Author : Dr. Gunjan Singh

Published on Jun 29, 2019 Commentaries 0 Hours ago

चीनला उत्तर कोरियाचा मोठा भाऊ असल्याचे दाखवायचे असून, त्याचसोबत उत्तर कोरियाने धाकट्या भावाची कर्तव्ये पार पाडवीत असे सांगितले जात आहे.

चीन-उत्तर कोरियाची भाऊबंदकी

शी जिंगपिंग यांनी २० आणि २१ जून २०१९ रोजी उत्तर कोरियाला दिलेली भेट अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण, चीनच्या अध्यक्षांनी प्योंगयांगला भेट देण्याचा हा योग तब्बल १४ वर्षानंतर पहिल्यांदाच जुळून आला आहे. दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील राजकीय संबधांना यावर्षी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या भेटीदरम्यान शी यांच्या सोबत त्यांच्या पत्नी पेंग लीऑन, परराष्ट्र मंत्री वँग यी, चीनचे वरीष्ठ राजदूत यांग जेशी आणि राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे प्रमुख, ही लायफेंग हे देखील होते.

सततच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे उत्तर कोरियाला गेली १४ वर्षे चीनच्या बाजूने सातत्याने कठोर धोरणे अवलंबलेली पाहायला मिळाली. दुसरीकडे संयुक्त राष्ट्र संघाद्वारे घालून देण्यात आलेले दंड देखील चीनने मान्य केल्याचे दिसते. खरंतर, या दंडांमुळे उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट प्योंगयांग साठी एक करारभंग करणारी महत्वाची भेट म्हणून पहिले जाते.

आपल्या भेटी आधी शी यांनी “रोडॉंग सिन्मन” या कोरियन वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की, कोरियन पेनिन्सुलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्योंगयांगच्या “योग्य धोरणांना” चीन निश्चितच पाठींबा देईल. या लेखामध्ये शी यांनी असेही म्हंटले आहे की, ते स्वतः आणि किम यांच्यामध्ये इतकी क्षमता आहे की, या संबंधांना ते एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील आणि ही भेट म्हणजे अशाच एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. ही एक राजकीय भेट असल्याचेही म्हंटले जाते. दोन्ही नेत्यांनी मिळून देशातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. उत्तर कोरियाने शी यांच्यासाठी एक महत्वाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये दोन्ही देशाचे संबध आणि जवळीकता यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. शी जिंगपिंग यांचे स्वागत करण्यासाठी प्योंगयांगच्या रस्त्यावर २५०,००० लोकांनी गर्दी केली होती. रुंग्राडो मे डे स्टेडियमवर जिम्नॅस्टिक्स शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. हा स्वागत समारंभ आणि जिम्नॅस्टिक्स शो यामुळे उत्तर कोरियात या देशांच्या संबाधांना किती महत्व आहे हे स्पष्ट होते.

जी-२० परिषदे दरम्यान जपान, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिकेच्या नेत्यांची भेट घेण्यापूर्वी एक दिवस अगोदर शी यांनी हा दौरा आखला.  कोरियन  पेनिन्सुला  अण्वस्त्रमुक्त करण्यामध्ये  या देशांचा मोठा वाटा आहे. उत्तर कोरियाची जी सध्या शस्त्रास्त्र चाचणी सुरु आहे त्यामुळे या देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. हनोई येथे ट्रम्प आणि किम यांच्या अयशस्वी भेटीचा पगडा या भेटीवर देखील होता. किम यांच्या रशियन दौऱ्याला देखील महत्वाची पार्श्वभूमी होती.

अर्थातच आर्थिक प्रश्न आणि आसपासच्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करणे हेच चर्चेचे महत्वाचे मुद्दे आहेत. किम यांच्या बीजिंग भेटीदरम्यान जो मेजवानीचा कार्यक्रम झाला, तेंव्हा शी म्हणाले होते, “द्विपक्षीय संबध सुधारण्यासाठी आणि नव्या समृद्ध भविष्याच्या निर्माणासाठी बीजिंग नेहमीच प्योंगयांगशी सहकार्य करण्यास तयार असेल.” यावरुन अर्थातच हे स्पष्ट होते की, उत्तर कोरियाची आर्थिक समृद्धी कशी साधता येईल आणि सध्या जे तणाव सुरु आहेत ते कमी होऊन शांततेचे संबंध कसे प्रस्थापित होतील हे पाहणे हाच या भेटी मागचा उद्देश होता.

