Author : Prateek Tripathi

Published on Aug 18, 2023 Commentaries 0 Hours ago

जगभरातल्या देशांची सरकारे आणि धोरणकर्त्यांनी गेमिंग उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. गेमिंग उद्योगामुळे सायबर सुरक्षेला धोके निर्माण होत आहेत आणि अशा घटनांमध्ये वाढच होत आहे.

ऑनलाइन गेमिंग : सायबर सुरक्षेला असलेले धोके

1972 मध्ये Pong हा व्हिडिओ गेम आला तेव्हापासून ते अगदी 2023 मधल्या Hogwart’s Legacy या गेमपर्यंत व्हिडिओ गेमिंग उद्योगाने मोठी मजल मारली आहे. गेमिंग उद्योगात 2022 मध्ये 227 अब्ज अमेरिकी डाॅलर्सपेक्षा जास्त कमाई झाली. त्यामुळे या उद्योगात पूर्वीपेक्षा खूपच बदल झाले आहेत. 2024 पर्यंत जगातल्या गेमर्सची संख्या 3.32 अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. कोविड-19 मुळे झाली वाढ 2019 आणि 2021 मध्ये या उद्योगाचा विस्तार सुमारे 26 टक्क्यांनी झाला. ही अलीकडची वाढ हा कोविड-19 महासाथीचा परिणाम आहे.

असं असलं तरी सध्याच्या काळात मनोरंजनाच्या या लोकप्रिय प्रकारामुळे सायबरसुरक्षा धोक्यात आली आहे. गेमिंगवरच्या सायबर हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. 2021 मध्ये वेब अॅप्लिकेशनच्या हल्ल्यांमध्ये 167 टक्के एवढी प्रचंड वाढ झाली. 2022 मध्ये गेमिंग उद्योग हे ‘डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस’ या प्रकारच्या हल्ल्यांचे सर्वात मोठे लक्ष्य बनले. एकूण हल्ल्यांपैकी याचे प्रमाण सुमारे 37 टक्के होते. खात्याचं टेकओव्हर, फसवणूक आणि क्रेडिट कार्डाच्या माहितीची चोरी असे गैरप्रकार गेमिंगमध्ये सर्रास होत असतात.

यातली सर्वात गंभीर घटना एप्रिल 2023 मध्ये घडली. व्हिडिओ गेम चॅट सर्व्हरवरची अमेरिकेची गुप्तचर यंत्रणांची अतिशय गोपनीय कागदपत्रे लीक झाली. याला पेंटॅगॉन मधील सर्वात वाईट लीक असे म्हटले जाते.

पेंटॅगॉन लीक

या घटनेवरून, गेमिंगमधल्या धोक्यांचे परिणाम राष्ट्रीय सुरक्षेवर कसे होतात हे उघड झाले आहे. असे प्रकार होऊ शकतात याची कल्पनाच नसल्यामुळे आणि त्याच्या परिणामांचा अंदाज नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत.

एप्रिल 2023 मध्ये अनेक दस्तऐवज हे ‘टॉप सिक्रेट’ म्हणजेच अतिशय गोपनीय माहिती म्हणून ठरवण्यात आले होते. असे दस्तावेज ‘माइनक्राफ्ट’ या लोकप्रिय व्हिडिओ गेमसाठी वापरण्यात येणाऱ्या डिस्कॉर्ड सर्व्हरवर लीक झाले होते. एवढेच नव्हे तर हा डेटा नंतर ट्विटर आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडियावरही पोहोचला. यामध्ये रशिया- युक्रेन युद्धातली युक्रेनची स्थिती, युक्रेनच्या दारूगोळा पुरवठ्यातील समस्या आणि रशियन सैन्याकडून होणारे नुकसान यासारखी संवेदनशील माहिती होती.

याशिवाय अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांमध्ये विशेषतः इस्रायल आणि दक्षिण कोरियामध्ये हेरगिरी करत असल्याचेही संकेत यामध्ये मिळाले. ही माहिती उघड करण्यामागचा हेतू कळू शकला नाही पण युक्रेन संघर्षाबद्दल दोन जणांच्या ऑनलाइन संवादातून ही माहिती उघड झाली. यापैकी एक जण 21 वर्षांचा आहे आणि तो अमेरिकन नॅशनल गार्ड मध्ये एअरमन म्हणून काम करतो. या जॅक टेक्सेरा नावाच्या तरुणाने वादविवाद जिंकण्यासाठी हे दस्तावेज पोस्ट केले आणि माहिती लीक झाली. ही माहिती पहिल्यांदा फेब्रुवारी 2022 मध्ये Teixeira द्वारे तयार केलेल्या Thug Shakers Central नावाच्या डिसकॉर्ड ग्रुपमध्ये उघड झाली आणि नंतर इतर डिस्कॉर्ड सर्व्हर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरली.

