Author : Dr. Gunjan Singh

Published on Feb 25, 2019 Commentaries 0 Hours ago

सर्वात जवळचा असा साथी असलेल्या उत्तर कोरियासोबत चीनचे संबंध गेल्या काही वर्षांत संबंध ताणले गेल्याचे दिसून येते आहे. याची कारणमीमांसा आणि पडसाद यांची चर्चा करणारा लेख.

चीन आणि उत्तर कोरिया संबंधांची दिशा

कोरियामधील यादवी युद्धापासून, उत्तर कोरियाला चीन हा आपला सर्वात जवळचा मित्र आणि पाठीराखा वाटत आलेला आहे. मात्र, गेल्या काही काळात उत्तर कोरिया सातत्याने अणुस्फोट चाचण्या करू लागल्यापासून या संबंधामध्ये ताण उत्पन्न झाला आणि शी जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर तर संबंध अधिकच बिघडत गेले. २००५ मध्ये हु जिन्ताओ यांनी उत्तर कोरियाला भेट दिली, त्यानंतर एकाही चिनी नेत्याने उत्तर कोरियाला भेट दिलेली नाही. आजघडीला उत्तर कोरियाच्या अंतर्गत आणि आर्थिक समस्यांवर केवळ चीनच साह्य करत आहे; मात्र, असे असले तरीही त्यांचे आपसातील संबंधातील तणाव अधिकाधिक वाढत चालले आहेत.

भविष्यातही चीन उत्तर कोरियाला पाठिंबा देतच राहील. तो पूर्णपणे कधीच काढून घेणार नाही किंवा उत्तर कोरियाचे विघटनही होऊ देणार नाही. कारण, तसे झाल्यास उत्तर कोरियातून निर्वासितांचे लोंढे चीनच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. असे घडणे हे, चीनच्या सीमासुरक्षा आणि शांतीच्या दृष्टीनेही ते अत्यंत धोक्याचे ठरेल. परंतु, उत्तर कोरियावर असलेला आपला दबाव वापरून त्याला मवाळ करत जागतिक सर्वमान्यतेच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न चीन करेल हे स्पष्ट होत चालले आहे.

९ सप्टेंबर हा दिवस उत्तर कोरियाचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. २०१८ साली उत्तर कोरियाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने, शी जिनपिंग उत्तर कोरियाची राजधानी प्यॉंगयॉंगला भेट देतील अशी अटकळ व्यक्त केली जात होती. पण शेवटी जिनपिंग यांनी या समारंभाला चिनी संसदेचे मुख्य आणि कम्युनिस्ट पक्षाच्या उतरंडीत तृतीय स्थानावर असलेल्या ली शांशु यांना त्या कार्यक्रमाकरता पाठवले. या कार्यक्रमास स्वत: न जाण्यामधून, उत्तर कोरिया पुरेशा वेगाने अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळत नसल्याबद्दलची चीनची नाराजीच प्रकट झाली. परंतु, स्थापना दिनानिमित्तच्या शुभेच्छा मात्र शी यांनी किम यांना दिल्या. शी यांनी उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जॉंग उन यांना लिहिलेल्या पत्रात, किम यांनी आत्तापर्यंत त्या दिशेने उचललेल्या पावलांची दखल मात्र घेतली.

यातले सर्वात उल्लेखनीय पाऊल म्हणजे किम यांनी अमेरिकी राष्ट्रपती ट्रंप यांची जून २०१८ मध्ये घेतलेली भेट. या भेटीमुळे अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळण्याचा उपक्रम परत एकदा ऐरणीवर आला आणि त्याला चालनादेखील मिळाली. आपसातील संबंध, स्थानिक स्थैर्य व शांती अधिक दृढ करण्याच्या दिशेने आपण चालत राहू, अशी आशाही या पत्रात शी यांनी व्यक्त केली. २०१९ साली किम यांनी चीनला भेटी दिल्या; त्यांनी आपला ३५वा वाढदिवसही चीनमध्ये साजरा केला. चीनला भेट देणारे ते उत्तर कोरियाचे पहिलेच राष्ट्रप्रमुख होत.

