Author : Nilanjan Ghosh

Published on Aug 26, 2021 Commentaries 0 Hours ago

पाणी टंचाई किंवा दुष्काळामध्ये ‘वॉटर फ्युचर्स’ हे बाजारावर आधारित विमा यंत्रणा म्हणून काम करू शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अमेरिकेतील दुष्काळ आणि वॉटर फ्युचर्स

पश्चिम अमेरिकेतील कॉलोरॅडो राज्यामधील नदी खोर्‍याच्या प्रदेशात कोरड्या दुष्काळाचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेच्या ‘ब्युरो ऑफ रेक्लेमेशन’ने अधिकृतपणे अमेरिकेतील सर्वात मोठा जलाशय असलेल्या हुवर धरणाच्या मीड लेकमध्ये पाण्याची तीव्र टंचाई घोषित केली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे १,०६७ फुटांवर असलेला हा तलाव १९३० साली बांधण्यात आला आहे. सध्या त्यात फक्त ३५% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

कोलोरॅडोमधील लेक पॉवेल हा दुसर्‍या क्रमांकाचा मोठा जलाशय सध्या त्याच्या पूर्ण क्षमतेच्या फक्त ३२% इतकाच भरला आहे. या जलाशयाला कोलोरॅडो नदी येऊन मिळते. कोलोरॅडो जलप्रणालीतील ह्या घटीचा मोठा फटका २०२२ मध्ये ग्लेन कॅनयन धरण आणि हूवर धरणाला बसणार आहे. याचा फटका कॅलिफोर्निया, अॅरिझोना आणि नेवाडा या राज्यांना तर बसेलच व यासोबत या संकटाचा सामना करण्यासाठी मेक्सिकोमध्येही पाण्याची तीव्र कपात करण्यात येईल.

२०१९ मध्ये अमेरिकेतील दुष्काळी परिस्थितीशी लढण्यासाठी फेडरल मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार लेक मिडमधून अॅरिझोना, नेवाडा आणि मेक्सिकोमध्ये होणार्‍या जल वितरणात अनुक्रमे १८%, ७% आणि ५% इतकी घट करण्यात आली आहे. नेवाडा राज्याने पाणी टंचाईचा आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी आधीपासूनच पावले उचण्यास सुरुवात केली आहे.

कोलोरॅडो जलप्रणालीतील पाण्याची घट ही बहुतांशी मानवनिर्मित हवामान बदलाचा एक परिणाम आहे. विज्ञान क्षेत्रातील एका अभ्यासामध्ये असे नोंदवण्यात आले आहे की, अप्पर कोलोरॅडो जलप्रणालीमध्ये वार्षिक सरासरी जलवितरण ९.३ टक्क्यांनी घटत चालले आहे. हिमाची कमतरता आणि सोलार रेडीएशनमुळे तापमानवाढ दिसून येत आहे त्यामुळे बाष्पीभवन प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. अर्थात या आपत्तीसाठी हे एकमेव कारण नाही.

मार्क रेसनर यांच्या ‘कॅडीलॅक डेझर्ट’ आणि फिलिप फ्राडकिन यांच्या ‘अ रिवर नो मोर’ या पुस्तकांमधून नद्यांवरील विकास प्रकल्प, पश्चिम अमेरिकेतील राज्यांची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी उचलण्यात आलेली पावले, त्यांचे पर्यावरण आणि पाणी यांच्यावर दिसून येत असलेले दीर्घकालीन गंभीर प्रतिकूल परिणाम मांडण्यात आले आहेत. धरण किंवा इतर कामासाठी करण्यात आलेल्या बांधकामामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात दीर्घकालीन विखंडन घडून येते. दीर्घकालीन प्रवाहात होणार्‍या घटीमध्ये जगातील तापमान वाढ आणि हवामान बदल यांची भर पडली आहे.

पश्चिम अमेरिकेतील राज्यांनी या आपत्तीशी लढण्यासाठी कायदे आणि नियमावलींचा आधार घेतलेला आहे. वर उल्लेखलेली, २०१९ रोजी जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे हे त्याचेच उदाहरण आहे. डिसेंबर २०२० सीएमई ग्रुप आणि एनएएसडीएक्यू यांच्यात एनएएसडीएक्यू वेलेस कॅलिफोर्निया वॉटर इंडेक्स कॉंट्रॅक्ट हा करार करण्यात आला. विशेषतः कॅलिफोर्नियासाठी तयार करण्यात आलेल्या या कॉंट्रॅक्टमुळे २०१९-२० मध्ये १.१ अब्ज अमेरिकन डॉलरची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हा करार एनएएसडीएक्यू वेल्स कॅलिफोर्निया वॉटर इंडेक्स व स्पॉट मार्केट किंमतीशी संबंधीत आहे. भौतिक वितरणाच्या विरुद्ध हे करार आर्थिकदृष्ट्या सेटल केले जातात त्यामुळे आर्थिक लाभ मिळण्यासोबतच व्यवहारावरील खर्च कमी होतो.

