणून त्यांचा पराभव होत आलेला आहे, असे मानणारा खूप मोठा वर्ग भारतात तयार झालेला आहे. त्यातून एकंदर सतत आणि चोवीस तास राजकारण याचे समर्थक वाढत चालले आहेत. देशातील प्रत्येक पक्षाला ‘चोवीस तास राजकारण’ गरजेचे वाटू लागले आहे. त्यामुळे भारतीय नागरिक हा नागरिक तर सोडाच, पण मनुष्यही राहिलेला नसून तो निव्वळ मतदार झालेला आहे, हेच यातून दिसून येत आहे.

राजकारण या शब्दाला खूप व्यापक अर्थ आहे. अर्थकारण, धर्मकारण, समाजकारण, युद्धनीती, दंडनीती आणि न्याय अशा अनेक बाबींनी मिळून, राजकारणाची व्याख्या अनेक राजकीय पंडितांनी आजवर  केली आहे. आधुनिक राजकीय व्यवस्थेत लोकशाही ही आजघडीला सर्वोत्तम राजकीय व्यवस्था समजली जाते. लोकशाहीतही दोष आहेत पण, त्यापेक्षा सर्वोत्तम व्यवस्था अजून तरी  राजकीय तज्ञांनी निर्माण केलेली नाही. भारतात संसदीय लोकशाही पद्धती आहे, मात्र देशातील राजकारणाचा बाज मात्र गेल्या चार पाच वर्षात पूर्णतः बदललेला आहे.

राजकारण हे लोकशाहीत सदैव चालू असते मात्र एकदा निवडणुका झाल्या की निवडून आलेले सरकार आपली ध्येयधोरणे अमलात आणते. संसदीय राजकारण आणि निवडणुकांचे राजकारण यात पूर्वी जो फरक होता तो मात्र आता पूर्णतः नष्ट झाला आहे. चोवीस तास राजकारण यात ‘काळ व्यापकता’ हा मुद्दा आहे मात्र काळा  बरोबर ‘जळी स्थऴी काष्ठी आणि पाषाणी’ म्हणजेच ‘यत्र तत्र सर्वत्र’ राजकारण हीच वृत्ती या चोवीस तास राजकारणाच्या ध्यासाचा भाग आहे.

केरळमध्ये एका हत्तीणीने स्फोटक पदार्थ मिसळलेले खाद्य सेवन केले आणि त्यात तिचा मृत्यू झाला. यातही राजकारण शोधले गेले. केरळमधील लोक साम्यवादी म्हणून मुद्दाम हत्तीणीस मारले इथंपासून ते, ती हत्तीण राहुल गांधीच्या वायनाड मतदार संघाच्या सीमेवर मरण पावल्यामुळे राहुल गांधी तिच्या मृत्यूस जवाबदार असल्याचे म्हटले गेले. हा २४ तासा बरेबर अष्टोप्रहर, अष्टदिशातून राजकारण याचा भाग होता. कोरोना विषाणू साथीत अनेक भारतीय नागरिक मृत्यमुखी पडत होते. पण हत्तीणीचा मृत्यू हा विषय देशातील प्रसिद्धी माध्यमांनी बनवला

चोवीस तास राजकारण ही वृत्ती लोकांत बळवण्यास २४ तास चालणा-या, वृत्तवाहिन्यांचा वाटा खूप मोठा आहे. मानवी मनातील विरोध, ईर्ष्या, क्रोध, मत्सर यांना अष्टोप्रहर सचेतन ठेवणे. यातून त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवरच नियंत्रण मिळवणे, हे या वाहिन्याचे साध्य बनले आहे. राजकीय नेत्यांनी देखील याचा वापर सुरू करून दर्शकांना यंत्रवत बनवले आहे. त्यातून २४ तास राजकारण अंगात एवढे भिनले गेले आहे.

अगदी एका कुटुंबात वा नातेवाईकात देखील राजकीय मतभेद वा समर्थन पराकोटीला जाऊन पोचलेले आहे. सुशिक्षित वा उच्च शिक्षित लोकही अत्यंत निराधार वक्तव्ये आणि समर्थन करताना दिसून येत आहेत. कारण सत्याचा संबध मानवी जीवनात खूप अल्प झाला असून, चोवीस तास राजकारणामुळे एक प्रकारची रोगट आणि विरोधाची चुरस, त्वेष आणि त्यातून द्वेषवृत्ती वाढीस लागली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही चोवीस तास राजकारणाने बाधीत केले आहे.