अमेरिकन सैन्याने डिसकॉर्ड सारख्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांना यात गुंतवले आणि डेटा लीक करण्यासाठी सापळा लावला. डिसकॉर्ड सारख्या खेळांमध्ये तरुणांना शूटर गेम्सबद्दल बोलण्यासाठी आणि त्यात खेळण्यासाठी प्रवृत्त केले जाते. यात आधीच 17 हजार सदस्य आहेत. त्यांना भविष्यातले सैन्य असे म्हटले जाते. हा लष्कर भरतीच्या इ स्पोर्ट्स उपक्रमाचाच एक भाग आहे. हा उपक्रम गेमिंगच्या माध्यमातून तरुणांचा कल आणि आवड ओळखून त्यांना एकत्र करण्यासाठीच डिझाइन केलेला आहे.

गेममधले चलन, जुगाराचे कायदे आणि पैशांची अफरातफर

व्हिडिओ गेम्सच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे ते तयार करणाऱ्या कंपन्यांनी त्यांची कमाई आणखी वाढवण्यासाठी नवेनवे मार्ग शोधले आहेत. यामुळे व्हर्च्युअल किंवा इन-गेम चलनेही तयार झाली आहेत. अशी चलने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करता येतात. याच चलनांचा उपयोग पुढे छोटेछोटे व्यवहार करण्यासाठी किंवा लूट बॉक्स खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. छोट्या व्यवहारांमध्ये विशिष्ट सामग्री किंवा वैशिष्ट्यं अनलॉक करता येतात. यामध्ये लष्कराशी संबंधित नामावली वापरली जाते. मग शस्त्रास्त्रांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्यास प्रवृत्त केले जाते.

लूट बॉक्स हा असाच छोट्याछोट्या आर्थिक व्यवहारांचा प्रकार आहे. यामध्ये गेमिंग करणारे लोक व्हर्च्युअल उपकरणे किंवा लूट बॉक्स खरेदी करू शकतात. यात सौंदर्यप्रसाधनांसारख्या आभासी वस्तूंची निवड करता येते. यामध्ये गेमिंग करणाऱ्या व्यक्तीला काय मिळणार आहे ते आधी माहितीही नसते. याच कारणांमुळे इन-गेम चलन आणि लूट बॉक्स यावरून अलीकडे बरेच वाद निर्माण झाले आहेत. यात अल्पवयीन मुलांच्या भावनांचा आणि प्रेरणांचा गैरवापर केला जातो, असा आरोप होतो आहे. अनेक देशांमध्ये म्हणूनच अशी अॅप्स पूर्णपणे बेकायदेशीर ठरवण्यात आली आहेत. हा एक ऑनलाइन जुगाराचाच प्रकार आहे, असे मानले जाते. उदाहरणार्थ, 2018 मध्ये बेल्जियम सरकारने इलेक्ट्रॉनिक आर्ट्स या जगातील सर्वात मोठ्या व्हिडिओ गेम डेव्हलपरने बनवलेल्या फुटबॉल फ्रेंचायझी FIFA पॉइंट्स खरेदी करण्यावर बंदी घातली. FIFA पॉइंट्स हे गेमिंगमधलेच चलन आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये ऑस्ट्रियानेही त्याचे अनुकरण केले आणि FIFA पॅकला बेकायदेशीर जुगार म्हणून घोषित केले. अशा ऑनलाइन व्यवहारांमुळे गेमिंगमधल्या वस्तूंच्या किंमतीही वाढल्या आहेत. तसेच व्हिडिओ गेमच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग म्हणजे पैशांच्या अफरातफरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. व्हिडिओ गेमच्या या आभासी अर्थव्यवस्थेत लाखो डॉलर्सची उलाढाल होते. त्यामुळे बाजारात भरभराट आहे. त्यातच अशातून पैसै उधार देऊन सावकारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याला तरुण मुलं बळी पडतायत ही सगळ्यात चिंतेची बाब आहे. कॉल ऑफ ड्यूटी सारख्या गेमच्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी अनेकांची गर्दी होते आणि मग त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. गेमिंग करणारे लोक प्री-पेड, सिंगल- यूज क्रेडिट कार्ड वापरून इन-गेम चलन किंवा वस्तू खरेदी करू शकतात आणि नंतर ते वेगळ्याच वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवू शकतात. इथे उत्साही गेमर्स त्याची खरेदी करतात. हे व्यवहार बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून केले जातात आणि विक्रेत्याला लगेच पैसे मिळतात.

अशा व्यवहारांत त्या विक्रेत्याची ओळख किंवा त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोत याबद्दल काहीच माहिती मागे राहात नाही. मे 2023 मध्ये भारताच्या अमलबजावणी संचालनालयाने (ED) परदेशी नोंदणीकृत ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर देशव्यापी कारवाई केली. या कंपन्यांनी 4 हजार कोटींची अफरातफर केल्याचा ED ला संशय होता. या कंपन्यांनी क्युराकाओ, माल्टा आणि सायप्रस यासारख्या करसवलती असलेल्या देशांमध्ये नोंदणी केली होती. या कंपन्या ऑनलाइन गेमिंग व्यवहारांशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींच्या नावाने उघडण्यात आल्या होत्या. या व्यक्तींची खाती भारतातल्या बँकांमध्ये होती. या सगळ्या माहितीचा या कंपन्यांनी गैरफायदा घेतला.

