Author : Priyal Pandey

Published on May 20, 2020 Commentaries 0 Hours ago

कामासाठी आणि विरंगुळ्यासाठी वापरली जाणाऱ्या सारख्या उपकरणांमुळे स्क्रिनचा वापर वाढला आहे. परिणामी मानसिक-शारिरिक थकवाही वाढतो आहे.

डिजिटल आयुष्याचे ताणेबाणे

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊमुळे आपले दैनंदिन आयुष्य अनेपेक्षितपणे एकाच ठिकाणी थांबल्यासारखे झाले आहे. आपले वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य जपण्यासाठी सर्वांनाच काहिशा जबरदस्तीनेच घरात थांबावे लागले आहे. या लादलेल्या बंदीचा परिणाम आपल्या दैनंदिन व्यवहारांवर आणि आपल्या खासगी आयुष्यावरही झाला आहे. आपण सर्वच जण तणावाच्या परिस्थितीत असून, मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही आपल्यासमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. या भयंकर ताणतणावामध्ये स्वतःच मन गुंतवून ठेवण्यासाठी लोक टीव्ही आणि स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर करताहेत. जगभरात इंटरनेटचा वापर तब्बल ८० टक्क्यांनी वाढला आहे.

याआधी, २०१७ मध्ये आलेल्या हार्वे या चक्रीवादळाच्या वेळी, तसेच २०१६ मध्ये झालेल्या हिमवादळाच्या वेळी टेक्सासमधील ह्युस्टन शहरात असाच अनुभव नोंदला गेला होता. त्यावेळ दूरचित्रवाणीच्या वापरात अनुक्रमे ५६% आणि ४०% ची वाढ झाली होती. न्यूयॉर्क शहराला जानेवारी २०१६ मध्ये जेव्हा एका भयंकर हिमवादळाचा तडाखा बसला होता, त्यावेळी तिथेही काहीसे असेच चित्र दिसले होते. त्यावेळी तिथे दूरचित्रवाणीचा सरासरी वापर ४५% पेक्षा अधिक होता. त्यामुळेच अशा घटनांमधून एक असे गृहितकही मांडता येते की जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या लॉकडाऊनची स्थिती निर्माण होते, त्यावेळी दूरचित्रवाणी किंवा तत्सम प्रकारांच्या माध्यमांच्या वापरात मोठी वाढ होते.

खरे तर सध्या सुरु असलेल्या कोरोना संकट काळात, आपलं मनोरंजन होत राहावे, किंवा आपण कशाततरी गुंतून रहावे यादृष्टीने प्रत्येकजण प्रयत्न करतोय. अशा वेळी आपल्याला हवे असेल तेव्हा व्हिडिओ, हवे तेव्हा पाहण्याची सोय (व्हिडिओ ऑन डिमांड) उपलब्ध असणे, ही बाब एखाद्या वरदानासारखी ठरली आहे. अमेरिकेसारख्या देशात ऑनलाइन स्ट्रिमिंग ही नियमित आणि प्रथापित झालेली बाब असतानाही, तिथे दूरचित्रवाणीच्या वापराच्या प्रमाणात १८% वाढ, तर दूरचित्रवाणी पाहणाऱ्यांच्या संख्येत १४% ची वाढ झालेली दिसते. सध्या लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालावधीमुळे जगभरातले स्ट्रिमिंगचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज निल्सनने प्रकाशित केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

एका अर्थाने सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे, घरबसल्या मनोरंजनाची सेवा देणाऱ्या नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, डिस्ने प्लस, अॅपल टिव्ही अशा माध्यमांना एक मोठीच संधी मिळाली. एकीकडे मनोरंजन विश्वाला चित्रपटांच्या वितरणालाच खीळ बसली आहे, त्यामुळे मनोरंजन विश्वही संकटातच सापडलेले आहे. अशा परिस्थितीत आपल्या मागणीनुसार आपल्याला हवा तो व्हिडिओ उपलब्ध करून देणारी ही व्यासपीठे, एकांत किंवा विजनवासात अडकलेल्या असंख्य लोकांसाठी, एक प्रकारचा आधार ठरली आहेत.

