Author : Avinash Godbole

Published on Jun 03, 2020 Commentaries 0 Hours ago

देशोदेशी या ना त्या स्वरूपात राष्ट्रवाद बोकाळतो आहे. या राष्ट्रवादामुळे वर्षानुवर्षे चालत आलेले संघर्ष कोणते वळण घेतील, हे पाहणे जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

कोविड-१९ आणि जागतिक संघर्षाची क्षेत्रे

Image Source: sott.net

कोरोनाचा उद्रेक होण्याआधी जगभरात सुरू असलेले संघर्ष या कोरोनाकाळात कोणत्या स्थितीत आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहेत. काही ठिकाणी हे प्रदीर्घ काळ चालत आलेले काही संघर्ष, कोविड-१९मुळे अधिक तीव्र होऊ बघत आहेत. येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी, की जागतिक महासत्ता असलेले देश जेव्हा स्वतःपुरता विचार करून राष्ट्रवादी धोरणे राबवू लागले, तेव्हाच कोविड-१९चे संकट अवतरले आहे. यामुळे आज अमेरिका, युरोप आणि आता रशिया हे या महामारीची लढण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांना देशाबाहेर पाहायला उसंत नाही. अशा परिस्थिती जगभरातील संघर्षाची क्षेत्रात काय घडते,  यावर भविष्यातील जागतिक गणिते अवलंबून असतील.

जपान आणि कोरियातील उभा दावा

या संदर्भात, सर्वात उल्लेखनीय प्रकरण हे जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्षाचे आहे. आजवर या दोन देशांचे संबंध कायमच तणावाचे राहिले आहेत. हे दोन्ही देश अमेरीकेच्या सुरक्षाछत्राखाली आहेत, हा एक या दोघांना जोडणारा समान दुवा. मात्र, चीनच्या सातत्याने होणाऱ्या उत्कर्षामुळे त्यांना आपसातले हेवेदावे तात्पुरते का होईना, विसरायला भाग पडले आहे. दोक्दो किंवा ताकेशिमा बेटांवरून असलेल्या सीमाविवादासारखा खरे तर लहानसा पण भावनिकदृष्ट्या अतिशय तापलेला मुद्दा असो किंवा दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याकरता जबरदस्तीने वेश्या बनण्यास भाग पाडलेल्या कोरीयाई स्त्रियांना नुकसानभरपाई मिळण्याचा मुद्दा असो (आणि हा मुद्दा तर समस्त कोरीयाई जनतेकरता अतिशय भावनिक त्रास देणारा मुद्दा आहे), या दोन्ही देशांमध्ये सततच कुरबुरी चालू असतात.

गेल्या वर्षभरात अमेरिका जागतिकीकरणातून हळूहळू अंग काढून घेत आहे. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारी संघर्षही तीव्र होत जात असताना, जपान आणि कोरिया यांच्यातील व्यापारी संबंधही खालावत आहेत.

दुसऱ्या महायुद्धात जपानने पादाक्रांत केलेल्या देशांमधील जनतेकडून सक्तमजुरी करून घेतली. त्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याकरता वाटाघाटी चालू होत्या, त्या फसल्या. पुढे जुलै २०१९ मध्ये, जपानने कोरियाला उच्च तंत्रज्ञान निर्यात करण्यावर बंधने घातली. त्यामुळे हे संबंध अजूनच खालावले. याचा परीणाम कोरियात राष्ट्रवाद उफाळून येण्यात झाला आणि बिअर, मोटारी यांसारख्या जपानी उत्पादनांचा कोरीयातील खप कमी झाला. याशिवाय, जहाजबांधणीसारख्या क्षेत्रांत हे दोन्ही देश एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत.

दोन्ही देशांत जहाजबांधणी हे अत्यंत महत्त्वाचे उत्पादनक्षेत्र आहे. त्यामुळे, कोविड१९ महामारी येण्याच्याही आधीपासूनच या दोन्ही देशांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास होताच. कोविड१९ नंतर दोघांनीही एकमेकांच्या देशात येण्याजाण्यावर निर्बंध लादले आणि आधीच खराब असलेले संबंध अजूनच खालावले. या सगळ्यात भरीस भर म्हणून शिंझो आबे यांनी ’यासुकुनी देवस्थान’ या वादग्रस्त धार्मिक स्थळाला पाठवलेल्या दानावरून या भावनिक भडक्यात भरच पडली.

दक्षिण चीन समुद्रात चीन आक्रमक

दक्षिण चीन समुद्रात चीनने ’प्रशासकीय विभाग’ पाडले, तसे जाहीरही केले, आणि अन्य आग्नेय आशियाई देशांना, ’आता यापुढे वाटाघाटी होणार नाहीत’ असा स्पष्ट इशारा दिला. आता चीनच्या या पवित्र्यामुळे वास्तवात तसा काही फार मोठा फरक पडणार नाही, मात्र, यातून एक बाब अगदीच स्पष्ट होते  की, चीन एकीकडे अगदी सौम्य परदेश धोरण अवलंबेल पण दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रात आपले अधिपत्य वाढवत नेण्यासारखे प्रखर राष्ट्रवादी उपद्व्यापही करेल. ASEAN संघटनेतील देश व्यापारात चीनवर अतिशयच अवलंबून आहेत आणि चीनने व्यापार थांबवल्यावर त्यांचा हा दुबळेपणा अधोरेखितच झाला.

