आज आपल्या जीवनाचा भाग बनत असलेल्या, कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका अथवा तिचे आव्हान माणसाने कसे पेलावे? हा आजच्या मानवतेपुढील महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे.
(‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण’ या लेखमालिकेतील हा पहिला भाग आहे.)
साधारण चार वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘लेवरहुल्म इन्स्टीट्यूट फॉर द फ्यूचर ऑफ इंटेलिजन्स’च्या उद्घाटन प्रसंगी केम्ब्रिज विद्यापीठात स्टीवन हॉकिंग म्हणाले “कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवतेच्या बाबतीत घडलेली सर्वोत्तम अथवा सर्वात नीचतम गोष्ट ठरू शकते.” दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत मात्र त्यांनी इतरत्र केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीच्या मतांपेक्षा हे मत काहीसे वेगळे आणि समतोल होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विरोधी कम्पूमधील विद्वान असा शिक्का त्यांच्यावर मारणाऱ्या विद्वानांसाठी हे विधान फार सूचक आहे. पण, मोठे लोक सत्य बोलतात तेव्हा ते बऱ्याचदा नकारात्मक किंवा निराशावादी वाटू शकते. मोठे लोक सूत्ररूपाने बोलतात. त्यामुळे त्यांची एखादी उक्ती एखाद्यासाठी जन्मभर अभ्यासाचा विषय ठरू शकते. स्टीवन हॉकिंगच्या याच उक्तीचे बोट धरून पटकन चांगली/आशावादी अथवा वाईट/निराशावादी असा कुठलाच शिक्का न मारता, शक्यतो कुठलाच पूर्वग्रह न ठेवता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हे समजून घेणे, हा या लेखाचा उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध क्षेत्रांवर होणारे परिणाम/ त्यामागची कारणपरंपरा आणि त्यातून निष्पन्न होणारे निष्कर्ष शोधून काढणे हा या संपूर्ण लेखमालेचा उद्देश आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना: इतिहास आणि वास्तव
१९५६ सालच्या डार्टमाउथ इथे झालेल्या परिषदेत सर्वप्रथम ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही संज्ञा वापरली गेली. त्यापूर्वी संज्ञा म्हणून नाही तरीही कल्पना म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता विचारविश्वात तरी अस्तित्त्वात होती. रोबॉट हा शब्द अस्तित्त्वात होता. यंत्रे- स्वयंचलित यंत्रे- यंत्रमानव-कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुढे हा प्रवास इतका सहज नव्हता. तरीही तो जणू काही मानवजातीच्या प्राक्तनात लिहिलेला असल्यासारखा अखंडितपणे घडत गेला.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रचंड गुंतागुंतीची आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर वास्तव बुद्धिमत्तेचे यशस्वी अनुकरण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. मात्र अनुकरण म्हणजे काय? ते आपण किती प्रमाणात करू शकतो? आणि ते अगदी तंतोतंत झालेले असेल तरी ते यशस्वी झाले का, हे ठरवायचे कसे याविषयी मतमतांतरे आहेत.
साधारण १९ व्या शतकापासून स्वयंचलित यंत्रे प्रचलित झाली. आत्ताच्या ‘टेस्ला आयएनसी’चे संस्थापक निकोला टेस्ला यांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात रेडिओ लहरींवर चालणारे जहाज तयार केले. ते मानव-चलित यंत्रांपासून स्व-चलित यंत्रांपर्यंतच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानले जाते.
