Author : Anil Chopra

Published on Nov 28, 2021 Commentaries 0 Hours ago

जागतिक दर्जाचे किनारपट्टीचे शहर म्हणून मुंबईचा सागरी विकास होणे महत्त्वाचे आहे. ज्याद्वारे जागतिक गुंतवणूक आणि कौशल्य आकर्षित होऊ शकेल.

मुंबईच्या ऐतिहासिक किनारपट्टीचे भविष्य

१६६१ मध्ये पोर्तुगीजांनी तत्कालीन बॉम्बेची वसाहत इंग्रजांच्या स्वाधीन केल्यापासून, हे शहर झपाट्याने विकसित होत गेले आणि वाढत्या ब्रिटिश साम्राज्याच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र बनले. हिंद महासागर प्रदेश आणि पूर्व गोलार्धातील सागरी सुरक्षा तसेच भारताचा औद्योगिक विकास आणि समृद्धी या दृष्टीनेही या शहराचे महत्त्व लक्षणीय होते. याचे सुस्पष्ट कारण असे की, मुंबई हे दोन्ही किनार्‍यांवर आढळणारे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे, ज्यामुळे जगाकरता मुंबई भारताचे नैसर्गिक प्रवेशद्वार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र बनले आहे. आजच्या वाढत्या परस्परांशी जोडलेल्या जगात मुंबईचा समृद्ध वारसा आणि अनुभव लाभदायक आहे, ज्यात सागरी परिमाणाला केंद्रस्थान प्राप्त झाले आहे.

मुंबई हा ब्रिटिशांचा एक शक्तिशाली नौदल तळदेखील होता आणि आजमितीसही भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईला लाभलेल्या जहाजांची दुरुस्ती आणि देखभाल करणाऱ्या विशाल गोदीसह, ज्याच्या विविध आवश्यकतांमुळे गेल्या तीन शतकांपासून शहरातील औद्योगिक उपक्रम आणि वाढीला चालना मिळाली आहे.

सुएझ कालवा, आफ्रिकन भूमीचा पूर्वेकडील विस्तार, एडनचे आखात, पर्शियन आखात आणि नंतरच्या काळात शत्रूत्व पत्करलेल्या शेजारील राष्ट्रांच्या संदर्भात मुंबईच्या मोक्याच्या स्थानामुळे, भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी, व्यापार अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी तसेच पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांपासून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी मुंबई महत्त्वपूर्ण आहे.

इतिहासात स्पष्टपणे नोंद करण्यात आल्यानुसार आणि परंपरागत एकापाठोपाठ एक आलेल्या महान शक्तींनी दाखवून दिल्यानुसार, या महान शहराच्या मध्यभागी असलेली नौदलाची उपस्थिती व्यापार, सुरक्षा आणि समृद्धी यांच्यातील दुवा अधोरेखित करते. ‘व्यापार ध्वजाचे अनुसरण करतो आणि ध्वज व्यापाराचे अनुसरण करतो,’ या उक्तीनुसार, नौदलातर्फे केवळ धोक्यांचाच सामना केला जातो, असे नाही, तर त्यापलीकडे आर्थिक हितसंबंधांचे रक्षण नौदल करते.

पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७० टक्के भाग व्यापते; जगातील सुमारे ८० टक्के लोकसंख्या समुद्राजवळ- समुद्रापासून २०० मैलांच्या आत राहते आणि सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा जीवनरेखांपैकी अंदाजे ९० टक्के समुद्रमार्गे जातात. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या १९५ सदस्य राष्ट्रांपैकी दीडशेहून अधिक देशांना किनारपट्टी लाभलेली आहे. लोकसंख्या आणि उद्योग केंद्रे ही सर्व खंडांच्या किनारपट्टीभोवती एकवटलेली आहेत. समुद्राच्या सीमेवर असलेला हा प्रदेश, ज्याला समुद्रकिनाऱ्यावर वसलेले शहर म्हणून संबोधले जाते, हा पृथ्वीतलावरील सर्वात औद्योगिक आणि विकसित भाग आहे.

महासागर हा सजीव आणि निर्जीव संसाधनांचा खजिनादेखील आहे व अन्न सुरक्षा, खनिज स्त्रोत/खाणकाम, आणि कदाचित पाण्याच्या कमतरतेवर उतारा म्हणूनही एक प्रमुख घटक आहेत. यामुळे मोठा सागरी संघर्ष होऊ शकणे अपरिहार्य आहे, याला समुद्राविषयक वाढणारे ‘प्रादेशिकीकरण’ म्हटले जाऊ शकते. दक्षिण चीन समुद्रात ही बाब सर्वात ठळकपणे होत असल्याचे दिसून येते.

अलीकडच्या काळात वाढते विवादित आणि विस्तीर्ण महासागरीय अवकाश धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले आहेत आणि एकविसाव्या शतकाचे वर्णन ‘समुद्रांचे शतक’ असे योग्य रीतीने केले गेले आहे. ‘इंडो-पॅसिफिक’ धोरणात्मक बांधणी हे भौगोलिक घटकांच्या प्रभावाचा राजकारणाशी आणि अर्थकारणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सागरी परिमाण किती व्यापक महत्त्वाचे ठरते, याचे उदाहरण आहे.

