Published on Sep 27, 2021 Commentaries 0 Hours ago

कोविड-१९ ची जगभर पसरलेली साथ ही भारतासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण देण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठीची संधीही आहे.

कोरोनानंतर शिक्षणाचे आव्हान कसे पेलणार?

शिक्षणासारख्या मूलभूत सुविधेंसदर्भात कोरोनाच्या साथीने नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. शिक्षणातून आपल्याला आपल्या समाजाबद्दल आणि परिसराबद्दल माहिती मिळते आणि त्यातून होणार्‍या सरावाने आपण आपल्याकडे असलेल्या कौशल्यात अधिकाधिक पारंगत होत जातो. शिक्षणाने आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होत जातो आणि त्यातूनच आयुष्याच्या विविध पैलूंबद्दल आपला स्वतःचा असा दृष्टिकोन आणि मते तयार करायला आपण सक्षम होतो. पण, आजच्या काळात शिक्षण केवळ माहिती मिळवण्यापुरते मर्यादित नाही. माहिती मिळवायला उत्सुक असणार्‍या मंडळींना कुठलीही माहिती आजकाल वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि ई-प्लॅटफॉर्म्स यांच्या माध्यमातून सहज मिळते. पण ही माहिती शिक्षणाशिवाय ज्ञानात रूपांतरित कशी होणार?

आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या समस्या आणि घटना यांचे आकलन करण्याचे प्रशिक्षण आपल्याला शिक्षणातूनच मिळते. खेरीज आपण फक्त अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकातून शिकत नाही. तर ती पाठ्यपुस्तके कशी वाचायची, गंधमादन पर्वतावरून विशल्यकरणी ओळखून कशी शोधून आणायची हे शिकवणार्‍या आपल्या शिक्षकांकडून, मार्गदर्शकांकडूनसुद्धा आपण अनेक गोष्टी शिकतो. तसेच आपण आपल्याला स्वतःला आलेल्या अनुभवांमधून, प्रशिक्षणातून मिळणार्‍या अनुभवांमधूनसुद्धा आपण खूप काही शिकतो. थोडक्यात, शिक्षण आपल्याला ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि दृष्टिकोन आत्मसात करायला मदत करते. याच गोष्टींच्या आधारे आपण समजून उमजून निर्णय घेऊ शकतो, एक अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतो आणि समकालीन समाजात आपली भूमिका समर्थपणे पार पाडू शकतो.

२०२० हे वर्ष सुरू झाल्यापासून आपण विविध प्रकारच्या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करत आहोत. कोविड-१९च्या साथीने भारतासह संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला. त्यात कित्येकांची आयुष्ये आणि उपजीविका पणाला लागल्या आहेत. परिणामी मार्च २०२०पासून नोवेल कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारतातल्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी जवळपास वर्षभर त्या त्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकले नाहीत. त्याचा विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास झाला आहे.

जेव्हा अनेक दशलक्ष विद्यार्थ्यांना त्यांच्या इतर कुटुंबीयांप्रमाणे घरी राहणे भाग असते, शैक्षणिक संस्था बंद असतात, अशा वेळी या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहण्यासाठी ऑनलाइन घेतले जाणारे वर्ग हाच एकमेव पर्याय डोळ्यासमोर येतो. परंतु, शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठीचा हा पर्याय, त्यातून दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा दर्जा न खालावता आपल्या देशात अंमलात आणण्यासाठी आपण सक्षम आहोत का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर ते एकच असेल – नाही, आपण अजून त्यासाठी सक्षम झालेलो नाही.

ज्यांच्या घरी संगणक किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही किंवा अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे अशा आपल्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणार्‍या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रमाण ऑनलाइन शिक्षण हा पर्याय अजूनही त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांमधून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांकडे ब्रॉडब्रॅंड इंटरनेट, 4G स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स किंवा डेस्कटॉप्स आणि ऑनलाइन वर्गांसाठी अत्यावश्यक असणार्‍या इतर सोयी, तंत्रज्ञान आहे याबद्दल कोणताही डेटा आपल्याकडे गोळा केलेला नाही.

अनेक कुटुंबांमध्ये लॉकडाउनसारख्या काळात दिवसागणिक कमी होत जाणार्‍या रोजगाराच्या संधींचा शक्य तेवढा उपयोग करून घेत असताना आणि शक्य झाल्यास ‘work from home’ करणार्‍या घरच्या कमावत्या मंडळींमध्ये वापरला जाणारा एकच 4G स्मार्टफोन असल्याचे दिसून आलं आहे. अशा वेळी वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांना त्या एका स्मार्टफोनसाठी धक्काबुक्की करण्यापलीकडे दुसरा पर्याय उरत नाही. साहजिकच अशा कुटुंबांवर प्रचंड ताण असतो. आधीच रोजगारावर गदा आलेली असते, एकूण उत्पन्न कमी झालेलं असतं.

म्हणूनच, २५ सप्टेंबर, २०१५ रोजी संयुक्त राष्ट्रांनी आपली पृथ्वी न्याय्य आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने स्वीकारलेल्या शाश्वत विकास ध्येयांमध्ये (SDG) ज्यावर भर देण्यात आला आहे अशा अधिक शाश्वत भविष्य आणि समस्यांचे आकलन होण्यासाठी आवश्यक असलेले दर्जेदार शिक्षण तर सोडूनच द्या, पण या लॉकडाउनच्या काळात कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षणही न मिळता आपल्या देशातली बरीच तरूण मंडळी घरात बसून आहेत.

