Author : Cahyo Prihadi

Published on Jun 23, 2020 Commentaries 0 Hours ago

अमेरिकेतील ट्रम्प यांच्या उदाहरणावरून, खिळखिळीत होत चाललेल्या जगभरातील लोकशाही देशांनी वेळीच धडा घ्यायला हवा, हा जॉन बोल्टन यांच्या पुस्तकाचा संदेश आहे.

लोकशाही देशांना बोल्टन यांचा इशारा

Source Image: telegraph.co.uk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचे  ‘द रूम व्हेअर इट हॅपन्ड’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकावरून अमेरिकेत मोठा धुरळा उडला आहे. या पुस्तकात बोल्टन यांनी ट्रम्प यांचे विचार, कामाची पद्धत, धोरणे इत्यादीबाबत आपला अनुभव लिहिला आहे. अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक कमालीचे वादग्रस्त आणि सनसनाटी निर्माण करणारे ठरले आहे. अमेरिकेसह जगभरातील माध्यमांमध्ये या पुस्तकावर चर्चा होत असून, खुद्द ट्रम्प यांनाही यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

ट्रम्प यांची अनेक जाहीर विधाने, त्यांचे ट्विट्स हे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पण, जेव्हा थेट त्यांच्यासोबत काम करणारे, व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासोबत वावरणारे जॉन बोल्टन आपल्या राष्ट्राध्यक्षाबद्दल लिहितात, तेव्हा त्या ट्रम्प यांच्या भोवतीच्या चर्चांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो. नेमके हे पुस्तक ज्या वेळी प्रकाशित झाले आहे, ती वेळही महत्त्वाची आहे. संपूर्ण अमेरिका कोरोनाच्या विळख्यात अडकली असताना, वर्णद्वेषाचा प्रश्न चिघळला असताना, ट्रम्प यांच्यावर आधीच टीका होत आहे. त्यात अमेरिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. अशा वेळी आलेले हे पुस्तक ट्रम्प यांच्या नेतृत्त्वावर चिखलफेक करणारे ठरले, तरीही त्यामुळे त्यांना लोकप्रियताही मिळणार आहे.

बोल्टन यांनी काय म्हटले आहे?

या पुस्तकात बोल्टन यांनी ट्रम्प यांनी वेळोवेळी केलेली विधाने, त्यांचे अनेक किस्से आणि बोल्टन यांना त्या घटनांबद्दल वाटणारी मते नोंदवली आहेत. त्यातील अनेक मते ही स्फोटक आहेत. काही शंका घ्यावी अशीही आहेत. पण काहीही असली तरी ती अदखलपात्र नक्कीच नाहीत. आपण काही विधानांचा परामर्श घेऊया.

बोल्टन पुस्तकात म्हणतात, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांच्याशी वाटाघाटी करताना, ट्रम्प यांनी अमेरिकन शेतमाल चीनने खरेदी करावा, अशी मागणी केली होती. यामुळे ट्रम्प यांना शेतकऱ्यांची मते मिळतील आणि त्यामुळे ते पुन्हा निवडून येऊ शकतील, असे त्यांनी शी जिन पिंग यांना सांगितले होते. ही चर्चा झाली तेव्हा, जगाच्या दृष्टीने अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध चालू होते. एकीकडे चीनवर राजकीय दबाव आणायचा, चीनचा माल आयात करायचा नाही, असे ट्रम्प म्हणत होते. पण, मागल्या वाटेने चीनशी व्यवहार करून स्वतःचा फायदा करून घ्यायचा असे ट्रम्प यांचे धोरण असल्याचे बोल्टन म्हणतात.

जो बायडन या आपल्या संभाव्य प्रतिस्पर्ध्याची चौकशी करा, असेही ट्रम्प यांनी शी जिन पिंग यांना विनवले होते. तसेच शी जिन पिंग यांनी उईगूरमधल्या मुसलमानांसाठी छावण्या उघडून त्याना वेगळे ठेवले, वेगळे वागवले हे योग्यच केले असेही ट्रम्प म्हणाले होते. बोल्टन एवढेच लिहून थांबत नाहीत. तर, अमेरिकेत अध्यक्षपद फक्त दोनच वेळा घेता येते, ही अडचण आहे, ती दूर केली पाहिजे, तहहयात अध्यक्ष रहाता येईल असे काही तरी राज्यघटनेत केले पाहिजे, असेही ट्रम्प म्हणाले होते. असे बोल्टन नमूद करतात.

