Published on Jan 22, 2025 Commentaries 0 Hours ago

चीनची आफ्रिकेतील दीर्घकालीन खेळी ही केवळ आर्थिक प्रभावासंबंधी नाही की लष्करी ताकदीपुरतीही मर्यादित नाही. ती मुत्सद्देगिरीच्या आणि प्रभावाच्या सूक्ष्म कौशल्याशीही संबंधित आहे.

चीनची आफ्रिकेतील दीर्घकालीन खेळी

Image Source: Getty

चीनने २०२२ मध्ये टांझानियामध्ये आपल्या पहिल्या राजकीय प्रशिक्षण संस्थेची म्हणजे ‘मॉलिमू ज्युलियस न्येरेरे लिडरशिप स्कूल’ची स्थापना केली, तेव्हा या स्थापनेमागची प्रेरणा स्पष्ट नव्हती. सुमारे चार कोटी डॉलर मूल्य असलेली ही संस्था चीनच्या प्रशासन पद्धतीच्या तत्त्वांना आदर्श मानणाऱ्या भविष्यातील आफ्रिकी नेत्यांची जडणघडण करण्यासाठी ‘चायनीज कम्युनिस्ट पार्टी’च्या (सीसीपी) हातात असलेले साधन होती.

हे लक्षात घेता, या संस्थेच्या पहिल्या गटसमूहातील १२० अधिकृत सदस्य चीनशी दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध असलेल्या देशांमधील होते, यात आश्चर्य नाही. या देशांवर स्वातंत्र्यपूर्व लढ्यात सहभागी होऊन नंतर सत्तेवर आलेल्या लिबरेशन पार्टींची सत्ता सातत्याने कायम आहे. या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, अँगोला, नामीबिया, झिम्बाब्वे आणि टांझानिया यांचा समावेश होतो. खरे तर, बोट्सवाना या देशासह वरील सहा देश ‘फॉर्मर लिबरेशन मुव्हमेंट्स ऑफ सदर्न आफ्रिके’चा एक भाग आहेत. ही एक अनौपचारिक आघाडी आहे. या देशांमधील सरकारांसमोर येणाऱ्या प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी आणि सत्ता कायम राखण्यासाठी एकमेकांना मदत करणे हा या आघाडीचा उद्देश आहे.

लिबरेशन पार्टींना सामायिक शैक्षणिक स्रोतांच्या माध्यमातून आपल्या प्रशासकीय क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठी राजकीय प्रशिक्षण संस्था हे या नेत्यांसाठी आणखी एक व्यासपीठ आहे.

संबंधित देशांशी आपले संबंध मजबूत करणे आणि तेथील धोरणकर्त्यांवरील आपला प्रभाव वाढवणे, हा राजकीय प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्याचा चीनचा उद्देश असल्याचे स्पष्टच आहे. लिबरेशन पार्टींना सामायिक शैक्षणिक स्रोतांच्या माध्यमातून आपल्या प्रशासकीय क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठी राजकीय प्रशिक्षण संस्था हे या नेत्यांसाठी आणखी एक व्यासपीठ आहे. सत्ताधारी पक्षाचे स्थान आणि या पक्षाचा देशावर असलेला अंमल यावर आधारित प्रशासनाच्या प्रारूपाचा प्रचार करून आफ्रिकेच्या राजकीय वातावरणास आकार देण्याच्या चीनच्या व्यापक धोरणाचेही हे एक उदाहरण आहे.

प्रभावाचे राजकारण

एखाद्या देशाला आपल्या प्रभावाचे दर्शन घडवायचे असेल, तर अनेक मार्ग असू शकतात. सकारात्मक संवाद सुलभ व्हावा, यासाठी संबंधित देशांमध्ये मध्यस्थी करणे किंवा संवाद वाढवणे, हा एक मार्ग असू शकतो. मध्यस्थ देशाची जागतिक स्तरावर ताकदवान प्रतिमा निर्माण करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिका हा सर्वाधिक प्रभावी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ ठरला आहे. मात्र, आता ही भूमिका साकारण्यासाठी चीन आक्रमक भूमिका घेत आहे. सौदी अरेबिया-इराण आणि निगेर-बेनिन या देशांतील पेच सोडवण्यासाठी चीनने केलेल्या मध्यस्थीतून हे दिसून येते.

पाश्चात्य देशांच्या नेतृत्वाखालील जागतिक पद्धतीला पूरक ठरेल अशी अथवा कधीकधी या पद्धतीच्या विरोधात एक पर्यायी जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची चीनची इच्छा आहे. त्यासाठी विविध बहुराष्ट्रीय व्यासपीठांवर आफ्रिकेचे समर्थन गरजेचे आहे, याची चीनला जाणीव आहे. ५५ देशांचा समूह असलेला आफ्रिका हा खंड आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. म्हणूनच, जागतिक सत्ताकेंद्र आपल्या बाजूला वळवण्यासाठी आफ्रिकेशी मजबूत संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने चीनने आपले प्रयत्न तीव्र केले आहेत.

