Published on May 26, 2020 Commentaries 0 Hours ago

कोविड-१९ ची साथ हा काही एक इव्हेंट नाही. जशी संहारक अण्वस्त्रे हे वास्तव आहे, त्याप्रमाणे यापुढे साथीचे आजार हे सत्य असणार आहे. त्यासाठी सज्ज राहायलाच हवे.

भविष्यात हवी साथीचे आजार रोखण्याची सज्जता

कोरोनाच्या साथीने आज केवळ अर्थव्यवस्थेसमोर अडथळे उभे केले नाहीत, तर जगभरातील मानवी विकासाच्या संकल्पनेलाही त्याने हादरे दिले आहेत. उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुर्मान हे मुद्दे मानवी विकासाचा पाया म्हणून ओळखले जातात. पण कोरोनाने या आरोग्याच्या समस्येचे भयानक रूप जगापुढे उघड केले. तसेच, आर्थिक विकासातूनच मानव विकास साध्य होऊ शकतो हा समजही कोरोनाचा सामना करताना क्षणभंगूर ठरला आहे.

UNDP (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम) च्या मानव विकास निर्देशांकानुसार जगाची वाटचाल निश्चितच विकासाकडे होत नव्हती, हेच कोरोनाने सिद्ध केले. जगभरात विकासाच्या नावाखाली प्रत्येक देश आपल्या मनाप्रमाणे वागत होता. या विकासाच्या प्रारूपांना या अभूतपूर्व आपत्तीमुळे एका फटक्यात तडा गेला आहे. त्यामुळे आता तरी, या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सारे जग ठप्प झाले असताना या कळीच्या मुद्द्यावर विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी अगदीच शून्यातून सुरूवात न करता गेल्या काही वर्षात उचलल्या पावलांना कशी दिशा देते याईल याकडे लक्ष द्यायला हवे.

कोविड-१९ हा काही एक इव्हेंट नाही. जसे जगभर असलेली संहारक अण्वस्त्रे हे वास्तव आहे, त्याप्रमाणे यापुढील काळात साथीचे आजार हे सत्य असणार आहे. काळानुसार भविष्यात साथीच्या आजारांचे प्रमाण आणि तीव्रता वाढतच जाणार असल्याचे स्पष्टच आहे. त्यामुळे यापुढील काळात मानव विकास निर्देशांकात साथीच्या आजारांसाठीची सज्जता या नव्या निर्देशांकांचा समावेश करावा लागेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची क्षमता आणि भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाची तयारी, या निर्देशांवर राष्ट्रांची कशाप्रकारे तयारी आहे हे ठरू शकेल.

मानव विकास निर्देशाकात सार्वजनिक आरोग्याला स्थानच नाही

मानव विकास निर्देशांकात आयुर्मान (जन्मापासून), शिक्षण (शालेय), जीवनमान (राष्ट्रीय सकल उत्पन्न ) हे तीन प्रमुख घटक आहेत. पण, मानव विकासाचे मोजमाप करणारे सध्याचे हे मॉडेल अचूक असल्याचे दिसत नाही. ‘लोकांपेक्षा आर्थिक वृद्धीला प्राधान्य’ या मॉडेलवर टीका होत आहे. त्यामुळे कोणत्याही देशांची कार्यक्षमता मोजताना, त्या देशातील सार्वजनिक आरोग्यांतर्गत साथीच्या आजारांचा मुकाबला करण्याची यंत्रणेचा विचार केला जात नाही. सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय, तर रोगराई रोखण्याची क्षमता, आयुष्य वाढवण्यासाठी होणारे प्रयत्न आणि समूह संक्रमण होऊ नये यासाठी संघटीत प्रयत्न करणे, त्यासाठी परिसर स्वच्छ राखणे आदी होय.

मानव विकास निर्देशांकात अजूनही स्थानिक आजारांमुळे कमी होणाऱ्या आयुर्मानावरच लक्ष केंद्रीत केलेले आहे, मात्र साथीच्या आजारांकडे सारखेच लक्ष दिले जात नाही. गेल्या काही वर्षांमध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर परिस्थिती हाताळताना आणीबाणीची वेळ ओढावते. सार्स, मेर्स, एच१एन१, एव्हीएन इन्फलुएंझा यावेळी अशीच परिस्थिती दिसून आली. त्यामुळेच यापुढे एखाद्या देशामध्ये साथीच्या आजारांना अटकाव घालण्याचे व्यवस्थापन कितपत विकसित झालेले आहे, यावर त्या देशातील लोकांचे जीवनामान किती सुरक्षित आहे हे ठरेल.