काही स्फोटक विधाने बोल्टन यांनी या पुस्तकात केली आहेत. उदाहरणार्थ, युक्रेनला संसदेने देऊ केलेले पैसे ट्रम्पनी रोखून ठेवले, हिलरी क्लिंटन यांच्याबद्दल डर्ट (घाण) पुरवलीत तरच ते पैसे देऊ असेही ट्रम्प युक्रेनच्या अध्यक्षाला म्हणाले होते. दुसरे उदाहरण म्हणजे, अमेरिकेत काही व्यक्तींवर फौजदारी खटला होता, तो खटला तुर्की प्रेसिडेंटना मदत करण्यासाठी मागे घ्यायची ट्रम्प यांची योजना होती. त्या बदल्यात त्या तुर्की प्रेसिडेंटनी ट्रम्पना मदत करायची होती. तिसरे उदाहरण म्हणजे, किम जाँग उन यांच्याबरोबर क्षेपणास्त्र वाटाघाटी ट्रम्पनी योजल्या. पण ते सारे प्रकरण अत्यंत व्यक्तिगत पातळीवर आणि लहरीपणावर ते हाताळत होते. कोणाही सहकाऱ्याशी चर्चा करत नसत. ते काय वाट्टेल ते करून बसतील, ही शक्यता लक्षात घेऊन सेक्रेटरी ऑफ स्टेट पाँपिओ, बोल्टनना म्हणाले की, ट्रम्प यांना कधीही एकटे सोडता कामा नये, ते वाट लावतील.

व्हेनेझुएला हा अमेरिकेचाच एक भाग असून त्या देशावर आक्रमण करणे योग्य आणि शक्य आहे, असे ट्रम्प बोल्टन यांच्याशी बोलले होते. फिनलंड हा देश रशियाचा एक भाग आहे, असे ट्रम्प यांचे ठाम मत होते. युके हा अण्वस्त्रधारी देश आहे, हे ट्रम्पना ते पंतप्रधान थेरेसा मे यांना भेटायला गेले, त्या क्षणापर्यंत वाटत होते. युरोप चीनपेक्षा घातक आहे, असे ट्रम्प बोल्टनना म्हणाले होते, असे त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे.

हे झाले परदेश संबंधांबाबत. व्हाईट हाऊस आणि देशाचा कारभार चालवत असतानाही ते क्षणोक्षणी आपल्या भूमिका बदलत असतात. त्या भूमिका त्यांच्या अज्ञानावर आणि लहरीवर अवलंबून असत. असे लिहून बोल्टन म्हणतात की, “ट्रम्प यांचे अज्ञान, अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार धक्कादायक आहे.’

ट्रम्प यांची सारवासारव

बोल्टन यांचे पुस्तक प्रसिद्ध होऊ नये, यासाठी ट्रम्प यांनी खूप प्रयत्न केले. पुस्तक प्रसिद्ध केल्यावर बोल्टन हे हताश, निराश असून ते डेमॉक्रॅट्सच्या आणि डाव्यांच्या नादी लागून खोटेनाटे लिहीत आहेत, असे ट्रम्प म्हणत आहेत.

बोल्टन यांनी जे सांगितले ते आधीच सर्वाना माहित होते. पेपरामध्ये आले होते. परंतु बोल्टन यांनी स्वतः अनुभव घेतल्याचे सांगितल्याने ट्रम्प यांच्यावरच्या आरोपांना बळकटी आली आहे. त्यांना एक प्रकारे अधिकृतपणा आला. डोनल्ड ट्रम्प यांना लोकशाही, लोकहित अशा कशाशीही देणेघेणे नाही, ते कायदा पाळत नाहीत, ते नीतीमत्ता पाळत नाहीत. त्यांनी व्यवसायही धडपणाने केलेला नाही. त्याना एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे प्रसिद्धी.