खरे तर या एकाकी परिस्थितीत, या प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कंटेटने सगळ्यांना व्यापून टाकले आहे. या मनोरंजनाने अगदी सोयिस्करित्या कोरोनाच्या भीषण आकडेवारीपासून लोकांचे लक्ष इतरत्र वळवले आहे. या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आपले जुने आवडते कार्यक्रम आणि नव्याने प्रदर्शित झालेले सिनेमे पाहण्याचा मार्ग, सध्याच्या वाढत्या भितीच्या परिस्थितीशी कुशलतेने जुळवून घेण्याचा मार्ग ठरू लागला आहे.

लोकांना आरामात बसून काहीतरी पाहायला आवडत असते. त्यात लोकांना गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य असते, हे लक्षात घेऊनच, भारत सरकारने दूरदर्शनवरील रामायण आणि महाभारत सारख्या पौराणिक महाकाव्यांवरच्या मालिकांसह, शक्तिमान सारख्या लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा दाखवाणे सुरु केले. यामुळे दूरदर्शनची प्रेक्षकसंख्या विक्रमी ५ कोटी १० लाखांहून अधिक वाढली. मनोरंजन क्षेत्रात २०१५ नंतरची ही सर्वाधिक प्रेक्षकसंख्या आहे. त्यासोबतच या मालिकांच्या पुनःप्रक्षेपणामुळे दूरदर्शन ही सर्वाधिक पाहिली गेलेली वाहिनीही ठरली. अर्थात त्याचवेळी जेव्हा रामायण मालिकेचे पुनःप्रक्षेपण संपले (१८ एप्रिलला), त्यानंतर पुन्हा एकदा एकूण प्रेक्षकसंख्या निम्म्यावर आली.

दूरचित्रवाणीसाठीच्या डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवेचे उत्पादन काहीसे खुंटलेले आहे, आणि याचा थेट फायदा ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिसेस (ओटीटी) आणि व्हिडिओ ऑन डिमांडसारखी सेवा उपलब्ध करून देणाऱ्या प्लॅटफॉर्मना होऊन, प्रेक्षक त्यांच्याकडे वळू लागले. याचे ठळक पुरावे म्हणजे गेल्या काही काळात ‘झी फाईव्ह’ (Zee5) ची प्रिमियम सेवा घेणाऱ्यांचे प्रमाण १०० टक्क्याने, ‘एच.बी.ओ नाऊ’चे ९० टक्क्याने आणि ‘शोटाइम’चे ७८ टक्क्याने वाढले आहे. अलिकडेच नेटफ्लिक्सनेही आपल्या ग्राहकांची संख्या १५.८ दशलक्षने वाढली असल्याचे जाहीर केले. ही संख्या त्यांनी स्वतःच मांडलेल्या अंदाजापेक्षाही दुप्पट आहे. अशा व्हिडिओ ऑन डिमांडसारखी व्यासपीठांवर खर्च होणारा वेळ हा दर आठवड्याला २१९ मिनिटे इतका आहे.

एकीकडे व्हिडिओ ऑन डिमांडसारखी सेवा पुरवणाऱ्या ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिसेस (ओटीटी) सारख्या सेवा देणाऱ्यांकडे असलेला कंटेट प्रचंड आहे. मात्र तरीदेखील फ्रेंड्स, द ऑफिस, सीनफेल्ड या जुन्या आणि प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमांचे गारुड आजही कायम आहे, आणि आता त्यांच्या प्रक्षेपण हक्कांच्या विक्रीचा बाजारही आता अधिकाधिक खुला होत जाईल. मनोरंजन उद्योग क्षेत्रात वलय, लोकप्रियता, सर्वाधिक प्रेक्षकसंख्या आणि पारितोषिक मिळवलेले हे असे काही मोजके कार्यक्रम आहेत, की त्यांच्या प्रक्षेपण हक्कासाठी सातत्याने बोली लागत असते. एकीकडे नव्या निर्मितींना खीळ बसलेली असताना, अशा प्रकारचा कंटेट गमावला जाऊ नये म्हणून या क्षेत्रातली जी मोठी व्यासपीठे आहेत, ती अधिककाधिक वाटाघाटी करायला उत्तेजित होऊ शकता. यातून मूल्य ठरवण्यासाठीचे एक वेगळेच युद्धही पाहायला मिळू शकते. विशेषतः जेव्हा मोठ मोठे स्टुडिओ (निर्मिती कंपन्या) स्वतःच आपले स्वतंत्र व्यासपीठ सुरु करण्याच्या तयारीत आहे, हे ही या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घ्यायला हवे.

कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे समोर येत असलेली पर्यायी जीवनशैली, यामुळे सिनेमा विरुद्ध ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ असा वाद विवाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांशी जोडलेली पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्य कालातित आहेत, मात्र जागतिक पातळीवर सर्वत्रच सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या एकत्रित येण्यावर असलेल्या निर्बंधामुळे ही मूल्यही आता बदलू लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा लॉकडाऊनमुळे ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवा पुरवणाऱ्या व्यासपीठांकडून उपलब्ध होणाऱ्या कंटेटचा (स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय) प्रचार प्रसार ठोसपणे होऊ लागल्यासारखीच स्थिती आहे, आणि त्याचवेळी याआधी प्रदर्शित झालेले सिनेमांनाही अशा व्यासपीठांच्या संग्रहाच्या माध्यमातून अधिकचे आयुष्य लाभले आहे.

खरे तर ही अशी काही चमत्कारिक किंवा विचित्र परिस्थिती आहे, जिथे या व्यासपीठांवरून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कंटेटमुळे आपले लक्ष खऱ्या आयुष्यातल्या महामारीवरून, सिनेमाच्या आभासी जगातल्या जगण्याकडे त्यातल्या आश्वस्ततेकडे वळवले जात आहे. एकीकडे चित्रपटगृहांमध्ये सिनेमे प्रदर्शित होण्याचा कालावधी कमी झाला आहे, आणि परिणामी काही सिनेमे अशा तऱ्हेच्या डिजिटल व्यासपीठांवरूनच प्रदर्शित व्हायला लागले आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर फ्रोजन २, ऑनवर्ड आणि अंग्रेझी मीडियम हे सिनेमे डिस्ने प्लस या व्यासपीठावरून प्रदर्शित झाले.

वॉल्ट डिस्ने या कंपनीचीच एक शाखा असलेली ‘डिस्ने प्लस’ हे व्यासपीठ जेमतेम पाच महिनेच जुने आहे. मात्र इतक्या कमी वेळातही या व्यासपीठाचे सशुल्क सदस्यत्व घेणाऱ्या ग्राहकांची जगभरातली संख्या ५० दशलक्षांहून अधिक आहे, त्यासोबतच भारतात हॉटस्टारशी केलेल्या भागिदारीच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकसंख्येत ८० लाख खात्यांचीही भर पडली आहे. फोर्बच्या माध्यमातून, अँटेना या स्ट्रिमिंगविषयी विश्लेषण करणाऱ्या संस्थेने मांडलेल्या अहवालात असा निष्कर्ष मांडला आहे की, डिस्ने प्लसचे सदस्यत्व घेणाऱ्यांची संख्या तिपटीपेक्षा जास्तने वाढली आहे, आणि ही सर्वाधिक वेगाने झालेली वाढ आहे.

सध्या जागतिक पातळीवर सुरु असलेली ही लॉकडाऊनची स्थिती आणि परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी स्थिती आता बराच काळ अशीच राहणार आहे. दुसरीकडे वाढती प्रेक्षकसंख्या आणि बाजाराची गरज पूर्ण होत असल्याने ‘डिजिटल प्लॅटफॉर्म्स’च्या संख्याही वाढते आहे. त्यामुळे यापुढे सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याचीही परंपरा बदलेल, असे चित्र दिसते आहे. हे चित्रपट ‘व्हिडिओ ऑन डिमांड’सारखी सुविधा पुरवण्याऱ्या व्यासपीठांवरून प्रदर्शित होण्याची प्रक्रिया वेग धरू लागेल.

हे लक्षात घेतले तर बड्या कलाकांरांना घेऊन बनवले जाणारे जेम्स बाँड सारखे सिनेमे, ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ सारख्या मोठ्या निर्मिती संस्था हा बदलत असलेला पर्याय स्वीकारण्याची शक्यता आता अधिक वाढली आहे. उदाहरणच घ्यायचे तर, मार्टिन स्कॉर्सेसचा ‘द आयरिशमन’, अॅडम सँडलर भूमिका असलेला ‘मर्डर मिस्ट्री’ आणि सँड्रा बुलकचा बर्ड बॉक्स हे सिनेमे अलिकडे नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित झाले, आणि हे सिनेमे प्रदर्शित झाले त्याच आठवड्याच्या अखेरीस तुफान प्रतिसादही मिळाला होता.

परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिला जाणारा कंटेट, आकर्षक सवलती आणि योजना, काही काळ मोफत वापरण्याची सोय आणि यासोबतच सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचेही प्रक्षेपण यासारख्या सुविधांमुळे ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिसेस (ओटीटी) आणि व्हिडिओ ऑन डिमांडसारखी सेवा देणारी व्यासपीठे मनोरंजनाचे मुख्य स्रोत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

सध्याच्या परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याची निर्माण झालेल्या परिस्थितीने स्ट्रिमिंगची सेवा देणाऱ्या व्यासपीठांना आपल्या वापरकर्त्यांशी संवाद साधण्याची – जोडून घेण्याची तसेच विविध स्वरुप आणि प्रकारचा कंटेट उपलब्ध करून देण्याची संधी दिली केली आहे. त्याचवेळी सध्या इतर कोणतीही व्यासपीठे उपलब्ध होत नसल्यामुळे अशा व्यावसपीठांच्या सदस्यांच्या संख्येत, प्रेक्षकवर्गात मोठी वाढ होत आहे, आणि त्यामुळे विविध स्वरुपातला मनोरंजक आणि माहितीपर कंटेट ऑनलाईन पाहण्याची प्रथाही रुढ होऊ लागली आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर व्हीडिओ ऑन डिमांडच्या सेवेसोबतच, सर्व भाषांमधल्या बातम्या पाहण्याच्या प्रमाणातही २९८ टक्क्याची वाढ झाली आहे. दूरचित्रवाणी पाहण्याचे प्रमाणही दर आठवड्याला ८ टक्क्याने वाढल्याचे दिसले आहे, या सगळ्याचा परिपाक म्हणजे दूरचित्रवाणी पाहण्याच्या प्रमाणात तब्बल  ७० अब्ज मिनिटांची वाढ झालेली दिसते. स्मार्टफोनच्या वापराबाबत बोलायचे झाले तर ३५-४४ वर्षे वयोगटातले स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण १ तास ४० मिनिटांनी वाढलेले आहे. ही या वयोगटासाठीची सर्वाधिक वाढ आहे.

केवळ घरातच राहण्याच्या सक्ती आणि भितीचा परिणाम काही हजारांवर नाही तर प्रत्येकावर होतोय हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत दूरचित्रवाणी, चित्रपट, स्मार्टफोन, बातम्या अशा गोष्टीच लोकांना गुंतवून ठेवत आहेत, त्यांचे मनोरंजनही करत आहेत. याबरोबरच वापरकर्त्यांनीच निर्माण केलेल्या कंटेटमधे विशेषतः छोट्या कालावधीच्या व्हिडिओ कंटेंटमध्येही काही प्रमाणात वाढ होईल, तर फेसबुकसारखे अॅप वापरण्याचे प्रमाण ३७ टक्क्यांनी आणि टिकटॉकच्या एकूण वापरात २० टक्क्यांची वाढ होईल, अशी शक्यताही मनोरंजन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतात ४९ दशलक्षांपेक्षाही अधिक नवे लोक ही अॅप डाऊनलोड करतील.

अर्थात, कामासाठी आणि आपल्या विरंगुळ्यासाठी वापरली जाणारी बहुसंख्य उपकरणे आता एकच होऊ लागली असल्याने, लोकांचा स्क्रिनशी सर्वात जास्त संबंध येऊ लागला आहे. मग एकतर ते कंटेट शोधत किंवा पाहात असतात, किंवा झूमसारख्या सुविधेतून व्हिडिओ कॉलवर असतात. एकीकडे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याच्या अवकाशातली सीमारेषा धूसर होत चालली असताना, स्वतःला सतत नव्या माहितीने अद्ययावत ठेवण्याचा वाढत असलेला ताण, यामुळे मानसिक आरोग्य, उत्पादन क्षमतेवर विपरित परिणाम होतोय, तसेच सातत्याने स्क्रिनचा वापर करत राहिल्याने मानसिक आणि शारिरिक थकवाही वाढतो आहे.