आलेख १

स्त्रोत- कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटर, जॉन हॉप्किन्स विद्यापीठ आणि मेडिसिन

टीप- मानव विकास निर्देशांक २०१९  आधारे

वरील आलेख १ मध्ये विविध देशांमधील कोविड-१९ चा संसर्ग झालेल्यांची संख्या आणि मृत्यूच्या पार्श्वभूमीवर या देशांचा मानव विकास निर्देशांकानुसारचे स्थान याविषयी चर्चा करण्यात आली आहे.

जर्मनी, स्वीडन, अमेरिका, इटली आणि ब्रिटन या देशातील मानव विकास निर्देशांक खूप वरचा आहे. शिवाय सर्वाधिक आयुर्मान असलेले हे देश आहेत. मात्र  याच देशांना सर्वाधिक फटका बसला आहे. २ मे २०२०  च्या आकडेवारीनुसार याच देशांमध्ये कोरोना व्हायरसने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक झालेले दिसून येत आहे. सामान्य परिस्थितीत येथे आरोग्य व्यवस्था भक्कम दिसून येत असली तरी, साथीच्या आजाराच्या एका फटक्यात उभी केलेली ही सर्व व्यवस्था नेस्तनाबूत होत असल्याचेही दिसून येत आहे.

मानव विकास निर्देशांकाने आतापर्यंत नेहमीच्या आजारांवर लक्ष केंद्रीत केले असून जीवनमान वाढविण्यावर भर देताना साथीच्या आजारांकडे सारखेच लक्ष देण्याकडे मात्र दुर्लक्ष केलेले आहे.

याबाबत दक्षिण कोरिया आणि न्यूझिलंड हे दोन्ही देश अपवाद ठरले आहे. या दोन्ही देशांचे सरासरी आयुर्मान अनुक्रमे ८३.५० वर्षे आणि ८२.८० वर्षे आहे. मानव विकास निर्देशांकात या देशांचा क्रमांक हा खूप वरचा आहे. साथीचे संक्रमण कमी व्हावे आणि मृत्यू दर कमी राखता यावा, यासाठी या देशांनी केलेले प्रयत्न आणि उपाययोजनांचे मॉडेल जगभरात अंगिकारले जात आहे.

या आलेखातील दुसरी वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे व्हिएतनाम, भारत आणि दक्षिण आफ्रिका या विकसनशील देशांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी होय. मानव विकास निर्देशांकानुसार मध्यमप्रतीची कामगिरी असलेल्या या देशांनी कोविड-१९ चे संक्रमण आणि मृत्यूचे प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी राखण्यात यश मिळविले आहे.

या काळादरम्यान दिसून आलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण ट्रेंड्सचे निष्कर्ष असे आहेत.

एक – नियमित आजारांमुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवणाऱ्या आरोग्य यंत्रणेचा साथीच्या रोगांदरम्यान मात्र जसाच्या तसा वापर करू नये. दुसरे – असे की, जीवनमानाचा दर्जा उच्च राखण्यावर अधिक लक्ष देऊन विविध आजारांची संख्या कमी करण्यात यश येते, हे खरे असले तरी त्याची एक दुसरी निसरडी बाजूही आहे. देश आणि परिणामी नागरिक त्यांच्या येथील आरोग्य व्यवस्थेला गृहित धरायला सुरवात करतात. तिसरे – विशेष करून विकसित देशांनी अन्न, निवारा आणि आरोग्य क्षेत्रातून अंग काढून घेत अतिरिक्त खासगीकरण आणले, त्याची किंमत साथीच्या आजारादरम्यान मोजावी लागली आहे. शेवटचे म्हणजे… महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थापन करण्यास सरकारने सक्रिय हस्तक्षेप केल्यास सकारात्मक परिणाम दिसतात.

मानव विकासाचा पुनर्विचार, साथीच्या आजारांसाठीची सज्जता

अधिक आयुर्मानामुळे कमी मृत्यूदर असलेल्या देशांच्या मानव विकास निर्देशांकावर साथीच्या रोगांदरम्यान कसा परिणाम झाला हे आपण पाहिले. अशा परिस्थितीत नियमित आजाराबाबतच्या मूल्यमापनाचे व्यवस्थापन होणे हे आवश्यक आहेच. पण त्सासोबत यात साथीच्या आजारांसाठीची सज्जता या नवीन निर्देशकाची भर घालण्याची आवश्यकता आहे. या नवीन निर्देशकाचा तीन पातळ्यांवर विचार व्हायला हवा.

