Published on Oct 08, 2020 Commentaries 0 Hours ago

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पण दुसरीकडे काहीच काळजी किंवा भीती नसल्याचे वातावरण पाहायला मिळते आहे. हा विरोधाभास धोका वाढविणारा आहे.

कोरोना अद्याप संपलेला नाही!

देशभर आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असल्याने लोकांमध्ये कमालीचा बेफीकीरवृत्ती वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मास्क न घातलेले, सामाजिक अंतर न पाळणारे लोक, संस्था दिसत आहेत. जणू कोव्हिड-१९ ने आपल्या आयुष्यातून रजाच घेतली आहे, असेच लोक वागत आहेत. एकीकडे कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. कोव्हिडमुळे पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे जीव गेल्याचे आपण एकीकडे पाहत आहोत आणि दुसरीकडे काहीच काळजी किंवा भीती नसल्याचे वातावरण पाहायला मिळणे, हा धोका वाढविणारा विरोधाभास आहे.

पहिल्या काही महिन्यांत, महासाथीच्या जीवघेण्या, अंदाज न लावता येण्यासारख्या, अनिश्चित स्वरूपामुळे खूप भीती पसरली होती. त्यातच आर्थिक नुकसानीची भर पडली होती. आता अनिश्चितता काहीशी कमी झाली असली तरी भीतीच्या अभावाने काही जणांसाठी ती स्वीकारण्याचे किंवा इतरांसाठी तिने निष्काळजीपणाचे रूप धारण केले आहे. जेव्हा बहुमतांशी लोक रस्त्यांवर पुन्हा वावरू लागले आहेत, दुकाने उघडू लागली आहेत आणि एकंदर वातावरण पूर्ववत व सामान्य होऊ लागले आहे, तेव्हा लोकांनी नवा प्रघात किंवा नवी व्यवस्था विसरल्याचे दिसत आहे. प्रत्येकजण बाहेर पडत असल्याने बहेर जाण्यात काहीच धोका नाही, असा समज झाल्याचे भासत आहे. अर्थात, बहुसंख्य लोक एखादी गोष्ट करत आहेत म्हणजे ती बरोबर आहे असे होत नाही.

लोक बाहेर रस्त्यावर आहेत, वर्तमानपत्रांत लोक कामावर जाण्यासाठी लांब रांगांमध्ये उभे असल्याचे दाखवले जात आहे. टाळेबंदीच्या मधल्या टप्प्यात लोकांच्या संख्येवरील मर्यादा, खरेदीसाठी उभे राहण्यासाठी आखलेल्या चौकटी, नियम तोडणाऱ्यांवर होणारी कठोर कारवाई अशा बाबी दिसत होत्या. आता तशा मर्यादा लादल्या नसल्याने लोकांना नियम पाळण्याची गरजच वाटेनाशी झाली आहे. अर्थात, याला काही अपवाद आहेत.

लोक पाश्चिमात्य देशांतील शिस्त, नियमांचे पालन, स्वच्छता आदी बाबींविषयी कायम बोलतात आणि आपल्याला दूषणे देतात. पण आपण जर धोरणांकडे पाहिले तर जाणवते की, आपल्यासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात लोकांना शिस्त लावण्याचे कोणतेही धोरण बाह्य शक्ती आणि शिक्षा यावरच आधारलेले असते. हेल्मेट घालण्याच्या सक्तीचेच उदाहरण घेऊ. प्रशासनाने रस्ते दुरुस्त करून रस्ता सुरक्षेची जबाबदारी उचलली पाहिजे हे अगदी खरे आहे, पण स्वत:च्या सुरक्षेची आणि भल्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवरही आहे. पण जोवर अधिकाऱ्यांकडून दंड ठोठावला जात नाही किंवा ते समोर दिसत नाहीत तोवर लोक हेल्मेट वापरणे महत्त्वाचे मानत नाहीत.

याचा अर्थ असा होऊ शकतो की, अ) माझी काळजी घेण्याची जबाबदारी माझी नाही आणि केवळ तसा नियम असल्याने मला हेल्नेट घालावे लागते, ब) अपघाताच्या शक्यतेला कमी लेखून लोक सुरक्षेकडे सामान्य दृष्टीकोनातून पाहतात, (उदाहरणार्थ – कित्येक लोक विनाहेल्मेट फिरतात, त्यात काय मोठे, किंवा क्षणिक फायद्यांचा विचार करून दुचाकीवरून तिघे प्रवास करतात).

