Author : Kabir Taneja

Published on Aug 06, 2021 Commentaries 0 Hours ago

अफगाणिस्तानात आपला ठसा कसा उमटवायचा, याचा पूर्ण आराखडा चीनकडे तयार असला तरी अजूनही चीन आपले पत्ते उघड करण्यास राजी नाही.

अफगाणिस्तानाबाबत चीन किंकर्तव्यमूढ

मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्या नेतृत्वाखालील तालिबानी शिष्टमंडळ नुकतेच चीनच्या दौऱ्यावर आले होते. तिआनजिन या शहरात चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे दोन्ही बाजूंनी सांगण्यात आले. अमेरिका अफगाणिस्तानातून काढता पाय घेत असताना, चीनने तालिबानी शिष्टमंडळाशी चर्चा करणे म्हणजे अफगाणिस्तानात असलेली संधी आणि तेथे असलेला धोका, या दोन्हींबाबतीत संतुलन साधण्याचा प्रयत्न चीन करत असल्याचा संदेश त्यातून प्राप्त होतो.

चीन काही प्रथमच तालिबानशी चर्चा करत आहे, असे अजिबात नाही. याआधीही तालिबानी नेत्यांनी चीनला भेट दिली होती आणि चीननेही तालिबानच्या दोहा येथील कार्यालयाशी नियमितपणे संवाद आणि संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तरीही आताच्या परिस्थितीत तालिबानी नेत्यांनी चीनचा केलेला दौरा अधिक महत्त्वाचा आणि म्हणूनच दखल घेण्याजोगा आहे.

चीनने २०१८-१९ पासून दोहामार्फतच तालिबानशी व्यवहार करण्याला, प्राधान्य दिल्याचे सांगितले जाते. परंतु पाकिस्तानातील दुसा प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चिनी कर्मचारी ठार झाल्यानंतर चीनने आपला पवित्रा बदलला. पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यासाठी चिनी प्रसारमाध्यमांनी तहरिक-ई-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ईटीआयएम) या दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले.

ईटीआयएम या दहशतवादी संघटनेचे चीनच्या शिंकियांग प्रांतातील उईगूर मुस्लिमांशी थेट संबंध असल्याचा वहीम आहे. लाखो उईगूर मुस्लिमांना ‘पुनर्शिक्षण शिबिरां’मध्ये डांबून ठेवत त्यांच्यावर चीन सरकारने अनन्वित अत्याचार करणे सुरू ठेवले आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानने तातडीने आपले परराष्ट्रमंत्री आणि आयएसआय या गुप्तचर संस्थेचे प्रमुख यांना बीजिंगला धाडले. पाकिस्तानातील घटनेमुळे नाराज झालेल्या चिनी नेतृत्वाच्या पाकिस्तानला नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. पाक परराष्ट्रमंत्री आणि आयएसआय प्रमुख यांच्या या चीन भेटीनंतर लगेचच तालिबानी नेत्यांनी चीनच्या दौऱ्यावर जाणे हा निव्वळ योगायोग नाहीच. ईटीआयएम या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानातच नव्हे तर अफगाणिस्तानातही हातपाय पसरवण्यासाठी वाव मिळू नये, यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत.

ईटीआयएमच्या माध्यमातून शिंकियांग प्रांतातील उईगूर मुस्लिमांना नैतिक बळ प्राप्त होऊन या परिसरात अशांतता निर्माण होऊ नये. त्यामुळे ईटीआयएमला वेळीच आवर घालता यावा, यासाठीही चीनची धडपड सुरू आहे. म्हणूनच चीनने तालिबानी नेत्यांशी गुफ्तगू करण्याच सत्र अवलंबले आहे. तालिबानला राजकीय पाठिंबा देऊन अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप न करण्याचा चीनचा इरादा आहे. परंतु त्या बदल्यात चीनला लक्ष्य करून अफगाणिस्तानची भूमी दहशतवाद्यांना वापरू न देण्याची हमी चीनला तालिबानकडून हवी आहे. अर्थातच तालिबान चीनच्या या अपेक्षेला किती धूप घालतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानने तातडीने आपले परराष्ट्रमंत्री आणि आयएसआय या गुप्तचर संस्थेचे प्रमुख यांना बीजिंगला धाडले. पाकिस्तानातील घटनेमुळे नाराज झालेल्या चिनी नेतृत्वाच्या पाकिस्तानला नाकदुऱ्या काढाव्या लागल्या.