१. सरकारतर्फे धोरणात्मक प्रतिसाद

कोणत्याही आपात्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारचा प्रतिसाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कोविड-१९ सारखी सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी हाताळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्थिर आणि सुसंगत धोरण केल्यास, त्याचे मोठ्या प्रमाणात परिणाम दिसू शकतात. साथीच्या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित देशांना किती कालावधी लागला, यासाठी ‘पॉलिसी रिस्पॉन्स’ या निर्देशकाचा समावेश याविषयीचे धोरण आखताना करावे लागेल. तसेच हे धोरण आखताना बिगर-औषधी उपायांशिवाय करण्यात आलेल्या उपाययोजना, जसे की लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंन्सिगचा समावेश करण्याची गरज आहे.

आलेख २

स्त्रोत: अवर वर्ल्ड

कोविड-१९ चे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी (तीन दिवस) निश्चित करण्यासाठी हा आलेख तयार करण्यात आलेला आहे. शंभर किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण झाल्यानंतर रुग्ण संख्या दुप्पट होण्यास सरासरी पाच दिवस किंवा त्याच्या मागेपुढे दोन दिवस लागतात. याच पध्दतीप्रमाणे १०० किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण झाल्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर किती रुग्ण झाले, याची सरासरी काढली गेली. सरकारने लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग सारख्या उपाययोजना योजल्यानंतरच्या एक महिन्याच्या कालावधीतील रुग्णसंख्येचा विचार केला गेला. अखेरीस तयार झालेल्या या आलेखानुसार संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कडक उपायांमुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या सुरुवातीच्या वेगाला रोखता आले, त्याची सरासरी आणि सुरुवाताच्या काळातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या कालावधीच्या सरासरीचा आलेख काढताना विचार केला गेला.

प्रमाण =  संसर्ग रोखण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नानंतर रुग्ण संख्या दुप्पट होण्याची सरासरी

पहिल्या काही रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी

सरासरी प्रमाण अधिक असणे चांगले मानले जाते. सरकारमार्फत राबवलेले बिगर-औषधी हस्तक्षेप जसे लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग याची परिणामकारकता यातून सिद्ध होते. आलेख २ नुसार, सरकारने योग्य प्रतिसाद दिल्याचे सकारात्मक परिणाम दक्षिण कोरिया, न्यूझिलंड आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये दिसून आले आहे. या देशांनी पहिल्या टप्प्यात रोगाची बेरजेत होणारी भरमसाठ वाढ होण्यास अटकाव केला. तसेच साथीच्या दुसऱ्या टप्प्यातील लाटेचा प्रभावही कमी केला. या सर्व यशाचे श्रेय सरकारच्या सक्रिय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला जाईल, याचा समावेश मानव विकास निर्देशांकात होण्याची आवश्यकता आहे.

याशिवाय भारत आणि दक्षिण आफ्रिका देखील या यशाचे साक्षीदार आहेत. या देशांमध्ये आरोग्याच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधा अभिमान बाळगण्यासारख्या मजबूत नाहीत. पण रोगाचा बेरजेत होणारा प्रसार रोखण्यासोबतच इतर देशांसाठी अत्यंत आवश्यक अशी औषधे, पीपीई सूटची आदींची निर्यात देखील केली. या सर्व यशाचे श्रेय सरकारच्या सक्रिय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाला जातो. याचाही समावेश मानव विकास निर्देशांकात होण्याची आवश्यकता आहे.

आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधांच्या क्षमतेचे मोजमाप

साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी मजबूत अशा आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधांची गरज असते. या आरोग्य सुविधांना साथीचे आजार रोखणे, त्यावरील उपचार तसेच लस शोधून काढण्याचा दबाव, आव्हान आणि गरजांपुढे टिकाव धरता आला पाहिजे. याबाबत कोविड-१९ची साथ ही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांपुढे भले मोठे आव्हान म्हणून उभे राहिले आहे. आपल्या येथील सुसज्ज अशा आरोग्य सुविधांबाबत जगातील जे देश अभिमान बाळगत होते तिथे व्हेंटिलेटर्स, पीपीई आणि मास्क सारख्या वस्तुंचा तुटवडा भासत असून औषधे तसेच तपासणी क्षमतांचीही कमतरता भासत आहे.

अमेरिका, इटली आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. या देशांमध्ये जीवनमानातील सुधारणेमुळे नियमित आजारांच्या संख्येत घट झाली असली तरी त्यातून निर्माण झालेली आरोग्यसुविधा ही मात्र कोविड-१९ सारख्या साथीने निर्माण केलेल्या आरोग्य आणीबाणीचा मुकाबला करण्यात असमर्थ ठरली. विविध देशांनी भविष्यात येऊ घातलेल्या साथींचा मुकाबला करण्यास सज्ज रहावे यासाठी प्रस्तावित निर्देशांक आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील कमतरतेचे मूल्यमापन करणार आहे.

