Published on Jul 02, 2020 Commentaries 0 Hours ago

चीन ऐतिहासिक काळापासूनच ’सॉफ्ट पॉवर’ तंत्रामध्ये आघाडीवर आहे. कोरोनाकाळात पुन्हा एकदा आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चीनने हे तंत्र घासूनपुसून पुढे आणले आहे.

चीनची ‘सॉफ्ट पॉवर’ही वाढतेय!

चीनी मोबाईल अॅप बंद करण्यावरून आपल्याकडे सध्या बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. चीन जगभरात आपले कसे हातपाय पसरतो आहे, याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. यापुढे देशादेशातील लढाया या सीमेवर कमी आणि लोकांच्या मनामध्ये अधिक लढल्या जातील, अशी परिस्थिती आहे. या लढायांसाठी एक तंत्र वापरले जाते, ते म्हणजे ’सॉफ्ट पॉवर’चे. चीन ऐतिहासिक काळापासूनच या ’सॉफ्ट पॉवर’ तंत्रामध्ये आघाडीवर आहे. आता कोरोनाकाळात पुन्हा एकदा आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चीनने हे तंत्र घासूनपुसून पुढे आणले आहे.

सध्या कोविड–१९ मुळे उद्भवलेली संपूर्ण जगासमोरील आव्हाने जसजशी व्यापक होत चालली आहेत, तसतशी विविध राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरजही वाढू लागली आहे. आजपर्यंत या अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अमेरिका आणि युरोपीय देशांची आघाडी असायची. पण, आता कोरोनामुळे ते आपपल्या सीमांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची अनुपस्थिती, चीनला जगभर आपले प्रस्थ वाढवण्यास अगदीच पथ्यावर पडली आहे.

एक उदयाला येणारी महासत्ता म्हणून, स्वत:ला प्रस्थापित करायचे असेल आपल्याला ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून स्वतःचे अस्तित्व जपावे लागेल. ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजेच एक सांस्कृतिक, बौद्धिक ताकद असण्याला किंवा असैनिकी सत्तेला महत्त्व आहे, हे चीनच्या नेतृत्वाने फार पूर्वीच ओळखले होते. किंबहुना चीन सरकारच्या विदेशनीतीचा तो आता एक अभिन्न भागच बनला आहे. चीनच्या राजेशाही इतिहासाचा धांडोळा घेत, आजघडीला त्या देशाने अंगीकारलेली धोरणे ताडून पहायचे म्हणाल तर ही ‘सॉफ्ट पॉवर’ नीती फार पूर्वीपासून प्रचलित असलेली आढळल्यास नवल वाटू नये.

चीनच्या सम्राटांनी आपल्या मध्यवर्ती सत्तेतल्या (middle kingdom) आर्थिक आणि सांस्कृतिक उत्पादनांच्या माध्यमातून पुऱ्या आशिया खंडात चीनच्या साम्राज्याचा बोलबाला केला होता. पुढच्या काळात जरी परकीय आक्रमकांपासून आपल्या सीमा सुरक्षित राखण्यात चीन अपयशी ठरला खरा, पण तरीही आपल्या देशाचा प्रभाव अंतर्गतरित्या टिकवून ठेवण्यासाठी या ‘सॉफ्ट पॉवर’ रणनीतीचा वापर चीनी समाजाने संस्थात्मकरित्या सातत्याने सुरूच ठेवला होता. याच कारणापोटी आक्रमक परकीयांमुळे चीनी सत्ताधारी जरी बाजूला सारले गेले तरी त्याने फारसा फरक पडला नाही.

आता तर गेल्या काही वर्षात चीनच्या नेतृत्वाने ही ‘सॉफ्ट पॉवर’ नीती खूप विकसित केली आहे. त्याचप्रमाणे चीनच्या नेतृत्वाने ‘सॉफ्ट पॉवर’च्या आपल्या भूमिकेला नवनवीन आयाम देखील दिलेले दिसतात. चीनचे माजी अध्यक्ष हु जिन्ताओ यांनी Uan li liang अर्थात ‘सॉफ्ट पॉवर’ नीतीचा वेळोवेळी उल्लेख केलेला दिसतो. तीच नीती शी जिंगपिंग यांच्याकडे परंपरेने चालत आलेली आहे. या ‘सॉफ्ट पॉवर’ च्या माध्यमातून चीनी समाजाचा पुनरुद्धार होणार आहे आणि राष्ट्राच्या गौरवप्राप्तीचे महान स्वप्न साकार करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून उपयोगाचे आहे, याची चीनी समाजाला खात्री आहे.