उल्लेखनीय म्हणजे इस्लामिक स्टेट (आयएस) यांसारख्या अफगाणिस्तानातील इतर दहशतवादी संघटनांनी चीन आणि शिंकियांग प्रांतातील उईगूर मुस्लिमांवर होणारे अत्याचार यांविषयी तोंडात मिठाची गुळणी धरली आहे. इलियॉट स्ट्युअर्ट यांच्यासारख्या विद्वानाने चीनमध्ये उईगूर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत इस्लामिक जगताने पाळलेल्या मौनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

उईगूर मुस्लिमांवर चीन सरकार करत असलेल्या अनन्वित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक स्टेटसारखी दहशतवादी संघटना पेटून उठत जगभरातून अधिकाधिक लोकांना जिहादसाठी भडकवेल, असे वाटत होते. परंतु तसे काहीच घडताना दिसत नाही. नाही म्हणायला ईटीआयएमने आयसिस खिलाफतीच्या नेतृत्वाखाली २०१७ मध्ये चीनविरोधात गरळ ओकणारा व्हिडीओ सीरियातून प्रसारित केला होता. मात्र, त्यानंतर आयसिस किंवा अल-कायदा या दोन्ही संघटनांकडून या आघाडीवर फारसे काही घडलेले नाही.

या सगळ्या मौनाच्या मागे एक अर्थ असा निघू शकतो की, सर्व इस्लामिक दहशतवादी संघटना चीनकडे अमेरिकेला पर्याय म्हणून पहात असावे. इस्लामिक संघटनांसाठी अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार ही सर्वोच्च घडामोड असून या ठिकाणी चीनला पाय रोवण्यासाठी ही सुसंधी असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच चीनने तालिबानशी चर्चा करण्याच्या मुद्द्याला महत्त्व प्राप्त होते. भूराजकीय आणि भूआर्थिक दृष्टिकोनातून ही आत्यंतिक महत्त्वाची घडामोड आहे.

असे सर्व असले तरी, इतरांप्रमाणेच चीनने गाफील न राहण्याचे ठरवले आहे. अफगाणिस्तानात आपला ठसा उमटवण्याच्या विचारात चिनी नेतृत्व आहे. अमेरिकेच्या अनुपस्थितीमुळे या टापूमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी चीन उत्सुक असून त्याच्यासाठी ते सहज शक्य असल्याचे अनुमान बहुतांश विद्वानांनी काढले आहे. मात्र, चीन थेट अफगाणिस्तानच्या भूमीवर सुरक्षात्मक काही कार्य करण्यासाठी त्याच्या एकमेव विश्वासू मित्र असलेल्या पाकिस्तानला पुढे करू शकतो. तालिबान्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन पाकिस्तानवर दबाव आणू शकतो. एकीकडे टीटीपी या देशांतर्गत दहशतवादी संघटनेच्या कृत्यांमुळे कातावलेल्या पाकिस्तानला चीनचा हा दबाव झुगारून टाकणे कठीण आहे.

अफगाणिस्तानात आपला ठसा कसा उमटवायचा याचे पूरेपूर आराखडा चीनकडे तयार असला तरी अजूनही चीन आपले पत्ते उघड करण्यास राजी नाही. कारण अफगाणिस्तानात आतापर्यंत अमेरिका आणि रशिया या दोन्ही आजी-माजी महासत्तांनी स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास म्हणावे तसे यश आले नाही.

अफगाणिस्तानात आपला ठसा कसा उमटवायचा, याचा पूर्ण आराखडा चीनकडे तयार असला तरी अजूनही चीन आपले पत्ते उघड करण्यास राजी नाही. कारण अफगाणिस्तानात आतापर्यंत अमेरिका आणि रशिया या दोन्ही आजी-माजी महासत्तांनी स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास म्हणावे तसे यश आले नाही. अफगाणिस्तानचा टोळीयुद्धाचा हिंस्र इतिहास, तेथील अवघड भूगोल आणि इतर देशांशी असलेले अफगाणिस्तानचे संबंध या सर्व परिप्रेक्ष्यातूनच चीनला अफगाणिस्तानविषयीचे आपले धोरण ठरवावे लागणार आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.