Published on Jun 05, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोना हा निसर्गाने आपल्याला दिलेला धडा आहे. म्हणूनच आपण सगळे आपल्या जगण्याचा नव्याने विचार करू लागलो आहोत. ‘वन ट्री चॅलेन्ज’ ही त्यासाठीची नवी सुरुवात आहे.

कोरोनाने दिलेले ‘वन ट्री चॅलेन्ज’

Source Image: lh3.googleusercontent.com

आजचा जागतिक पर्यावरण दिन खूप काही अनुभव आपल्यासोबत घेऊन आला आहे. अवघे जग कोरोनाशी झुंजत असतानाच, भारतात आपण दोन चक्रीवादळे अनुभवली. आधी उन्हाचा कडकडीत तडाखा आणि नंतर ‘अम्फान’ आणि ‘निसर्ग’ या दोन वादळांचा फटका… एकीकडे किनारपट्टीवर हे सोसाट्याचे वारे वाहण्याचे इशारे येत होते, तेव्हा तिकडे रेताड प्रदेशात टोळधाडीचे संकट आले… हवामान बदलाचा एवढा सारा रुद्रावतार दाखवतच यंदाचा पर्यावरण दिन उगवला आहे.

उन्हाची तलखी संपून आता पावसाळा तोंडावर आला आहे. पण या दिवसात कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून प्रयत्नांची शर्थ करावी लागते आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे अशा नैसर्गिक आपत्ती यांच्या तडाख्यात सापडलेले आपण भविष्याबद्दल पुरते धास्तावून गेलो आहोत. तरीही आपल्यातली उमेद जागवून पुन्हा नवी लढाई लढतो आहोत. कोरोनाच्या उद्रेकानंतरची दोनअडीच महिन्यांची ही उलथापालथ आपल्याला खूप काही शिकवून गेली आहे. आपण सगळेच आपल्या जगण्याचा नव्याने विचार करू लागलो आहोत आणि याचा थेट संबंध निसर्गाशी, पर्यावरणाशी आणि आपल्या जीवनशैलीशी आहे. म्हणूनच आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने थोडे फ्लॅशबॅकमध्ये जाऊया… काय झाले, काय होईल याची थोडीशी चर्चा करुया. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, इथून पुढे आपण नेमके कसे जगणार आहोत याबद्दलही बोलूया.

कोरोनामुळे काही प्रमाणात पर्यावरणाबद्दल सकारात्मक बदल दिसू लागल्याने, काही पर्यावरणवाद्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण, हा परिणाम तात्पुरता असून तो दीर्घकाळ टिकवायचा असेल, तर धोरणात्मक बदल आवश्यक ठरले आहेत. या धोरणात्मक बदलांसाठी आग्रही राहतानाच, प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरही काही गोष्टी करायला हव्यात.

वन ट्री चॅलेन्ज

पर्यावरणाची कशी हानी होते आहे, याबद्दल पुस्तकेच्या पुस्तके लिहिली गेली आहेत, माहितीपट बनले आहेत, आंदोलने झाली आहेत… पण जोपर्यंत प्रत्येक माणसाला हा विषय आपला वाटत नाहीत. तोपर्यंत जगभरातील सत्ताधीशांना याचे महत्त्व पटणार नाही. त्यासाठीच या कोरोनाकाळात एक सोशल मीडिया चॅलेन्ज ट्रेण्ड होतेय… ते म्हणजे ‘वन ट्री चॅलेन्ज’!

सध्या सोशल मीडियावर कसलेकसले चॅलेन्ज घेतले जातात आणि दिले जातात. पण, या साऱ्या चॅलेन्जेसपेक्षा थ्रिलर आणि डेंजरस चॅलेन्ज यंदा कोरोनाने आपल्यापुढे ठेवले आहे. या कोरोनाचे काय करायचे, याबद्दल अनेकजण तावातावाने बोलताहेत. पण यातील एक वाक्य मात्र कायम आहे, ते म्हणजे निसर्गाला माणसाने खिजगणतीत न धरल्यामुळेच हा कोरोना आपल्या घराघरात पोहचला आहे. त्यामुळे या साऱ्याला पुरून उरायचे असेल तर यंदाच्या पर्यावरण दिनी आपल्याला निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी एक पाऊल उचलावे लागेल. भविष्यकाळात कोरोनासारख्या साथीवर मात करण्यासाठी, आपल्यातील प्रत्येकाला ‘वन ट्री चॅलेन्ज’ स्वीकारावेच लागेल.