शी जिनपिंग आणि किम यांच्या भेटीमुळे, चीन हा उत्तर कोरियाचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा मित्र आहे व शी जिनपिंग यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय किम कोणताही निर्णय घेणार नाहीत, हे परत एकदा स्पष्ट झाले. एका वर्षाच्या आत त्यांचा हा चौथा चीन दौरा होता. त्यामुळे, आता जिनपिंग यांनी उत्तर कोरियाला भेट देण्याचे किम यांचे निमंत्रण स्वीकारले आहे, यात काहीच आश्चर्याची बाब नाही.

सूत्रांकडून येणार्या बातम्यांनुसार, त्यांचा हा उत्तर कोरिया दौरा एप्रिल २०१९ मध्ये होणार आहे. जिनपिंग खरोखरच उत्तर कोरियाला गेले तर चीन-उत्तर कोरिया संबंधांतील जिव्हाळा वाढत चालल्याचेच ते द्योतक असेल.

चीनच्या उत्तर कोरियासोबत असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे, एक जबाबदार राष्ट्र अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना गंभीर तडे जात असतात. त्यामुळे, सत्ता हाती घेतल्यानंतर शी यांनी हे संबंधांना एक नवे रूप देण्याकरता कृती करणे क्रमप्राप्तच होते. संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर लादलेल्या निर्बंधांचे पालन करणारे शी हे पहिलेच चिनी नेते ठरले. शी यांच्या नेतृत्वाखाली चीनने काही महत्त्वपूर्ण पावले उचलली. फेब्रुवारी २०१७ मध्ये चीनने उत्तर कोरियातून कोळसा आयात स्थगित केली; जून २०१७ मध्ये उत्तर कोरियाला इंधनविक्री स्थगित केली; सप्टेंबर २०१७ मध्ये आर्थिक हालचालींवर निर्बंध घातले. या सगळ्यामागे, उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करावा हाच उद्देश होता. २०१८ सालातही चीनने या निर्बंधांचे पालन करण्याचे आपले धोरण चालूच ठेवले. उत्तर कोरियाच्या नागरिकांना काम न देणे, यंत्रसामुग्री, औद्योगिक धातू, इतर उपकरणे व वाहने इत्यादींच्या निर्यातीवर प्रतिबंध वगैरेंचाही समावेश या निर्बंधांमध्ये आहे.

किम यांनी अण्वस्त्रबंदीच्या अनुषंगाने ट्रम्प यांची भेट घेण्यास होकार दिला आणि चीन-उत्तर कोरिया संबंध सुधारण्याची आशा खूपच उंचावली. जूण २०१८ मध्ये ही भेट होण्याच्या आधीच्या काही काळात परस्पर संबंध खूपच सौहार्दपूर्ण होत गेल्याचे दिसले. या काळात किम यांनी तब्बल तीनदा चीनला भेट दिली व उत्तर कोरियाकरता असलेले चीनचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यातून हे सुद्धा मांडले गेले की, चीन स्वत: जरी सिंगापूर येथील चर्चेत जातीने उपस्थित नसला तरी या सर्व प्रक्रियेत तो एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे हे मात्र सगळ्यांनाच स्पष्टपणे पोचले. जुलै २०१८ मध्ये आर्थिक निर्बंध हटविण्याची आग्रहाची मागणी किम यांनी शी यांच्याकडे लावून धरली, कारण या निर्बंधांमुळे उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. परंतु, प्यॉंगयॉंगने आपल्या स्वत:च्या आश्वासनांवर पुरेशी कारवाई न केल्यामुळे, आणि त्याशिवाय त्याच्या अणुभट्ट्या अद्यापही कार्यरत असल्याच्या बातम्या सातत्याने येत राहिल्यामुळे, उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यातील चर्चेची पुढील फेरी अमेरिकेने रद्द केली.