वॉटर फ्युचर्स मार्केटचे फायदे

वॉटर फ्युचर्स मार्केट्सचे (डब्ल्यूएफएम) अनेक फायदे आहेत. वॉटर फ्युचर्स मार्केटमध्ये संसाधंनांच्या टंचाई मूल्यांद्वारे एकूण मूल्य ठरवले जाते परिणामी संसाधंनांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. अशाप्रकारे, कार्यक्षम वाटप आणि योग्य वितरणास मदत होते, त्यासोबतच उपभोग आणि उत्पादन यांची सामाजिक अनुकूलता प्राप्त होण्यास मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉटर फ्युचर्स करारांच्या मदतीने भविष्यात साठवल्या जाणार्‍या पाण्याची किंमत ठरवता येते.

परिणामी गुंतवणुकीसंबंधी निर्णय तसेच भविष्यातील जोखीम व्यवस्थापनात मदत होऊ शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्युचर्स मार्केटमधून निर्धारित होणारी किंमत भविष्यातील संसाधनांच्या उपलब्धतेच्या स्थितीशी निगडीत असेल परिणामी मागणी संदर्भात निर्माण होणारी सापेक्ष टंचाई सूचित होण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाण्याचे टंचाई मूल्य निर्धारित करण्यास विशेष मदत होईल.

चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंचनावर तसेच पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला कृषी व्यवसाय या फ्युचर्स मार्केटच्या (किंवा मार्केट मधील उत्पादनांच्या) सहाय्याने दुष्काळाशी लढण्यासाठी विमा काढण्यास सक्षम होऊ शकेल. खाजगी क्षेत्रातील अशा जोखीमींनी युक्त असलेल्या हस्तांतरणामुळे सध्या दुष्काळ निवारणाचा सरकारवर असलेला भार कमी होण्यास मदत होईल.

पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदार आणि बँका यांना ग्रामीण कृषी क्षेत्रात आत्मविश्वासाने गुंतवणक करण्यासाठी वॉटर फ्युचर्स मार्केट हे प्रभावी आर्थिक माध्यम आहे. याचा थेट परिणाम दीर्घकालीन नियोजन आणि गुंतवणूकीवर होईल म्हणजेच ज्या भागांना पाण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडे फक्त विमा काढणे हा एकमेव उपाय न राहता पाण्याचा योग्य पुरवठा करता येऊ शकेल.

वॉटर फ्युचर्स मार्केट्सचा वापर करून बँका आणि इतर मध्यस्त संस्था आपल्या वापरकर्त्यांसाठी सुलभ उत्पादने विकसित करू शकतील. वॉटर फ्युचर्स मार्केटमुळे जल कार्यक्षम तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळेल. वॉटर फ्युचर्स मार्केटमधील निर्धारित किंमतीच्या सहाय्याने मर्यादित बजेटमध्ये न्याय्य जलसंवर्धनाच्या इतर साधनांचा विकास करता येईल. वॉटर फ्युचर्स मार्केटच्या सहाय्याने मागणी व पुरवठा यांचा मेळ साधतानाच बाजारातील किंमतीमधील जोखीम ओळखणे आणि मूल्य निर्धारण करणे सोपे जाईल.

कॅलिफोर्नियापर्यंतच ही बाब मर्यादित का ?

सद्यस्थितीत उपलब्ध असलेली व्यवस्था कोलोरॅडो जलप्रणालीतील पाण्याची उपलब्धतेबाबत कमी अधिक प्रमाणात अंदाज वर्तवत असली तरीही पाण्याच्या उपलब्धतेमागील जोखीम कमी झालेली नाही. अर्थात या क्षेत्रात वॉटर फ्युचर्स मार्केटची गरज आहे. सध्याच्या घडीला ही बाब फक्त कॅलिफोर्निया पुरती मर्यादित राहिली परिणामी पश्चिम अमेरिकेतील दुष्काळग्रस्त भागांपर्यंत ही संकल्पना पोहोचणे कठीण आहे. अर्थात यामुळे सर्व राज्यांचे, सर्व क्षेत्रांचे व सर्व भागधारकांचे मोठे नुकसान होणार आहे. म्हणूनच सर्व राज्यांना फ्युचर्स मार्केटची गरज आहे.