आपल्या डोळ्यांसमोर वेगाने उलगडत असलेल्या या महासागरीय किंवा सागराचे महत्त्व दुणावलेल्या शतकात मुंबई शहर हे जगभरातील महत्त्वाच्या सागरी केंद्रांपैकी एक आहे. सागरासंबंधित अर्थकारणाच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि सागरी क्षेत्राच्या वाढीला शाश्वत पाठिंबा देण्यासाठी आवश्यक असे- सागरी संरक्षित क्षेत्रांचे व्यवस्थापन आणि शाश्वत वित्तपुरवठा निर्माण करण्यासाठी मुंबई खरोखरीच तयार आहे. भारतातील उर्वरित किनारी शहरांसाठी आणि राज्यांसाठी हे एक उदाहरण ठरावे.

मुंबई हे भारतातील आघाडीचे बंदर आहे आणि देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईची भौगोलिक स्थान अत्यंत मोक्याचे व महत्त्वाचे आहे. मात्र, शहराच्या सागरी पायाभूत सुविधा आणि शहराच्या विकासासंदर्भातील दृष्टीचा अभाव यामुळे मुंबई शहराची सद्यस्थिती मुंबईला उपलब्ध असलेल्या संभाव्यता आणि संधींशी जुळत नाही.

सोयीस्कर पूल, बोगदे, घाट, नौकाविहारासाठी छोटे जलाशय, जलवाहतूक आणि पुरवठासंबंधित क्षेत्रे, समुद्र मागे सारीत तयार केलेली जमीन, आधुनिक मासेमारी बंदरे इत्यादींच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही. कल्पकतेच्या अभावामुळे आणि पुरेसे लक्ष न दिल्याने बंदरासोबतच समुद्राजवळील शहराच्या भागाचीही विकासाची गती खुंटली.

यामुळे केवळ सागरी अर्थव्यवस्थेचा विकासच रोखला गेला नाही, तर शहराचा संपूर्ण विकास खुंटला, तो जमिनीच्या एका अरुंद पट्ट्यापर्यंत मर्यादित झाला. परिणामी, गर्दी, गुंतवणूक आणि उत्पादकता कमी झाली आणि तेथील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जाही खालावला. अव्यवस्थित, अनियंत्रित मासेमारीमुळे तसेच समुद्रात व समुद्राखाली तेल, नैसर्गिक वायू शोधण्यासाठी आणि उत्पादनासाठी निर्माण झालेल्या वाहतुकीमुळे किनारपट्टीच्या सुरक्षेलाही फटका बसला.

या शहराच्या सुदैवाने, सहस्रकाच्या वळणानंतरच्या दोन दशकांमध्ये सागरी व किनारी क्षेत्रामध्ये सरकार आणि सूचित नागरिक गट या दोहोंच्या बाजूने स्वारस्य निर्माण झाले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी, गुंतवणूक आणि सागरी क्षेत्राशी संबंधित अनेक भागधारकांमधील विचारांची देवाणघेवाण याद्वारे सागरी जोडणी, पायाभूत सुविधा आणि आर्थिक उपक्रमांच्या नियोजित विकासाद्वारे देऊ केलेल्या संधी व संभाव्यतेबद्दल जागरुकता वाढत आहे.

निःसंशयपणे सागरी जोडणीसंबंधीच्या पायाभूत सुविधा आणि किनारी रस्ते यांमध्ये सहभाग, नियोजन आणि गुंतवणूकीची नितांत गरज आहे. यात बंदर सुधारणा; किनारी वाहतूक केंद्रे; किनारी पर्यटन; समुद्रानजीकचा शहराच्या भागाचा विकास; नौकाविहारासाठी छोटे जलाशय आणि जल-क्रीडा; मासेमारी आणि मत्स्यपालन; गोदामे; सागरी प्रदूषण नियंत्रण आणि किनारी सुरक्षा यंत्रणा यांचा समावेश करता येईल. जागतिक दर्जाचे किनारपट्टीचे शहर म्हणून मुंबईच्या भविष्यासाठी हा सागरी विकास खरोखरीच महत्त्वाचा आहे, ज्याद्वारे जागतिक गुंतवणूक आणि कौशल्य आकर्षित होऊ शकेल.

‘महासागर आणि समुद्रांचे संरक्षण’ करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार (SDG14), पर्यावरणीय जोखीम आणि पर्यावरणीय ऱ्हासही लक्षणीयरीत्या कमी करत असताना, मुंबईने अल्पकालीन लक्ष्य संपादन करण्याऐवजी दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करणारा दृष्टिकोन स्वीकारण्याची आणि अमलात आणण्याची आणि शहराची समृद्धी, सुरक्षितता व जागतिक दर्जा वाढवण्यासाठी समन्वित सार्वजनिक आणि खासगी उपक्रमांची मालिका सुरू करण्याची वेळ जवळ आली आहे. ‘कुलाबा कॉन्व्हर्सेशन्स’ हा एक बहु-शाखीय विचारमंच आहे, जो अल्पकालीन लक्ष्य संपादन करण्याऐवजी दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दृष्टिकोनाची एकसंधपणे दखल घेतो.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Anil Chopra

Anil Chopra

Vice Admiral Anil Chopra (retd) has been the Commander-in-Chief of both the Western Naval Command and the Eastern Naval Command: as well as being the ...

Read More +