‘सॉफ्ट पॉवर’च्या माध्यमातून कोणताही देश आपल्या संरचनेनुसार अन्य देशांना स्वत:बद्दल सकारात्मक बनवण्यासाठी काम करत असतो. तसेच, आपला राष्ट्रीय स्वार्थ साध्य करण्याच्या दृष्टीने अन्य देशांना आपल्याकडे वळवत असतो. मात्र ही ‘सॉफ्ट पॉवर’ कोणत्या निश्चित श्रेणीमध्ये समाविष्ट करता येत नाही. उलट त्याच्याद्वारे साध्य केलेल्या परिणामांवरूनच तिची महती कळते. एकीकडे ‘हार्ड पॉवर’ किंवा सैनिकी वा कूटनीतिक बळाचा वापर करण्यामागे महत्त्वाचा उद्देश असतो तो, ‘समोरच्याची कृती बदलवण्याचा’; तर ‘सॉफ्ट पॉवर’ची मदार असते, ‘समोरची कृती त्याच्या नकळतपणे आपल्याला अनुकूल करण्यात.’

एखादा देश आर्थिक दृष्ट्या सबळ असणे याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आकर्षण नक्कीच असते. ज्यामुळे आपली संस्कृती आणि विचारधारा प्रसारित करण्याचा जसा चांगलाच वाव मिळतो. त्याचप्रमाणे जिथे स्थिर सत्ताकेंद्र उभे राहिलेले नसेल अशा जागी आपले पक्के बस्तान सुद्धा बसवता येते. चीनची वाढती आर्थिक सत्ताप्रणाली सध्या याच दिशेने प्रवास करते आहे. विशेषकरून जे विकसनशील देश आर्थिक साहाय्याद्वारे चीनच्या छत्रछायेखाली आले आहेत त्यांचा प्रवास तिकडेच चाललेला आहे.

डेनिस ई झेंग यांच्या मतानुसार चीनच्या ‘सॉफ्ट पॉवर’ची व्यापक अर्थाने व्याख्या करायची झाली तर मोठमोठ्या आर्थिक गुंतवणुका, देवाण–घेवाण कार्यक्रम, मुत्सद्देगिरी, अनेक बहुआयामी संघटना आणि मानवतावादी साहाय्य हे तिचे विविधांगी कंगोरे आहेत. चीन जगाच्या आर्थिक क्षेत्रात मजबूत पाय रोवून उभा असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने मजबूत पकड मिळवली आहे, ज्याला चीनच्या सांस्कृतिक योगदानापेक्षा जास्त महत्त्व आहे. चीनच्या आर्थिक सत्तेने सुरुवातीला जेव्हा हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा तिच्या विस्ताराचा स्पष्ट अंदाज कोणाला नव्हता, पण  बीजिंगच्या भक्कम आर्थिक पाठबळामुळे हे सत्ताकेंद्र फ़ार वेगाने विकसित झाले (आणि स्थिरही.)

चीनची उत्पादनक्षमता आता पूर्वपदावर आल्यासारखी भासते आहे. एप्रिल महिन्यात, आंतरराष्ट्रीय आयातीमध्ये १४.२% घट झाली असली तरी, चीनच्या निर्यातीत दरवर्षीप्रमाणे सातत्याने ३.५% वाढ होते आहे. ज्यामुळे जाणकारांनी निर्यात घट होईल, अशे वर्तवलेले अंदाज धादांत चुकले आहेत. अर्थातच त्याला कारणही तसेच आहे. चीनने या कोरोना काळात जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उत्पादनांची निर्यात केली आहे.

