Published on Jun 24, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाविरुद्धची लढाई सरकारवर अवलंबून न राहता, मनोरंजन क्षेत्राला स्वतःच लढावी लागणार आहे. पण, काहीही करून सिनेमा आणि त्यातून येणारी स्वप्ने जगली पाहिजेत.

सिनेमा टिकला, तरच ‘स्वप्ने’ टिकतील!

Image Source: jakpost.net

पडद्यावर दिसणारा सिनेमा… मग, तो थिएटमधल्या पडद्यावरचा असो की टीव्ही-मोबाईलच्या पडद्यावरचा… या सिनेमातील दृश्यांच्या पाठी एक प्रचंड मोठी ‘इंडस्ट्री’ काम करत असते. ही ‘इंडस्ट्री’ आजवर आलेल्या अनेक संकटांना पुरून उरली. २००८ च्या मंदीतही सिनेमा उद्योग कोलमडला नाही. पण, आज कोरोनाच्या संकटाने या कणखर उद्योगाला अक्षरश गुडघ्यावर आणले आहे. हा फक्त उद्योग नाही, तर कोट्ववधी लोकांची ती स्वप्नांची दुनिया आहे. काहीही झाले तरी, ही स्वप्ने तुटता कामा नयेत. कारण स्वप्ने ही जगण्याची प्रेरणा आहेत. म्हणूनच, कोरोनानंतरच्या काळात हा ‘उद्योग’ कसा टिकवायचा, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

सिनेमा उद्योगाचे सामर्थ्य

२००१ मधली ही गोष्ट. गुजरातमधल्या भुजमध्ये विध्वंसकारी भूकंप आला होता. हजारो जीव गेले होते आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. लक्षावधी माणसे आयुष्यातून उठली होती. त्याच वेळेस तिथले एक छायाचित्र वर्तमानपत्रात छापून आले होते. भूकंपानंतर काही दिवसांनी एका मोडकळीला आलेल्या चित्रपटगृहात त्याच्या मालकाने आहे त्याच अवस्थेत, प्रोजेक्टरच्या मदतीने मोठ्या पडद्यावर सिनेमा सुरु केला. डोक्यावर धड छप्पर नाही… खुर्च्या मोडकळीला आलेल्या… अशा या भीषण अवस्थेतही काही प्रेक्षक डोळे विस्फारून, देहभान हरपून सिनेमा पाहत होते. ते छायाचित्र खूप काही सांगत होते. माणसाच्या भविष्यावर असलेल्या विश्वासावर, सिनामा उद्योगाच्या सामर्थ्यावर ते छायाचित्र म्हणजे खूप मोठे भाष्य होते.

अशीच एक घटना दुसऱ्या महायुद्धादरम्यानची. जर्मन विमानांनी लंडनवर बॉम्बची संततधार धरली होती. पण त्या अवस्थेतही अख्खे लंडन टिकून राहिले ते मार्क्स बंधूंचे हास्यपट बघून. चित्रपट क्षेत्र किंवा एकूणच मनोरंजन क्षेत्र ही मोठी प्रवाही आणि लवचिक गोष्ट आहे. हे क्षेत्र बदलत्या वेळेशी, येणाऱ्या संकटांशी, वेगवेगळ्या जगांशी फार उत्तमरित्या जुळवून घेते.

सिनेमा एकाच वेळेस आलिशान मल्टिप्लेक्समध्ये पण चालू असतो आणि त्याचवेळेस एखाद्या खेड्यात भरलेल्या जत्रेतही तो सुरू असतो. तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये निवांत टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर तो पाहू शकता, त्याचवेळेस भरगच्च भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर पण बघू शकता. सिनेमा तुम्ही मल्टिप्लेक्समधले तीनशे रुपयात मिळणारे पॉपकॉर्न बघत खाऊ शकता, तसेच सिनेमा तुम्ही दहा रुपयात मिळणारे खारेमुरे खात एखाद्या सिंगलस्क्रीनमध्ये पण बघू शकता.

मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये सिनेमा कदाचित पहिल्या दहामध्येही नसेल पण तो मानवाच्या नेणिवांमध्ये-जाणिवांमध्ये यत्र तत्र सर्वत्र आहे. २००८-०९ ला मोठी आर्थिक मंदी आली होती, तेव्हा करण जोहर म्हणाला होता की, चित्रपटक्षेत्र हे ‘रिसेशनप्रूफ’ आहे. हे विधान किती खरे होत हे आर्थिक मंदीला पुरून उरून सिनेमाने सिद्ध केलेच. थोडक्यात सिनेमाचा प्रवाह युद्ध, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट या सगळ्यांना तोंड देत वर्षानुवर्षे खळाळत वाहतच आहे. हे सारे खरे असले तरीही, डोळयांना न दिसणाऱ्या एका विषाणूने या लवचिक उद्योगाला गेल्या काही महिन्यांपासून ‘पॅकअप’ करायला लावले आहे. कोविड -१९ ने एकूणच मानवजातीवर संक्रांत आणली आहे, तशीच सिनेमाच्या क्षेत्रावर पण आणली आहे. फिल्म इंडस्ट्रीवर आलेले हे संकट केवळ आर्थिकच नाही तर त्यापेक्षा व्यापक पातळीवरचं आहे.