मध्यप्रदेशमध्ये ऐन कोरोनाच्या साथीच्या काळात, मध्य प्रदेशच्या आरोग्य मंत्री, राज्यातील आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडून बंगळुरू येथे जाऊन राहिले आणि पुढे तिथे सरकार कोसळून तिथे नवीन सरकार स्थापन झाले. यात राजकीय दोष कोणाचा हा भाग वेगळा परंतु ऐन कोरोनाच्या साथीच्या काळात अनेक भारतीय  मृत्यमुखी पडत असताना राजकीय महत्वकांक्षा या प्राधान्याच्या विषय ठरल्या. हा चोवीस तास राजकारणाच प्रताप होता. राजस्थानातही असाच चोवीस तास राजकारणाचा  प्रकार घडला. सरकार पाडण्यासाठी  प्रयत्न करणारे आणि ते वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे, दोन्ही बाजू चोवीस तास राजकारणाचे बळी पडले. कारण आजचा प्राधान्याचा विषय कोणता ही बाब कोणाच्याच मनात नव्हती. सर्वच राजकीय पक्ष समर्खत आपपल्या पक्षनेत्यांच्या  कृतीचे समर्थन करताना दिसून येत आहेत.

समृद्ध लोकशाहीसाठी राजकीय शिक्षण महत्वाचे असते. चोवीस तास जनतेचे हीत असा या चोवीस तास राजकारणाचा विषय असता, तर कदाचित त्यातून नेते व जनतासुद्धा  राजकीय दृष्ट्या अधिक शिक्षित आणि अधिक प्रगल्भ बनत आहे म्हणता आले असते. दुर्दैवाना देशात तशी स्थिती दिसत नाही. चोवीस तास राजकारण याचा अर्थ निव्वळ ‘सदा सर्वदा, सर्व प्रहर  वा सर्वत्र ‘ सत्तेचा ध्यास असा घेतला जातो आहे. परंतु त्याऐवजी २४ तास जनतेचे हित, सतत राजकीय प्रग्ल्भता वाढवणे आणि मानवी जीवन सर्वार्थाने समृद्ध करणाऱ्या जीवनातील सर्वांगांना कवेत घेणे, असा व्यापक असायला हवा.

ओशो त्यांच्या एका प्रवचनात, माणूस सतत चोवीस तास काय  विचार करतो, हे सांगताना एक उदाहरण दिले होते. एकदा एक हाडाचा सापळा सर्व लोकांना दाखवण्यात आला आणि प्रश्न विचारला की सापळा पाहून सर्वात प्रथम मनात आलेला विचार कोणता होता? त्यातील बहुसंख्यानी हे उत्तर दिले की, त्यावेळी  मनातील पहिला प्रश्न होता की, हा सापळा स्त्रीचा आहे की पुरुषाचा? म्हणजे माणसाची किंमत या लोकांच्या लेखी केवळ लैंगिकतेवर आधारीत होती. बाकी बाबी दुय्यम होत्या!

आजकालचे राजकीय नेते आपण सतत प्रसार माध्यमात राहावे, आपले अस्तित्व चोवीस तास सामाजिक आणि राजकीय पटलावर असावे, म्हणून चोवीस तास राजकारण करत असतील तर तशीही स्थिती नाही. राजकारणाचा अर्थ एवढा संकुचित झालेला आहे की, देशातील सत्ताधारी किंवा विरोधकही राजकीय कार्यक्रमाशिवाय साहित्य संमेलनात, काव्य मैफलीत वा एखाद्या नाट्य मेळाव्यास किंवा संगीत समारोहात अजिबात दिसून येत नाहीत.

चोवीस तास राजकारण ही बाब संवेदनशील व्यक्तीसाठी कठीण असते. जनतेने लोकशाहीत कोण्या एखाद्या पक्षाच्या बहुमताचे साधन न बनता, सर्वार्थाने परीपूर्ण जीवन जगावे, अशी भूमिका घेऊन वावरणारे नेते आधी होते. हे नेते, राजकीय नेते असण्यासोबतच लेखक, समीक्षक, वाचक, कवी आणि अगदी चित्रकारही होते. आज असा एकही नेता दिसत नाही. ‘चोवीस तास राजकारण’ या वृत्तीने राजकीय नेत्यांना पाच वर्ष, ३६५ दिवस, चोवीस तास, निवडणुकीतील उमेदवार बनवून संसदीय राजकारणातील स्टेट्समनशीपचा अंत केला आहे.

‘चोवीस तास राजकारण’ या वृत्तीतून प्रजेची किंमत एक माणूस म्हणून नव्हे, तर एक मतदार म्हणूनच होऊ शकते. उद्या एखाद्या आपत्तीत मनुष्यहानी झाली तर, मेलेले लोक कोणत्या पक्षाचे मतदार होते, हेच बघितले जाईल. जे येणा-या पिढ्यासाठी खूप घातक असेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.