अण्वस्त्र आणि अण्वस्त्रमुक्ती हा देखील या भेटीमागचा मुख्य हेतू होता आणि चर्चेदरम्यान शी यांनी हा मुद्दा देखील उचलून धरला. आपल्या भाषणात शी म्हणाले, “कोरियन पेनिन्सुलातील अण्वस्त्र प्रश्नावर राजकीय तोडगा निघण्याची अपेक्षा हा अतिशय महत्वाचा मुद्दा असून तो अपरिहार्य आहे आणि शांततेच्या  प्रश्नांवर सातत्याने चर्चा करण्यावर भर दिला पाहिजे ज्यामुळे या प्रदेशात, तसेच जगभरात शांतात, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित होण्यास अधिक हातभार लागेल, याबाबत बीजिंग आणि प्योंगयांग मध्ये एकमत झाले आहे.” कोरियन पेनिन्सुला प्रश्नावर योग्य तोडगा निघणे अपेक्षित असल्यास किम आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा सुरु राहणे गरजेचे असल्याचेही शी यांनी अधोरेखित केले.

किम यांना अजूनही चीनच्या पाठिंब्याची गरज असून, उत्तर कोरियामध्ये आर्थिक समृद्धी आणि  शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर चीनचे त्यांना नेहमी सहकार्य राहील, असे चित्र निर्माण करण्यास ही भेट यशस्वी ठरली. सयुंक्त राष्ट्रसंघांच्या निर्बंधानंतरही आपले स्थानी राखण्यासाठी चीनने सातत्याने उत्तर कोरियाची मदत केलेली आहे.

अगदी प्रतीकात्मक दृष्ट्या देखील शी जिंगपिंग आणि किम जोंग-उन यांच्यासाठी ही भेट फार महत्वाची आहे. या भेटीच्या माध्यमातून शी यांनी हे स्पष्ट केले की, प्रादेशिक विकासासाठी त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. उत्तर कोरिया हा देश अजूनही चीनवर अवलंबून आहे आणि त्यांच्या संमतीशिवाय किंवा पाठींब्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत हे देखील स्पष्ट झाले. शी जेंव्हा जी-२० परिषदेमध्ये ट्रम्प यांची भेट घेतील आणि उत्तर कोरियाच्या प्रश्नावर चर्चा केली जाईल तेंव्हा आपसूकच शी यांचे पारडे जड असणार आहे. कोरियातील राज्याच्या मुखपत्र असलेल्या कोरियन सेन्ट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) दिलेल्या वृत्तानुसार, “आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक परिस्थितीत काही गंभीर आणि जटील समस्या निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी महत्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक भूमिका घेत आपापली मते मांडली.”

शुक्रवारी दुपारी शी प्योंगयांग मधून निघाल्यानंतर या भेटीचे भविष्यात नेमके काय परिणाम होतील हे पुरेसे स्पष्ट नव्हते. शी यांनी आर्थिक प्रगती साध्य करण्याचे महत्व, तसेच अण्वस्त्रमुक्ती आणि किम ट्रम्प भेटीचे फलित या मुद्द्यांवर जोर दिला. अर्थात कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर न केल्याने बर्याच गोष्टी साशंक एकी गृहितकावर आधारित आहेत. किम नेमाका कोणता विचार करत आहेत हे जाणून घेणे आणि त्यांना चर्चेसाठी तयार करणे हाच या भेटीमागचा उद्देश असल्याचा दावा देखील कोणी करू शकतो. उत्तर कोरियातील त्यांचे वर्चस्व कमी होईल या भीतीने बीजिंगने तिथे पूर्ण निर्बंध कधीच लादले नाहीत, जे चीनला अजिबात होऊ द्यायचे नाही.

जो काही देखावा सध्या सुरु आहे आणि जी प्रतीकात्मकता उभी केली जात आहे त्यावरून चीनला स्वतःला उत्तर कोरियाचा मोठा भाऊ या नात्याने संबंध प्रस्थापित करायचे असून त्याचसोबत उत्तर कोरियाने धाकट्या भावाची कर्तव्ये पार पाडवीत अशी अपेक्षा लादली जात आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान चर्चा घडवून आणण्यात आणि यापुढे ते फारशा अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या घेणार नाहीत, याकडे चीनचे लक्ष आहे.

प्रदिशिक शांतता चीनच्या दृष्टीने महत्वाची असून उत्तर कोरियाने आर्थिक प्रगती साधण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेचा एकात्मता साधावी असे चीनला वाटते. २०१९ मधील ही एक अत्यंत महत्वाची घटना असली तरी यातून नेमके काय साध्य होणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.