चित्रातील जहाज छोटे असले तरी त्यातील गमतीशीर गोष्ट ही होती की, त्यात संदेशवहनासाठी रेडीओ लहरी वापरल्या गेल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष माणसाला जहाजावर जाण्याची गरज नाही, ही कल्पनाच नवीन होती. मॅडीसन स्क्वेअर गार्डनर मधील एका प्रदर्शनात ठेवलेल्या या जहाजाला प्रेक्षकांनी ६४ चे घनमूळ काय असे विचारले की, जहाजावरचे ४ दिवे प्रदीप्त होत. गंमत म्हणून निकोला टेस्लांनी हे जहाज ‘उसन्या बुद्धीवर’ चालते असे सगळ्यांना सांगितले. प्रत्यक्षात ते अर्थातच रेडिओ लहरींद्वारे जहाजाशी संवाद साधत होते. रोबो तंत्रज्ञानाचे ते अर्भकावस्थेतील दिवस होते असे म्हणतात.
पुढे पुढे यंत्रमानव म्हणजेच मानवसदृश यंत्र निर्माण करणे याच कल्पनेने विसाव्या शतकाचा बहुतेक भाग व्यापला होता. ही कल्पना वेगळी आणि नवीन जरी असली तरी खूप बंधने लादणारी सुद्धा होती. प्रस्तुत प्रतिमेतील रोबॉट्स अथवा यंत्रमानव पहिले तर आपल्या लक्षात येईल की अगदी विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेची अधिक संयत/ सूक्ष्म संकल्पना लोकांच्या पचनी पडली नव्हती. १९५६ सालच्या डार्टमाउथ परिषदेत पहिल्यांदा या संकल्पनेची चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष परिषदेत तर विरोध झालाच पण नंतरही वैज्ञानिकांनी तंत्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर अविश्वास दाखवणे चालू ठेवले.
अॅलन ट्युरिंगने १९५० मध्ये लिहिलेल्या ‘कम्प्युटिंग मशिनरी अॅण्ड इंटेलिजन्स’[1] या निबंधात अॅलन ट्युरिंगने ‘यंत्रे विचार करू शकतात का?’ असा मुलभूत प्रश्न विचारला. उत्तर म्हणून तो निबंधाच्या शेवटी म्हणातो की, हा प्रश्नच निरर्थक आहे कारण येत्या शतकात यंत्रे केवळ विचारच करतील असे नाही तर अशा विचार करणाऱ्या यंत्राशी बोलणारी माणसे आपण माणसाशी बोलतो आहोत की यंत्राशी हे पहिल्या पाच मिनिटांत ओळखू देखील शकणार नाहीत. इतकी ते मानवी भाषेची हुबेहूब नक्कल करतील.
इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कृत्रिम बुद्धिमत्तेची काही मोजकी पाळेमुळे क्रिप्टोग्राफी म्हणजे सांकेतिक भाषेची उकल करण्याच्या शास्त्रात आहेत. त्यात विसावे शकत भाषाविज्ञानाच्या प्रभावाचे शतक होते. सर्वोत्तम आणि सर्वांत एकल अशी मानवी क्षमता कोणती असे तेव्हा वैज्ञानिकांना विचारले, तर ते म्हणत भाषा वापरण्याची क्षमता, संवाद साधण्याची क्षमता. ट्युरिंगने सुचवलेल्या चाचणीत नेमके याच क्षमतेला मापदंड मानले गेले.
ही गोष्ट अलाहिदा की, तेव्हा काहीशी वादातीत असलेली ही चाचणी अजूनही यांत्रिक प्रभाषक (बॉट्स) यशस्वीपणे पार करू शकले नाहीत. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे नैसर्गिक भाषेवरील प्रक्रिया हे अजूनही कृत्रिम बुदधिमत्तेसमोरील मोठे आव्हान मानले जाते. ट्युरिंग त्या मोजक्या विद्वानांपैकी एक होता ज्यांनी सत्तर वर्षांपूर्वी संगणकदेखील आधुनिक व्हायचे होते, तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर दुर्दम्य विश्वास व्यक्त केला.