प्रसिद्धी मिळाली की, त्यावर पैसेही मिळतात. तुम्ही कसेही असा, तुम्ही टीव्हीवर झळकत असाल, तुमच्यावर मजकूर प्रसिद्ध होत असेल, तुमची पुस्तके खपत असतील तर तुम्हाला पैसे मिळतात. हे ट्रम्प यांना माहीत आहे. त्यामुळे येन केन प्रकारेण चमकणे हाच त्यांचा कार्यक्रम असतो. अध्यक्षपदादाची निवडणूकही ते केवळ प्रसिद्धी मिळते, म्हणूनच लढवत होते. आपण निवडून येणार नाही, याची त्यांना खात्री होती आणि बोल्टनसारख्यांनाही वाटत होते की ट्रम्प हरतील. निवडून आल्यामुळे सरकारी खर्चात प्रसिद्धी मिळवणे त्याना शक्य झाले.

गंमत अशी की, हे सारे खुद्द ट्रम्पनी कधीच लपवून ठेवले नाही. संसद, न्यायव्यवस्था, लष्कर, प्रेस इत्यादी संस्था आपल्याला उध्वस्थ करायच्या आहेत, असे ते उघडपणे म्हणत होते. त्यांच्याकडे धोरण नाही, कार्यक्रम नाही, अभ्यास नाही, सतत काही तरी चमत्कारीक मते व्यक्त करत ते लोकांचे लक्ष वेधून घेतात. हे सारे माहीत असूनही, दिसत असूनही, हताश अशा मतांची एकी झाली आणि त्यानी ट्रम्पना निवडून दिले.

लोकशाही देशांनी धडा घ्यावा

निवडून आल्यावर चार वर्षात ट्रम्प यांनी काय केले, हे आता सारे जग आणि अमेरिका पहातेय. अमेरिकन लोकशाही खिळखिळी झालीय. जगभरच्या धटिंगणाना ट्रम्प यांच्यामुळे जीवदान मिळालेय. सुमारे शंभर वर्षाचे युरोपशी असलेले अमेरिकेचे सहकार्य नष्ट झाले आहे. जगाला एकत्र ठेवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटना, पर्यावरण रक्षण संघटना त्यांनी मोडायला घातल्या आहेत, खुद्द अमेरिका हा देशच विखंडीत करून नष्ट करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. यात अमेरिकेचे तर नुकसान त्यांनी केले आहे, पण जगातल्या क्षीण होत चाललेली  लोकशाही नष्ट करायचे ट्रम्पनी ठरवले आहे, असे वाटू लागले आहे.

येत्या नव्हेंबर महिन्यात, अमेरिकेत निवडणूक होणार आहे. काहीही करून त्या निवडणुकीत निवडून यायचेच असा ट्रम्प यांचा खटाटोप आहे. जो कोणी आड येईल, त्याला हेकलणे आणि हाकलणे ही त्यांची रणनीती आहे. लोकशाहीवादी माणसे विभागली असल्यानेच ट्रम्प निवडून येतात. खोटेपणा, अपप्रचार, भ्रमनिर्मिती इत्यादी बाबतीत हिटलरही छोटा ठरावा, असा धडाका ट्रम्पनी लावला आहे.

आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्ट करणारे जॉन बोल्टन यांचे हे पुस्तक सांगते की, लोकशाहीत जगणाऱ्या लोकांना आपण कोणाला निवडून देतो याचा विचार करावा लागणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया वापरून काही राजकीय नेते, लोकशाहीचे कसे तीन तेरा वाजवू शकतात, हे ट्रम्प यांनी दाखवून दिले आहे. खिळखिळीत होत चाललेल्या जगभरातील लोकशाही देशांनी यातून वेळीच योग्य तो धडा घ्यायला हवा.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Cahyo Prihadi

Cahyo Prihadi

Cahyo Prihadi Director of Monitoring and Evaluation Project Management Office of Kartu Prakerja Coordinating Ministry for Economic Affairs of the Republic of Indonesia

Read More +