त्यामुळे, सामान्यपणे असे दिसते की, लोक अंत:प्रेरणेपेक्षा (मी माझ्या स्वत:च्या सुरक्षेसाठी पुढे घुसण्यापेक्षा रांगेत उभे राहीन) बाह्यप्रेरणेने कृती करतात (मला जर रांगेत उभे राहायला सांगितले तरच मी रांगेत उभे राहीन). काही वेळा, वस्तूंचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असणे हेदेखील लोक स्वनियंत्रण आणि शिस्त विसरण्यामागचे कारण असू शकते. लोकल (उपनगरी) रेल्वे प्रवासाचे उदाहरण घेऊ. एखादी व्यक्ती जर फार वेळ व्यवस्थित आत जाण्याची वाट पाहत बसली तर कदाचित तिला कायमचे वाट पाहावे लागेल. तरीही, काही लोकांनी एकत्रितपणे अंत:प्रेरणे रांगेसाठी काही व्यवस्था आणि नियम बनवले आहेत, अर्थात त्यात काही त्रुटी किंवा उणीवा आहेत.

नियम तयार करणे आणि ते लागू करणे हे तुलनेने सोपे असते जेव्हा लोकसंख्या मर्यादित असते आणि लोकांमध्ये नियमांसाठी आणि ते पाळण्यासाठी आतून इच्छा असते (त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी भल्यासाठी हे गरजेचे आहे हे त्यांना पटलेले असते तेव्हा). जेव्हा लोकांवर सक्ती करण्याची वेळ येते तेव्हा हेच काम मोठे जिकिरीचे होऊन बसते आणि काही लोकांवर नियंत्रण मिळवणे खरेच अवघड असते.

लोककल्याणार्थ झटणाऱ्या संस्थांसाठीही हे काम मोठे हालाखीचे असते. उदाहरणार्थ, सुरुवातीला प्रसिद्ध व्यक्ती, पोलीस, डॉक्टर, स्वयंसेवक आदींनी लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आणि लोकांनी ते पाळलेही. पण आता तसे होताना दिसत नाही आणि प्रत्येक कृतीवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे.

काही वेळा लोक नियम पाळायला विरोध करतात कारण त्यांना खास वागणूक अपेक्षित असते. सामान्य ग्राहक दुकानदाराला सामान घरी पोहोचवण्यास सांगतो, जेव्हा त्याला ते स्वत: घेऊन जाणे शक्य असते. अशा वेळी लोक स्वत:ला आणि इतरांनाही होणाऱ्या संभाव्य नुकसानाकडे दुर्लक्ष करतात. काही वेळा सामान्य नागरिकांच्या फायद्याच्या एखाद्या नेहमीच्या नियमाचे राजकारण केले जाते किंवा त्यावर टीका होते आणि त्याचे महत्त्व कमी करून त्याची तुलना दुसऱ्याच मोठ्या विषयाशी केली जाते.

याबद्दल काय करावे –

> एकदम मोठ्या प्रमाणावर राबवण्यापेक्षा विविध पातळ्यांवर, टप्प्या-टप्प्याने, लहान स्तरावर राबवलेले धोरण फायद्याचे ठरू शकते. एका लहान भागात ते यशस्वी ठरले की त्याचा इतरत्र अवलंब करमे सोपे होईल.

> अधिकाऱ्यांबरोबर समन्वय – बऱ्याच लोकांना ठराविक वेळी कार्यालयात जाव लागते. घरात बसणे हा काही पर्याय नाही. काही जण त्यासाठी खासगी वाहनांचा वापर करतात तर बरेच जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहेत. अशा वेळी वाहनांवर मर्यादा घालण्याऐवजी ती वाढवली पाहिजेत. तसेच एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून सरकारी व खासगी कंपन्यांत मेळ साधून वेळा बदलल्या पाहिजेत. अर्थात यात कर्मचाऱ्यांशी संवाद न साधता कंपन्यांशी साधला पहिजे.