दरम्यान, अमेरिकेत घरगुती वापरासाठी ब्रॉडबँडची सेवा वापरणाऱ्या ७६ टक्क्यापेक्षा जास्त कुटुंबांनी ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिसेस (ओटीटी) सेवेचे सदस्यत्वही घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर पार्क्स असोसिएट्स या ओटीटी व्हिडिओच्या बाजारपेठेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने असे म्हटले आहे की, यामुळे संवाद प्रमाणालीशी संबंधित पायाभूत सुविधांवरचा ताण अभूतपूर्व वाढला आहे. बहुतांश लोक कुठूनतरी घरातून कार्यालयाचे कामे करत असल्यामुळे इंटरनेट आणि स्क्रीनचा वापर होण्याचा कालावधीही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इंटरनेट बँडविड्थवर मोठा ताण आला असून, अनेकदा त्यात खंडही पडतो आहे.

युरोपीय महासंघाप्रमाणेच भारतातल्या सेल्यूलर ऑपरेटर्सच्या संघटनेने ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिसेस (ओटीटी) सेवा पुरवणाऱ्या व्यासपीठांना त्यांच्याकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या व्हिडिओंचा बिटरेट कमी करावा अशी विनंती केली आहे. जेणेकरून ऑनलाइन स्ट्रिमिंगमुळे इंटरनेट पुरवठा करणाऱ्या पायाभूत सुविधांवर येत असलेला ताण कमी करता येईल.

कोविड१९च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊनचा कालावधीही सातत्याने वाढवला जातोय, आणि याकाळात जगभरात इंटरनेटचा वापरही ८० टक्क्यांनी वाढला आहे. आता प्रश्न हाच आहे की, इंटरनेट आधारित सेवा या वाढत्या वापरामुळे आलेला ताण, वाढतं इंटरनेटचे ट्रफिक आणि त्यामुळे आपसूकच वाढलेला प्रतिक्षेचा काळ या सर्व समस्या कुशलतेने हाताळू शकतात का?

लॉकडाऊन आणि क्वारंटाईन या संज्ञा आता कोव्हिड-१९ची अविभाज्य ओळख म्हणून ठसल्या आहेत. तर दुसरीकडे पर्यटकांच्या अभावी मिलान, पॅरिस आणि न्यूयॉर्कमधले ओस पडलेले रस्ते पाहिले तर आपण याच संज्ञांना धरून पुढच्या काही काळातले चित्र कसे असेल याची काहीएक कल्पना नक्कीच करू शकतो. दुसरी बाब अशी की सध्याच्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीने आपल्याला काही महत्वाच्या समस्यांचीही जाणीव करून दिली आहे. त्यापैकीच एक म्हणजे इटरनेट तसंच असंख्य कामांचे डिझीटाझेशन करणं किती गरजेचे आणि महत्वाचे आहे याची आपल्याला पुन्हा एकदा ठळकपणे जाणिव करून दिली आहे.  याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे, या परिस्थितीने आपल्याला नवनने तंत्रज्ञान (मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूम सारख्या) कशा रितीने सुरु करता येईल, तसेच नवी जीवनशैली कशी विकसित करता येईल याचे मार्गही प्रशस्त करून दिले आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले, तर यापुढे सिनेमा आणि चित्रपटगृहांना भूतकाळातल्या मौल्यवान ठेव्यासारखेच मोल असले तरीही, ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिसेस (ओटीटी) सेवा पुरवणारी व्यासपीठांनी आणि मोठमोठ्या निर्मिती संस्थांनी एकत्र येत सध्याच्या अस्वस्थ करणाऱ्या काळात यशस्वीपणे गुंतवून ठेवले हे वास्तव आहे. ऑनलाइन मनोरंजन क्षेत्राने लहान मुलांसाठीचाही कंटेट उपलब्ध करून दिला, त्यांनी कुटुंबाला परस्परांसोबत चांगला काळ व्यतित करण्याची संधी उपलब्ध करून दिली, तसेच लोकांसमोर वैविध्यपूर्ण कंटेटचे भंडार उपलब्ध करून देत काहिशा विजनवासात पडल्यासारखे वाटत असलेल्या असंख्य व्यक्तींना गुंतवुनही ठेवले.

खरे तर या सगळ्यातून एक सोयिस्कर अर्थ मात्र काढता येईल, तो म्हणजे, या काळात लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या व्यासपीठांनी आपल्या प्रेक्षकांना काहीएक प्रमाणत क्रियाशीलही ठेवले, समोरच्या संकटावरून त्यांचे लक्षही विचलित केले आणि त्याचवेळी विवेकही जागृत राहिल यासाठीही प्रयत्न केले.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.