पण उत्तर कोरियाने काही पावले मात्र उचलली आहेत. बऱ्याचशा अभ्यासकांच्या मते, उत्तर कोरियाने उचललेल्या या पावलांवरून, त्यालाही एक सामान्य राष्ट्र म्हणून आंतराष्ट्रीय समुदायाचा एक भाग बनण्यामध्ये रस आहे हेच दिसून येते. सप्टेंबर २०१८ मध्ये स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या संचलनात उत्तर कोरियाने आपली आंतरखंडीय टप्प्यांवर मारा करणारी क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन करणे टाळले. या संचलनात प्रामुख्याने आर्थिक विकास दाखवण्यावरच भर होता. त्यशिवाय, वार्षिक भाषण किम यांच्या ऐवजी संसदेच्या प्रमुखांनी केले. या भाषणातही प्रामुख्याने आर्थिक उद्दिष्टांवरच भाष्य केले गेले. हे सर्व विशेष नोंद घेण्यासारखे आहे. संचलनाच्या कार्यक्रमाचा एकंदर नूरही तसा शांतच होता. या सगळ्याचा अन्वयार्थ इतकाच की उत्तर कोरियाला तणाव कमी करून, आंतरराष्ट्रीय समुदायात परत एकदा सन्मानाने नांदण्याची इच्छा आहे.

आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या संचलनातील अनुपस्थितीची विशेष दखल अमेरिकेनेही घेतली. “उत्तर कोरियाने नुकताच आपला ७०वा स्थापना दिन साजरा केला. या निमित्ताने झालेल्या संचलनात अण्वस्त्रांचं प्रदर्शन टाळण्यात आलं. सगळा भर शांती आणि आर्थिक विकासावर होता.”, असं खुद्द अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांनी ट्वीट केलं.

जागतिक राजकीय पटलावर समतोल राखण्याच्या अपरिहार्यतेमुळे शी यांना अत्यंत सावधतेने पावले टाकावी लागत आहेत. आणि त्यामुळे चीन उत्तर कोरियामधील संबंधांतील गुंतागुंतही वाढते. एकीकडे, उत्तर कोरियाला सांभाळून घेण्याची अपरिहार्यता, कारण तसे न केल्यास त्यातून अशांतता माजण्याची शक्यता आहेच पण पुढे चीनचेही अंतर्गत स्थैर्य धोक्यात येऊ शकते, याची पूर्ण कल्पना शी यांना आहे.

दुसरीकडे, चीन व दक्षिण कोरिया यांच्यातील आर्थिक संबंध सुदृढ होत चालले आहेत, आणि उत्तर कोरियाच्या अविवेकी कृत्यांमुळे ते धोक्यात येऊ द्यायची जोखीम शी यांना पत्करायची नाहीये. सध्या चीन व अमेरिका यांच्यात जोरदार व्यापारी युद्ध सुरू आहे. संपूर्ण कोरियन द्वीपकल्पातून अण्वस्त्रं हद्दपार व्हावीत असा अमेरिकेचाही धोशा आहेच. या सर्व परिस्थितीमुळेच शी यांना उत्तर कोरियावर निर्बंध घालणे व तिकडे जाणे रहित करणे भाग पडले. त्यातून, एक जबाबदार आंतरराष्ट्रीय नेता म्हणून आपली प्रतिमाही बनवण्यात त्यांनी यश मिळवले आहे.

ट्रम्प आणि किम यांच्यातील पुढील बैठक फेब्रुवारीच्या २७ व २८ तारखेला व्हिएतनाममध्ये होणार आहे. या बैठकीत, दोन्ही कोरियांमधील युद्ध अधिकृतरीत्या संपुष्टात येत असल्याची घोषणा केली जाईल अशी अटकळ सर्वत्र बांधली जात आहे. परंतु, या चर्चेचा चीन व उत्तर कोरिया यांच्यातील संबंधांवर नेमका कसा परिणाम होईल, हे बघणे फारच रोचक ठरेल.

(डाॅ. गुंजन सिंग या चीन आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासिका असून दिल्ली येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज’ येथे सहायक संशोधिका म्हणून कार्यरत आहेत.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.