Published on Oct 25, 2023 Commentaries 0 Hours ago

हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायल कधी नव्हे एवढे हादरले आहे. त्याचे परिणाम मध्यपूर्वेच्या पूर्ण प्रदेशावरच होण्याची शक्यता आहे.

जागतिक संकटात इस्रायल पॅलेस्टाइन संघर्षाची भर

मध्यपूर्वेमध्ये मृत्यू आणि विनाशाचं भयाकारी तांडव  सुरू आहे. इस्त्रायलच्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण युद्ध आहे आणि हमासच्या हल्ल्यामुळे या दहशतवादी शक्तींचे ऊग्र रूप सगळ्यांसमोर आले आहे. गाझामधल्या रहिवाशांच्या नावाने हा हिंसाचार झाला असला तरी त्याचे भयानक परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. गाझामधल्या रुग्णालयांची शवागारे झाली आहेत. त्याचबरोबर आता युरोपच्या रस्त्यांवर ज्यू लोकांवरच्या हल्ल्यांच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. हमासविरोधात रोज नवे पुरावे इस्रायलच्या हाती येतायत तसतसा हमासचा रानटीपणाही उघड होतो आहे. इस्रायल या सगळ्याचा बदला घेणार हेही अटळच  आहे. इस्रायली आणि पॅलेस्टिनी लोकांमधल्या या हिंसक संबंधांवर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी याबद्दल जगभरातले अनेक लोक संभ्रमात आहेत. प्रादेशिक आणि जागतिक व्यवस्था बिघडवणाऱ्या या संकटाचा दोष नेमका कुणाचा याबद्दल राजकीय गणिते ठरवली जात आहेत.

हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायल पूर्ण हादरून गेले आहे आणि त्याचे परिणाम अवघ्या मध्यपूर्वेला भोगावे लागण्याची शक्यता आहे.    इस्रायलच्या अतिप्रचंड सुरक्षायंत्रणेमध्ये हमासच्या अतिरेक्यांनी सहज प्रवेश केला. त्यामुळे इस्रायलला मोठा धक्का बसला. इस्रायलमध्ये याबद्दल तीव्र संताप आहे. या हल्ल्यात 1200 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे याचा बदला घेतलाच पाहिजे ही इस्रायलमधल्या नागरिकांची भावना आहे. याबद्दल त्यांच्यात मोठी एकजूट निर्माण झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी हा अत्यंत कसोटीचा काळ आहे. ‘हमास’ला आयसिसप्राणेच वागवले जाईल आणि राष्ट्रांच्या समुदायातूनच बाहेर काढले जाईल, अशी घोषणा नेतन्याहू यांनी केली आहे. नेतन्याहू आणि माजी लष्करी प्रमुख बेनी गँट्झ यांनी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. यानुसार गँट्झ य़ांचा राष्ट्रीय एकता पक्ष नेतन्याहू यांच्या उजव्या वितारसरणीच्या युतीमध्ये सामील होणार आहे.

हीच वेळ आहे की आपण या क्रौर्याविरुद्ध एकजुटीने उभे राहायला हवे, असे आवाहन नेतान्याहू यांनी केले आहे. त्यांनी हमासविरुद्ध लढण्याचा निर्धार केला आहे. इस्रायलच्या गैरव्यवस्थापनाबद्दल नेतन्याहू यांनाच जबाबदार धरले जाईल हे ते जाणून आहेत. नेतन्याहू य़ांचे निर्णय एक मजबूत लोकशाही म्हणून आपल्या क्षमतेचा अभिमान असलेल्या इस्रायलसाठी निर्णायक ठरणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने इस्रायल अत्यंत दक्ष आहे, अशी इस्रायलची प्रतिमा होती. पण हमासच्या हल्ल्यामुळे ती पार धुळीला मिळाली आहे. इस्रायलवर असा हल्ला होऊ शकतो याचा इशारा इजिप्तने आधीच दिला होता. पण अशा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले. इस्रायलच्या इतिहासात सुरक्षेच्या दृष्टीने इतकी बेपर्वाई कधीच झालेली नव्हती आणि म्हणूनच याची सर्व जबाबदारी नेतन्याहू यांच्याकडे येते. या हल्ल्यामुळे नेतन्याहू यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इस्रायलमध्ये अलिकडच्या काही महिन्यांत राजकीय आणि सामाजिक मतभेद वाढत चालले होते आणि राष्ट्रप्रमुख नेतन्याहू या दलदलीतून मार्ग काढण्याऐवजी या संघर्षात तेलच ओतत होते. न्यायसंस्था कमकुवत करण्याच्या हेतूने नेतन्याहू यांनी आणलेल्या योजनांना राष्ट्रीय स्तरावर आव्हान दिले गेले. यामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय दुही निर्माण झाली.   हमासने याच गोंधळाचा फायदा घेतला आणि इस्रायलच्या राजकीय व्यवस्थेलाच धक्का दिला. इस्रायलमधले लोक आणि तिथलं राजकारण यावर याचा दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम होणार आहे.