> याबाबतीत मुंबई पोलिसांनी केलेला एक उपाय चांगला आहे. ट्रॅफिक सिग्नलवर ज्या रांगेतले वाहनधारक हॉर्न वाजवून अधिक आवाज करतात त्यांना उशीरा सोडणे. यात रांगेतील दोन जणांनीही चूक केली तरी शिक्षा सर्व रांगेला मिळेल. त्यामुळे रांगेतील इतर व्यक्ती नियम तोडणाऱ्यांवर लक्ष ठेवतील. तसेच चांगल्या किंवा वाईट वागण्याचा फायदा किंवा तोटा ताबडतोब मिळेल आणि तो सर्वांसमक्ष असल्याने आक्षेप घेण्याचीही गरज पडणार नाही.

> एकत्रित कृतीचे आणखी एक उदाहरण म्हणजे रेव्लेत चेन ओढून ती थांबवणे. यात बरेचदा कोणी चेन ओढली हे माहित नसते पण सगळ्यांचा खोळंबा होतो. लोकांना चूक करण्यापूर्वी त्याचे परिणाम माहीत असले पाहिजेत. अशा वेळी स्थानकात किंवा विश्ष्ट रांगेत प्रवेश करण्यापूर्वी कार्ड स्वाइप करणे असे उपाय करता येतील.

> जर आर्थिक दंड वसूल करायचा असेल तर त्याची रक्कम मोठी हवी. कारण कित्येक लोकांना १०० रुपये दंड भरणे फार मोठी बाब वाटत नाही. अर्थात हे तेव्हाच करावे जेव्हा सुरक्षित प्रवासाचे पुरेसे उपाय उपलब्ध असतील, कारण लोक मूलभूत गरजेपोटी प्रवास करत आहेत.

> तरीही मास्क घालणे, दुकांनाच्या रांगांत चौकटी आखणे असे नियम केले पाहिजेत, कारण सगळे नसले तरी बरेच लोक नियम बाहेरून लादल्याशिवाय आणि त्याला दंड असल्याशिवाय ते पाळत नाहीत.

> काही वेळा हाऊसिंग सोसायटी, मोहल्ला अशा लहान गटांत काही बाबी नीट राबवल्याचे दिसून येते. त्यांनी आपापल्या पातळीवर नियम तयार करून ते काटेकोरपणे पाळले आहेत आणि चांगले काम केले आहे. याला कारणे वेगवेगळी असू शकतात. मोठया गटाऐवजी लहान गटात शिस्त लावणे सोपे असते. सोसायटीत किंवा घरांत आपलेपणाची आणि जबाबदारीची जाणीव अधिक असते. एखाद्या स्थानिक व्यक्तीच्या प्रभावापोटी किंवा आदरापोटी नियम पाळले जातात. तसेच लहान गटात भावनिक बंध अधिक दृढ असल्यानेही हे शक्य होते.

> आगामी काळ सणासुदीचा आहे. अशा वेळी अनेक रोजंदारीवरील कामगार त्या सणादरम्यानच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. त्यांच्या वस्तू विकण्यासाठी त्यांना एका जागी न थांबता लांबवर प्रवास करावा लागू शकतो. अशा वेळी त्यांच्या मदतीसाठी विक्री आणि विपणनाचे ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून देणे, स्थानिक संबंध स्थापित करून देणे, या व्यवस्थेमधून दलाल आणि मध्यस्थांना बाजूला ठेवणे, सरकारकडून सामायिक पोर्टल उभे केले जाणे, असे उपाय योजले जाऊ शकतात.

कोव्हीड अद्याप संपलेला नाही आणि बहुतांश लोकांना खुशीने नव्हे तर रोजगारासाठी बाहेर पडावेच लागेल. तेव्हा बाह्य उपाययोजना तयार करून त्यांचे सातत्याने जमेल तेवढे पालन केले जाईल याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे, जेणेकरून धोका आणि नुकसान कमीत कमी करता येईल. सर्वंकश नियंत्रण कठीण आहे कारण नियमांना विरोध करणारे लोक आणि विविध घटक कायमच असणार आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.