अशा परिस्थितीत, २०२०-२१ आणि त्यापुढच्या काही वर्षांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांच्या संख्येत गळती होण्याची शक्यता दाट आहे. त्यातही पुन्हा आपल्याकडील पितृसत्ताक कुटुंबपद्धती लक्षात घेता जिथे आपल्याकडे अधिक चांगल्या आणि उच्चशिक्षणाच्या बाबतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं, तिथे या जगद्व्यापी साथीच्या काळात आणि त्यानंतरही मुलांपेक्षा मुलींची संख्या शाळा, महाविद्यालयांमधून कमी होण्याची शक्यता जास्त आहे.

कोविड-१९ची जगभर पसरलेली साथ आणि त्याचा परिणाम म्हणून जर हेच होणार असेल तर २०२०च्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये (NEP) अभिप्रेत असलेले एकूण नावनोंदणी गुणोत्तर (GER) वेगाने वाढवण्याचे लक्ष्य धोक्यात येऊ शकते. शिक्षणक्षेत्र हे भारतातील असे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये कोविड-१९चे असे विषम परिणाम सर्वात जास्त दिसून येतात. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे अनिश्चित काळासाठी बंद ठेवल्याचा परिणाम म्हणून आपल्या देशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी चालू असलेल्या विकासकामांची अधोगती होऊ शकते.

उपाययोजना

सद्यस्थितीत, अशा निराश करणार्‍या शक्यतांकडे लक्ष पुरवण्याऐवजी तातडीने कोणत्या गोष्टी करता येतील यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, शाश्वत विकास ध्येयांमध्ये म्हटल्याप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी समोरासमोर बसून केलेली ज्ञानाची देवाणघेवाण आणि विद्यार्थ्यांचे वर्गात आणि वर्गाबाहेर होणारे जोषपूर्ण व निकोप वादविवाद किंवा चर्चा हे दर्जेदार शिक्षणाचे अविभाज्य घटक आहेत हे आपण मान्य करणे गरजेचे आहे. ऑनलाइन दिले जाणारे शिक्षण पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणाला पूरक ठरू शकेल पण ते कधीच त्याची जागा घेऊ शकणार नाही.

सामाजिक आणि भावनिक शिक्षणाची अनुभूती, दक्षता, सहयोग आणि वाटाघाटी, समीक्षणात्मक किंवा सृजनात्मक पद्धतीने विचार करणे, वेगवेगळ्या दृष्टिकोनांबद्दल सजग असणे आणि आपल्यापेक्षा वेगळ्या मंडळींचा आदर करणे – यांसारख्या गोष्टी समोरासमोर बसून दिल्या-घेतलेल्या शिक्षणाशिवाय मुलांच्या अंगात बाणवल्या जाणे खूप कठीण आहे. तसे असलं तरीही दुसरी एक गोष्टही आपण समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे, जेव्हा कोणत्याही कारणाने – मग ती एखादी जगभर पसरलेली एखाद्या रोगाची साथ असो किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित कारणाने – जेव्हा वर्गात प्रत्यक्ष समोरासमोर बसून शिक्षण देणे-घेणे शक्य नसते अशा वेळी ऑनलाइन घेतले जाणारे वर्ग हा पर्याय अंमलात आणता येऊ शकतो. परंतु तत्पूर्वी खाली दिलेल्या गरजांची पूर्तता होण्याची नितांत आवश्यकता आहे:

१. समाजाच्या आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना, समाजाच्या ज्यांच्याकडे डिजिटल उपकरणे आहेत आणि ज्यांच्याकडे ती नाहीत अशा दोन घटकांमधील, सध्या सर्वत्र दिसून येणारी दरी पार करता यावी यासाठी पुरेशा सार्वजनिक आर्थिक संसाधनांची व्यवस्था केली जावी.

२. दर्जेदार ऑनलाइन शिक्षण पुरविण्यासाठी संपूर्ण देशभर उत्तम ब्रॉडब्रॅंड सुविधा उपलब्ध होईल यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी केल्या जाव्या. तसेच यापूर्वी अस्तित्वात असणार्‍या रेडिओ, दूरदर्शन यांसारख्या तंत्रज्ञानांचाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उपयोग केला जावा.

३. दर्जेदार ऑनलाइन शिक्षण पुरविण्यासाठी केवळ महानगरांमधीलच नव्हे तर अगदी लहान शहरे, खेड्यापाड्यातील शैक्षणिक संस्थासुद्धा अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहन तंत्रज्ञानाच्या सोयींनी सुसज्ज असायला हव्यात.

४. वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करून ऑनलाइन शिक्षण देता येण्यासाठी शिक्षकांनाही पुरेसे प्रशिक्षण दिले जावे.

५. डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून भारतातील विविध स्थानिक भाषांमध्ये शिक्षण दिले जाण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी.

६. विद्यार्थ्यांच्या दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी योग्य पद्धती विकसित केल्या जाव्या आणि त्या विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही व्यवस्थित समजावून सांगितल्या जाव्यात.

७. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही दर्जेदार ऑनलाइन शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी केल्या जाव्यात.

या प्राथमिक गरजांची पूर्तता झाली तरच भारताला भविष्यात जगाच्या दक्षिण गोलार्धातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे आणण्यासाठी आणि आपल्या लोकसंख्येचा फायदा करून घेऊन २१व्या शतकातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रगत कौशल्यांमध्ये अधिकाधिक लोकांना प्रशिक्षित करून त्यांचे रूपांतर आपल्या मानवी संसाधनांमध्ये करण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याच्या इतर शाश्वत पद्धती तयार करता येतील. कोविड-१९ ची जगभर पसरलेली ही साथ म्हणजे भारताच्या कसोटीचा काळ आहे. पण हीच या संकटाला भारताच्या सर्वांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या ध्येयाला पूरक ठरणार्‍या प्रेरणेत बदलण्याची संधीही आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.