चीनची अर्थव्यवस्था कुशल स्तरावरची विविधांगी उत्पादने व संपर्क साधने आणि टिकाऊ पायाभूत सुविधा अशा दोन स्तरांवर उभी आहे. ट्रिव्हियम नॅशनल बिझनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्सच्या १२ मे २०२० रोजीच्या आकडेवारीवरून चीनची सद्यस्थितीतली आर्थिक क्षमतेची उपयोगिता ८७ टक्क्यावर आहे. मात्र सध्या कोविड–१९ च्या संकटामुळे चीनी उत्पादनांची मागणी लक्षणीय रित्या घसरली आहे. मात्र तरी देखील आर्थिक क्षेत्रातली चीनची ही मजबूत वाढ त्याच्या ‘सॉफ्ट पॉवर’ रणनीतीला भरघोस पाठबळ देते आहे.

चीनच्या ‘सॉफ्ट पॉवर’ रणनीतीचा प्रभाव आफ्रिकेतल्या विकसनशील देशांप्रमाणेच लॅटिन अमेरिकी देश आणि दक्षिण–पूर्व आशियायी देशांमध्ये चांगलाच जाणवतो आणि तो जगाच्या अन्य भागातही वाढतो आहे. मात्र पाश्चिमात्य देशांवर चीनचे हे गारुड आजतागायत पडलेले नाही. या पाश्चिमात्य देशांचे चीन सोबतचे व्यापारी संबंध गेल्या काही वर्षात वाढलेले असले तरीही या देशांना चीनच्या वाढत्या दबदब्याची भीतीच जास्त वाटत आली आहे. याची जाणीव असल्यामुळे जेव्हा कधी या देशांशी थेट संघर्षाची शक्यता निर्माण होत असेल, त्या ठिकाणी आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’ रणनीतीवरच चीन भर देत आला आहे.

सध्याच्या कोविड – १९ च्या झपाट्याने होत असलेल्या प्रसाराच्या परिस्थितीत आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’ नीतीच्या बळावरच पुढाकार घेऊन जागतिक स्तरावरील नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न चीनने चालवला आहे. मात्र त्यामुळे अमेरिकी नेतृत्वाने आजवर ‘हार्ड पॉवर’ रणनीतीवर जो भर दिला आहे, त्या भूमिकेवरही प्रभाव पडला आही.

कोविड–१९ च्या प्रादुर्भावाबद्दल सुरुवातीला चीनने कोणतीच स्पष्ट माहिती जगाला दिली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून चीनवर टीकेचा भडिमारही खूप झाला. पण, चीनने त्याचा कोणताच प्रत्याघाती प्रभाव आपल्यावर पडू न देता, कोविड–१९ चा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’ नीतीच्या बळावर मदतकार्यावर लक्ष केंद्रित केले. याचे कारण असेही असू शकेल की, चीनी समाज नेहमी आपल्या चुकांमधून धडा घेत आला आहे. त्याचप्रमाणे आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’ नीतीचा पूर्वापार चालत आलेला वापर आणखी नव्या दमाने करण्यात वाकबगार आहे. अर्थात अमेरिकन सरकारकडून चीनवर करण्यात आलेल्या आरोपांची सुद्धा चीन दखल घेतो आहे आणि असे गंभीर निष्कर्ष काढण्यावर आक्षेप नोंदवतो आहे.

चीनच्या सरकारने कोविड–१९ च्या प्रकोपाला आवर घालण्यासाठी जे सुसज्ज मानवतावादी मदतकार्य आरंभले त्याची व्याख्या करताना म्हटले होते की, “१९४९ मध्ये ‘पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ची स्थापना झाल्यापासून आजतागायत हे हाती घेण्यात आलेले अत्यंत सखोल व विस्तृत असे आपात्कालीन मानवतावादी मदतकार्य आहे.”