शहरात, खेडेगावात जिथेजिथे कोरोनामुक्त ग्रीन झोन आहे, तिथेतिथे आपण लॉकडाऊनच्या काळात एक तरी झाड लावावे असे हे चॅलेन्ज आहे. आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हे हिरवेगार आपण सगळ्यांनीच हे हिरवेगार चॅलेन्ज स्वीकारायला हवे आणि जिथे शक्य असेल तिथेतिथे वड, पिंपळ, चिंच, जांभूळ असे वृक्ष लावायला हवेत आणि जगवायला हवेत. आपण लावलेली ही झाडे आपल्याला स्वच्छ हवा तर देतीलच शिवाय कोरोनाच्या संकटाशी सामना करण्याची नवी उमेदही मिळेल, असे हिरवळ संस्थेचे किशोर धारिया यांना वाटते.

धारिया यांना कोरोनाच्या या संकटातही पर्यावरण संवर्धनाची मोठी संधी दिसते. लॉकडाऊनमुळे आपण निसर्गाच्या खूप जवळ गेलो आहोत. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी यांचं मोल आपल्या जीवनात काय आहे हे आता आपल्याला कळून चुकले आहे. म्हणूनच पाण्याचे संवर्धन करूया, झाडे लावून चांगल्या जगाची निर्मिती करूया असे त्यांचे सांगणे आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी वृक्षारोपणाच्या या चळवळीत राज्याच्या वेगवेगळ्या भागांतल्या तरुणांना सामावून घेतले आहे.

जगाची तापमानवाढ रोखायची असेल तर कार्बन डायऑक्साइचे उत्सर्जन कमी करायला हवे. हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारे परिपूर्ण यंत्र अजूनतरी आपण बनवू शकलेलो नाही. पण हा कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करणारे झाड नावाचं एक नैसर्गिक यंत्र आपल्याकडे आहे. आपल्याला स्वच्छ हवा आणि सावली देणारी सगळीच झाडे म्हणून तर आपण जपली पाहिजेत.

कोरोनाने दिलेली निसर्गदृष्टी

कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाला आणि आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात रमलेले आपण आपल्या अवतीभवती सजगतेने पाहू लागलो. एरव्ही शहराच्या गजबजाटात आपले निसर्गाकडे फारसे लक्ष नसते. पण, मोबाइलच्या अलार्म कॉल्सनी जागे होणारे आपण पहाटेच पक्ष्यांच्या आवाजांनी जागे होऊ लागलो. आपल्यासोबत काही झाडे, पक्षीही इथे राहातात हे आपल्याला अगदी ठळकपणे जाणवले. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत गेले तसतशी हवा स्वच्छ होऊ लागली. वाहनांचे प्रदूषण, धुरके यामुळे श्वास कोंडलेल्या शहरांमध्ये खूप दूरपर्यंतचे नजारे दिसू लागले. पंजाबमधल्या जालंधरमधून दिसलेल्या हिमालयाच्या रांगांनी डोळे सुखावले, रासायनिक प्रदूषणाने मलिन झालेल्या गंगा यमुनेचे पाणी निळे नितळ झाले… मुंबईचा मरीन ड्राइव्हचा किनारा शहर किती सुंदर असू शकते, हे सांगू लागला आणि स्वच्छ आकाश फ्लेमिंगोंनी भरून गेले!

औद्योगिकरण आणि डिजिटल क्रांतीमध्ये गढून गेलेले आपण हे सगळे पाहून स्तिमित झालो आणि निसर्गप्रेमींना हा लॉकडाऊन हवाहवासा वाटू लागला. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या या दिवसात जग असेसुद्धा असू शकते, याची कल्पनाच आपण केली नव्हती. कोरोनाने जिथे पहिल्यांदा थैमान घातले त्या चीनमधल्या वुहानमध्येही निसर्ग कसा श्वास घेतो आहे, याचाही एक हेलावून टाकणारा व्हिडिओ आला होता.

हे सगळे पाहून आपण भानावर तर आलो आणि मनात अशा स्वच्छ सुंदर जगाची उमेद जागवली गेली. काही पर्यावरणवादी कार्यकर्ते तर दरवर्षी असा पर्यावरणासाठी  म्हणून काही दिवस लॉकडाऊन करा, अशी मागणी करू लागले. थोडे दिवस हे सगळं छान चालले होते पण नंतरनंतर लॉकडाऊनची भयानकता जाणवू लागली. उद्योगधंदे बंद पडले, रोजगार गेले, भविष्याबद्दलची न संपणारी अनिश्चितता जाणवू लागली आणि मग हा स्वच्छ हवेचा लॉकडाऊन असह्य होऊ लागला.