प्रत्येक राज्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी अधिक आहे त्यामुळे त्या त्या राज्यांची गरज ओळखून वॉटर फ्युचर्स मार्केट्स डिझाइन करणे गरजेचे आहे. कॅलिफोर्नियासाठी उपयुक्त ठरणार्‍या बाबी नेवाडा आणि अॅरिझोनासाठीही लागू पडतीलच असे नाही त्यामुळे प्रत्येक राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईचे प्रमाण आणि टंचाई मूल्य या दोन्ही गोष्टी बाजार मूल्यांवर प्रतिबिंबीत होणे गरजेचे आहे.

व्यापक व्यवहार्यतेसाठी

जिथे पाण्याची भौतिक बाजारपेठ उपलब्ध नाही अशा परिस्थितीत काय करावे ? अशा परिस्थितीत बाजारपेठा निर्माण करता येतात का ? अशा प्रकारचे प्रश्न आता निर्माण होऊ शकतात. पश्चिम अमेरिका जिथे पाण्याच्या भौतिक बाजारपेठा उपलब्ध आहेत तिथे जितका हा प्रश्न सुसंगत आहे तितकाच जगभरात जिथे पाण्याशी संबंधित भौतिक बाजारपेठा उपलब्ध नाहीत तिथेही तितकाच सुसंगत आहे.

या प्रश्नाचे उत्तर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात दिले आहे. ह्या संशोधनामध्ये भारतातील कर्नाटकमध्ये कावेरी नदीच्या खोर्‍यातील जलाशयांमधील पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित निर्देशांक विकसित केला आहे. या अभ्यासात भात लागवडीशी संबंधित पाण्याच्या टंचाई मूल्याचा अंदाज पाण्याच्या उपलब्धतेनुसार (वॉटर अव्हेलीबिलिटी इंडेक्स – डब्ल्यूएआय) लावण्यात आला. यातून निघालेला निष्कर्ष पाण्याच्या टंचाई मूल्याच्या आर्थिक तर्कशास्त्राशी उत्तमरीत्या जुळलेला आढळला आहे. (पाण्याच्या उपलब्धतेचा निर्देशांक – वॉटर अव्हेलीबिलिटी इंडेक्स – डब्ल्यूएआय)

कोरड्या हंगामात किंवा सिंचनाखालील धानासाठी, डब्ल्यूएआय आणि टंचाई मूल्य यांच्यातील सहसंबंध गुणांक हा -०.९२ इतका उच्च होता तर तीव्र मान्सूनच्या काळात हा गुणांक -०.६५ इतका होता. हा नकारात्मक परस्परसंबंध स्पष्टपणे दिसून आलेला आहे – पाण्याची मुबलक उपलब्धता किंवा डब्ल्यूएआयचे उच्चतम मूल्य हे पाण्याचे कमी टंचाई मूल्य दाखवून देते. कोरड्या हंगामात शेतजमीन पुर्णपणे सिंचनावर अवलंबून असते. म्हणूनच अशा परिस्थितीत उच्च नकारात्मक परस्पर संबंध दिसून आलेला आहे.

या अभ्यासात असेही दिसून आले आहे की १९९२ ते १९९८ या सहा वर्षांच्या काळात डब्ल्यूएआय हा ०.८ ते ०.९ यांच्या दरम्यान होता. तर टंचाई मूल्य हे ०.४ ते ०.६ रुपये प्रति क्युबिक मीटर इतके होते. १९९९ यावर्षी आलेल्या दुष्काळाच्या वेळेस डब्ल्यूएआयमध्ये ०.७१ च्या आसपास घसरण दिसून आली. त्यावेळी टंचाई मूल्य १.३१ रुपये प्रति क्युबिक मीटर इतके होते. अशा परिस्थितीत भौतिक बाजारपेठांपेक्षा वॉटर फ्युचर्स मार्केटची अधिक मदत होऊ शकते. अर्थात यासाठी योग्य नियमन आणि नियामक व्यवस्थांची गरज असते.

पाणी टंचाई किंवा दुष्काळामध्ये वॉटर फ्युचर्स हे बाजारावर आधारित विमा यंत्रणा म्हणून काम करू शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कृषी संस्था, बँका आणि वित्त संस्था या शेतकर्‍यांना, कृषी गटांना कर्ज देतात. पाण्याच्या उपलब्धते संबंधीच्या अडचणी विमा कंपन्या आणि विमाधारक दोघांवरही नकारात्मक परिणाम करतात. अशा वेळेस ही वॉटर फ्युचर्स मार्केट उपयोगी पडू शकतात. याद्वारे भागधारकांच्या बॉटमलाइन्सचे रक्षण करू शकतील व त्यासोबत करारांच्या सहाय्याने दुष्काळी परिस्थितीत नुकसान भरपाईसुद्धा मिळवू शकतील.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.