चीनचा इतिहास आणि संस्कृती मानवतावादाचे समर्थनच करते. संकटे आंतरराष्ट्रीय असोत वा स्थानिक, चीनने मदतकार्यात नेहमी तत्परता दाखवली देखील आहे. उदाहरण द्यायचे तर २००३ सालातला सार्सचा प्रादुर्भाव असो, २०१८ मधला इबोलाचा हल्ला असो किंवा २०१५ मधला नेपाळचा भूकंप असो. परंतु सध्याच्या कोविड–१९ च्या संकटात मात्र चीनने मदतकार्यात पुढे येण्यामुळे निराळ्याच समस्या पुढे आल्या. काहीजण असा दावा करत असले की, या प्रादुर्भावाचा सामना करण्यात चीनने तातडीने घेतलेला पुढाकार त्याच्या स्वानुभवाचे फलित आहे. म्हणूनच तर चीनचे प्रशासन तत्परतेने मदतकार्यासाठी पुढे आले.

याचवेळी हे सुद्धा विसरून चालणार नाही की, या विषाणूचा प्रादुर्भाव जिथून उपजला ते वुहान चीनमधलेच ठिकाण आहे. परत या विषाणूच्या प्रसाराबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती प्रारंभीच्या काळातच चीनने जाहीर न केल्यामुळे अमेरिकेसारख्या देशांनी जागतिक आरोग्य संघटनेचा (World Health Organization) आर्थिक निधीच गोठवून टाकला आहे. या संघटनेने या प्रादुर्भावाच्या प्रारंभीच्या काळात या संकटाकडे गांभीर्याने लक्ष न देऊन त्याचा प्रसार जगभर होऊ दिला असून त्यात चीनलाच सातत्याने पाठीशी घातले आहे असा अमेरिकेचा थेट आरोप आहे.

WHO सारख्या संघटनेला आपल्या अनूकूल मार्गानेच प्रवास करण्यास चीन भाग पाडू शकला, त्याचे एक कारण हेही आहे की, अमेरिकेसारखे देश अशा आंतरराष्ट्रीय मंचापासून दूर होत चालले आहेत. याचा फायदा चीनने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उत्तम प्रकारे करून घेतला आहे.

या वर्षीच्या मार्च महिन्यात अमेरिकेने आफ्रिकेतील देशांमध्ये जाणारी जहाजे मागे फिरवली होती. अमेरिकेवर असाही आक्षेप घेतला जातो आहे की, अशाप्रकारे वैद्यकीय साहित्य घेऊन जाणारी जहाजे अडवून काही देशांना अमेरिकेने वैद्यकीय मदत पोहोचूच दिली नाही. तर उलट, चीन या व्हायरसच्या प्रादुर्भावाने संकटात सापडलेल्या देशांना विविध प्रकारे महत्त्वाची मदत देण्यात सातत्याने पुढे राहिला आहे. जगातले जे देश सध्या कोविड – १९ च्या विळख्यात सापडले आहेत त्यांना औषधे, व्हेंटिलेटर्स, सुरक्षा साधनेच नव्हे तर वैद्यकीय साहाय्य देखील पाठवून चीन या आपात्काळात प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिलेला देश असा नावलौकिक मिळवत असला तरी, त्या त्या देशांना आपल्यावर अवलंबून ठेवून आपल्या छत्रछायेखाली सुद्धा आणण्याची जागतिक स्तरावरची चलाखी चीनने दाखवली आहे.

इथे ही गोष्ट मान्य केली पाहिजे की, चीनचे हे ‘सॉफ्ट पॉवर’ तंत्र कधीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्या स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत हाताळले जात नाही, तर त्यात चीनच्या सरकारचीच मक्तेदारी असते हे विशेष. मात्र गेल्या काही वर्षांत, खास करून जेव्हापासून चीनचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागल्यापासून चीनचे काही नागरिक जागतिक मंचावर सहजपणे जाऊन पोहोचले आहेत. अलिबाबा ग्रुप या कंपनीचा अब्जाधीश संस्थापक जॅक मा सातत्याने जागतिक स्तरावरच्या लोकांशी संवाद साधत असतो. त्यातून तो चीनची एक मोह्क आणि आकर्षक प्रतिमा सर्वांसमोर मांडत असतो. अशा बिगर सरकारी संस्थांच्या ‘सॉफ्ट पॉवर’ने जागतिक स्तरावर कमावलेल्या आपल्या उजळ प्रतिमेद्वारे जगभरातून विश्वासार्हता प्राप्त करण्यात चीन यशस्वी झालेला दिसतो आहे. अर्थातच त्याने चीनच्या महासत्ता होण्याचे स्वप्न आणखी बळकट केले आहे.