गेल्या तीन दशकात मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेली प्रगती एका लेखात सामावता येणार नाही. प्रत्यक्ष नवीन यंत्र निर्माण न करता, आहे त्या यंत्रांमध्ये आज्ञावली (प्रोग्राम) निर्माण केल्या की, तोच कार्यभाग अधिक स्वस्त आणि अधिक परिणामकारक पद्धतीने साधता येतो, हे या काळात लक्षात येऊ लागले होते. आता या आज्ञावली दृश्यमान नसल्याने त्यांचे सूक्ष्म अस्तित्व अचंबित करणारे. बुचकळ्यात टाकणारे, काहींसाठी मंत्रमुग्ध करणारे होते. मग १९९७ साली ‘डीप ब्लू’ नावाच्या संगणकाने विश्वविजेत्या गॅरी कास्पारोवला हरवले.
प्रत्यक्षात एखाद्या कपाटासारखे दिसणारे हे यंत्र एकदा याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हरले होते. मग पुन्हा सराव करून दुसर्या वेळी मात्र त्याने या विश्वविजेत्याला हरवले. मशीन लर्निंग म्हणजे यांत्रिक प्रशिक्षण या संकल्पनेची तेव्हा पायाभरणी होत होती. यंत्रे केवळ सूत्ररूपाने, सांकेतिक भाषेत शिकतात एवढेच नव्हे, तर मागील चुका सुधारून त्यांच्यात बदलही घडून येतात हे तेव्हा ‘आयबीएम’चा ‘डीप ब्लू’ सिद्ध करत होता. विसावे शकत संपत असताना माहितीचे युग आकाराला येत होते आणि साहजिकच माहितीपूर्ण असणे, ज्ञान संपादन करणे, शिकणे हे मानवाशी साधर्म्य साधण्याचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य मानले गेले.
२०११ साली जेओपर्डी या सामान्य ज्ञानावर आधारीत खेळात ‘आयबीएम’च्या बॉट्सनने पूर्वीच्या दोन विजेत्यांना हरवले. २०१४ साली गूगलने विकसित केलेली विनाचालक कार वाहनचालक तपासणीच्या चाचणीत यशस्वी झाली. २०१६ साली गूगल ‘डीपमाइंड’च्या ‘अल्फागो’ने ‘गो’ या चीनी बैठ्या खेळात पूर्वीचा विजेता ली से-डोल याला हरवले. या खेळात वेगवेगळ्या स्तरांवरील सामरीक चिंतन करणे अपेक्षित असते. जननावस्थेत असताना आज्ञापालन हे एकाच लक्ष्य असलेली यंत्रे इथपासून ते आता स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या, वेळ पडल्यास धोरण बदलणाऱ्या, खोल विचार करू शकणाऱ्या, प्रचंड जागा न व्यापणाऱ्या मात्र स्वतःचा आभासी अवकाश असणाऱ्या आज्ञावली असा हा भव्य-दिव्य बदल होता.
पर्यावरण नष्ट करायच्या माणसाच्या अमर्याद शक्तीमुळे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हे शतक माणसासाठी संपूर्णपणे वेगळे आणि अनाकलनीय ठरू शकते, असे माझे वैयक्तिक मत आहे.
मग कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय?आणि ती विवाद्य विषय का आहे?
सोप्या शब्दात सांगायचे तर, कृत्रिम बुद्धिमत्ता ही वास्तव बुद्धिमत्तेची हुबेहूब नक्कल, अथवा नक्कल करायचा केलेला यशस्वी प्रयत्न आहे. आता या विषयात ज्यांना माणसासारखा कार्बनयुक्त करडे द्रव्य असलेला मेंदू नाही मात्र सिलिकॉन युक्त द्रव्याने ज्यांना त्याच मेंदूचा परिणाम साधता येतो, अशा जीवांची निर्मिती केली जाते. हे जीव अजून माणसाइतके उत्क्रांत नाहीत. काही दशलक्ष शक्यता अथवा काही कोटी विषयांची माहिती साठवणे, ज्यात मूळातच अभूतपूर्व असे काही घडणे शक्य नाही. अशा नियंत्रित वातावरणात खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये जिंकणे आणि माणसासारखे जीवनाच्या विविध आघाड्यांवर लढून असा विजय मिळवणे, यात खूप अंतर आहे.