कोरोनानंतरचा सिनेमा

कोरोनाच्या साथीबद्दल कुणकुण डिसेंबरपासूनच लागली होती. तरीही या साथीच्या रोगाची तीव्रता लक्षात आली ती फेब्रुवारीमध्ये. या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारांनी टाळेबंदीचे धोरण स्वीकारले. हे धोरण कितपत यशस्वी झाले, हा वादाचा मुद्दा आहे. पण, आपल्याकडच्या संघटित आणि असंघटित श्रमिक वर्गावर याचे दूरगामी परिणाम होणार हे उघड होते आणि तसेच झाले. मनोरंजन क्षेत्रही याला अपवाद नव्हते. प्री प्रोडक्शन, शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन यावर रोजीरोटीसाठी अवलंबून असलेले शेकडो श्रमिक यामुळे एकदम घरी बसले.

कुठल्याही मल्टिप्लेक्स थिएटरची किंवा सिंगल स्क्रीन थिएटरची स्वतःची एक अर्थव्यवस्था असते. या थिएटर्समध्ये काम करणारे लोक, थिएटरच्या आजूबाजूला खाद्यविक्री आणि इतर अनेक वस्तूंची विक्री करणारे लोक या लॉकडाऊनमुळे एका झटक्यात बेकार झाले. नवीन सिनेमे रिलीज होण्याचे थांबल्याने थिएटरमधे प्रेक्षक येण्याचा प्रश्नच नव्हता. थियेटर कधी सुरु होतील (आणि सुरु झाली तरी पूर्ण क्षमतेने कसे सुरु होतील) या प्रश्नाचे उत्तर छातीठोकपणे सध्या कुणीच सांगू शकत नाही.

समजा थिएटर सुरु झालेच तरी संसर्गाच्या भीतीने किती प्रेक्षक सिनेमागृहात येतील याबद्दल शंका आहे. ज्यांचे सिनेमे तयार आहेत किंवा निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, अशा सिनेमांच्या निर्मात्यांची कुचंबणा होत आहे. यातल्या अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट सिनेमे प्रदर्शित करण्याचा मार्ग चोखाळला. शूटिंग आणि नवीन सिनेमांचे प्रदर्शन थांबल्यामुळे देशातील मनोरंजन क्षेत्राला बसलेला आर्थिक फटका एक हजार कोटींच्या वर आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दरम्यान, वर्तमानपत्रांमध्ये मनोरंजन क्षेत्रात कार्यरत लोकांच्या आत्महत्येच्या बातम्या पुन्हा पुन्हा वाचण्यात येऊ लागल्य. यापुढेही अनेक आत्महत्यांची शक्यता नाकारता येत नाही. या क्षेत्रात कार्यरत लोकांचा वर्तमानकाळ अंधकारमय आहे आणि भविष्यकाळ अनिश्चित. म्हणूनचा सिनेमाचा विचार, फक्त मनोरंजनापुरता न करता अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग म्हणून करणे अत्यंत गरजेचे आहे.

काय करायला हवे?

आपल्याकडे फिल्मइंडस्ट्री असे आपण म्हणत असलो, तरी चित्रपटक्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळायला स्वातंत्र्यानंतर पन्नास एक वर्ष जावी लागली. या सरकारी अनास्थेमुळे मनोरंजनक्षेत्रात ‘फायनान्सर’ या गोंडस नावाने अनेक अनिष्ट प्रवृत्तींनी प्रवेश केला होता. याउलट अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये चित्रपटांना उद्योगांचा दर्जा पहिल्यापासूनच आहे. कोरोना साथीच्या लॉकडाऊनचा फटका सामान्य जनतेला बसू नये, यासाठी या देशांनी अनेक पावले उचलली. यातले एक महत्वाचे पाऊल म्हणजे त्यांनी अनेक उद्योगांना आर्थिक पॅकेजेस दिली.