कोविड – १९ च्या बाबतीत सुद्धा हेच घडते आहे. याच मा फाउंडेशनने युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशिया, मध्यपूर्वेतले देश आणि अगदी अमेरिकेला सुद्धा कोविड–१९ च्या वैद्यकीय तपासणीची साधने आणि अन्य मदत पुरवली आहे. या अशा मदतकार्यामधून अलिबाबा ब्रॅंडची पाळेमुळे चीनच्या बाहेरही रुजवायला मदत झाली आहे त्याचप्रमाणे जॅक मा याला बीजिंगच्या राजकीय वर्तुळात सुद्धा महत्त्व प्राप्त व्हायला साहाय्य  झाले आहे. त्याद्वारे अन्य देशांना साहाय्य करायला चीन कसा तत्पर आहे, याची सकारात्मक प्रतिमा जगासमोर पुढे येते आहे.

चीनने विविध गरीब देशांना दिलेल्या कर्जांच्या रकमा सध्याच्या या महामारीत माफ केल्यास, आंतरराष्ट्रीय समुदायात त्याला आणखी महत्त्व प्राप्त झाल्याशिवाय रहाणार नाही. चीनचा असा मदतीचा हात मिळाला नाही तर, विकासाच्या आघाडीवर मागे राहिलेले अनेक आफ्रिकी देश चांगलेच संकटात सापडतील असा अंदाज आहे. गेल्या काही काळापासून चीन विविध आफ्रिकी देशांना आर्थिक साहाय्य देण्यामध्ये सगळ्यात पुढे आहे. अशाप्रकारची बिनव्याजी कर्जे माफ करण्याचा चीनने पूर्वीही प्रघात पाडलेला आहे. मात्र, आफ्रिकेतल्या देशांना चीनने मोकळ्या हाताने वाटलेला पैसा बिनव्याजी कर्जांच्याही पलिकडे जाऊन ‘कन्फेशनल लोन’ आणि ‘क्रेडिट लाइन’च्या स्तरावरचा आहे. सध्या तरी चीनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा स्थिरस्थावर होताना दिसत असली तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेली कर्जे अंशत: देखील माफ करण्याच्या स्थितीत चीन दिसत नाही.

आफ्रिकी देशांच्या कर्जमाफीचा विचार करताना प्रत्येक देशाचे प्रकरण चीनला निरनिराळे हाताळावे लागणार आहे. सगळ्याच आफ्रिकी देशांना सरसकट कर्जमाफी देण्याचे धोरण अंगीकारण्याची ऐपत बीजिंगकडे सध्या तरी नाही. यामुळे या कर्जबाजारी देशांच्या मदतीला धावून यायला, आंतरराष्ट्रीय स्तरावरची अनेक धनको नेते मंडळी पुढे येतीलच. मात्र, तरीही चीनच्या महत्तेला त्याने नक्कीच धक्का बसणार नाही.

बीजिंगची कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून दुसऱ्या देशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची नीती खास करून गेल्या काही वर्षांपासून एक शस्त्र म्हणून वापरली जाते आहे. ज्या देशांना बीजिंगकडून घेतलेले कर्ज चुकते करणे, जड जात असेल त्यांना त्यांच्या सोयीचे हप्ते बांधून द्यायला बीजिंग तत्परता दाखवतो. परंतु त्याच्या बदल्यात त्या देशाला आपल्या सार्वभौमत्वावर पाणी सोडावे लागते आणि चीनला नेहमी मानाचे पान द्यावे लागते. तर दुसरीकडे अमेरिका या बाबत जास्त समजूतदार आणि कनवाळू महासत्ता आहे, असेच म्हणावे लागेल.

आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कर्जमाफी धोरणाबाबत अमेरिका प्रसिद्ध अशा ‘ब्रेटन वुड्‍स मॉडेल’चा आधार घेतो. मात्र यावेळी कोविड–१९ चा सामना करण्यामध्ये अमेरिकेला आपल्याच परिघापुरत्या सीमित क्षेत्रात काम करता करताच नाकी नऊ आले आहेत. तर इकडे बीजिंग तत्परतेने आपली वसूल न झालेली परकीय कर्जे आता परदेशातल्या आपल्या मालमत्तेमध्ये परावर्तित करून घेण्याच्या मागे आहे. उदाहरणच द्यायचे तर, श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर आणि त्याच्या आसपासची ९९ एकर जमीन चीनने ९९ वर्षांच्या भाडेकरारावर मिळवली ती अशाचप्रकारे.

जगभरात पी.पी.ई.किटचा पुरवठा करण्याच्या चीनच्या प्रयत्नांमागे आपली प्रतिमा उजळवण्याचा स्वार्थ होता असाच सर्वांचा कयास आहे. युरोपीय देशांनी वैद्यकीय साधन पुरवठ्यात कुठलाच पुढाकार न घेतल्यामुळे चीनला ती कमतरता भरून काढण्यास चांगलाच वाव मिळाला. अर्थातच त्याद्वारे युरोपातले जे देश चीनबद्दल फारसे सकारात्मक नाहीत, त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी चीनला मिळाली आहे. अर्थात, अशा संकटकाळात मदतीस तत्पर असल्याचा चीनचा आवेश म्हणजे स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेतल्यासारखे म्हणावे लागेल.

कारण वस्तुस्थिती अशी आहे की, युरोप मधला इटली हाच एकमेव देश आहे की, ज्याने चीनच्या बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह (BRI) मध्ये सहभाग घेतला आहे. अर्थात त्याला कारण सुद्धा आहे. इटलीमध्ये बेकारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे आणि आर्थिक दृष्ट्या तो देश फार बिकट अवस्थेत आहे. पण सोबतच चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली जी आकर्षक प्रतिमा बनवली आहे, त्याचाही प्रभाव इटलीवर पडला आहेच. तरी देखील चीनशी मित्रत्व आणि शत्रुत्व यांच्यातली सीमारेषा किती पुसट आहे, याचे इतिहासातले दाखले पाहिल्यावर, आता चीनशी मैत्रीचे संबंध वाढवून पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ नये, म्हणून अनेक देश पूर्वीसारखेच चीनपासून दोन हात दूर राहणेच पसंत करतात.

२००५ पासून चीनची ही खेळी आहे की ‘मेड इन चायना’ चा ठसा कोणत्याही देशात पक्का उमटविण्यासाठी तंत्रज्ञानासहित विविध प्रकारचे साहाय्य त्या देशाला देऊ करायचे आणि हळूहळू आपल्या उत्पादनांच्या सहाय्याने स्थानिक बाजारात हात पाय पसरत जाऊन, चीनी उद्योगांची मुळे तिथे रुजवायची.

या जागतिक संकटाच्या काळात चीनने मदतकार्यात घेतलेला पुढाकार हा बहुतेक पाश्चात्त्य देशांना एक राजकीय खेळीच वाटते आहे. मात्र या संकटाने पूर्ण जगालाच घातक विळखा घातला असल्याने सगळ्याच देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र येऊन राजकीय समजदारी दाखवणे गरजेचे आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत युरोप आणि अमेरिकेने या बाबतीत कोणताच पुढाकार न घेणे. किंबहुना आपल्याच देशापुरता विचार करणे चीनला फायद्याचे ठरले आहे. ज्यायोगे चीनला मदतकार्याद्वारे जागतिक स्तरावर आपली प्रतिमा बऱ्यापैकी उजळवण्याची संधी मिळाली आहे.

चीन सध्या आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’ नीतीच्या अनुषंगाने जगभरातल्या मदतकार्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्याबद्दलची नकारात्मक प्रतिमा पुसून त्याच्या जागी नवी सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यास परोपरीने झटतो आहे. जरी चीनने कोविड – १९ च्या या संकटकाळात पाठवलेले मदत साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याला चोहीकडून टीकेचे धनी व्हावे लागले होते ही एक बाब आहेच, मात्र या संकटामुळे चीनच्या ‘सॉफ्ट पॉवर’चा किती परिणाम साध्य झाला आहे, याचा अंदाज हे वैश्विक संकट पूर्णपणे समाप्त झाल्यावरच येईल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.