आणखी एका गोष्टीची नोंद करणे खूप आवश्यक आहे. ती म्हणजे सुरवातीला कृत्रिम बुद्धिमत्ता तर्कशास्त्रावर आधारीत होती, तेव्हा तर्कशास्त्राच्या तर्ककठोरपणामुळे मानवीय सामान्य संवाद, व्यवहारज्ञान, समाजभान इत्यादी असणे कृत्रिम बुद्धिमत्तेला अशक्यप्राय होते. हा गणितीय आधार जेव्हा सोडला, तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचे सर्वांत मोठे लक्ष्य कॉमनसेन्स म्हणजे व्यवहारज्ञान मिळवणे हे झालेले आहे. तो मिळवण्यासाठी नवे तर्कशास्त्र निर्माण झाले आहे. संगणकाला समजेल अशा पद्धतीने मानवी भाषेचे सांकेतिकीकरण करणे, इथून आता मानवाला जी भाषा समजते आणि रुचते ती संगणकाने आत्मसात करणे हा कायापालट खुद्द कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात घडून आला आहे.
याचाच दुसरा अर्थ असा की आधी फक्त काही अभियंते-शास्त्रज्ञ-संगणक शास्त्रज्ञ यांच्यापुरत्या मर्यादित असलेल्या या प्रयोगाचे रुपांतर आता भल्यामोठ्या उद्योगजगतात झाले आहे. निक बोस्ट्रॉम म्हणतात त्याप्रमाणे आज १० लाखांहून अधिक कृत्रिम जीव उद्योग क्षेत्रात काम करत आहेत. पूर्वी माणसाची असलेली माहिती आकलन (डेटाअॅनालिसिस), आकृतीबंधान्वेषण (डेटा मायनिंग) आणि बृहन्माहिती (बिग डेटा) इत्यादींशी संबंधित अनेक कामे कार्यावली करत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचे वाद खूप सूक्ष्म आणि ज्ञानशास्त्रीय पासून अस्तित्त्वावादीय पर्यंत अनेक पटलांवरचे आहेत. वानगीदाखल काही वाद इथे नोंदवून लेखाचा समारोप करते. प्रथमतः आत्तापर्यंतच्या प्रगतीचा आलेख पाहता कृत्रिम बुद्धिमत्ता केव्हाही मानवी प्रशिक्षकाचा हात सोडून स्वतःच्या पायावर न डगमगता उभी राहू शकते. न्यूनतम नियंत्रणावर चालणाऱ्या कार्यावली आजही अस्तित्त्वात आहेत मात्र त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे.
ट्युरिंग चाचणी आणि अन्य चाचण्यांमध्ये यशस्वी होऊन कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेला सर्वच पातळ्यांवर पायदळी तुडवेल काय? याची शक्यता जर असली तर ती आपण वास्तवात येऊ द्यावी की, तिचा धिक्कार करावा? अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ डोनाहॅरवे म्हणतात त्याप्रमाणे माणसाचे आधीच सायबोर्गमध्ये म्हणजे वास्तव आणि आभासी अस्तित्त्वात वाटल्या गेलेल्या जीवामध्ये रुपांतर झाले आहे.
अशात कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका अथवा तिचे आव्हान माणसाने कुठे आणि कसे पत्करावे? माणूस अशाने आणीच कठीण जीव आणि माणूस असणे हे अगदी मेरू पर्वत उचलण्यासारखे महाकठीण काम होणार नाही काय? आणि तिसरा मुख्य वाद म्हणजे जिला मुळात चेतना नाही मात्र चेतासंस्थेची नक्कल करणरे आभासी जाळे आहे अशा कार्यावलीला बुद्धिमत्ता/ कृत्रिम जीव म्हणावे का? लेखमालेतील पुढील लेखांमध्ये या सगळ्याच प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत.
(‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण’ या लेखमालिकेतील हा पहिला भाग आहे.)
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.