पुन्हा एकदा अर्थकारण की पर्यावरण? अशा चर्चा झडू लागल्या. निसर्गाने खूप मोठी शिक्षा दिलीय आपल्याला… असे कुणीतरी म्हणाले. ‘हवामान बदल, प्रदूषण या युगात आणखी काय होणार?’ अशी आणखी एक प्रतिक्रिया आली. ‘हा सगळा विनाश थांबणार कधी? कधी संपणार हे सगळे? की ही तर सुरुवात आहे?’ असे हळहळणारे प्रश्न विचारले जाऊ लागले. कुणी म्हणाले…. पृथ्वीला बऱ्याच दिवसांनी श्वास घ्यायला मिळाला आहे… ‘पृथ्वी दुरुस्तीला काढली आहे’, असा एक मेसेजही सोशल मीडियावर फिरत होता!

लॉकडाऊनच्या काळात विचारल्या जाणाऱ्या या सगळ्या प्रश्नांमध्ये, व्यक्त होण्यामध्ये एक जाणीव मात्र नक्की आहे. निसर्गाचा आदर करण्याची आणि पर्यावरण संवर्धनाची! आपल्या आयुष्याकडे नव्याने पाहण्याची. आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने म्हणूनच आम्ही कोरोना आणि पर्यावरण याबद्दल पर्यावरणतज्ज्ञांची मते जाणून घेतली. या सगळ्या तज्ज्ञांच्या मते, कोरोनामुळे पर्यावरणाला काहिसा दिलासा जरूर मिळाला पण तो तात्पुरता आहे आणि यातून आपण काहीच शिकलो नाही तर हा दिलासाही अपुराच ठरणार आहे.

लॉकडाऊनमुळे प्रदुषणही डाऊन?

लॉकडाऊनच्या काळात जगभरातले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण १७ टक्क्यांनी खाली आले आहे, असे आकडेवारी सांगते. वाहनांचे प्रदूषण, रासायनिक उद्योग, कोळसा जाळून होणारी वीजनिर्मिती या सगळ्यामुळे हवामानात प्रदूषणकारी हरितवायूंची भर पडत असते. हेच हरितवायू पृथ्वीचे तापमान वाढवतात. तापमानवाढीच्या या घटकांपैकी लॉकडाऊनच्या काळात वाहनांचे प्रदूषण जवळजवळ थांबलेच आहे. सुरुवातीच्या दिवसात उद्योगधंदेही बंद होते त्यामुळे कार्बनचं उत्सर्जन कमी होणे साहजिकच होते. या वर्षअखेरीस हे उत्सर्जन ४ ते ८ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे.

पण आता हळुहळू लॉकडाउनची भाषा संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पुन्हा एकदा उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू होतील, वाहनांची गर्दी वाढेल तेव्हा हे उत्सर्जन वाढणार आहेच हे आपण लक्षात घ्यायला हवे. लॉकडाउनच्या काळात हवा शुद्ध झाल्याने त्याचा तापमानवाढ रोखण्यासाठी किती उपयोग होईल, याबद्दल सध्या जगभरात संशोधन सुरू आहे.

पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी यावर प्रकाश टाकला आहे. लॉकडाऊनच्या काळात जगभरातल्या कार्बन उत्सर्जनात १७ टक्क्यांची घट झाली, असे सर्वेक्षण आहे. पण तरीही याचा जागतिक तापमानवाढ कमी होण्यावर फारसा परिणाम होणार नाही, असे त्यांना वाटते. ते म्हणतात की, जगभरात कोळसा जाळून वीजनिर्मिती करणाऱ्या औष्णिक प्रकल्पांमुळे तापमानवाढ करणारे वायू बाहेर पडत असतात. आपल्याकडे होणाऱ्या वीजनिर्मितीपैकी ५६ टक्के वीज औष्णिक विद्युतप्रकल्पांतून येते. यातून सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सूक्ष्म धनकण बाहेर पडतात. या वायूंमुळे तापमानवाढ होते. लॉकडाऊन असला तरी वीजपुरवठा सुरूच होता आणि हे प्रकल्पही सुरू होते. त्यामुळे प्रदूषण थांबलेले नाही. जोपर्यंत आपण कोळसा जाळून केल्या जाणाऱ्या वीजनिर्मितीवर अवलंबून आहोत, तोपर्यंत या प्रदूषणाचे परिणाम आपल्याला भोगावेच लागणार आहेत.

जिथेजिथे हवेचे प्रदूषण जास्त आहे अशा ठिकाणी कोरोनाचा संसर्ग जास्त झाला, याकडेही अतुल देऊळगावकर लक्ष वेधतात. हवेचे प्रदूषण रोखायचे असेल तर, वाहनांच्या प्रदूषणाला आळा घालावा लागेल. यासाठीच सार्वजनिक वाहतुकीचे प्रकल्प आवश्यक आहेत पण कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे आपण पुन्हा एकदा खासगी वाहनांचा जास्त वापर करू लागणार आहोत. या स्थितीत वाहनांचे प्रदूषण रोखणार तरी कसे? हा प्रश्न आ वासून उभा आहे. वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी जगभरातच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे पण या उद्योगालाही कोरोनाच्या उद्रेकामुळे खीळ बसणार आहे, असा इशारा ते देतात.