न्यायव्यवस्थेच्या शक्तीवर निर्बंध घालण्याच्या नेतन्याहू सरकारच्या योजनांना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देण्यात येत होते, ज्यामुळे देशाच्या इतिहासातील सर्वात गंभीर राजकीय विभागणी झाली.

इस्त्रायल हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी जोरदार प्रत्युत्तर देतो आहे. त्याचवेळी अमेरिकाही इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अमेरिकेने इस्रायलला सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. इस्रायलच्या लष्कराने ‘गाझा’च्या भूप्रदेशात आक्रमणाची तयारी केली आहे. परंतु गाझा ताब्यात घेणे ही इस्रायलची घोडचूक ठरेल, असाही इशारा अमेरिकेने दिला आहे. इस्रायलच्या लष्कराने हल्ला चढवताना सामान्य लोकांचे बळी घेणार नाही ही खबरदारी घ्यावी, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. जोपर्यंत हमास 250 इस्रायली ओलिसांची सुटका करत नाही तोपर्यंत गाझाचा वेढा सुटणार नाही, अशी घोषणा इस्रायलने केली आहे. त्यामुळेच गाझा पट्टीतल्या हजारो लोकांचं जीवन धोक्यात आलं आहे. हमासने इस्रायली नागरिकांना ओलीस धरल्यामुळे इस्रायलच्या कारवाईला मर्यादा आहेत. तरीही उत्तर गाझामधील प्रत्येकाने दक्षिणेकडे स्थलांतरित व्हावे असा इशारा इस्रायलने दिला आहे.

इस्रायलने हमासचे पूर्ण उच्चाटन करण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे पॅलेस्टिनींना इस्रायली हवाई हल्ले आणि गाझाचा वेढा यांचा सामना करावा लागतो आहे. पॅलेस्टाइनचे प्रशासन कधीच कोलमडून गेले आहे. अनेक पॅलेस्टिनींसाठी हमास हाच याला पर्याय आहे. पॅलेस्टाइनमध्ये हमासचा वाढता प्रभाव हा कोणत्याही प्रकारच्या शांतता करारातला मुख्य अडथळा आहे. हमासने कधीही इस्रायलशी शांतता करार करण्याची कल्पना स्वीकारलेली नाही. त्यांनी ओस्लो शांतता प्रक्रियाही उधळून लावली.

हमासला हे इराणच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले. इराणने आपल्या प्रादेशिक रणनीतीमध्ये पॅलेस्टिनी इस्लामी जिहाद आणि हमास यांना अनेक वर्षं फूस दिली. हमासला इराणकडून निधी, शस्त्रास्रे आणि प्रशिक्षण मिळते. त्यामुळेच अरब देश आणि इस्रायल यांच्या संघर्षात इराण भूमिका कळीची आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे सर्वोच्च लष्करी सल्लागार हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यांचे समर्थन करत आहेत. पॅलेस्टाईन आणि जेरुसलेमची मुक्तता होईपर्यंत इराण इस्लामी सैनिकांना पाठिंबा देत राहील, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

हमासच्या हल्ल्यांमध्ये थेट इराणचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडे नाही. परंतु सौदी अरेबिया आणि इस्रायल यांचे वाढते संबंध इराणसाठी चिंतेचे कारण ठरले असते हे या हल्ल्यामागचे कळीचे कारण आहे. आता मात्र हमासच्या हल्ल्यांमुळे इराण आणि सौदी अरेबियाला एकत्र आले आहेत. या हल्ल्यांनतर आता अरब राष्ट्रांमध्ये एकजुटीची भावना आहे आणि त्यामुळेच इस्रायल- पॅसेल्टाइन संघर्ष आणखी व्यापक होण्याचाच धोका आहे. हमासने मध्य पूर्वेतील व्यवस्थेला जबर धक्का दिला आहे. त्यामुळेच इस्रायल येत्या काही दिवसांत नेमकं काय करेल यावरच या प्रदेशातली शांतता आणि स्थैर्य अवलंबून आहे.

दुसरीकडे मध्यपूर्वेमध्ये चीनचा प्रभाव वाढतो आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये अमेरिका केंद्रस्थानी राहणार हेही  पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अमेरिकेसारखी महाशक्तीच रणनीती आणि मुत्सद्देगिरी च्या आधारावर या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आणि समझोता करण्यासाठी प्रयत्न करू शकते. अमेरिका आता मध्य पूर्वेतील संकटाच्या निराकरणात अडकले आहे. त्यामुळे रशिया आणि चीन या दोघांनाही आपले धोरण चालाखीने आखावे लागेल. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आव्हान देण्याच्या हेतूने तेल अवीवशी त्यांचे एकेकाळी उबदार संबंध असूनही मॉस्को आणि बीजिंग या दोघांनीही इस्रायलचा त्याग करण्यात वेळ गमावला नाही. या सगळ्या घ़डामोडी पाहिल्या तर सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षाचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता नाही. म्हणूनच याचा परिणाम पूर्ण जागतिक व्यवस्थेवरच होऊ शकतो.

हे विश्लेषण प्रथम ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’मध्ये प्रकाशित झाले आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.