अचानक वाढणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याच्या हेतुने (१० हजार किंवा त्यापेक्षा अधिक) मूल्यमापन करण्यात येणाऱ्या प्रमुख बाबींपैकी प्रथम- रुग्णालयांची सध्याची क्षमता, कम्युनिटी क्लिनिक, नर्सिंग होम, इत्यादींचा समावेश असेल. दुसरे-  सर्वसाधारण धोरणात्मक प्रतिसाद जसे चाचणी क्षमता, पीपीई, मास्क, ग्लोव्ह्जसारख्या आवश्यक वैद्यकीय मालाची खरेदी तसेच उत्पादनादरम्यान येणाऱ्या अचडणींचे विश्लेषण करणे होय. अचानक आदळलेल्या साथीच्या रोगात सद्यस्थितीतील आरोग्य व्यवस्थेत किमान अडथळा निर्माण व्हावा याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सोई-सुविधांचा सुयोग्य वापर

साथीचा आजार हा रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टी जसे जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि औषधांच्या नियमित पुरवठ्यावर  परिणाम करतो. लोकांच्या सुरक्षिततेसाठी विविध देश कठोर पावले उचलत असल्याने अचानक अवलंबलेल्या या उपायांमुळे आधुनिक जगण्यात आवश्यक असलेल्या पुरवठा साखळीवर परिणाम होत असतो. अशावेळी साधन सामग्रीची ने-आण करणे कठीण होऊन जाते. अशा साथीच्या काळात अत्यावश्यक ‘सोयीसुविधांचा’ सुरळीत पुरवठा करणे तथा ही पुरवठा साखळी कायम राखण्यास एखादा देश कितपत तयार आहे याबाबतची क्षमता जाणून घेणेही आवश्यक ठरते.

साथीच्या काळात अत्यावश्यक वस्तुंचा सुरळीत पुरवठा करणे म्हणजे एकीकडे अचानक बसणाऱ्या धक्क्याचा प्रभाव सौम्य करत शेतीमाल, अन्नधान्य, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांच्या तुटवड्यावर नाविन्यपूर्ण पद्धतीने उपाय शोधून काढणे हे आहे. उदाहरणार्थ भारतात वापरात नसलेल्या रेल्वेच्या बोगी आणि हॉटेल्सचे रुपांतर विलगीकरण केंद्रात करण्यात आले. जेणेकरून भविष्यकाळात तुटवडा भासू नये. अशा प्रकारच्या उपायांमुळे दुहेरी दबाव कमी होतो आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारच्या स्त्रोतांचा वापर होत असल्याचे दिसून येत असल्याने ही संकल्पना महत्वाची ठरते.

अन्नधान्य तसेच वैद्यकीय मालाचा पुरवठा करणारी पुरवठा साखळी ही संकटकाळात आलेल्या अडचणींपासून कितपत सुरक्षित आहे हे प्रस्तावित निर्देशकाद्वारे समजून घेता येईल. पुरवठा साखळीदरम्यान आलेले अडथळे दूर करण्यामध्ये देशांना लागणारा कालावधी तसेच त्यासाठी अवलंबलेल्या नाविन्यपूर्ण पद्धती याचेही मोजमाप करता येईल. अखेरीस, खाद्यपदार्थ, वैद्यकीय माल तसेच उपकरणांसारख्या जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्यबाबतच्या पायाभूत सुविधांबाबत देश कितपत स्वयंनिर्भर आहे याचेही या निर्देशकाद्वारे मोजमाप करता येणार आहे.

समारोप

एखाद्या देशाचे आर्थिक आणि सामाजिक परिमाणांवर मोजमाप करावयाचे झाल्यास मानव विकास निर्देशांक हा महत्वाचा निर्देशक मानला जातो. तथापि, १९९० साली समावेश करण्यात आलेल्या या निर्देशकाच्या व्याख्येत नवीन बदलांचा समावेश करून विस्तार करणे आवश्यक आहे. भविष्यात साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारीबाबत मानव विकास निर्देशकाचा पुनर्विचार करण्यासाठी कोरोना विषाणूने सर्वांना जागे करण्याचे काम केले आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Prachi Mittal

Prachi Mittal

Prachi Mittal was an Research Assistant with ORFs Centre for New Economic Diplomacy(CNED). Her research focuses on development economics Indian economy and the Sustainable Development ...

Read More +
Shreya Mishra

Shreya Mishra

Shreya Mishra is Masters in International Relations. She currently works as a Junior Research Fellow at Jindal School of International Affairs O.P. Jindal Global University. ...

Read More +