भारत-पाकिस्तानचे काय?

भारत-पाकिस्तान यांच्या बाबतीत विचार केल्यास त्यांच्यातील सीमा ही कायमच अस्थिर राहिली आहे. जसजसा उन्हाळा वाढतो तसतसे सीमेपलिकडून आतंकवादी भारतात घुसू लागतात. एप्रिल महिन्यात अनेकदा सीमेपलिकडून तोफांची सरबत्ती झाली. दुसरीकडे लक्ष वेधून, सीमा पार करून भारतात घुसू पाहणाऱ्या दहशतवाद्यांना मदत व्हावी हाच या मागचा उद्देश असतो. रमझान महिन्याच्या पहिल्या दहा दिवसातच काश्मीरमधे झालेल्या हल्ल्यांमध्ये २५ जण मृत्यूमुखी पडले आणि २४ जण गंभीररित्या जखमी झाले.

सध्या चालू असलेल्या प्रचारयुद्धामुळे व अतितीव्र राष्ट्रवादी भूमिकांमुळे काश्मीरमध्ये आधीच नाजूक असलेली शांतता अजूनच भंग होण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तान अस्वस्थच

कोविड-१९ महामारी चालू आहे, पण ती ही काबूलमधील एका इस्पितळातील सुतिकाविभागावर हल्ला करण्यापासून तालिबानींना परावृत्त करू शकली नाही. या आधी शाळा किंवा विद्यापीठांवर हल्ले झाले आहेत, आणि त्या त्या वेळी, हा संघर्ष अजून किती नीच पातळी गाठणार आहे, असा प्रश्न पडत होताच. मात्र, नुकताच झालेला हा हल्ला गेल्या ४५ वर्षांतील सर्वात भीषण घटना होती याबद्दल दुमत नाहीच. त्याच सुमारास अफगाणिस्तानात अजून एक आत्मघातकी हल्ला झाला. आधीच अफगाण सरकारची अवस्था नाजूक आहे. त्यात या हल्ल्यांमुळे त्याची अवस्था अजूनच नाजूक झाली आहे. आणि, नुकत्याच झालेल्या शांतीकराराच्या मर्यादाही दिसून आल्या. तसंही, या शांतीकरारात, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अफगाण सरकारला फारसे काही महत्त्व उरलेले नाही.

इराण आणि आखाती देश

या सगळ्या अंधारात, इराण आणि काही आखाती देश यांच्यातील संबंध काहीसे सुधारले, हाच काय तो थोडासा आशेचा किरण. अर्थात, सातत्याने चाललेल्या संवादाचेच हे फलित आहे. इराणने कायमच कतार, ओमान आणि अन्य काही देशांसोबत द्विपक्षीय बोलणी चालू ठेवण्यावर भर दिला आणि त्याचा फायदा होताना दिसतो आहे. इराणमध्ये कोविड१९ महामारी भडकल्यावर कुवेतने एक कोटी अमेरीकी डॉलरची मदत इराणला केली. संयुक्त अरब अमिरातीच्या अनेक अधिकाऱ्यांमार्फत इराणशी सातत्याने संपर्क साधला जात राहिला आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्फत इराणला वैद्यकीय साधनांची मदतही पोचवली गेली. काही लहान आखाती देशही परिस्थितीवर नजर ठेवून आहेत, आणि संवाद सुरू करू शकतात. त्यामुळे, या भागातील घडामोडींवर बारकाईने नजर ठेवणे भाग आहे.

युएसएस रूझवेल्ट या अमेरिकी युद्धनौकेवरील ४९०० पैकी तब्बल १००० नौसैनिक कोविड१९ने बाधित झाले. आणि हे एकच उदाहरण नाही, अशा अनेक घटना घडल्या आहेत. फ्रान्सच्या ’चार्ल्स द गॉल’ या विमानवाहू युद्धनौकेवरही ७०० नौसैनिक कोविड१९ने बाधित झाले. संपूर्ण जगभरातूनच अशा घटनांच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे, जगभरातील ठिकठिकाणच्या सत्तांसमोर पेच उभे राहाणार आहेत.

कोविड१९ नंतर जगाचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे हे तर आता स्पष्टच आहे. जागतिक महासत्ता आता आपापल्या घरगुती प्रकराणांमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे जागतिक राजकारणात एक पोकळी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, आजवर चालत आलेल्या संघर्षांवर तातडीने काय व कसा परिणाम होईल यावर लक्ष ठेवणे क्रमप्राप्त आहे. जगभरातील सगळ्याच सत्ता आणि व्यवस्थांच्या प्रतिष्ठेला कोविड-१९ने खिंडार पाडले आहे. या वर प्रतिक्रिया म्हणून, देशोदेशी या ना त्या स्वरूपात राष्ट्रवाद बोकाळतो आहे. या राष्ट्रवादामुळे हे संघर्ष कोणते वळण घेतील, हे येणारा काळच सांगू शकेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.