कॅनडा, ग्रेट ब्रिटन यासारख्या अनेक देशांनी त्यांच्या देशातल्या मनोरंजन क्षेत्राला घसघशीत पॅकेजेस दिली आहेत. आपल्याकडे तसे होण्याची शक्यता नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आपल्या सरकारांकडून अशा अपेक्षा ठेवणे पण अवास्तव आहे. आपल्या मोठ्या लोकसंख्येमुळे, रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे आणि असंघटित क्षेत्रात मोठे मनुष्यबळ असल्यामुळे आपल्या सरकारांसमोरची आव्हाने आधीच डोंगराएवढी आहेत. अगोदरच ताणली गेलेली अर्थव्यवस्था, आटलेले आर्थिक स्रोत यामुळे मेटाकुटीला आलेल्या आपल्या केंद्र किंवा राज्य सरकारने मनोरंजन क्षेत्राला विशेष पॅकेज द्यावे, ही अपेक्षा म्हणूनच अवास्तव ठरते

कोरोनाविरुद्धची ही लढाई सरकारवर अवलंबून न राहता, मनोरंजन क्षेत्राला स्वतःच लढावी लागणार आहे, हे बऱ्यापैकी उघड आहे. महत्वाचे म्हणजे मनोरंजन क्षेत्राला याची जाणीव आहे आणि त्यांनी आपली लढाई सुरु केली आहे. मनोरंजन क्षेत्रातल्या काही धुरिणांनी आणि कलावंतांच्या संघटनांनी या लढाईत पुढाकार घेतला आहे.

‘दी इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी’ (IPRS) या कलावंतांच्या संघटनेने आपल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या लेखक-संगीतकार सदस्यांसाठी रिलीफ पॅकेज जाहीर केले. ‘इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स असोसिएशन’ (IFTPC) आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईज’ (FWICE) सारख्या कलावंताच्या आणि निर्मात्यांच्या संघटनांनी हाच कित्ता रंगवला. अर्थात, प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला येणारा रकमेचा आकडा फार मोठा नसेल, पण या आणीबाणीच्या काळात मिळणारी प्रत्येक मदत मोलाची आहे. ‘फिल्म रायटर्स असोसिएशन’ सारख्या संघटनांनी या बिकट प्रसंगी आपले सदस्य नैराश्याने ग्रस्त होऊ नयेत, म्हणून त्यांना मानसशास्त्रज्ञांकडून समुपदेशन मिळेल याची व्यवस्था केली.

कलावंतांच्या संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे रोजंदारीवर काम करणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातल्या श्रमिकांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे. ‘द इंडियन सिंगर्स राइट असोसिएशन’ या संघटनेने तीन दिवसांचा virtual concert भरवून, त्यातून आपल्या सदस्यांना आर्थिक उत्पन्न मिळतील, यासाठी तरतूद केली. (संदर्भ Mondaq.com या वेबसाइटवरून घेतले आहेत). याशिवाय सरकारने जाहीर केलेल्या काही उपाययोजनांचा प्रत्यक्ष फायदा पण मनोरंजन क्षेत्रातल्या लोकांना झाला. जसे घरमालकांनी भाडेकरूंकडून तीन महिने घरभाडे घेऊ नये, बँकांनी कर्जाचे हफ्ते तीन महिने वसूल करू नयेत अशा सरकारी निर्णयांचा फायदा मनोरंजन क्षेत्रातल्या लोकांना झाला.

अनेक निर्मात्यांनी उदा. प्रशांत दामले, एकता कपूर आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांना स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली याची उचित नोंद पण घ्यायला हवी. कोरोनाविरुद्धची लढाई जितकी आर्थिक आणि शारीरिक आहे. तितकीच किंबहुना किंचित जास्त मानसिक आहे, याची जाणीव या क्षेत्रातल्या धुरिणींना आणि संघटनांना आहे हे फार महत्वाचे आहे .

दरम्यान, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने टप्प्याने टाळेबंदी शिथील करण्याचे धोरण स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातल्या सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’च्या अंतर्गत अनेक धोरणात्मक निर्णय यासंदर्भात घेतले. त्यात मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगला सशर्त परवानगीही देण्यात आली. यात शूटिंग करणाऱ्या टीमने आरोग्यविषयक सावधानगिरीचे नियम कडकपणे पाळणे अपेक्षित आहे. शूटिंग करताना फिजिकल डिस्टन्स पाळणे, शक्य तितक्या कमीत कमी crew सोबत शूट करणे, लॉकडाऊनचे नियम पाळत शूट करणे, शूटिंग करणाऱ्या टीमला आरोग्यविषयक ट्रेनिंग देणे आणि असे अनेक नियम काटेकोरपणे पाळणे अपेक्षित आहे.