चीनच्या आफ्रिकेसंबंधीच्या मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘अभ्यास दौरा.’ शेकडो आफ्रिकी अधिकारी विद्यापीठात व्याख्याने देण्यासाठी, राज्य सरकारांच्या भेटीसाठी आणि चीनमधील परंपरा व प्रशासकीय पद्धतींची ओळख करून देण्याच्या उद्दिष्टाने आखणी केलेल्या सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांसाठी दर वर्षी चीनला भेट देतात.

चीनचा आफ्रिकेवरील वाढता प्रभाव नव्या शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून तर दिसतोच, शिवाय त्यांचे राजकीय संबंध दृढ होण्यातूनही दिसून येतो.

बड्या आफ्रिकी राजकीय नेत्यांवर आपला प्रभाव निर्माण करण्याची चीनची खेळी आता राजकीय प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून विस्तारली आहे. २०२१ मध्ये चीन-आफ्रिका सहकार्यासंबंधीच्या चर्चेच्या आठव्या परिषदेमध्ये आफ्रिकेतील ५१ देशांमधील शंभरपेक्षाही अधिक राजकीय पक्षांशी आपले संबंध असल्याचे चीनने जाहीर केले.   

चीनचा आफ्रिकेवरील वाढता प्रभाव नव्या शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून तर दिसतोच, शिवाय त्यांचे राजकीय संबंध दृढ होण्यातूनही दिसून येतो. उदाहरणार्थ, केनियाने चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या ‘सेंट्रल पार्टी स्कूल’च्या माध्यमातून अर्थपुरवठा होणारी आणि या स्कूलच्या धर्तीवर चालणारी नेतृत्व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याबद्दल उत्सुकता दाखवली आहे. या प्रयत्नांना पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीची जोड आहे. चीन व केनियाच्या राजनैतिक संबंधांना ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने केनियाच्या नव्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयाच्या बांधकामासाठी निधी देऊ केला आहे.

चीनकडून नव्या संस्थांची उभारणी केली जात आहेच, शिवाय सध्या कार्यरत असलेल्या संस्थांचे नूतनीकरणही केले जात आहे. उदाहरणार्थ, चीनने झिम्बाब्वेतील हर्बर्ट चिटेपो स्कूल ऑफ आयडियालॉजीच्या नूतनीकरणासाठी निधी पुरवला आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून स्थैर्य व नियंत्रण देऊ करणाऱ्या मजबूत केंद्रीय पक्ष पद्धतीवर आधारित आपल्याप्रमाणेच एक प्रशासकीय प्रारूप निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे परस्परसंबंध निर्माण करण्याचा प्रभाव विशेषतः नेतृत्वामधील स्थैर्य व केंद्रीकरणास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या देशांशी असलेल्या संबंधांचा प्रभाव अधोरेखित होतो.

चीनची आफ्रिकेतील मुत्सद्देगिरी

चीनचा आफ्रिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक दशकांच्या संयमी मुत्सद्देगिरीवर आधारलेला आहे. ‘न्येरेरे लीडरशीप स्कूल’ हा महत्त्वाचा टप्पा असला, तरी आफ्रिकेच्या राजकीय पद्धतीत खोलवर शिरकाव करण्याच्या चीनच्या व्यापक धोरणाचा हा केवळ एक लहानसा भाग आहे. चीनकेंद्रित जागतिक व्यवस्थेचा पुरस्कार करणे, हे चीनचे दीर्घकालीन ध्येय आहे. या व्यवस्थेत जागतिक शासनाच्या रचनेला आकार देण्यात चीनची भूमिका केंद्रीय असेल.   

चीन केंद्रित जागतिक व्यवस्थेचा पुरस्कार करणे, हे चीनचे दीर्घकालीन ध्येय आहे. या व्यवस्थेत जागतिक शासनाच्या रचनेला आकार देण्यात चीनची भूमिका केंद्रीय असेल.        

अर्थात, चीनला आफ्रिकेतील संभाव्य सत्ताबदलांचीही जाणीव आहे. त्यामुळे सत्तापालट झाल्यास आपले हितसंबंध जपण्यासाठी विरोधी पक्षांना आतापासूनच खुश ठेवायला हवे, हेही चीनला माहिती आहे. राजकीय संस्थांची स्थापना आणि सत्तेवरील व विरोधी पक्षांशी असलेले संबंध दृढ करून राजकीय स्थित्यंतरांची पर्वा न करता आपला प्रभाव कायम राहील, याची निश्चिती करीत आहे.

चीनची आफ्रिकेतील दीर्घकालीन खेळी ही केवळ आर्थिक प्रभावासंबंधी नाही की लष्करी ताकदीपुरतीही मर्यादित नाही. ती मुत्सद्देगिरीच्या आणि प्रभावाच्या सूक्ष्म कौशल्याशीही संबंधित आहे. आफ्रिकेच्या राजकीय भविष्यात धोरणात्मक गुंतवणूक करणारा चीन आगामी काळात आफ्रिकेच्या शासन रचनांना आकार देण्यात आपली भूमिका महत्त्वपूर्ण राहील, यासाठी खुंटा हलवून बळकट करीत आहे.


हा लेख या आधी ‘द हिंदू’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Samir Bhattacharya

Samir Bhattacharya

Samir Bhattacharya is an Associate Fellow at ORF where he works on geopolitics with particular reference to Africa in the changing global order. He has a ...

Read More +