Published on Apr 20, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होत आहे, होणारही आहे. मात्र, या बदलाचे स्वरूप प्रत्येक देशात वेगळे असेल.

कोरोनानंतरच्या जगाची रचना कोण ठरवणार?

कोविड १९ च्या विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातलाय. या विषाणूच्या फैलावाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. साथीच्या या संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी रोजच्या रोज नवे निर्णय घेतले जात आहेत. हे सगळे होत असताना आपल्याला जगभरातच मानवी स्वभावात अर्थपूर्ण बदल दिसू लागले आहेत. हे बदल अनेक पातळ्यांवरील आहेत. जेवणाच्या व झोपण्याच्या वेळा बदलल्या आहेत. उपभोगाच्या सवयी बदलल्या आहेत. सांस्कृतिक बदल दिसत आहेत. शिकण्याची व सरावाची नवी कौशल्ये आत्मसात केली जात आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेले धार्मिक विधी करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत.

‘कोरोना’च्या साथीच्या पार्श्वभूमीवर मानवी स्वभावामध्ये होत असलेले हे बदल हा प्रामुख्याने इंटरनेटचा वापर आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या पर्यायांच्या वाढत्या वापराचा परिणाम आहे. एरवी जगभरातील जवळपास सहा अब्ज लोक इंटरनेटचा वापर करतात. ऑनलाइनच्या आभासी विश्वात मोठ्या प्रमाणावर वेळ घालवतात. कोविड १९ चा उद्रेक झाल्यापासून इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे.

टीव्ही आणि रेडिओवरील प्रसारण किंवा वर्तमानपत्र अशा पारंपरिक माध्यमांशी तुलना करता इंटरनेटच्या व्हर्च्युअल जगात होणारा संवाद पूर्णपणे वेगळा असतो. अधिकृत मीडियाच्या तुलनेत जगभरातील माणसा-माणसांमध्ये सध्या इंटरनेटवरील सोशल मीडियातूनच संवाद होतोय. वेगवेगळ्या माहितीची देवाणघेवाण होतेय. त्यात भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या माहितीचा समावेश आहे आणि त्या माहितीच्या माऱ्यामुळे लोकांच्या वर्तनात झपाट्याने बदल होताना दिसतोय. या सगळ्या घडामोडींमुळे, नव्या मानवजातीच्या उदयाबद्दल, किंबहुना सध्या जगभर पसरलेल्या ‘कोविड १९’च्या साथीनंतरच्या नव्या जगाबद्दल चर्चा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जगातील बहुसंख्य लोकांच्या वर्तनामध्ये दिसत असलेला हा बदल येणाऱ्या काळात वैश्विक पातळीवर विविध क्षेत्रांचे नियम बदलणारा ठरणार आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रेही त्यास अपवाद ठरणार नाहीत.

एकंदर परिस्थितीचा विचार करता एक गोष्ट सहज लक्षात येण्यासारखी आहे. ती म्हणजे, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कोणत्या व कशा उपाययोजना केल्या जातात, यावरच नवे जग कसे वाटचाल करणार हे ठरणार आहे. कोरोनाविरुद्धचे उपाय हाच या वाटचालीतील निर्णायक घटक असेल. कोरोनाच्या साथीमुळे होणाऱ्या विविध परिणामांना तोंड देण्यासाठी भविष्यात जे जे उपाय पुढे येतील, ते नुकसानीची तीव्रता नक्कीच कमी करतील.

‘कोविड १९’ नंतर माणसाला अपेक्षित असलेल्या जगाचा विचार न करता जे देश केवळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यात गुंतले आहेत किंवा त्यावरच समाधान मानत आहेत, अशा देशांना भविष्यात अधिक मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, हे निश्चित. हे संकट किती घातक असेल, याची कल्पना आता कुणीही करू शकणार नाही.

जगातील महासत्ता किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न व पुढारलेल्या अमेरिका, इंग्लंडसह अन्य काही देशांतील आर्थिक व सामाजिक घडी कोरोनाच्या संकटामुळे विस्कटून जाणार आहे. त्यामुळे ही साथ गेल्यानंतर या देशांना जगाच्या व्यासपीठावर वावरताना महासत्ता असल्याचा अविर्भाव कायम ठेवण्यासाठी किंवा चीनसारख्या देशांशी समान पातळीवर राहून संवाद साधण्यासाठी एखादी खिडकी तयार करणं गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात हे देश ‘कोविड १९’चे संकट चीनशी निगडित कसे होते, हे दाखवण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही. किंबहुना तसे करणं त्यांना भाग पडेल.

‘कोविड १९’मुळे विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहेत, किंबहुना झाले आहेत. मात्र, त्या तीव्रतेचे स्वरूप प्रत्येक देशात वेगळे असणार आहे. कोविड १९ चे संकट सरल्यानंतर उद्भवणाऱ्या संकटांची काही देशांना आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्या तुलनेत पूर्व आशियातील देशांना, विशेषत: चीनला मोजावी लागणारी किंमत कमी असेल.

तिसऱ्या जगातील देश म्हणून गणले जाणाऱ्या आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियाच्या अन्य भागातील देशांसाठी कोविड १९ ही एक बहुमोल संधी ठरणार आहे. पाश्चिमात्त्य जोखडातून मान सोडवण्यासाठी बांधबंदिस्ती करण्याचा अवकाश त्यांना मिळेल. शिवाय, आपल्या देशातील सरकारची देशवासीयांशी असलेली बांधिलकी व उत्तरदायित्वाबद्दल नव्याने विचार करता येईल. मात्र, हे देश आधीच्या प्रमाणेच आपल्या देशाचा गाडा हाकत राहिले तर त्यांचे होणारे नुकसान हे वसाहत काळात झालेल्या नुकसानीपेक्षा जास्त व गंभीर स्वरूपाचे असेल.

कोविड १९ च्या उद्रेकाच्या माध्यमातून निसर्ग एवढी मोठी संधी मिळवून देईल, यांचा विचार अर्थातच कोणी केला नसेल. मात्र, तिसऱ्या जगातील देशांसाठी ही अत्यंत योग्य संधी आहे. जगातील महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या देशांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी या छोट्या देशांना कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. काहीही झाले तरी येत्या काळात अनेक देशांतील राजवटी व अर्थव्यवस्था कोसळणार आहेत. सामाजिक घुसळण होणार आहे. अनेक देशांतील सामाजिक घडी विस्कटणार आहे. ‘कोविड १९’ नंतरचे जग या साऱ्याचे साक्षीदार असेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.