या नियमांचा आधार घेऊन अनेक मालिकांचे शूटिंग लवकरच सुरु होईल. हे नियम पाळून शूटिंग करणे ही एक मोठी कसरत असणार आहे. आपल्या मालिकांच्या निर्मात्यांना हे कसे जमेल, यावर मनोरंजन क्षेत्राच्या पुढच्या वाटचालीचा रोडमॅप ठरणार आहे. पण, मालिका क्षेत्राचा आर्थिक कणा असणाऱ्या जाहिरातींचे काय? हा कळीचा मुद्दा आहेच. कारण, मालिकांना प्रायोजित करणाऱ्या, जाहिराती देणाऱ्या कंपन्यांना पण कोरोनाच्या साथीचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. सध्याच टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती पन्नास टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आता या जाहिरातींचा ओघ कसा राहील, हे बघणे औत्सुक्याचे राहील.

भविष्यात असे संकट येऊ नये म्हणून…

कोरोनाने जगभर घडविलेले महानाट्य आपण आज सर्वच जण अनुभवतो आहोत. या नाट्यावर एक नाही, हजारो सिनेमा उद्या तयार होतील. हे सिनेमे लोकांना वास्तवाची जाणीव करून देतील, संकटावर मात करण्याची प्रेरणा देतील आणि भविष्याची दिशाही दाखवतील. पण हे सारे घडण्यासाठी मूळात सिनेमा जगायला हवा. सिनेमा जगला तर स्वप्ने जगतील. स्वप्ने जगली, तरच उद्या कोणत्याही संकटावर मात करता येईल हा विश्वास अखंड राहील.

सिनेमा हा उद्योग जगण्यासाठी, टिकून राहण्यासाठी आता तरी दीर्घकालीन विचार करणे गरजेचे आहे. भविष्यात असे कोणतेही संकट आले तरी, या उद्योगातील कोणावरही उपासमारीची, आत्महत्येची वेळ येऊ नये, याची काळजी घेणारी दीर्घकालीन योजना आखणे गरजेचे आहे. या कामासाठी सिनेउद्योगासह सरकारने, सांस्कृतिक मंत्रालयाने लक्ष देणे गरजेचे आहे. पडद्यावर दिसणारे आणि पडद्यामागे न दिसणारे या साऱ्यांसाठी संकटकाळात उपयोगी पडेल, अशी व्यवस्था उभी करणे अत्यावश्यक आहे.

विमा योजना, पेन्शन योजना, समाजकल्याण अशा अनेक माध्यमातून हे दीर्घकालीन नियोजन व्हायला हवे. किमान मनोरंजन उद्योगातील सगळ्यांचा नीट डेटा उपलब्ध असायला हवा. या साऱ्यांपर्यंत संकटकाळात पोहचता यायला हवे. त्यांसाठी सर्वांनी मिळून उभी केलेली यंत्रणा असावी. या यंत्रणेच्या माध्यमातून मिळणारी मदत, ही फक्त कोरोनासारख्या संकटकाळातच नव्हे, तर अपघात, आजारपण, निवृत्ती अशा अनेक प्रसंगामध्ये या अनिश्चित उद्योगाला ‘सुरक्षा’ देणारी ठरेल.

असे म्हणतात की, माणसाला आयुष्यात डाऊन वाटत असल्यास किंवा हताश वाटत असल्यास, त्याने चांगले सिनेमे बघावेत. त्यासारखे दुसरे टॉनिक नाही. सिनेमे-कलाकृती बघून आजवर अनेक आत्महत्या टळल्या असतील. पण यासाऱ्याचा हिशेब कोण ठेवतेय? सिनेमा त्या अर्थाने लाखो करोडो लोकांना व्यक्तिगत-व्यवसायिक लढाया लढण्यासाठी प्रेरित करत आला आहे. पण आज सिनेमा उद्योगाने स्वतःलाच प्रेरणा देण्याची वेळ आली आहे.

‘डेव्हिड आणि गोलियथची कथा सगळ्यांना माहीतच आहे. जगभरातल्या सिनेमामध्ये डेव्हिड आणि गोलियथच्या रूपकांचा कथेमध्ये वापर करण्यात येतो. अतिशय ताकदवान धिप्पाड खलनायक आणि तुलनेने किरकोळ पण, चलाख नायक यांच्यातली विषम लढाई आणि अंडरडॉग नायकाचा खलनायकावरचा विजय, हे टेम्प्लेट वापरून आजवर शेकड्याने सिनेमे बनले आहेत. अंडरडॉग  नायकामध्ये स्वतःला पाहणाऱ्या प्रेक्षकांना पण हा सिनेमा भावतो. कोरोनाविरुद्धची आपली लढाई ही अशीच विषम लढाई आहे. जगभरातल्या लाखो लोकांना प्रेरित करणारा सिनेमा बनवणाऱ्या लाखो लोकांना स्वतःच बाह्या सरसावून, असा ‘नायक’ बनण्याशिवाय पर्याय नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.