ऑनलाईन गेमिंगसाठी सध्याची धोरणात्मक चौकट

एप्रिल 2023 मध्ये भारत सरकारने ऑनलाइन गेमिंगबद्दल एक धोरण बनवले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ऑनलाइन गेमिंगसाठी नवे नियम तयार केले. यानुसार ऑनलाइन गेमिंग दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले. पहिला प्रकार म्हणजे ऑनलाइन रिअल मनी गेम्स. जे गेम सेल्फ-रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन म्हणजे त्या कंपन्यांचेच नियंत्रण असलेल्या श्रेणीत येतात. अशा गेम्समध्ये पैसे गुंतवणे धोक्याचे ठरू शकते. नवीन नियमांनुसार सट्टेबाजी आणि सट्टेबाजीचा समावेश असलेल्या सर्व ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाइन गेमिंगमध्ये मध्यस्थ कोण आहे ते पाहिले जाते. त्याबरोबर यातले गैरव्यवहार रोखण्यासाठी पालकांची संमती आणि तक्रार-निवारण यंत्रणा यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या नियमांनुसार उद्योग प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांचा समावेश असलेल्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. हे तज्ज्ञ कोणत्या ऑनलाइन गेमना मंजुरी द्यावी ते ठरवतील. ही नियमावली एक चांगली सुरुवात आहे परंतु तरीही गेमिंगला असलेला सायबर सुरक्षेचा धोका कमी करण्यासाठी ती अपुरी आहे. ही यंत्रणा केवळ अशा खेळांवर लक्ष केंद्रित करते ज्यामध्ये वास्तविक चलन आणि जुगाराचा समावेश असतो. त्यामुळे अशा यंत्रणांच्या अधिकारांना मर्यादा असतात. सध्याच्या काळात बहुतेक ऑनलाइन गेममध्ये छोटे व्यवहार चालतात. त्यामुळे असे गेम नियम चुकवू शकतात. हे गेम केवळ आभासी चलनात बक्षिसे देऊन या कायद्यांना पूर्णपणे बगल देतात.

शिवाय या नियमांमध्ये लूट बॉक्सचा उल्लेख नाही आणि त्यामुळे FIFA पॉइंट्सच्या खरेदीसारख्या गोष्टी बेकायदेशीर ठरवता येत नाहीत. व्हिडिओ गेममध्ये लूट बॉक्सला परवानगी देणे हे जुगाराला परवानगी देण्यासारखेच आहे की नाही यावर वाद होऊ शकतो. तसेच त्याचा विशेषत: लहान मुलांवर आणि अल्पवयीन मुलांवर काय परिणाम होतो यावर चर्चा होणे आवश्यक आहे. याबद्दल जगभरातून नोंदवलेल्या प्रकरणांचा अभ्यास करून यातून कायदे बनवणाऱ्यांना पुरेसे मार्गदर्शन मिळू शकते. व्हिडिओ गेम वापरून होणाऱ्या पैशांच्या अफरातफरीच्या समस्येवर उपाय काढण्याचीही गरज आहे. याबद्दल कायदे तयार करण्यासाठी MeitY ने कायदा आणि न्याय मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि उद्योग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ऑनलाइन गेमिंग हे जागतिक मनोरंजन आणि मीडिया उद्योगातील सर्वात वेगाने वाढणार्या क्षेत्रांपैकी एक आहे आणि जगभरातील लोकांना एकत्र करण्यासाठी एक शक्तिशाली नवीन व्यासपीठ प्रदान करते.

या आभासी चलनाच्या व्यवहारांचा तपास करण्याची आणि नियमित व्यवहारांपासून ते वेगळे करण्याचा मार्ग शोधण्याचीही गरज आहे. यासाठी भारताने समविचारी भागीदारांसोबत काम करण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ गेमिंगचा उद्योग हा पैशांच्या मोठ्या अफरातफरीसाठी संभाव्य धोकादायक जागा आहे हे वेळीच ओळखायला हवे.

निष्कर्ष

ऑनलाइन गेमिंगमुळे सायबर गुन्हेगारांना आयतीच संधी मिळाली आहे. स्पर्धात्मक ऑनलाइन गेममध्ये फसवणूक आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरण्यापासून जे प्रकार सुरू झाले ते आता मोठे आर्थिक घोटाळे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेली माहिती उघड होण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. यामुळेच जगभरातील सरकारे आणि धोरणकर्त्यांनी ऑनलाइन गेमिंग उद्योग आणि त्यामुळे सायबर सुरक्षा धोक्यांमध्ये झालेली वाढ यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. ऑनलाइन गेमिंग हे जागतिक स्तरावरचे मनोरंजन आणि मीडिया उद्योगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे आणि जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी एक शक्तिशाली नवीन व्यासपीठही आहे. हे पाहता हा उद्योग सुरक्षित आणि जबाबदार पद्धतीनेच वाढेल याची खबरदारी घ्यायला हवी. तसेच काही घोटाळेबाज लोकांमुळे इतरांच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही यासाठी कायदेशीर पद्धतीने उपायही योजायला हवे.

प्रतिक त्रिपाठी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीचे प्रोबेशनरी रिसर्च असिस्टंट आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.