Author : Akop Gabrielyan

Published on Sep 07, 2020 Commentaries 0 Hours ago

एकूणच संपूर्ण जग कोरोनाच्या महासंकटाला सामोरे जात असताना, जगात कोणत्याही वादाला अधिक हवा न देता तो मिटेल कसा, यावर भर दिला जाणे हीच काळाची गरज आहे.

कोरोना ही मानवतेची परीक्षा

गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये मूळ धरणा-या कोरोना महासाथीने यंदाच्या मार्च ते मे या तीन महिन्यांत जगभरात आपले हातपाय पसरले. तेव्हापासून कोरोना महासाथीचा समर्थपणे मुकाबला करणे, हा जगातील प्रत्येक देशाचा महत्त्वाचा अजेंडा ठरू लागला आहे. सर्व देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि इतर महत्त्वाच्या संघटनांनी आपल्यासमोरील सर्व तातडीची कामे बाजूला ठेवत, कोरोना आव्हानाला प्राधान्य दिले आहे. यातील काही देशांना कोरोना महासाथीला ताकदीने तोंड देता आले नाही, म्हणून टीकेला सामोरे जावे लागत आहे. शिवाय त्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्गही वाढू लागला आहे. एकूणच कोरोना महासाथीने जगातील मानवतेची परीक्षा घेतली आहे.

एखाद्या महासाथीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जगाची कितपत तयारी आहे, संकटग्रस्त देशांना परस्पर सहकार्य करण्यात कोण किती सक्षम आहे, तसेच या सर्व मुद्द्यांवर सर्वांनाच आलेले अपयश या सगळ्याची ही परीक्षा आहे. तसेच या जागतिक महासंकटाला कोण कसे सामोरे जात आहे, याचाही अदमास यातून घेता आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जगभरात सारे काही आलबेल होते, अशातला भाग नाही परंतु कोरोनाने प्रत्येक देशाच्या प्राथमिकता बदलल्या हे मात्र खरे.

कोरोनाग्रस्त झालेल्या प्रत्येक देशाला आपल्यापुढील सर्व समस्या, अडचणी, आव्हाने यांना बाजूला सारून कोरोनावर लक्ष केंद्रित करावे लागले. काही समस्या तर अतिशय गुंतागुंतीच्या असून, त्यात एकाहून अनेक देशांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने एकूणच या सर्व जंजाळातून जागतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. या साऱ्याचे आंतरराष्ट्रीय संबंधांवर मोठे परिणाम होत आहेत.

कोरोनाचे गांभीर्य ओळखण्यात बराच कालापव्यय झाला, हे सर्वांनाच प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल. अनेक देशांनी सुरुवातीला तर या महासाथीकडे साफ दुर्लक्षच केले. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या इशा-यानंतरही अनेक देश कोरोनाबाबत गाफीलच राहिले. मात्र, कोरोनाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर ज्या भागातून या आजाराचा प्रादुर्भाव प्रथमतः सुरू झाला त्याच्या आसापासच्या देशांनी लगेचच खबरदारी घेत कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजण्यास सुरुवात केली. परंतु काही देशांनी अजूनही कोरोनाची गंभीर दखल घेतलीच नव्हती.

कोरोना जेव्हा इतर देशांमध्ये झपाट्याने पसरत होता त्यावेळी हा आजार आपल्यापर्यंत येणारच नाही, आपल्या लोकांना त्याची लागण होणारच नाही, अशा भ्रमात काही देश आणि त्यांचे नेते होते. परंतु कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आणि मृत्यूदरही वाढायला लागला त्यावेळी या गाफील देशांचे डोळे उघडले आणि त्यांनी तातडीच्या हालचाली सुरू केल्या. परंतु या आजाराचा मुकाबला कसा करायचा याचा कोणताही ठोस आराखडा त्या क्षणापर्यंत त्या देशांकडे नव्हता. म्हणजे कोरोना झालेल्या रुग्णाला नेमके कोणते औषध द्यायचे, याची काहीच माहिती कोणाकडे नव्हती.