कोरोनाच्या कचऱ्याचे काय?

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाबद्दल दिलासा मिळाला असला तरी, याच कोरोनाने पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. हवेच्या प्रदूषणाइतकाच प्लँस्टिकच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. कोरोनाशी लढताना सगळीकडेच मास्क, PPE किट्सचा वापर करावा लागतोय. पुढचे एक वर्ष तरी याशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही. त्यातच रुग्णांनी वापरलेल्या प्लेट्स, ग्लास, पाण्याच्या बाटल्या या सगळ्याचाही कचरा जमा होतो आहे. यामुळे ‘ हॉस्पिटल वेस्ट’ म्हणजेच हॉस्पिटलमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे.

कचरा व्यवस्थापनामध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे ‘एन्व्हायरोव्हिजिल’चे विद्याधर वालावलकर यांना हे मोठे आव्हान वाटते. सध्या तरी त्यावर काहीही उपाय निघताना दिसत नाही. महापालिकांच्या क्षेत्रात कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या युनिटमध्ये नेहमीपेक्षा तिप्पट कचरा जमा होतो आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा कचरा जाळून कार्बन डायॉक्साइडचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते, पण सध्या तरी या सगळ्याला पर्यायच नाही हे ते मान्य करतात.

कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर होतोय. हे मास्क सच्छिद्र आहेत, ते कापडाचे असतात पण PPE किट्सची विल्हेवाट लावायची असेल तर ते जाळावेच लागतात. आत्ताच्या घडीला यामुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा यातून होणारा संसर्ग रोखणे आवश्यक आहे. पण हा कचरा जाळल्याने हवेतली उष्णता वाढणार आहे.

‘आय नेचर वॉच’चे संस्थापक आयझँक किहिमकर नेमके याच मुद्द्याकडे लक्ष वेधतात. कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या या कचऱ्यावर आत्ता काही उपाय नसेल तर मग अशा स्थितीत प्लॅस्टिकचा अनावश्यक वापर तरी आपण टाळायला हवा, असे त्यांचे सांगणे आहे. त्यांच्या मते, कोरोनामुळे हवा स्वच्छ झाली, नदी, समुद्र नितळ दिसू लागले. याचा अर्थ आपलीच कृत्य या प्रदूषणाला कारणीभूत होती, हे आपण ओळखायला हवे. या सगळ्यातून धडे घेऊन आपण आपली जीवनशैली बदलली नाही, तर या लॉकडाऊनमधून आपण काहीच शिकलो नाही, असे म्हणावे लागेल.

कोरोनाचा हा विषाणू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे यावर सध्या बरेच वाद सुरू आहेत. पण पृथ्वीवरची मानवजात आपण जे केले तेच भोगते आहे, असे ते परखडपणे म्हणतात. आपण निसर्गाला खूप गृहीत धरतो हेच निसर्गाने दाखवून दिले. हवामान बदल आणि तापमानवाढीच्या दिवसात आपल्यापुढचे नैसर्गिक आपत्तीचे आव्हान वाढत चालले आहे आणि तरीही आपण जंगल, नद्या, समुद्र यांचा आदर करायला तयार नाही.

ब्राझीलमध्ये ॲमेझॉनच्या जंगलाची बेसुमार तोड, आर्क्टिकमध्ये चाललेलं नैसर्गिक वायूंचे उत्खनन, गोव्यामधले अनिर्बंध खाणकाम ही सगळी त्याचीच उदाहरणे आहेत. लॉकडाऊनच्या काळात निसर्गाने श्वास घेतला खरा पण बेकायदेशीर खाणकाम, वन्यजीवांची शिकार असेही प्रकार घडले. केरळमध्ये सायलेंट व्हँलीजवळ एका गर्भवती हत्तिणीची शिकार झाली. अन्नाच्या शोधात आलेल्या या हत्तिणीने फटाके भरलेली फळे खाल्ली आणि तिचा मृत्यू ओढवला.

निसर्गाने दिलेले एवढे धडे घेऊनही माणसाच क्रौर्य आणि हाव काही संपत नाही. निसर्गापुढे माणूस काहीच नाही, हे आपण कधी शिकणार असे आयझँक किहिमकर कळकळीने विचारतात. कोरोनाच्या निमित्ताने तरी निसर्गाचा आदर करूया, निसर्गाच्या जवळ जाऊया, असे त्यांचे म्हणणे आहे. कवी मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात सांगायचे तर, ‘ज्यांची ह्रदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात, तेच वाढतात, प्रकाश पितात, तेच ऋतू झेलून घेतात.’ पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अशी झाडाची ह्रदये असणाऱ्या माणसांची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची फार गरज आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.