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनने या महासाथीला आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यासाठी काही विशिष्ट प्रदेशांवर कठोर बंदी घातली, लाकांच्या मुक्त हालचालींवर निर्बंध आणले, शहरांमध्ये टाळेबंदी लागू केली. परिणामस्वरूप चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला. आचार-विचार आणि विहार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या युरोपीय देशांमधील सरकारांनी आपापल्या नागरिकांना सामाजिक वावराचे कठोर नियम पाळण्याचे आवाहन केले. परंतु कोणत्याही निर्बंधांची सवय नसलेल्या युरोपीय नागरिकांनी हे आवाहन तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. परिणामी युरोपात कोरोना झपाट्याने पसरला.

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला इटलीला. इटलीत कोरोनाचा समूहसंसर्ग झाला आणि पर्यटनावर आधारलेली इटलीची अर्थव्यवस्था झपाट्याने घसरली. इटलीच्या वाताहतीने युरोपीय समुदायातील इतर देशांचे डोळे खाडकन उघडले. युरोपातील प्रत्येक देशाने इटलीपासून धडा घेत आपापल्या देशात कठोर निर्बंध अंमलात आणण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम चांगला झाला आणि युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात तेथील देशांना यश आले. मात्र, असे असले तरी युरोपीय समुदायातील मोठ्या देशांना मोठा आर्थिक फटका बसला. परंतु त्यातून ते लवकर सावरले.

कोरोना संकटातून सावरल्यानंतर युरोपीय समुदायाने एकत्र येत समुदायातील ज्या सदस्य देशांना कोरोना महासाथीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करत तब्बल कैक ट्रिलियन युरोचे आथिक पॅकेज जाहीर केले. त्याचवेळी युरोप परिषदेने (कौन्सिल ऑफ युरोप) कोरोनाचा मुकाबला करतेवेळी मानवाधिकारांचे, लोकशाहीचे आणि कायदेकानूंचे रक्षण कसे करावे, याची मार्गदर्शक तत्त्वेच सदस्य देशांना घालून दिली.

कोरोना संकटाचे गांभीर्य ओळखून त्याविरोधात सुरू केलेल्या लढ्यानंतर या आजारावर नेमका कोणता उपचार प्रभावी ठरेल, यावर संशोधन सुरू झाले तसेच कोरोना विषाणूच्या अस्तित्वाबदद्ल शंका घेण्याचेही थांबले. कोरोनावर ठोस उपचार शोधण्यात जग अजूनही चाचपडत असताना काही देशांनी तर या आजारावर लस शोधण्याच्या कामात आपण बराच मोठा पल्ला गाठल्याचेही घोषित करून टाकले. रशियाने तर लस विकसित करण्यात आघाडीही घेतली. स्पुतनिक-व्ही नावाची लस आम्ही तयार केली असून, ती कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे रशियाने जाहीर केले. अर्थात लस संशोधनात रशियाने घेतलेल्या या आघाडीबाबत अनेक देशांनी संशय व्यक्त केला. कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा रशियाचा दावा राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे अनेकांनी ठासून सांगितले.

कोरोनाविरोधातील जागतिक लढ्यात दुसऱ्यांवर राजकीय कुरघोडी हाही एक महत्त्वाचा पैलू आहे, हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते. इराणला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. कोरोनाच्या विळख्याने हतबल झालेल्या इराणने अखेरीस जागतिक समुदायाकडे मदतीसाठी हात पसरले. असे असले तरी अमेरिकेने इराणवरील निर्बंध शिथिल करण्याची तयारी दर्शवली नाहीच. या पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञ असा दावा करतात की, कोरोनामुळे जागतिक वातावरण कमालीचे तणावाचे बनले आहे.

कोरोनामुळे अनेक देश त्रस्त झाले असून आपले नैराश्य बाहेर काढण्यासाठी ते संधीची वाट पाहात आहेत. कोरोनामुळे देशादेशांमधील आर्थिक आणि सामाजिक घडी विसकटू लागली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांची वीण उसवू लागली आहे. त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) उदाहरण पुरेसे बोलके आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखण्यात ही संघटना कमी पडली, असा आरोप करत अमेरिकेने डब्यूएचओचा निधी रोखला आणि नंतर या संघटनेतूनच बाहेर पडण्याचा अमेरिकी नेतृत्वाने निर्णय घेतला. “जागतिक आरोग्य संघटनेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणे गरजेचे आहे. परंतु त्यात ही संघटना कमी पडली आहे”, असा दावा करत अमेरिका डब्ल्यूएचओतून बाहेर पडली. तर संघटनेतील काही सदस्यांचे जुने हेवेदावे त्यासाठी कारणीभूत ठरले.

अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये काही कारणास्तव वाद निर्माण झाला. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळातही या दोन्ही देशांनी सीमेवर परस्परांविरोधात सैन्य उभे केले. वस्तुतः दक्षिण कॉकेशसमधील अर्मेनिया देश तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांच्या भूसीमांनी वेढला गेलेला आहे. त्यामुळे त्यास फारशा हालचालींना वाव नाही. देशांतर्गत कोरोनाचा वाढता विळखा आणि देशाच्या सीमांवर शत्रूचे सैन्य उभे, अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या अर्मेनियन सरकारला प्रचंड जनक्षोभाला सामोरे जावे लागले.

एकीकडे लोकांची कोरोनातून सुटका करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी सक्षम आरोग्ययंत्रणा नाही, त्यातून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही हा तणाव निर्माण केला आहे, असे आरोप अर्मेनियन सरकारवर झाले. अझरबैजानची स्थितीही याहून काही वेगळी नव्हती. कोरोनामुळे अझरबैजानची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. त्यामुळे तेथील जनतेचे आर्थिक प्रश्नांवरून लक्ष विचलित करून राष्ट्रप्रेमाचा डोस त्यांना पाजण्यासाठी म्हणून अर्मेनिनाशी युद्ध करण्याचा पवित्रा अझरबैजान सरकारने घेतला असल्याचा दावा तेथील काही तज्ज्ञांनी केला.

आंतरराष्ट्रीय समुदायाने या वादात वेळीच उडी घेत दोन्ही देशांच्या नेत्यांना समजावले नसते तर तुर्कस्तानने थेट लष्करी हस्तक्षेप करण्याची तयारी चालवली होती. तसे झाले असेत तर युद्धाचा भडका उडाला असता. याचाच अर्थ कोरोनाने शांततेच्या पुरस्कर्त्यांच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न करत अर्मेनिया आणि अझरबैजान, तुर्की आणि अर्मेनिया, तुर्की आणि ग्रीस यांच्यातील गैरसमज, बेलारूस, इराण आणि अमेरिका या देशांमधील अस्वस्थता यांना हवा दिली असती आणि आफ्रका, मध्यपूर्व व आशियापर्यंत त्याची झळ पोहोचली असती.

एकूणच संपूर्ण जग एका महासंकटाला सामोरे जात असताना कोणत्याही वादाला अधिक हवा न देता तो मिटेल कसा, यावर भर दिला जाणे हीच काळाची गरज आहे. एका कठीण अशा वळणावर कोरोनाने जगाला आणून ठेवले आहे. अशा परिस्थितीत एकतर जग संपूर्ण एकवटेल तरी किंवा मग परस्परांतील हेवेदावे, रागलोभ,शत्रुत्व कुरवाळत अनेक देश परस्परांचे नुकसान तरी करून घेतील. जागतिक नेतृत्वात थोडा जरी शहाणपणा असेल तर निदान सध्याच्या कठीण काळात तरी जगात तणाव निर्माण होईल, असे कोणी वागणार नाही, ही अपेक्षा.

कोरोनामुळे घसरलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी असे होणे आत्यंतिक गरजेचे आहे. जगाचा इतिहासही तसाच आहे. जेव्हा जेव्हा मानवतेवर संक्रांत आली आहे तेव्हा तेव्हा त्याविरोधात जगाने एकत्र येऊन त्या आव्हानाचा मुकाबला केला आहे. कोरोनाचे संकटही तसेच आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Akop Gabrielyan

Akop Gabrielyan

Akop Gabrielyan PhD is a researcher and graduate of Russian-Armenian University specialised in international relations and particularly the questions of international integration processes international institutions ...

Read More +